शंभरावा ट्रेक कुठे करायचा हे निश्चित होतं. दोन वर्षापासून मनात घोळत असलेला "दातेगड"! 😍😍😍😍😍
गड बघण्याची कमालीची उत्कट इच्छा. "गड छोटा आणि प्रवास जास्त" हे गणित असतानाही.
सातारा-उंब्रज-पाटण वरून घेरादातेगड गावाच्या दिशेने निघालो. खरं तर टोळेवाडीचा रस्ता घ्यायचा होता पण आलो ते घेरादातेगड गावाच्या दिशेला. एका दृष्टीने बरच झालं. "सुंदरगड" लिहिलेली पाटी दिसली.
गाडी आत घेतली. कच्चा रस्ता. मुरूमाने भरलेला. अणकुचीदार दगड वाटेवर विखुरलेले. ड्रायव्हरने गाडी पुढे नेण्यास नकार दिला. पायी निघालो. गडाच्या पायथ्यापर्यंत हे अंतर साधारण चार किमी असेल.
ह्या मार्गावर एक विस्तीर्ण अखंड तटबंदी सदृश्य डोंगररांग दिसत होती. स्थानिक लोकांकडे चौकशी केली. विंझाई मातेचे मंदिर तिथे आहे एवढेच त्यांना सांगता आले.
दातेगडाकडे नेणारा पायवाट परिसर एकदम शांत आणि रम्य. विजेच्या तारेवर पक्षी हेलकावे घेत बसलेले. श्राईक पक्षी असावा. छोटे छोटे बरेच पक्षी तारेवर दिसून आले.
लालसर रंगाची पायवाट खूपच आकर्षक. वाटेवरचे बलाढ्य खडक नजरेत भरणारे. डोंगररांगेच्या पायथ्याशी घनदाट हिरवीगार झाडी. वाऱ्याच्या झुळूक आली की उन्हाचा तडाखाही शीतलता देणारा.
साधारण तीन किमी पायपीट केल्यावर एक फलक दिसला. डावीकडची पायवाट गडाकडे जाणारी तर उजवीकडची गावाकडे.
डावीकडे एक-दीड किमी चाललो. गडझेंडा लांबून दिसला.
गड पायथा आला. गाड्या इथपर्यंत येतात. इथून पाच मिनिटाची चढाई केली की आपण गडावर. वाटलं बरं झाल चार किमी चालत आलो. नाहीतर शंभरावा "ट्रेक" म्हणता आला नसता.
गडमाथा एकदम आटोपशीर! सूटसुटीत! गडावर आलो आणि डावीकडे दगडात खोदलेली एक खिडकी वजा अवशेष दिसले. गुहामुख सदृश्य.
थोडे पुढे गेल्यावर गड माथ्यावर फडकणारा भगवा झेंडा दिसला.
ऐकेठिकाणी खाली काहीतरी पायरीवजा आहे असे वाटून तिथे आलो.
समोरचे दृश्य पाहून मी थबकले. स्तिमित झाले. अचंबित झाले. शब्द फुटेना. नजर हटेना. २०-२५ दगडी कातळ पायऱ्या खोलवर आत गेलेल्या. पायऱ्यांच्या पायथ्याशी तिथे शेंदूर अर्चित महाकाय गणेशमूर्ती! गडमाथ्यावरून दिसणारे हे दृश केवळ अलौकिक!
इतके गड/किल्ले झाले पण असं प्रसन्न करणार, पावले आणि नजरेला खिळवून ठेवणार दृश्य कोणत्या गडावर बघितल नव्हत. दातेगड बघण्याची इतकी उत्कट इच्छा का होती ह्याची कारणमीमांसाच झाली. गडाची कदाचित हीच ती रचना जिने प्रचंड ओढ निर्माण केली होती.
एक एक पायरी उतरत जावी तशी गणेशमूर्ती अधिकाअधिक आकर्षक, सुस्पष्ट आणि महाकाय होत गेली.....
थोड्या अधिक पायऱ्या खाली आलो तर उजवीकडे हनुमान प्रतिमा. तिकोना-विसापूर किल्ल्यावरील हनुमान प्रतिमेची स्मरण करून देणारी.
डावीकडे किल्ल्याच्या महादरवाज्याचे अवशेष. डावीकडील भग्नावस्थेतील दरवाजा, कोनाडे यांचे अवशेष. दरवाज्यातून दिसणारा नितांत सुंदर गावपरिसर. पश्चिम मुखी दरवाजातून थंडावा देणारा वारा.
इतकी सुंदर गडरचना लाभलेला हा दातेगड! छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणूनच गडाच नाव "सुंदरगड" ठेवल असावं.
सर्व पायऱ्या उतरल्यावर छोटासा जणू गाभारा. गडतटबंदीत कोरलेल्या देवतेच्या प्रतिमा. तपकिरी-काळसर गडरंगाच्या पार्श्वभूमीवर ह्या शेंदूर अर्चित प्रतिमा अत्यंत आकर्षक. नजर खिळवून ठेवणाऱ्या.
हनुमान प्रतिमा पश्चिम मुखी तर गणेश प्रतिमा पूर्वमुखी! सूर्योदय किरण अर्चना गणेशासाठी. सूर्यास्त किरण अर्चना हनुमानासाठी!
शंभरावा ट्रेक इथे विधिलिखित का असावा ह्याच उत्तर मिळाल. आंतरिक समाधान, दैवी आशीर्वाद तर मिळालेच परंतु पुढच्या शंभरीचा श्री. गणेशा इथून झाला ह्या विचाराने अंतरंग फुलून आले.
पायऱ्या चढून पुन्हा गडमाथ्यावर येऊन गडफेरी सुरु केली. अजून एक आश्चर्यचकित करणारी गडरचना आमची वाट पाहत होती. गडवैशिष्ट्यापैकी एक! जिच्या दर्शनासाठी गडभटके येतात. बरोबर ओळखलतं. "तलवार विहिर"! तलवारीचा आकार लाभलेली कातळात खोदलेली विहीर!
साधारण पन्नास एक दगडी पायऱ्या. भूगर्भात गेलेल्या.
एका बाजूच्या पायऱ्या जास्त उंचीच्या तर एका बाजूच्या कमी उंचीच्या.पायऱ्यांची अगदी ठळक रचना. असे का असावे हा प्रश्न मनात आलाच.
विहिरीच्या कड्यावर दगडात कोरलेले ह्स्तीशिल्प. गडमाथ्यावरून हे शिल्प अगदी स्पष्ट दिसते.
पायऱ्यावर उभे राहून खाली पहिले की कमळगडावरील कावेच्या विहिरीची आठवण येते. समान रचना, समान कातळकडा, कातळकड्यावरील समान वनस्पती, समान गारवा.....
पायऱ्या उतरताना डावीकडे शिवलिंग आणि नंदी चे अवशेष.
इतक्या खोल विहिरीत महादेवाचे मंदिर का असावे हा प्रश्न पडलाच.
विहिरीत खाली उतरून आकाशाकडे पाहिल्यास तलवारीचा आकार स्पष्ट नजरेस येतो.
गडमाथ्यावर उकाडा. विहिरीत कमालीचा गारवा.
गेरूचे प्रमाण सुद्धा असावे. उन्हाळ्यात विहीर कोरडी असताना येऊन पाहणे ह्या रचनेची अधिक जास्त कल्पना देणारी असेल.
विहिरीतून गडमाथ्यावर आल्यावर समोर तीन पाण्याची टाकी.
बस्स. इतकाच गडपरिसर.
गडउतार करून चार किमी चालून ट्रेक पूर्ण.
असा हा छोटासा सुबक "दंतगिरी"! एक वेगळेपण जपणारा गड!
शंभराव्या ट्रेकच्या निमित्ताने, प्र. के. घाणेकर लिखीत "लेणी महाराष्ट्राची" हे पुस्तक कौतुक भेट स्वरूप मिळाले.
राहुल, प्रशांत, सिद्धी आणि ओंकार माझ्या शंभराव्या ट्रेकचे सोबती झाले.
परतीच्या प्रवासात वाई च्या गणपती दर्शनाने माझ्या "डबल सेंच्युरी" कडील वाटचालीला जणू मनोबल लाभले.
शंभरी आणि दातेगडाचे मनोरथ पूर्ण दोन्ही साध्य झाल्याचे समाधान मिळाले.
शंभरी आणि दातेगडाचे मनोरथ पूर्ण दोन्ही साध्य झाल्याचे समाधान मिळाले.
मनात घोळत असलेला "दातेगड" मनपटलावर कोरला गेल्याचे समाधान गडावरून घेऊन आले!
संदेश पाठवून अभिनंदनाचा वर्षाव झाला.
भेटूच पुढच्या शंभरीत......💖💖💖💖
भेटूच पुढच्या शंभरीत......💖💖💖💖