नांदगिरी चे तपोलेणे: एक चित्त थरारक अनुभव, १८ ऑगस्ट २०१९

जानेवारी  २०१९ वर्षारंभी  अनेक संकल्प केले. त्यातील एक होता, आजपर्यंत न केलेले  ट्रेक्स करणे. "नांदगिरी किल्ला" म्हणूनच माझ्यासाठी संकल्प सिद्धीस नेणारा ट्रेक! 

नवीन किल्ला आणि गिरीप्रेमी टीम! गिरीप्रेमी संस्थेचे एक संस्थापक मा. जयंत तुळपुळे सर, गिर्यारोहणातील एक्सपीडीशनचे अनेक रेकॉर्ड्स नावावर असणारा, आशिष माने, उमदा ट्रेकर आणि वनस्पतींची इंतय्मभूत माहितीगार सुयश मोकाशी आणि  गार्डियन गिरीप्रेमी इंस्टीटयूट ऑफ माउंटनिअरिंग चा कोऑर्डीनेटर दिनेश कोतकर!

आम्ही साधारण ३० जण सकाळी ६.३० ला पुण्यातून निघालो. गिरीप्रेमी टीम सोडली तर बाकीचे सारेच अनोळखी ."अळीमिळी गुप चिळी"अशी अवस्था माझी सुरुवातीला झाली. 

सातारा रोडवरील एका हॉटेल मधे नाश्ता झाल्यावर जोशी विहीर फाटा अर्थात भुईंज पोलीस स्टेशन लगतच्या रोडला गाडीने वळण घेतलं. हलकासा गार वारा, चोहीकडे हिरवळ दाटलेली, दूर डोंगरावर ढग विसावलेले, श्रावणधारा बरसत नसल्या तरी काळेमेघ आणि फिरून पडणारे ऊन ह्यांची लपाछपी सुरु होती. 

गाडीच्या खिडकीतून दिसणारं ग्रामीण दर्शन केवळ अलभ्य! मनस्पर्शी शाळेची इमारत, काही सुंदरसे बंगले तर काही छोटी कौलारू घरे, घराभोवती डुलणारी फुलझाडे, वाऱ्यावर हलणारे दोरीवरचे ओले कपडे,  अंगणात विश्रांती घेत असलेल्या कासोट्याची साडी नेसलेल्या आजी, मोकळ्या मैदानात खेळणारी मुले, उघडण्याच्या प्रतीक्षेतील दुकाने.....

एकामागून एकेक गाव मागे पडत गेल....

नांदगिरी अर्थात धुमाळवाडीच्या शाळेच्या पटांगणात गाडी थांबल्यावर मी भानावर आले.

पावसाचे दिवस म्हणून रेनकोट, जास्तीचा कपड्याचा सेट सोबत आणलेला. तो एका बॅॅगेत वेगळा काढून गाडीतच ठेवला. पाण्याची बाटली, टॉर्च, ट्रेकिंग स्टीक इ. अत्यावश्यक सामान सोबत घेऊन गाडीउतार झाले.

समोर सुंदरसा नांदगिरी किल्ला दिसला.दिनेश ने गिरीप्रेमीच्या इतर तीन मेंबर ची ओळख करून दिली. आशिष ने नांदगिरी किल्ल्याची माहिती दिली.सातारा गॅॅझिटीयर मधे उल्लेख केल्यानुसार नांदगिरी किल्ला उर्फ  कल्याणगड हा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात वसलेला शंभू महादेव रागेतील किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून ३५३७ फुट उंचीवर असणारा हा किल्ला शिलाहार राजा भोज २ याने ११ ते १२ व्या शतकात बांधला असावा.  १६७३ मधे साताऱ्यातील अन्य किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या (१७२० ते १७४०) कारकिर्दीपर्यंत किल्ल्याचा कारभार प्रतिनिधी यांच्याकडे सुपूर्द होता. मराठ्यांच्या शेवटच्या युद्धात, एप्रिल १८१८ मधे किल्ला जनरल प्रीझलर ने ब्रिटीशांच्या ताब्यात घेतला. शिलाहार राजाने जैन धर्मियांना अनेक दानधर्म केले. किल्ल्यावरील ३० ते ४० मी. लांब लेणी अर्थात पार्श्वनाथ गुफा मंदिर त्याची साक्ष मानली जाते.

किल्ल्याची माहिती ऐकून किल्ला आणि गुफा/लेणी पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली.

शाळेपासून अर्धा किमी सपाट अंतर चालून गेल्यावर किल्ल्याची चढाई सुरु झाली. बरेच ठिकाणी दगडी पायऱ्या.


चढाई सोपी पण किंचित अंगावर येणारी. हवामानामुळे चढताना किंचित धाप लागत होती. पाण्यासाठी थोडे थांबत चढाई सुरु होती. पाऊस आणि उन्हामुळे मातीचा घसारा दबला गेलेला. त्या भागात अति पर्जन्य वृष्टी नसल्याने निसरडे अनुभवास आले नाही.

दूर डोंगरावर पवनचक्की दिसल्या.


चढण्याच्या वाटेवरील उमललेली सुंदर फुले पाहत, फोटो काढत चढाई सुरु होती.

रानतीळ


कानपेट


शिंडे/कचरी

पोपटी

भारंगी

रानतेरडा

आहेत न सुरेख फुले...या सुंदर फुलांमुळे किल्ल्याचे सौंदर्य खुलते आणि किल्ल्यावरील अवशेषांमुळे इतिहास!

साधारण पाऊण तासाच्या चढाई नंतर पाण्याचे एक खांब टाके दिसले. चार खांबावर उभे. डावीकडे हनुमानाची प्रतिमा कोरलेली. आतील खांबावर मनुष्यसदृश्य प्रतिमा कोरलेली.  डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याचे थेंब टाक्यात पडत होते.ठराविक अंतराने वरून टाक्यात पडणारे पाण्याची थेंबधार म्हणजे निव्वळ डोळासुख!किल्ला अजूनही बराच चढायचा बाकी होता. दुरून किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज दिसत होता.महाराष्ट्र माउंटनिअर्स रेस्क्यू कोऑर्डीनेशन सेंटर  (MMRCC) चा गिरीप्रेमी संस्थेने लावलेला फलक दिसला.किल्ल्याची तटबंदी जवळ आलेली पाहून हुरूप आला. लागलेली धाप केव्हाच कमी झाली होती. किल्ल्याच्या या बाजूचा फोटो काढायला तर हवाच होता....तटबंदी जवळ आले. डाव्या बाजूला किल्ल्यावर जायला रेलिंग ची जोड असलेल्या दगडी पायऱ्या.


आधी उजवीकडे गेले. समोर कातळात खोदलेल्या एक विस्तीर्ण गुहा.


कोणीतरी तिथे शंकराची मूर्ती ठेवलेली.


धुमाळवाडीतून एक रस्ता इथपर्यंत येतो. दुचाकीच नाही तर जीप इथपर्यंत येते. पोलीस खात्यातील एक इन्स्पेक्टर धुमाळवाडीचे ग्रामस्थ. त्यांनी सांगितले की कल्याणगडावर पवनचक्की उभारायची होती. ग्रामस्थांनी विरोध केला. समोरच्या डोंगरावर पवनचक्की उभारायला संमती दिली. धुमाळवाडी पासून कल्याणगडावर येणारा रस्ता करून घेतला.

इथून जैन मंदिराकडे जाण्याचा मार्ग दाखवणारी खुण आहे..


किल्ल्यावर जाण्यासाठी उजवीकडच्या दगडी पायऱ्या चढायला सुरुवात केली.समोर किल्ल्याचा दरवाजा दिसला. दरवाज्याला लोखंडी दार! एका बाजूला फिरता दरवाजा (Revolving door). नक्षीदार दरवाजा आणि फिरते गेट छान दिसत होते. एक प्रश्न मनात आला. नांदगिरी उर्फ कल्याणगड तसा आडवाटेवरचा किल्ला! इतर काही किल्ल्याच्या तुलनेत फारसा राबता नसलेला. अशा परिस्थितीत इथे फिरता दरवाजा का लावला असेल?


दरवाज्यातून आत गेल्यावर बाहेरील सुंदर हरित निसर्ग फोटोत टिपताना हर्ष अनुभवला.दरवाज्यातून आत वळताना समोरच मंदिराकडे जाण्याची खुण दिसली. डावीकडे वळल्यावर एक खोली होती. खोली समोर लेणी अर्थात गुफामंदिराकडे जाण्याचा मार्ग!मार्गावर उजवीकडे नंदीशिल्प आणि छोट शिवमंदिर!श्री. १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन गुफा मंदिर अर्थात लेणीत खाली जायला खाली काही पायऱ्या दिसल्या.पादत्राणे आणि सॅॅक बाहेरच ठेवली. टॉर्च हातात घेतला. आशिष आणि काही जण आधी पाहणी करून आले. "पाणी खूपच थंड आहे. पोटापर्यंत पाणी आहे. मोबाईल वरच ठेवा." असे ते बोलताना मी ऐकले. "ह्यांच्या पोटापर्यंत पाणी म्हणजे मी तर डुबूनच जाणार "असा विचार मनात आला. लेणीत तर जाणे शक्य नाही, आलेच आहे इथपर्यंत तर लेणीच्या मुखापर्यंत जाऊन पहावे असा विचार केला.


मुखापर्यंत पायऱ्यांवर पाणी होते. समोर नजर टाकली तर फक्त अंधार. काहीच दिसत नव्हते.लेणीच्या मुखावरच भयाने ग्रासल. लेणी मधे जाणं तर फार म्हणजे फार लांबची गोष्ट. त्यात भर म्हणून कोणी सांगितलेले आठवले की इथे मधमाशांचे पोळे आहे.  खल्लास! ......काल्पनिक भीती अजून दाट झाली. कोणीतरी आवाज दिला, "या मॅॅडम, खाली या". माहित नाही कशी आणि कधी पण दोन पायऱ्या खाली उतरले. "पाणी थंड आहे" ह्याची प्रचीती आली. बापरे......पाणी इतके प्रचंड थंडगार होते की माझा श्वास वर गेला. छाती फुगून उंचावली. दात एकमेकावर घासून चर्र आवाज आला. अंग शहारल. सरसरून काटा आला. त्या पायरी वरच माझ्या निम्म्या छातीपर्यंत पाणी होतं. समोर काळाकुट्ट अंधार. एक क्षणच त्या पायरीवर असेन. थंड पाण्याने काकडलेले. "मला नाही जायच" म्हणत वर आले. आधीच पाण्याची भीती. कधी धबधब्याखाली सुद्धा न भिजलेली मी. चक्क थंड पाण्यात निम्म्या छातीपर्यंत भिजले. लेणी मुखाजवळ उभ्या असलेल्या दिनेशला "मी आत जाणार नाही" असं नि:क्षून सांगितल. माझी प्रतिक्रिया पाहून दिनेश आणि आशिष ने "चला, आम्ही आहोत" असा दिलासा दिला. पोलीस खात्यातील ते गृहस्थ आणि आमच्यातील १-२ जणांनी आग्रह केला. भय अधिक गडद झालेले. आतील पाण्याच्या पातळीचा अंदाज येईना. माझी पाच फुटापेक्षा कमी उंची. मी पूर्ण पाण्याखाली जाणार. भरीत भर चष्मा. तो पडला तर भयानक वांदे होणार. एका क्षणात काय काय विचारांनी मनाला घेरलं.  लेणीच्या काठावर ही भयभीत अवस्था! ३० मी लांबलचक लेणीत गेल्यावर काय होईल? .दिनेश ने पुन्हा दिलासा दिला. आशिष ने आधारासाठी हात पुढे केला. ह्या दोघांचे हे जेस्चर पाहून स्वत:शी एकच संवाद झाला, "सविता, हाच तो क्षण..हीच ती वेळ. आता नाही तर पुन्हा नाही". निश्चयाने जागा घेतली. परत पुन्हा दोन पायऱ्या खाली उतरले. हातातली टॉर्च ऑन केली. मी दोन पावले पुढे गेले. तिथून लेणीच्या विस्ताराचा अंदाज येत नव्हता. पाण्याच्या पातळीचा अंदाज येत नव्हता. मी फक्त एकच करू शकत होते की पायाखालच्या जमिनीचा अंदाज घेऊन पुढे पाऊल टाकणे. सुदैवाने लेणीच्या सुरुवातीच्या छताला माझा हात अगदी सहज पोहोचत होता. एका ठिकाणी फक्त डोके झुकवावे लागले. डाव्या हातात टॉर्च आणि उजव्या हाताने लेणीच्या छताचा आधार घेत पाऊल टाकू लागले. आधी दोन -तीन जण आत असल्याने प्रकाश बऱ्यापैकी पसरला होता. भय हे होते की पायाखाली खड्डा वैगैरे तर नाही ना. सपाट जमीन आहे ना. आणखी काही पावले पुढे गेले. आता माझे धाबे दणाणले. कारण इथे छताला माझा हात पोहोचत नव्हता. पाणी गळ्यापर्यंत. चेहरा तो काय पाण्याच्या वर होता. मी पाण्यात मधोमध विनाआधार. लोकांची हालचाल झाली की पाण्याच्या लहरी वेगाने यायच्या त्या माझ्या हनुवटीपर्यंत. तेवढ्यात आवाज आला, "मॅॅडम उजवीकडे सरका. तिथे रेलिंग आहे". पाण्याच्या लहरींच्या वेगावर मी हेलकावे घेतेय. आमच्यापैकी एकाने मला हाताचा आधार दिला. रेलिंग जवळ आले. तेव्हा दिनेश आणि आशिष देखील आले. इथून आता लेणीचा विस्तार दिसत होता. किती प्रचंड विस्तीर्ण लेणी! पाण्याचे तुडूंब भरल्याने तर अधिकच लांबलचक वाटत होती. मी आता हळूहळू पुढे गेली. चारही बाजूला पाहिलं तर पूर्णपणे बंदिस्त लेणी. इवलासा उजेड आत येत नव्हता.माझ्या उंचीएवढी तिची उंची. मधल्या भागात थोडी उंची जास्त होती. आलेल्या सर्वजणांना कमरेत पूर्ण वाकावे लागत होते. मी उभीच्या उभी आत जाऊ शकत होते. एवढाच काय तो उंचीचा फायदा झाला. थोडे पुढे गेल्यावर खुद्द तुळपुळे सरांनीच हाताचा आधार दिला. पोलीस खात्यातील ते गृहस्थ पुढे असल्याने त्यांनी लेणी किती मोठी आहे ते दाखवल. मधोमध छत उंच असणाऱ्या लेणीच्या इतर चार बाजू मात्र उंचीला कमी होत्या. लेणीच्या समोरच्या टोकाला उजवीकडे १००८ व्या पार्श्वनाथांची तपोवस्थेतील काळ्या पाषाणातील मूर्ती. एक छोट मंदिरच खरतर. मंदिराला लोखंडी चौकट. साधारण नवव्या शतकात हे मंदिर बांधले असावे असा कयास. पार्श्वनाथांचे मंदिर, एक दीक्षा स्थान, एक तपोस्थान! लेणीत दत्तात्रेयाची संगमरवरी मूर्ती आणि देवीची मूर्ती. पार्श्वनाथांची मूर्ती तर अर्ध्यापेक्षा जात पाण्याखाली होती. दत्तात्रेयाची मूर्ती दिसल्यावर तर मुखातून "गुरु ब्रम्हा गुरु विष्णू..." श्लोक बाहेर आला. अद्भुत लेणी. वर्षभर पाणी राहत असणारच. बाराही महिने बहुधा टॉर्च घेऊनच लेणीत जावे लागत असावे. परतीच्या वाटेवर तुळपुळे सर सोबत होते. हळूहळू पाउले टाकत लेणी च्या मुखद्वारातून बाहेर आले. क्षणभर तिथेच थांबले. त्याक्षणी आतापर्यंत न जाणवलेली हृदयाची धडधड जाणवली. हृदयाची स्पंदने स्थिर होईपर्यंत तिथेच थांबले. चित्त वास्तवात यायला किंचित वेळ गेला.ओलीचिंब भिजेलेली परंतु थंडीने कुडकुडले नव्हते.  एक जाणीव ही देखील झाली की पाण्याची थंडाई आतापर्यंत मला जाणवलीच नव्हती. असे होते बरेचदा. स्विमिंग पूल मधे पहिल्यांदा पाणी खूप गार वाटते, गार पाण्याने आंघोळ करताना काही तांबे थंडगार वाटून हुडहुडी भरते इ. माझे तसेच झाले. पहिल्यांदा पाण्याची थंडगार तीव्रता कमालीची जाणवली. विचार करताना एक वाटले माझ्याबाबतीत इथे "भय" महत्वाचे होते. भयाची जागा जेव्हा "अभया" ने घेतली तेव्हा  पाण्याचा स्पर्शाची थंड वा नरम अवस्था मला जाणवलीच नाही!

"डर के आगे जीत है" अशी जाहिरात लागते. हो, माझ्याबाबत इथे जीत नक्कीच होती, पण त्याहीपेक्षा जास्त एक शिकवण होती! जीत क्षणभराची, शिकवण आयुष्यभराची! " आत्ता नाही तर पुन्हा नाही" असा विचार न करता मी माघार घेतली असती तर माझी क्षमता, लेणी पाहणे, गळ्यापर्यंतच्या पाण्यात हेलकावे घेण्याचा थरार (माझ्या उंचीमुळे त्यात भर पडली) इ गोष्टी तर झाल्या नसत्याच परंतु "सुरक्षित साहस" ही खेळी मी कधी अनुभवलीच नसती. लेणीत  गेल्यावर साखळी करून, एकमेकांना सहकार्य करत , दिलासा देत पुढे जाण्यामधे "ऊबुंटु" ही भावना हृदयापर्यंत पोहोचलीच नसती.  "ऊबुंटु"! जगप्रसिद्ध आफ्रिकन नेते नेल्सन मंडेला यांनी जगाला दिलेला एक सुंदर शब्द! मानवता आणि करुणा यांचा संदेश. अर्थ आहे "मी आहे कारण आपण आहोत"!


दिनेश, आशिष, तुळपुळे सर यांच्या जेस्चर मधून हेच जाणवत होते की की साहस /धाडस नक्कीच आहे. पण ते सुरक्षित आहे"!

चित्त थरारून टाकणारा हा प्रसंग आत्ता लिहिताना मी घेतलेल्या पहिल्या धाडसाची आठवण होतेय, ड्युक्स नोज पिक वर केलेलं रप्लिंग आणि व्हली क्रॉसिंग! असो.

पायऱ्या चढून खोलीजवळ आल्यावर लेणी दिसेल असा सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. जमला नाही. खालील फोटो आशिष ने काढला! फोटोत मागे लेणीची जागा मला हवी तशी !लेणीतील थरारक अनुभव सोबत घेत पुढील किल्ला पाहण्यासाठी निघालो. किल्ल्याचा दुसरा दरवाजा..ह्या दुसऱ्या दरवाजाच्या आतून फोटो..


उजवीकडे फार सुंदर  चपेटदान मारुती  चे मंदिर लागले.मंदिराला वळसा घालून गडमाथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या..काही पाणतळी दिसली. पाण्याचा उपसा होत नसल्याने तळी शेवाळलेली.वाटेवर फुलेलेला रानतेरडा आणि इतर काही रानफुलांनी किल्ल्याचा माथा जणू दरवळलेला.गडमाथ्यावरून जरंडेश्वराचा डोंगर दिसला.


गडमाथ्यावरून दिसणारा सृष्टीचा नजरा..


हा नजारा डोळ्यात साठवताना  श्री. सुधीर फडके यांच्या "तेजोमय नादब्रम्ह"  या आल्बममधील श्री. प्रवीण दवणे यांनी लिहिलेले आणि आरती-अंकलीकर-टिकेकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेल्या  गीतातील काही ओळी आठवल्या...

सृष्टीचा देव्हारा, दरवळला गाभारा
सर्व दिशा कांचनमय, पवन मंद मंगलमय
आरतीत तेजाच्या विश्व दंग हे....

किल्ल्यावर गणेशमंदिर, श्री रामदासस्वामीचे शिष्य कल्याणस्वामींची समाधी आणि  पीराचे स्थान आहे. किल्ल्यावर दगडात कोरलेल्या तलवारीची एक सुंदर प्रतिमा आहे.सर्व पाहून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. साधारण एक तासात गडउतार झालो. जेवण करून संध्याकाळी साडेसात वाजता पुण्यात आलो.

नंदिगिरी किल्ला! बरं झालं न गेले ते. एक "चित्तथरारक" आणि  एक "सुरक्षित साहस" अनुभव सोबत घेऊन आले!

शेवटी काय हो, आठवणीच मागे राहतात ....नाही सोबत येतात!

पुन्हा भेटूच!

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

फोटो आभार: ट्रेक टीम

खास आभार:  श्री. जयंत तुळपुळे सर, आशिष माने, दिनेश कोतकर, सुयश मोकाशी आणि संपूर्ण ट्रेक टीम


3 comments:

उमेश झिरपे said...

खूपच छान वर्णन केले आहे..
उमेश झिरपे

Savita Kanade said...

Thank you so much sir!

ॐकार केळकर said...

मस्त अनुभव. फोटोही मस्त. लिहीत रहा :)