निसटलेले शिल्पक्षण ओंजळीत आले..@ सोमेश्वर मंदिर, पिंपरी दुमाला

पिंपरी दुमाला! लिहिताना किंचित थबकले! मागे १९९४-९५ सालात गेले. कामानिमित्ताने खूप वेळा या गावी गेलेले. "पिंपरी धुमाळ"! पांढऱ्या रंगाच्या फलकावर काळ्या अक्षरात लिहिलेली गावाच्या नावाची पाटी अजूनही डोळ्यासमोर आहे. ह्या पिंपरी गावात 'धुमाळ' आडनावाचे जास्तीत जास्त लोकं वास्तव्यास आहेत म्हणून गावाचे नाव पिंपरी धुमाळ! संशोधन कामानिमित्ताने कितीतरी वेळा आणि कितीतरी लोकांच्या पूर्ण नावात आडनाव धुमाळ लिहिल्याचे आजही स्मरणात आहे. 

आज २०१९ साली गावात गेले. गावच नाव झालय "पिंपरी दुमाला"! सोमेश्वर मंदिराच्या कमानीवर हेच नाव पाहिलं आणि पुन्हा थबकले! काय असेल हा नाव बदलाचा प्रवास? कितीतरी कारणे डोक्यात चमकून गेली. धुमाळ नावाच्या इंग्लिश स्पेलिंग आणि उच्चाराची तर ही कमाल नाही? .कारणांचा आज मी फक्त अंदाजच बांधू शकते. महत्वाचं हे की नाव लिहिण्यातील  बदल लोकांनी स्वीकारला आहे. गुगुल महाराजांनी सुध्दा स्वीकारला आहे. धुमाळ हे नाव कुठेतरी लुप्त झाल आहे. ९४-९५ साली कागदोपत्रावर पिंपरी धुमाळ असं लिहिणारे लोकं आज पिंपरी दुमाला लिहित असतील....अक्षर/नाव/उच्चारबदलाचा हा प्रवास जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. ....तूर्तास इतकेच!

श्री. क्षेत्र रांजणगाव गणपती गावापासून आता हे गाव आहे अगदी हाकेच्या अंतरावर! ३-४ किमी अंतरावर. श्री. क्षेत्र रांजणगाव येथे आहे "महागणपती देवस्थान"!  श्री. क्षेत्र पिंपरी दुमाला  इथे आहे "सोमेश्वर देवस्थान"! नजर स्थिरावणाऱ्या असंख्य  शिल्पांनी नटलेले शिवमंदिर...

९४-९५ साली गावात दिवसा गेलो तर उंबरे बंद . सर्व लोकं शेतात कामाला गेलेले. काही वृद्ध आणि लहानगे दिसले तर दिसले. आमच्या कामाचा टाईम मग संध्याकाळी सात नंतर. रात्री कामाशिवाय अवांतर बोलायला वेळ नसायचा की काही बघायला. जो थोडाफार संवाद व्हायचा त्यात ह्या प्राचीन मंदिराचा कधी उल्लेख आला नाही.  एका शिवमंदिरापेक्षा  मंदिराच्या शिल्पसमृद्धतेची ओळख रहिवाशी लोकांना कितपत असेल आता सांगता येत नाही.

श्री. क्षेत्र रांजणगाव चा महागणपती अष्टविनायकापैकी एक म्हणून त्याची महती पंचक्रोशीतच काय पूर्ण महाराष्ट्रात!

पिंपरी धुमाळ चे पिंपरी दुमाला जसे झाले तसेच "श्री क्षेत्र" पिंपरी दुमाला कधी झाले हा प्रवास नक्कीच रुचीपूर्ण असेल. जाणून घेईल नक्कीच केव्हातरी!

तूर्तास ह्या मंदिराची शिल्पकला पाहण्याची उत्सुकता कमानीतून आत घेऊन जात आहे....



कमानीतून किती सुरेख दिसले मंदिर. नंदीमंडप आणि कळस  भडक रंगवलेला. मंदिराच्या आवारात फरशी. कितीही नको म्हटल तरी विचार आलाच की ९४-९५ साली हे मंदिर पाहिलं असतं तर ...किंवा त्यांनतर केव्हातरी......

कमानीतून आत गेल्यावर मंदिरावर कोरलेली शिल्प अधिक ठळक झाली..शिल्प पाहण्याची, ओळखण्याची उत्सुकता अधिक वाढली.......


नंदींमंडपातील दोन नंदी शिल्प पाहून तर मी चकितच झाले. ...


फोटो फ्रेम मधे काय याव आणि ती कशी सुरेख दिसू शकते हे आता किंचित जमू लागल्याने मंदिराच्या अंतराळातून नंदी मंडप क्लिक केला. (अर्थात गर्भगृहातून बाहेर आल्यावर)


मंदिराचे मुख्यद्वार जरा निरखून पाहू लागले. दरवाज्यावरील शेंदूर अर्चित  गणेश प्रतिमा उठून दिसली.


गणेशपट्टीवर कोरीव नक्षी..जणू मंगल तोरण! जणू देवकोष्ठ कोरलेले!

द्वारशाखेच्या पायथ्याला लयबध्द अवस्थेतील, प्रसन्न, स्वागतोत्सुक शिवगण!

प्रवेशद्वारातून दिसणारा स्तंभ युक्त सभामंडप. स्तंभ रंगवलेले.


सभामंडप नक्षीदार स्तभांनी सजलेला आहे. स्तंभावर काही प्रसंग कोरलेले आहेत..

वाली-सुग्रीव युध्द प्रसंग.. मंदिरावर कोणते प्रसंग कोरायचे, तेच प्रसंग का कोरले यासारखे प्रश्न डोक्यात आलेच.


एका शिल्पामध्ये तीन पुरुष दाखवले आहेत आणि चार पाय दाखवले आहेत...एक काल्पनिक शिल्प. मधल्या शिल्पाचे दोन्ही पाय दाखवले आहेत तर बाजूच्या शिल्पांचा एक पाय. एक अद्भुत शिल्प. काय विचार असेल , काय कल्पना असेल ह्याचा मी फक्त विचार करू शकते.



स्तंभावर डावीकडे काही वादक दिसत आहे. एकाच्या हातात मृदंग आहे.


अंतराळात प्रवेश करण्यापूर्वीचे हे देखणे कोरीव स्तंभ.


गर्भगृहाची सुशोभित कोरीव द्वारशाखा...


द्वारशाखावर दोन्ही बाजूला खाली काही शिवगण कोरले आहेत..डावीकडील द्वारशाखा...


उजवीकडील द्वारशाखा..


द्वारशाखेच्या पट्टीवरील नक्षीकाम..

डावीकडील..


उजवीकडील


गर्भगृहातील सोमेश्वर..


अंतराळातील  गणेश आणि विष्णू प्रतिमा ..


दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मंदिराच्या बाह्यभागावरील शिल्पे..

डाव्या बाजूकडील ..


ह्या भागावर नर्तिका, ऋषी, गणेश, महावीर , विष्णू यांच्या प्रतिमा आहेत.

उजव्या बाजूकडील..


इथे सूरसुंदरी असून मधेच वीरगळ बसवलेला दिसतोय.

मंदिराला डावीकडून प्रदक्षिणा घालत असताना दिसलेली काही शिल्पे/शिल्पपट


डावीकडून पहिल्या तीन आणि शेवटच्या दोन सूरसुंदरी वाटत आहेत. चौथी शिल्प कावड घेतलेल्या पुरुषाचे आहे. पाचवे बाळाला जन्म देत असलेली स्त्री अर्थात लज्जागौरी चे अप्रतिम शिल्प.

भैरव शिल्प.


नंदीवर बसलेला शिव


दर्पणसुंदरी


वरील फोटोत उजवीकडून दुसरी दर्पण सुंदरी आहे. तिच्या शेजारील शिल्पात सुंदरी ने हातात नाग पकडला आहे. त्याच्या शेजारील सुंदरीच्या (मधली) एका हातात आंब्याच्या मोहरा तद्वत काहीतरी असून दुसऱ्या हातात एखादे बीज असल्यासारखे दिसत आहे.

घंटा वाजवणारा पुरूष आणि मर्कट - सुंदरी


डावीकडून दुसरे शिल्प घंटी वाजवणाऱ्या पुरुषाचे असून चौथ्या शिल्पात सुंदरी ला छळणारा मर्कट दिसत आहे. सुंदरीचा अविर्भाव मर्कटाला चापट देण्यासारखा आहे.

चामुंडा अवतार शिल्प



प्रेतावर उभी चामुंडा. शरीराचा सापळा झालेला...हातात कवटी..गळ्यात कवट्यांची माळ....

छातीशी बाळाला धरून उभी सुंदरी. हे शिल्प मला खास आवडले ते सुंदरीच्या /मातेच्या चेहऱ्यावरील हावभावा मुळे. किती वात्स्ल्यपुर्ती स्वरूप हावभाव आहेत. बाळाच्या डोके हनुवटीवर टेकून बाळाच्या माथ्याचा पापा घेणारे हे प्रेमळ हावभाव!


गणेश, नागप्रतिमा आणि  साधक



मंदिराच्या मागे विष्णू, वराह आणि मत्स्य शिल्प ठेवली आहेत.



मंदिराच्या मागील बाजूस असणारी पुष्करिणी..



लज्जागौरी, चामुंडा, साधक-ऋषी, भैरव, नंदीवर बसलेला शिव इ. आगळ्या वेगळ्या एकत्रित शिल्पकृतींनी सजलेले सोमेश्वर मंदिर....तेराव्या किंवा चौदाव्या शतकात यादवकालीन राजवट संपुष्टात येत असताना हे मंदिर बांधले असावे असा कयास बांधला जातो.


१९९४ आणि २०१९ सालातील  स्मृतीवर हिंदोळा भावनिक स्थित्यंतरे समाधानासोबत किंचित सल देऊन गेली. गाव पाहण्याची इच्छा वेळेअभावी राहून गेली, ९४ साली मंदिर पाहता आल नाही इ. इ. आज मंदिर नावारूपाला येण्याचा आणि  मंदिर आणि शिल्पकला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहीचत गेली असेल ह्या प्रवासाची ही उत्सुकता परतीच्या प्रवासात साथीला आली.

ह्या वारसा सहलीच्या निमित्ताने मन ९४-९५ सालात गेले.१९९४ साली निसटून गेलेले काही शिल्पक्षण आणि अनुभूती २०१९ साली ह्या सहलीच्या निमित्ताने ओंजळीत आले हे ही नसे थोडके!

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

फिरस्ती महाराष्ट्राची, पुणे तर्फे दिनांक २८ जुलै रोजी ही वारसा सहल आयोजित केली.
खास आभार: शंतनू परांजपे आणि अनुराग वैद्य

No comments: