एक टप्पा आऊट @ कोथळीगड, २५ ऑगस्ट २०१९

काही दिवसांपूर्वीच माझा एक ट्रेकमेट कोथळीगड ट्रेक करून आला. त्याने ट्रेकची कल्पना मला दिली होती. आंबिवली ते पेठ साधारण दीड तास चालायचे आणि पुढे साधारण पाउण तासाची गड चढाई!

खरं सागायचं तर मी ट्रेक करण्याआधी गुगल सर्च कधीच मारत नाही. ट्रेकचा अनुभव, त्याच्याकडे पाहण्याची -अनुभवण्याची दृष्टी माझी असावी या विचाराने. अन्यथा बायस होण्याची दाट शक्यता.

कधी नव्हे ते यावेळी गुगलवरचे व्हिडीओज पाहिले. दोन गोष्टींनी भुरळ पाडली, एक वलयाकृती दगडी पायऱ्या


आणि गुहेतील खांबावरची शिल्पकला!



व्हिडीओ पाहताना ब्लॉग साठी शीर्षक सुचलं. लगेचच ब्लॉगर वर जाऊन सुचलेल्या शीर्षकाखाली ब्लॉग ड्राफ्ट सेव्ह केला! किती ही उत्सुकता!

मागच्याच रविवारी नांदगिरी ट्रेक केलेला. एक मन जाऊ नकोस सांगत होत तर दुसरं मन भुरळ पाडलेल्या गोष्टींकडे ओढ घेत होतं. थकावट देणारा ट्रेक असला तरी मी करेन ह्याची खात्री होती.

आम्ही गिरीप्रेमी टीम सकाळी ६.३० वा. पुण्यातून निघालो. गिरीप्रेमी संस्थेसोबत ट्रेक करणे म्हणजे खासकरून Time Management आणि Overall Management याचे धडे गिरवणे. गाडी तर वेळेवर येतेच. ट्रेकमंडळी सुद्धा वेळेवर हजर!

पुणे-मुंबई एक्स्प्रेस मार्गापासुनच पावसाच्या हलक्याशा सरी पडत होत्या. लोणावळा तर धुक्यातच!  चौक  फाट्यावर नाश्ता करून कर्जत-मुरबाड रोडने गाडी आंबिवली गावाकडे निघाली. रस्त्याच्या दुतर्फा रानगवतांची रेलचेल. ओल्या मातीच्या सुगंधात ओल्या रानगवताच्या पान-फुलांचा मंद सुगंध दरवळलेला. ताजेतवान करणार किंचित कुंद वातावरण!

साधारण दहाच्या सुमारास गाडी आंबिवली मधे पोहोचली. अंकितने गिरीप्रेमी टीमची ओळख करून दिली. सव्वा दहा वाजता ट्रेक सुरु!

समारंभाला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सुवासिक अत्तराचा शिडकावा करून व्हावे तसे आमचे स्वागत पावसाच्या एका जोरदार सरीने झाले. ट्रेक सुरु झाला. पाउस रुपी अत्तर शिडकाव्या नंतर नीलकंठ नामक फुलांचा पुष्पवर्षाव!

नीलकंठ, कुर्डू, मोतीयन, कळलावी, भारंगी, रानहळद....कितीतरी सुंदर फुले गडवाटेवर बहरलेली!








फुलांच्या ताटव्यात एक सुंदरसे फुलपाखरू . फोटो घेईपर्यंत "स्टॅॅच्यु" अवस्थेत!



गडवाट म्हणजे दगडमातीचा कच्चा रस्ता. दुचाकी तर हमखास जाणार. काही अंतरापर्यंत चारचाकी वाहन देखील जाईल असा रस्ता. वळणावळणाचा चढाई हळूहळू वाढत जाणारा रस्ता.



उन्हाचा चटका ग्रासत होता. त्यात कोकणभाग. हुमिडीटी वाढलेली. पांणी पिण्याचे ब्रेक घेत घेत चढाई सुरु होती.

साधारण एका तासाच्या चढाईने गडवाटेच्या मध्यावर आलो. किती सुंदर दिसला कोथळीगड इथून. खोल दरी. पलीकडे काळ्या मेघामध्ये लपलेला कोथळीगड!



माझ्या लहानपणी, रॉकेल स्टोव्ह मधे भरायला आई प्लास्टिक च एक नरसाळ वापरायची. गडाचा आकार पाहताक्षणी ते नरसाळ डोळ्यासमोर आल. नरसाळ उलट ठेवल तर कसं दिसेल तसा आकार कोथळीगडाचा! गोलाकार बाजू खाली आणि नळीसारखा भाग वरती!

थोड पुढे आल्यावर गडाकडे पहिले. वृक्षांनी जणू गडाला कुंपणाकृती संरक्षण दिलेले.!



गडवाट खरंतर गडाच्या पायथ्याच्या पेठ गावचा रस्ता आता बऱ्यापैकी सपाट झालेला. ह्युमिडीटी आणि चटके देणाऱ्या उन्हामुळे थकवा वाढलेला. कधी एकदा गाव येतय अस वाटत होत.

पेठ गावात पोहोचलो तेव्हा साडे-बारा वाजत आलेले. गावातून गडाची व्याप्ती ध्यानात आली.



एका घरी क्षणभर विसाव्यासाठी थांबलो. माझ्यातले त्राण जणू संपलेले. घराच्या ओसरीवर मी चक्क अंग टेकवले. डोळे मिटून पडून राहिले. दहा मिनिटाने मला बरं वाटलं. लिंबू-पाण्याचे दोन ग्लास पोटात उतरवले.

थकवा होताच. गडचढाई आत्ता सुरु होणार. अर्धा-पाउण तासाची चढाई आहे असं मी ऐकल. मनाशी विचार केला मला एक-सव्वा तास लागेल.

पंधरा-वीस मिनिटाचा विसावा घेऊन गडचढाई सुरु केली. वीस ते तीस टक्के चढले. एका चढाईवर डाव्या पायाला क्राम्प आला. गुडघ्यापासून खालचा भाग एकदम गोठून आला. एक जोराची कळ आली. पाय हलवता येईना. वेदना सहन होईना. गिरीप्रेमी टीमचे अमृत, अंकित, तुळपुळे सर आणि मॅॅडम तिथे होते. मॅॅडम ने चुटकीभर मीठ खायला दिल. अमृत आणि अंकित ने पायाचे व्यायाम केले. मसाज केला. पण वेदना थांबेना. अमृत ने वेदनाशामक स्प्रे फिरवला. क्षणाने अंकितच्या सांगण्यावरून उभी राहिले.  क्राम्प च्या गुठळीने पोटरीचा भागात घट्टपणा जाणवत होता.

पुढील ट्रेक न करण्याचा निर्णय घेतला. अमृत ने एका लिंबूपाण्याच्या ठेल्याजवळ आणून सोडलं. वेदनाशामक स्प्रे मुळे १५-२० मिनिटात मला बर वाटू लागल.

एक क्राम्प आणि एक टप्पा आऊट!

बरं वाटू लागल्यावर हळहळ वाटू लागली. दोन तासाचे अंतर आणि २०-३० टक्के गडचढाई करून ट्रेक अपूर्ण राहिला!

किती ती हळहळ..किती ती अस्वस्थता!

थोडं बरं वाटल्यावर "जाऊ का गडावर" असा विचारही मनात आला. ट्रेक पुन्हा पूर्ण करायचा तर ह्या सर्व थकवटीतून परत जाव लागणार हा विचारच अत्यंत क्लेशदायक होता.

क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी गायलेले एक गाणे थोडे थोडे आठवत होते...



एखादे एक्सिपीडीशन एखाद्या कारणाने अपूर्ण राहिल्यावर गिर्यारोह्क काय मानसिक स्थितीतून जात असेल ती भावना मी समजत होते-अनुभवत होते.

वास्तविकता किंवा वस्तुस्थिती स्विकारायला वेळ लागला. मनाशी होत असणारा झगडा निवळायला दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली. माझ्या ट्रेकमेट ला अनुभव सांगितल्यावर आणि ट्रेक पूर्ण करण्याची माझी इच्छा त्याला माहित असल्याने तो म्हणे, " मॅॅडम, आपण परत जावूयात. ट्रेक पूर्ण करू"! त्या दिलासात्मक शब्दांनी  मनातील धगधग शांत झाली.

कोथळीगड, भुरळ पडलेल्या वलयाकृती दगडी पायऱ्या आणि गुहेतील स्तंभावरची शिल्पकला पाहण्यासाठी अजून वाट पाहवी लागणार. असो.

गड तिथेच आहे. माझी इच्छाशक्ती कायम आहे.
"एक टप्पा आऊट"  तरी दुसरी खेळी बाकी आहे.
भुरळ पाडलेल्या पायऱ्या आणि शिल्पे डोळ्यासमोर आहे.

दोन-सव्वा दोनच्या सुमारास टीमची गडउतराई झाली. पेठ गावातून आंबिवलीमधे यायला जवळजवळ चार वाजले.

सुगरास भोजनाचा आनंद घेऊन साधारण पाच-सव्वा पाचच्या सुमारास पुण्याकडे गाडी निघाली.

गाडीच्या वेगाबरोबर दिवसाच्या आठवणीचा वेगही वाढला.

पुण्यातून निघण्याअगोदर तुळपुळे मॅॅडम सोबत रंगलेल्या Indology विषयावरील गप्पा, चौक फाट्यावरील हॉटेल मधील टेस्टी शिरा, अभिजित सरांनी नांदगिरी ट्रेक ब्लॉग मधे सुचवलेली दुरुस्ती आणि सांगितलेली निगडीत माहिती, आंबिवली ते पेठ चढाई मधे तुळपुळे दापंत्यासोबत झालेल्या गप्पा, गडवाटे वर तुळपुळे सरांनी दाखवलेले काही फुलझाडे, पदरगड, तुंगी शिखर, सिद्धगड, आहुपेघाट, भीमाशंकर पठार, गोरखगड आणि मच्छिंद्रगड यांची दिशा, ऐश्वर्याने गडवाटेच्या मध्यावर काढलेला माझा फोटो, ट्रेक मधील एका सरांनी कोथळीगडाचे काढलेले सुंदर पेंटिंग, काही ट्रेकमंडळींसोबत झालेल्या गप्पा, चविष्ट भोजन.....

कोथळीगडावरून दिसणारा पदरगड..



कोथळीगडावरून दिसणारा सिद्धगड..


आठवणींच्या शिदोरीचा आस्वाद घेत पुण्यात पोहोचलो. नऊ वाजता घरी पोहोचले.

दुसऱ्या दिवशी ट्रेकच्या आठवणीत एक कविता सुचली.त्या कवितेनेच (शीर्षक बदलाव्या लागणाऱ्या) ब्लॉग ची सांगता!



कोथळीगड ट्रेकचा "नॉट आऊट" अनुभव घेऊन येईनच परत भेटायला.......

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

खास आभार: अंकित सोहोनी,  श्री. जयंत तुळपुळे सर, श्री. अभिजित बेल्हेकर सर, तुळपुळे मॅॅडम, अमृत आणि गिरीप्रेमी टीम

फोटो आभार: ट्रेक टीम

3 comments:

Unknown said...

very well summarised

जयंत said...

उत्तम लिखाण. गोरक्ष आणि मच्छिंद्र गड येथून दिसत नाहीत. फक्त दिशा समजते. भीमाशंकर पठार दिसते.

जयंत said...

तसेच भीमाशंकर पठार दिसते. तुंग किल्ला नव्हे तुंगी शिखर.