जांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६




जांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६
जंगल, प्लॅटयू (पठार), पर्वत..सर्व काही एकाच ट्रेकमध्ये! 



ट्रेकर्सना फारसा माहित नसलेला एक नाविन्यपूर्ण ट्रेक! तेजस कडून ट्रेकची माहिती घेतली. तो म्हणे, “मॅडम, तुम्ही करणार...मला माहित आहे ना”....

तेजस आणि माझी ओळख अंधारबन ट्रेक दरम्यान झाली होती. त्याच्या अर्थात “मिस्टेरिअस रेंजर्स”  ह्या ट्रेक ग्रुपसोबत हा माझा पहिलाच ट्रेक होता. ह्या ट्रेकला शिव असणार होता. शिव हा ट्रेकिंगमधला माझा गुरु! त्यांमुळे मी निश्चिंत होते!


तेजसने ट्रेक सहभागींचा वॉटसअप वर गुप केला आणि त्यावर टाकलेल्या एका वाक्याने तेजसची एक झलक डोळ्यासमोरून तरळून गेली. त्या वाक्यानंतर  झालेल्या संवादाने मी अचंबित आणि निरुत्तरित झाले. तो संवाद असा होता............

असो. ठरल्याप्रमाणे रविवारी, १८ तारखेला संभाजी उद्यान येथून ६.३० वाजता निघालो. कामशेतला नाश्ता करून जांभिवली गावातून साधारण १०.३० वाजता ट्रेकला सुरुवात केली. ट्रेक सुरु होण्याआधी सहभागींची ओळख परेड झाली. शिव ने ट्रेक ची कल्पना दिली. किती पायी चालावं लागणार, कुठे टेकडी चढावी लागणार, किती ट्रेक जंगलातून (सावलीतून) आहे, किती ट्रेक उन्हातून आहे ई. सर्व सविस्तर त्याने सांगितलं. ट्रेकच्या मानसिक तयारीसाठी अशी माहिती खूप उपयुक्त ठरते. निदान माझ्यासाठी तरी!

आमच्या गाडीच्या ड्रायव्हरकाकांचा मुलगा, दिगंबर आमच्या सोबत ट्रेक करणार होता. ओळख परेडच्या वेळी तो मला म्हणे, “ तुमचे पाय दुखणार नाहीत का?”...

मी माझ्या पद्धतीने आणि वेगाने ट्रेकला सुरुवात केली. यावेळी सुरुवातीलाचं टोपी घातली आणि जॅकेटच्या कॉलरने मान झाकून घेतली. उद्देश हा की उन्हाचा त्रास होऊ नये. नेहमीप्रमाणे लिंबू सरबत सोबत होतचं!

ढाक बहिरी ट्रेकच्या दिशेने ट्रेक सुरु झाला. हा ट्रेक मी अगोदर केला असल्याने रस्ता माहितीचा होता. इथेच एक मध्यम टेकडी/छोटा पर्वत आहे जो पार केल्यानंतर ढाक बहिरी ट्रेकचा रस्ता सोडून भिवगड ट्रेकला रस्ता आहे. हा रस्ता घनदाट जंगलातून जातो. तेजस आणि टीमने पायलट ट्रेक केला असल्याने आणि त्यावेळी ह्या  मुलांनी नारंगी रंगाची रेडीयम पट्टी ठिकठिकाणी चिटकवल्याने जंगलातून वाट मिळत गेली. अन्यथा ही वाट लक्षात राहण केवळ अशक्य आहे!

जंगलाचं सौदर्य बघायचं तर हा ट्रेक जरूर करावा! उंचच्या उंच आणि हिरव्यागार पानांनी लगडलेली झाडे, झुकलेल्या आणि लोंबकाळलेल्या लहान-मोठ्या फांद्या, आडवी-तिडवी विखुरलेली झाडाची मुळे, सुकलेल्या पानांचा थरचं थर, मुळा-खोडावर उगवलेले मशरूम, वाळविंनी पोखरलेले झाडाची खोड, झाडांची जाळीदार पाने, मध्येचं लहान-मोठे खडक, विविध प्रकारची एकापेक्षा एक सरस अशी वैविध्यपूर्ण रानटी फुले! ... जमीन/पायवाट म्हणून दिसत नाही..... वासोटा, अंधारबन अशा कितीतरी जंगलापेक्षा अतिशय घनदाट असे हे जंगल!

जमिनीलगत आलेल्या झाडांच्या फांद्यामुळे झुकून चालणं, जमिनीवर आडव्या-तिडव्या झाडांच्या मुळात पाय अडकणार नाही याची खबरदारी घेत चालणं, सुकलेल्या पानांच्या जाडसर थरातून सपाट जमिनीचा अंदाज घेत पाय ठेवणं, लहान मोठे खडक हलत नाहीत ह्याची खात्री करणं, पुढची व्यक्ती दिसली नाही तर “बरोबर चाललोय ना” असं वाटतं राहणं........बापरे बाप! किती ही कसरत! जंगलाचं सौदर्य बघावं की खबरदारी घेत चालावं?

जंगल पार होत नाही तो घासदार पठार/मैदान/माळरान! तुरळक झाडे आणि गैर-हरित/वाळलेली गवते! दूरदूर पसरलेल्या ह्या वाळलेल्या गवताचं, स्वत:चं एक सौदर्य होत! काळेभोर खडक आणि काही हरित तर काही निष्पर्ण वृक्षांमधे ही पांढरट, फिकट पिवळी गवते रेखीव आणि उठून दिसत होती. उन्हाने ह्या गवताच्या काड्या चकाकत होत्या. जणू त्यांनाही स्वत:ची अशी एक “रुपेरी कडा” होती! ह्या चकचकीत आणि गुळगुळीत काड्या पायवाटभर पसरल्या होत्या. 

त्या काड्यांवरून चालताना पाय सटकत असला तरी एक जाणीव होत होती की बहरलेल्या हरितपर्णानंतर पानगळीत- गैरहरित पर्ण हा निसर्गाचाचं नियम आहे!

दुपारच्या जेवणानंतर तासाभरानंतर ट्रेक सुरु करणार तर पुढे जायची वाट सापडेना. शिव, तेजस सोबत इतर काही मुले वाटेच्या शोधार्थ इतरत्र पांगली. इकडून तिकडे-तिकडून इकडे वाट शोधण सुरु होत. पायवाटेत वाळलेलं गवत पसरल्याने वाट स्पष्ट दिसून येत नव्हती. ह्या मुलाची शोध मोहीम सुरु होती. “चकवा” “भूलभुलैय्या”..सारखे शब्द ऐकायला मिळत होते. रेडियम पट्टी ऐवजी झाडाला रिबन बांधावी का, ऑईल पेंट ने खुणा कराव्यात का, स्प्रे-पेंट वापरावा का इ. मार्ग समोर येत होते. चाकूने झाडामधे कोरून खुण करण्यापेक्षा कोणते उत्तम मार्ग असू शकतात ह्यावर चर्चा होत होती. जंगलात रहाव लागलं तर काय , परत मागे १० किमी जावं लागणार का, वॉकी-टॉकी असावी का ह्या गंभीर चर्चे पासून मधल्या वेळेत काही खेळ झाले तर काही जण वाळलेल्या गवतावर विश्रांतीसाठी सुखावले. 

नवीन नवीन ट्रेक मार्गांचा शोध तर घ्यायलाचं हवा, मग माणसाची सुरक्षितता महत्वाची कि जंगलाची? असा काही मार्ग आहे ज्याने माणूस सूरक्षित राहील आणि जंगलरुपी निसर्गाचं पूजन होईल? सुवासिनी वटवृक्षाला दोरा गुंडाळतात, “विश ट्री” संकल्पनेत रंगीत कपडा झाडाला प्रार्थना अथवा इच्छापुर्ती दयोतक म्हणून बांधला जातो. अशा प्रकारची भावना जोपासून घनदाट जंगलामधला मार्ग सुकर करता येईल का? चला विचार करूयात!

एका तासाच्या अथक परिश्रमानंतर मुलांना ढाक गावचे एक गृहस्थ भेटले. “बहिरी” या ढाकच्या देवाचे दर्शन करून ते परतत होते. त्यांच्यारूपाने जणू साक्षात ढाकचा देवचं मदतीला आला. ढाक गावात त्यांच्या घरी थोडे विसावलो. त्यांनी गारुआई मंदिरापर्यंत साथ केली आणि त्यांना धन्यवाद देत पुढचा ट्रेक सुरु झाला. ट्रेक मार्ग लक्षात ठेवण किती अद्भुत काम आहे ह्याची जाणीव झाली. खरं तर वाट जवळचं होती पण मिळत नव्हती. फोनला रेंज नव्हती. प्रसंग आलाचं असता तर संपर्काचे साधन नव्हते. दिवस मावळत जाईल तसं प्रसंगाचं गांभीर्य कदाचित जाणवलं असतं. ह्यावेळी प्रत्कर्षाने वाटले कि ट्रेकिंग मधे होणारी वाढ लक्षात घेता आणि त्यानिमित्ताने होणारे गड-किल्ल्यांचे संवर्धन लक्षात घेता बीएसएनएल सारख्या कंपनीने त्यांचे नेटवर्क अशा ठिकाणी मजबूत करावे. ट्रेकमध्ये वाट चुकलेल्या ट्रेकर्सना बाहेर येण्यासाठी जे ग्रुप लगेच धावून येतात त्यांना शतशः प्रणाम!

आता पूर्णत: उतार असल्याने काळजीपूर्वक चालावं लागत होतं. अजिंक्यने ह्या उतारावर माझी सोबत केली. भिवगडच्या पायथ्याशी आलो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. दिगंबर मला म्हणे, “ पाय दुखले नाहीत ना?”.  त्याला मी “दत्त महाराज” म्हणून संबोधत होते. पूज्य मार्गशीर्ष महिन्यात साक्षात “दत्त महाराज” ट्रेकला सोबत करत होते असं वाटलं!

सकाळी १०.३० ते ५.३० ह्या सात तासाच्या अथक ट्रेक नंतर सूर्यास्ताच्या मनोहर दर्शनाने जरा उभारी आली.

भिवगड बेसला पोहोचल्यावर शिव ने भिवगड विषयी माहिती दिली. साधारण ८०० फुट उंचीचा, चढायला सोपा, फारसा माहित नसलेला रायगड जिल्यातील, वडाप गावाजवळील हा एक गड! गडावर पाण्याचे टँक आहेत, गुहा आहे आणि जवळचं पाण्याचा धबधबा आहे. गड तसा छोटा पण अंधार झाल्याने आम्ही वडाप गावाकडे वाटचाल सुरु केली. हा पण खोल उतार. एका हातात काठी आणि एका हातात टॉर्च घेऊन उतरण कसोटीच झालं. आयुष्यात प्रथम कपाळावरून घामाचे थेंब गळत होते!

संध्याकाळी ७.३० च्या सुमारास वडाप गाव सोडले आणि रात्री १०.३० च्या दरम्यान पुण्यात पोहोचलो. ह्या संपूर्ण प्रवासात खूप जणांनी मला सोबत केली. मी एका नवीन ग्रुपसोबत ट्रेक करतेय असं वाटलचं नाही!

अश्रफने ट्रेक दरम्यानची माझी एक पोझ कॅमेऱ्यात कॅच केली. प्रत्येक ट्रेक मधे माझी ही पोझ असतेच असते पण ह्या ट्रेक मधे ती पहिल्यांदा कॅमेऱ्यात आली! थॅक्स अश्रफ!

ह्या ट्रेक मधे सुरुवाती पासून डोक्याला टोपी आणि मान झाकून घेण्याचा फायदा झाला. उन्हाचा त्रास झाला नाही. उन्हामुळे येणारा थकवा, घाम, पाणी-पाणी होणे, गरगरणे इ. ट्रेकमध्ये उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी मान कव्हर करून घेणे किती प्रभावी उपाय आहे ह्याचा अनुभव घेतला. थॅक्स टू विशाल! त्याने मेसेज केला “ मॅम, एक टीप द्यायची आहे फोन करू का?” ..फोनवर म्हणे, “ऊन वाढतयं मॅम..तर ट्रेकच्या वेळी मान झाकून घ्या. तसे केले तर एक तासाने लागणारी तहान दीड तासाने लागते” . ट्रेकिंग टिप्स देणाऱ्या प्रत्येकाचे ह्या निमित्ताने खूप खूप आभार!

शिव, माझा “ट्रेक गुरु”! त्याच्या सोबत ट्रेक करणं म्हणजे ट्रेकिंग कौशल्याने समृद्ध होणं! ती अनुभूती अद्भुतचं!

ह्या ट्रेकमुळे झालेली तेजसची ओळख ही लाखाची गोष्ट! ट्रेक वातावरण लाइव्हली/जिवंत ठेवणारा हा मुलगा! आनंद, उत्साह, जोश आणि उर्जा यांचा अनोखा संगम म्हणजे तेजस! त्याने सुरु केलेल्या “मिस्टेरिअस रेंजर्स” ट्रेकिंग ग्रुपला माझ्या लक्ष लक्ष शुभेच्छा!






















"M" for "Mysterious Rangers!"







२०+ किमी चा हा ढाक बेस ते भिवगड ट्रेक अनन्यसाधारण ट्रेक आहे. इथलं निसर्ग सौदर्य असाधारण आहे. लहान-मोठे डोंगर, घनदाट जंगल, काही ठिकाणी हिरवीगार झाडे तर काही ठिकाणी वाळलेली गवते, कधी सुंदर पायवाट तर कधी अरुंद बंधारा, काही ठिकाणी बेढब खडक तर काही ठिकाणी आखीव-रेखीव खडक, कधी लांबवर पसरलेलं शेत तर कधी पाण्याची छोटी डबकी, कधी पानांनी लगडलेली झाडे तर कधी निष्पर्ण वृक्ष, कधी मोहक फुलांची तर कधी कूसळाची साथ, कधी मृत खेकडे- विंचू, तर कधी सापाची कात, कधी अतिशय थंडावा तर कधी उन्हाचा तडाखा, कधी गावातलं टूमदार घर तर कधी शेताची शोभा वाढवणार मातेचं मंदिर!......

ह्यात नाईट ट्रेकची एक झलक मिळाली तर भारीच अनुभव!

घनदाट जंगल, विस्तीर्ण प्लॅटयू अर्थात पठार, पर्वत, पाण्याचे झरे ह्या सगळ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हा ट्रेक नक्की करावा!



२०१६ सालची सांगता भिवगड ट्रेकने झाली! २०१७ सालात असेच नवीन ट्रेक व्हावेत, नवीन सहकारी मिळावेत, जुनी नाती अधिकाधिक घट्ट होत जावीत, नवीन ट्रेक कौशल्य आत्मसात व्हावीत, स्वत:ची नवीन ओळख होत रहावी आणि माझे ट्रेकिंगचे अनुभव ब्लॉग रूपाने तुमच्यासमोर येत रहावेत हाच नवीन वर्षासाठी संकल्प!


२०१७ साल तुम्हा सर्वांना “फुल टू ट्रेक” जावो हीच ईश्वरेच्छा!



सर्व फोटो आभार : ट्रेक टीम

राजगड ट्रेक इव्हेंट फॉर आर्मी पब्लिक स्कूल, दिघी: १ ऑक्टोबर २०१६

राजगड  ट्रेक इव्हेंट फॉर आर्मी पब्लिक स्कूल, दिघी: १ ऑक्टोबर २०१६




आर्मी पब्लिक स्कूल मधील ११-१२ वी च्या १२२ मुला-मुलींना घेऊन राजगड ट्रेक!



त्यांच्या एक टीचर, स्वागतिका मॅडमने पुढाकार घेतला आणि विशाल, राहुल, आलेख, भगवान, प्रतीक, प्रशांत, ओंकार, विनीत, स्मिता, अनुप्रिता आणि मी......मुला-मुलींसोबत हा इव्हेंट कम ट्रेक करण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज झालो! इव्हेंट पूर्व मिटिंग झाली, सर्वांच्या आयडीयाज एकत्र आल्या. मुला-मुलींचे वय, त्यांची रुची, दृष्टीकोन इ. लक्षात घेऊन तयारी केली आणि इव्हेंटचा दिवस उजाडला!

ठरल्याप्रमाणे सकाळी ५.३० च्या दरम्यान आम्ही स्कूल मध्ये दाखल झालो. स्वागतिका मॅडम, आलेख, राहुल यांनी मुला-मुलींना ब्रीफ केलं, आवश्यक सूचना दिल्या, ठरल्याप्रमाणे गाडींना नंबर दिले, एस.जी. स्टीकर चिटकवले, मुलांना ओळीने गाडीत बसवले. गाडीत बसण्याअगोदर प्रत्येक मुला-मुलीला ब्रेकफास्ट दिला.....व्हेज सँडविच, एगलेस केक, कॅडबरी, केळी आणि अॅपी! मुलांची आवड लक्षात घेऊन निवडलेला हा ब्रेकफास्ट!...ग्रेट ना! मुले जाम खूष!

सात वाजता गाड्या निघाल्या. राहुल आणि प्रतीकसोबत मी गाडी नंबर ३ मध्ये होते. मुले-मुली स्थिरस्थावर झाल्यावर राहुल आणि प्रतीकने गाण्यांची अंताक्षरी सुरु केली. १५-२० मिनिटातचं लक्षात आले की अंताक्षरी मध्ये मुला-मुलींना रुची नाही! अंताक्षरी थांबली आणि मुलांना त्यांच्या पद्धतीने एन्जॉय करू दयायचे असे ठरले!

गाण्यांच्या अंताक्षरी नाही...मग मुला-मुलींचा रस होता कशात? मुला-मुलींचा रस होता मोबाईलमध्ये! प्रत्येकाने मोबाईल सुरु केला, हेडफोन कानाला लावला आणि गाणी ऐकायला सुरुवात केली! त्यांच्या त्यांच्या मध्ये गप्पा सुरु झाल्या! एकामागून एक जण येऊन गाडीतल्या स्पीकरवर प्रत्येकजण आपल्या आवडीचं गाणं वाजवू लागला! गाण्यावर डान्स सुरु झाला!

मी थोडी रेस्टलेस होत होते. ह्या मुला-मुलींना समजून घेण्यासाठी खरं तर मी ट्रेकला आले होते! एक सहभागी म्हणून! खुल्या मनाने! मुला-मुलींबाबत कोणताही पूर्वग्रह मनात न धरता! मुलींची संख्या जास्त होती म्हणून लेडीज कोआर्डीनेटर म्हणून आम्ही भूमिका ट्रेक दरम्यान निभावणार होतो! विशालने मला विचारलं तेव्हा मी म्हटलं, “मला यायला नक्कीचं आवडेलं....पण माझी कशी मदत होणार तुला?”.....विशालने काही टिपणी केली नाही....त्याची संमती आणि माझी उत्सुकता म्हणून मी या इव्हेंटला आले होते! आता मुला-मुलींना त्यांच्या पद्धतीने एन्जॉय करू देणं हा विचार योग्यचं होता, पण.....मी विचार केला असंच चालू राहिलं तर मी ह्या मुला-मुलींना समजून घेणार कसं? संवाद जरुरीचा आहे समजून घेण्यासाठी! ताडकन उठले आणि गाडीत मागे जाऊन प्रत्येक मुला-मुलीशी बोलायला सुरुवात केली!

९.३० च्या दरम्यान आम्ही राजगडाच्या पायथ्याला पोहोचलो! चोर दरवाज्याने आम्ही चढणार होतो आणि पाली मार्गे उतरणार होतो! मुला-मुलींना त्यांच्या फ्रेंडनुसार २५ जणांचा ग्रुप करायला सांगितला आणि असे ५ गट केले.
दोन मेल कोआर्डीनेटर असणाऱ्या गटात स्कूलची फिमेल टीचर ठेवली. पुन्हा एकदा ब्रिफिंग झाले, सूचना दिल्या आणि १०.३० वाजता ट्रेक सुरु केला! विशाल मला म्हणे, “मॅडम ट्रेक लीड करा”!
मी त्याला आणि स्मिताला जॉईन झाले! आम्ही लीड केलं आणि बाकी चार ग्रुप आमच्या पाठोपाठ! राजगडाच्या चोर दरवाज्याने चढून आम्ही १२.३० वाजता आम्ही पद्मावती माची वर पोहोचलो! गडावर ढगधुके भरून आले होते, वाऱ्याची थंड झुळूक वाहत होती, चहूकडे, सोनकी आणि गुलाबी तेरडा फुलला होता!
यावेळचं राजगडाचं सौदर्य खुपचं मनमोहक होतं! क्षणात गडावरचं वातावरण बदललं आणि पाऊस सुरु झाला! ठरल्याप्रमाणे आम्ही ग्रुपला घेऊन सुवेळा माची आणि संजीवनी माची ला घेऊन निघालो! 


ढगधुक्यामुळे राजगडाचं सौदर्य खुललं होतं. वारा इतका सुटला होता की थंडी वाजत होती! २.३० वाजता जेवण केलं आणि ४.१५ च्या दरम्यान पाली मार्गे उतरायला सुरुवात केली. पावसामुळे निसरड झालं होतं. खरंतर हा मार्ग तुलनेत उतरायला सोपा पण पावसामुळे कठीण झाला! काही जागा उतरायला इतक्या अवघड होत्या बस्स! कसा कुठून प्रशांत माझ्या मदतीला आला आणि एक अत्यंत अवघड पॅच त्याने पार करून दिला! मी स्वतंत्रपणे अत्यंत हळूवारपणे, एकाग्रतेने, कपडे चिखलाने बरबटताहेत ह्याचा विचार न करता आणि सूरक्षिततेचा विचार करून उतरण पूर्ण केली! मला अभिमान वाटतं होता की ही उतरण मी स्वतंत्रपणे आणि सूरक्षिततेने पूर्ण करू शकले! आलेख म्हणे, “ तुमचं आता असं झालयं कि ट्रेक तर काय मी अस्सा करेन..आधी मला निसर्गाचा आनंद घेऊदेत”.....

सर्व मुला-मुलींना उतरायला ७ वाजले. चहा घेऊन ७.३० ला पुण्याकडे परतीचा प्रवास सुरु केला आणि रात्री ११ वाजता मुला-मुलींना त्यांच्या शाळेत सोडलं!

कसा होता ह्या मुला-मुलींसोबत ट्रेकचा अनुभव? एका शब्दात सांगायचे तर हा अनुभव Eye Opening” होता!

जाताना गाडीत प्रत्येकाशी संवाद साधला. फक्त चार प्रश्न विचारले..... १. नाव २. कुठले खेळ खेळता/ फेवरेट गेम/स्पोर्ट कोणता ३. हॉबीज काय आहेत आणि ४. यापूर्वी ट्रेकिंग/हायकिंग केलं आहे का?

गाडीतल्या कोणीही यापूर्वी ट्रेकिंग/हायकिंग केलं नव्हतं, मुले-मुली बास्केट बॉल आणि फुटबॉल खेळतात, एका मुलीने कबड्डी तर एकीने टेबल टेनिस सांगितलं! एक मुलगा आणि एक मुलगी स्कूल लेवलला चॅम्पीयन होते आणि एकजण स्कूलचा सर्व स्पोर्टचा कॅपटन होता!

बहुतेक सर्वांनीच “म्युझिक ऐकणे” ही एक हॉबी सांगितली! म्युझिक म्हणजे “गाणी ऐकणे”! काही मुली सालसा शिकत होत्या! काहींना कुकिंग करायला आवडत होतं! एका मुलीला गाणं गायला आवडतं! तिने स्कूल प्रोग्राममध्ये गाणं गायलं देखील होतं! तिला गाण्यात करिअर करण्याची इच्छा आहे! एका मुलाला (रोह्न) देखील गायची आवड.
म्हटलं, “म्हणून दाखव”..म्हणे, “ मोबाईलवर ऐकता?” मी चाट! मला लगेच हेड फोन लावायला दिला आणि मी गाणं ऐकलं! मी परत एकदा चाट! प्रोफेशनल सिंगर गातोय असं वाटलं मला! इतकं सुंदर गायलं होतं गाणं! वाद्याचा आवाज पण गाण्यात! मी विचारलं, “ हे म्युझिक कुठून आलं” त्याने एका मुलाकडे उंगलीनिर्देश केला. म्हणे, “ गाण्यात त्याने गिटार वाजवलीय”! गिटारवाल्या मुलाशी (सुरज) बोलले. तो म्हणे, “ त्याचं गाणं आहे म्हणून मी आहे”! मी खरचं निशब्द झाले!.... एक मुलगा तर चक्क लॅपटॉप घेऊन आला होता आणि कुठलातरी गेम त्यावर खेळत होता! खूप मुलांनी सांगितलं कि मोबाईलवर गेम खेळायला आवडतात! एका मुलाने तर माझं लक्ष प्रथमचं वेधून घेतलं होतं! एकटाचं
मोबाईलवर काहीतरी पाहत होता! त्याच्या शेजारी पण कोणी बसलं नव्हतं! त्याच्याशी बोलण्याची वेळ आली. म्हणे, “हॅलो मॅम”..तो मोबाईल वर महेंद्रसिंग धोनी वरचा कालचं प्रदर्शित झालेला सिनेमा बघत होता! “आपके पास शेअरइट है, अभी आपको सेंड करता हुं”! माझ्या मोबाईलवर क्षणात “महेंद्रसिंग धोनी” हजर! हया मुलाच्या हॉबीज रीडिंग आणि सिनेमा पाहणं.. सॅक मधून पुस्तक काढून दाखवलं......महात्मा गांधीजींची ऑटोबायोग्राफी! त्याला आर्मी मध्येचं जायचयं आणि त्यादृष्टीने त्याची तयारी पण सुरु आहे. मला म्हणे, “Mam, I am not that much socialized”! मला ह्या मुलाचं कौतुकचं वाटलं. ते ह्यासाठी की हे वाक्य त्या मुलाने बोलून दाखवलं! Socialized नसंण हे त्याच्यासाठी Socialized असण्याइतकचं नॉर्मल होतं! त्याच्या वाक्याने मला विचारात पाडले.....ह्याला कारण हे १६-१७ वर्षाचं त्याचं वयं....की मोबाईलने अशा मुलांना Socialized होण्यापासून परावृत्त केलयं?.....एखाद्या व्यक्तीचा Socialized  नसण्याचा स्वभाव नकारात्मक का घ्यावा आपण? .....कुठपर्यंत तो नकारात्मक घ्यावा?.....कधी Socialized व्हायचं हे मुलांवरच सोडावं का?..... मला माझा काळ आठवतो..तेव्हा टीव्ही, मोबाईल नव्हते...विचलित करायला लावणारी एकचं गोष्ट होती......पुस्तके! पुस्तके वाचणारे पण तेव्हा Socialized नव्हते! पुस्तक वाचण्यातचं रममाण होत होते! पुस्तक वाचण्याला चांगल म्हणून लेबल लावल्या गेलं आणि आजच्या काळात मन विचलित करणाऱ्या मोबाईलला वाईट लेबल लागलं.....हा काळाचाचं परिणाम नाही का?

ह्या मुलांना बोलताना ऐकताना ते आपलेसे वाटले....इनोसंट वाटले....खुल्या मनाचे वाटले.....एक जाण असणारे वाटले........त्यांची स्वत:ची एक फिलोसॉफी आहे आणि त्याप्रमाणे ते वागताहेत!

हा, अॅटीट्युड वाले पण काही जण होते.....मुलींनी तर मेकअपचं साहित्य सोबत आणलं होतं, आय लाईनर, एकदम फॅन्सी मिरर, कंगवा इ. इ. सेल्फी काढण्याची क्रेझ......ओपन एरियामधे लू ला जायला मुली हेजीटेट होत होत्या. गावातलं टॉयलेट बघून सुरुवातीला थोड्या बिचकल्या!...... “अवघड आहे” असं मला देखील वाटलं. पण त्यांच्याशी केलेला संवाद आठवून हे ही वाटलं कि हल्लीच्या ह्या वयातील मुलांना एका नकारात्मक लेबल मध्ये गुंफण हा त्यांच्यावर अन्याय आहे!

ट्रेक दरम्यान टीचर खास करून फिमेल टीचर बरोबर ह्या मुला-मुलींचं नातं मी अनुभवत होते. दोघंपण एकदम खेळीमेळीत! पंजा खेळण्यापासून ते टीचरचे फोटो काढणे, त्यांच्यासोबत फोटो काढणे, चढताना, उतरताना त्यांना मदत करणे, गप्पा मारणे इ. शारीरिकचं काय मानसिक अंतरही दोघांमधे दिसून येत नव्हतं! नकळत माझा काळ मला आठवत होता आणि एकाचं निष्कर्षापाशी येऊन थांबत होते आणि तो म्हणजे काळाचा महिमा!

काही शिक्षकांचे काही शब्द खटकले...वाटलं ही मुले-मुली तर त्यांच्या वयानुसार वागणारचं आहेत...आपण बदलण गरजेचं आहे. आपला पेशन्स वाढवण गरजेचं आहे. काही गोष्टी आपण शिकण गरजेचं आहे!

ट्रेक दरम्यान काही मुंलींचे पाय दुखू लागले, पोट दुखू लागले, उलटी झाली, चक्कर येत होती, हिट स्ट्रोक चा त्रास झाला, पायाला क्रॅम्प आले! मुले तशी बऱ्यापैकी मॅनेज करू शकली! निसरड्या जागेवरून पण पळत होती! सांगाव लागायचं, “please don’t run…..go slow…..be safe”!

ट्रेक चढताना मुला-मुलींशी बोलत होते.

अजून किती वेळ? किती चढायचं बाकी आहे” असे प्रश्न सुरु होते.

एक मुलगी म्हणे, “एक वर्षाचं चालले मी”!

एक म्हणे, “मॅम, आमचे आई-वडील आर्मीत आहेत त्यांना exercise करताना पाहतो आम्ही.....आपणही करावं असं वाटतं पण शाळा, अभ्यास, क्लास हे करतानाचं दमून जातो. शाळा, क्लास घराजवळ, नाहीतर गाडी, रिक्षेने, सायकलवर जातो.......चालण्याची सवयचं नाही

गड चढताना काहींच्या कमेंट ऐकायला मिळाल्या... “अरे एक “युनिटी” फिल कर रहे हम”....एक म्हणतं होती, “पिअर्स का सपोर्ट मिल रहा है....अच्छा लग रहा है”......मुले देखील मुलींच्या मदतीसाठी थांबत होती, त्यांना मदत करत होती! ---ते पाहून वाटलं ट्रेकचा हा अर्थ तर ह्यांना गवसलाय अजून काय हवयं?

काही म्हणे, “आपने हमे इतना चढाया..यहा क्या देखने को है?”

माझी ट्रेकिंग स्टिक पाहून खूप जण म्हणे, “हमे भी ऐसा स्टिक देना चाहिये था”....म्हटलं, “आप १७ साल के हो और मै ४९ साल की... घुटने और बॅलंस के लिये है ”....

एकजणाने बोलताना मला “ आँटी” म्हणून संबोधलं... दुसरा लगेचं म्हणे, “don’t call her Aunty, say mam…be respectful

एकीला विचारलं, “कसा होता अनुभवं?”.... “बहोत बुरा था”.....सरळ सरळ थेट उत्तर...कौतुकास्पद वाटलं मला!

काही कमेंट अशाही ऐकायला मिळाल्या कि, “ टीचर हमे यहा क्यू लेकर आये..कोई दुसरी जगह नहीं मिली क्या?”

काही जणांना ट्रेक अनुभव भावला सुदधा! “बहोत एन्जॉय किया..मजा आया...बारीश और थंडी ने बुरा हाल किया..आदरवाईज वुई एन्जॉयड”!

संमिश्र प्रतिक्रिया होत्या! पण मला वाटतं होतं कि उद्या फेरविचार करताना, स्मरण करताना त्यांना केलेली गोष्ट साहसी वाटेल, थ्रिलिंग वाटेल!  ट्रेक आपण एन्जॉय केलाय ह्याची कल्पना येईल! तसं झालं देखील! स्वप्नील कडून फोटो आले, नंबर एकमेकात फिरला, चॅटिंग सुरु झालं.....रोहनने त्याने गायलेलं गाणं सेंड केलंफेसबुक रेक्वेस्ट आल्या... फेसबुक स्टेट्स अपडेट झालं.... “राजगड.....कुल वेदर....कुल फ्रेंड्स, फन, एन्जॉयमेंट, इ. असे पोस्टला हेडिंग आले.........सगळ एकदम सुपर फास्ट.....मला छान वाटतं होतं कि त्यांच्यामध्ये ह्या निमित्ताने ट्रेक आणि आमच्याबद्दल गप्पा होतायेत! ट्रेकची न्यूज इतर फ्रेंड्सपर्यंत पोहोचतीयं!  “आम्ही Track एन्जॉय केला” अशी प्रतिक्रिया येतीय!

बरेचजण प्रथमच ट्रेक करत होते, त्रासाला सामोरे जात होते,  निसरड्यावरून खूपजण घसरले, चिखलाने बरबटण त्यांना तितकसं रुचलं नाही पण त्यांनी ट्रेक पूर्ण केला!

जवळ जवळ ९५% मुले-मुली अमराठी आणि परप्रांतीय! त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नाही! ट्रेक बद्दलचे अज्ञान! असं वाटलं ह्या गोष्टींची ओळख करून देण्यात आपण तर कमी पडलो नाही ना? अर्थात विशालने खूप काही ठरवलं होतं पण अचानक आलेल्या पावसाने आणि प्रचंड थंडीने मुले पण थकून गेली होती, मुलांना भूक लागली होती, कधी एकदा घरी जातोय असं त्यांना झालं होतं, उतरण पण जीवावर आलं होतं....त्यामुळे ठरवलेल्या गोष्टी करताचं आल्या नाहीत! तरिही आमच्या परीने आम्ही काही गोष्टीं करण्याचा प्रयत्न केला!

माझ्या बाबत बोलायचं तर, ट्रेक दरम्यान मी ट्रेकिंग टिप्स देत होते. माझे अनुभव शेअर करत होते. गड चढण्यासाठी मोटीव्हेट करत होते, काही गोष्टी सांगून त्यांच्या वेदनापासून क्षणभर त्यांना दूर नेत होते.....राजगडाचा इतिहास, गडावर काय बघायचे, कोणत्या गोष्टींचा आनंद घ्यायचा....गड का महत्वाचे, त्यांचे जतन का करावे, फुले का तोडू नये इ. बऱ्याच गोष्टी सांगत होते..... मुले-मुली मला विचारत होती, “आपकी एज क्या है? कितने साल से आप ट्रेक करते हो? ट्रेक क्यों करते हो? अबतक कितने ट्रेक किये?”......माझे अनुभव ऐकुन खूप जण प्रभावित झाले. कितीतरी जणांनी “हॅटस अप टू यू मॅम”! हे बोलून दाखवलं! त्यांच्या एक टीचर म्हणे, “आपको देखकर चढने की प्रेरणा मिल रही है”!

मला वाटलं होतं माझी काय मदत होणार? पण ट्रेक दरम्यान मला जाणवलं की एस. जी. मेम्बर्स ने मला जे शिकवलं ते मी ह्या मुला-मुलींना सांगू शकले......ट्रेकिंग टिप्स देऊ शकले...त्यांना मोटिव्हेट करू शकले...कळत नकळतं गड चढण्याची प्रेरणा मी बनू शकले! एका मुलीला उन्हाचा त्रास होतं होता तर आलेख ने चक्क माझी परीक्षा घेतली. म्हणे, “आप बताओगे हो क्या करना है?”...माथेरान ट्रेक मध्ये त्याने जे सांगितलं होतं ते सगळं त्या मुलीला मी सांगितलं आणि माझ्या सांगण्यानुसार तिने तसं केल्यावर तिला खरचं फरक जाणवला!

मुला-मुलींसोबतचा हा अनुभव “Eye Opener मी अशासाठी म्हटलं कि ह्या मुलं-मुलींना समजून घेताना मला “समज” आली! ही मुलं-मुली जशी आहेत तशी त्यांना स्वीकारण्याची समज!

हा इव्हेंट कम ट्रेक कमालीचा यशस्वी झाला! या अर्थाने कि काही अनुचित घटना घडली नाही. मुला-मुलींनी आणि त्यांच्या शिक्षकांनी छान सहकार्य केले! खरंतर १२२ पालकांनी त्यांच्या मुलां-मुलींना ट्रेकला पाठवलं ह्यातचं त्यांच कौतुक आणि आभार! आर्मी पब्लिक स्कूल आणि स्वागतिका मॅडमचे खास आभार! एस. जी. ट्रेकर्सवर विश्वास दाखवून हा इव्हेंट स्कूलने त्यांना करायला दिला ही एस.जी साठी अभिमानाचीचं गोष्ट आहे!

दोन लीडर्सने २५ जणांचा ग्रुप मॅनेज करणं ही सोपी गोष्ट नाही. बरेचदा असं होतं कि एक गोष्ट चुकीची झाली तर चांगल्या केलेल्या १०० गोष्टींवर पाणी पडल्या जातं त्यामळे एकचं काय अर्धी गोष्ट पण चुकीची होऊ न देणं ह्याची खूप मोठी जबाबदारी आमच्यावर होती! मुलांच्या सूरक्षिततेसाठी वेळप्रसंगी कठोर राहणं आवश्यकचं असलं तरीही मुलांच्या मनात लीडर्स, ट्रेक आणि एस. जी. ट्रेकर्सची प्रतिमा उंचावलेली ठेवण ही तारेवरची कसरत होती! हे सर्व होण्यासाठी सर्व लीडर्सने अथक प्रयत्न केले आणि म्हणूनचं मनापासून आभार, एस. जी च्या सर्व लीडर्सचे....विशाल, राहुल, आलेख, भगवान, प्रतीक, प्रशांत, ओंकार, विनीत, स्मिता, अनुप्रिता... मला स्वत:ला तर स्वत:चा अभिमानचं वाटतं होता! एस.जी च्या लीडर्सने जे मला शिकवलं आणि मी आत्मसात केलं ते मी ट्रेक दरम्यान राबवू शकले!

विशेष आभार ह्या १२२ मुला-मुलींचे! माझ्याशी संवाद साधल्याबद्दल, आम्हा लीडर्सना सहकार्य केल्याबद्दल आणि हा ट्रेक इव्हेंट यशस्वी केल्याबद्दल!



माथेरान ट्रेक व्हाया वन ट्री हिल पॉइंट, २५ ऑक्टोबर २०१५




पुणे-कर्जत-आंबेवाडी मार्गे माथेरान ट्रेक हा लक्षात राहिलेला ट्रेक आहे तो दोन कारणांसाठी! 

एक कारण हे होते कि माझी मैत्रीण सबा हिचा हा पहिलाच ट्रेक होता आणि दुसरे कारण, आलेख प्रजापती ह्या ट्रेक लीडरची आम्ही अनुभवलेली लीडरशिप!


माथेरान हे मुंबई जवळील एक हिल स्टेशन आहे. साधारणतः ८०० मी. उंचावरच्या या ठिकाणी  २५ च्यावर पॉइंट आहेत आणि त्यातील एक आहे वन ट्री हिल पॉइंट! माथेरान हे इको सेन्सिटिव्ह रिजन असल्याने प्रदूषणरहित ठिकाण आहे. 

आम्ही सकाळी ६.३० च्या लोकलने निघालो आणि कर्जतला  साधारणत: ८.८०-९  ला पोहोचलो. तिथून जीपने आंबेवाडी! आंबेवाडी हे ह्या ट्रेक चे बेस व्हिलेज आहे. गावातूनच ट्रेकचा रस्ता जातो.



इथे राहणारे आदिवासी लोक बाजारासाठी माथेरानला ह्याचं मार्गाने जातात. 

आम्ही ट्रेक १०-१०.३० च्या सुमारास सुरु केला. आंबेवाडीतून बाहेर निघाल्यावर सुरुवातीलाचं डोंगराची चढण आहे.  भयानक ऊन आणि ह्युमीडीटी यामुळे चढण चढताना नाकीनऊ येत होते. घामाच्या धारामुळे थकायला होत. खरंतर जवळचं मोरबे धरणाचं पाणी दिसत होतं तरिही हवेत थंडावा नव्हता. सबाला तर चालवतचं नव्हतं. परत फिरायची भाषा ती करत होती. बसली कि बसूनचं राहत होती.  ती टेकडी पार करून जंगलात शिरायलाचं आम्हाला एक ते दीड तास लागला. आलेख आमच्या सोबत होता. त्याच्या मदतीसाठी मयूर बोरोळे हा ट्रेक सहभागी थांबला होता. सबाची नकारात्मक भूमिका पाहून त्यावेळी आलेख ने तिचा ट्रेक पूर्ण करण्याचं आव्हानचं स्वीकारलं. त्याने सबाला इतकं समजावून सांगत, शांत आणि संयमाने मोटीव्हेट केलं कि ते पाहून मी चकित झाले. ट्रेक सुरु केला कि तो पूर्ण करण हाच एक पर्याय असतो विशेषत: तेव्हा कि परतीचा मार्ग दुसरा असतो. पहिला एक-दीड तास आलेखने सबाने ट्रेक करण्यासाठी इतके प्रयत्न केले कि एका क्षणी आलेख म्हणे,  "आता ती ट्रेक पूर्ण करेल." त्याच्या म्हणण्याप्रमाणे एक-दीड तासाने सबा स्वतंत्रपणे ट्रेक करू लागली! तिच्यातला बदल हा पाहण्यासारखा होता आणि तो परिणाम केवळ आलेखमुळे दिसून येत होता!

आलेख तेव्हा इंग्लिश भाषा बोलण्यास जास्त कम्फर्टेबल होता. त्याचं सगळं मोटीव्हेशन इंग्लिशमधून चाललेलं होत.  ट्रेकिंगवर तो वाचतं असणा-या पुस्तकातील काही उदाहरणे त्याने दिली. एव्हरेस्ट एक्सपीडीशन मधील ट्रेकर्सचे अनुभव सांगितले, प्रथमचं ट्रेक करत असणाऱ्या व्यक्तीने काय करावे, कोणते व्यायाम करावे, स्टॅमीना कसा वाढवावा ह्याबद्दल खूप सखोल मार्गदर्शन केलं. ह्या ट्रेक मधे उन्ह आणि घामामुळे दमछाक झाली होती. एका ठिकाणी पाण्याचा मोठा झरा होता. आलेखने आम्हाला तिथ थांबवलं आणि शरीराच्या कुठल्या भागावर पाणी मारलं कि शरीर थंड होतं, थंडावा मिळतो आणि ऊन बाधत नाही हे त्याने सांगितलं. उदा. कानाच्या मागे, कानाच्या पाळ्या, मान, माथा, डोळे, चेहरा इ. त्याचं स्पष्टीकरण लाॅजिकल वाटतं होतं, पटत होतं. त्याचं दांडग वाचन, ते इंग्लीश मधून सांगणं खूप जबरदस्त होत! 

आलेखपुढचं आव्हान इथेचं संपलं नाही. आता मला त्रास व्हायला लागला होता. थोडं चाललं कि दम लागत होता आणि थकवा जाणवतं होता. आता घनदाट जंगलाचा भाग संपून एक भला मोठा राॅक पॅच सुरु झाला होता. छोटे-मोठे, उभे-आडवे-तिरपे कसेही विखुरलेले दगड. दगड एकमेकात इतके घट्ट रोवलेले होते कि दगडावर पाय स्थिर होण्यासाठी खाचा नव्हत्या आणि दोन दगडांच्या कपारीत पाय बसत नव्हता. त्यात माझ्या पायाला क्रम्प आला . तो इतका जबरदस्त होता कि पोट-यांचा भाग टणक झाला होता आणि एक तीव्र कळ येत होती. काही क्षण मला काहीच सुधरले नाही. आलेख ने पायाला मसाज केला आणि पायाची एक विशीष्ट हालचाल केली, पायाचे काही सोपे व्यायाम करायला सांगितले. जवळजवळ १५-२० मिनिटाने मला बरं वाटायला लागलं. पाणी पिल्यानंतर परत ट्रेक सुरु केला.

आमचा साधारण १५ जणांचा ग्रुप होता. बाकीचे विशालसोबत पुढे गेलेले,
सबा पण पुढे गेलेली. मी आणि आलेखचं मागे राहिलेलो. पण ह्या मुलाने घाई केली नाही किंवा सगळे पुढे गेलेत आपल्यालाही जायला हवं अशाप्रकारे दडपण माझ्यावर आणलं नाही. मी जोपर्यंत चालण्यासाठी ठीक होत नाही तोपर्यंत हा मुलगा झटतं होता. गप्पा मारून काहीवेळा लक्ष विचलित करत होता. भला मोठा तो राॅक पॅच पार केला आणि हसून आलेखने माझं आणि सबाचं अभिनंदन केलं. आम्हाला थोडावेळ विश्रांतीचा सल्ला दिला.


वन ट्री हिल पॉइंट,ला पोहोचलो आणि मुसळधार पाऊस आला. त्या पावसाने थकवा तर क्षणांत गेलाचं पण शरीराला थंडावा मिळाला! वन ट्री हिल पॉइंट हा म्हणजे सभोवताली असणाऱ्या घनदाट जगंलात मधोमध एक भला मोठा वृक्ष आहे! त्याची मुळे आणि खोड अजस्त्र आहे. ह्या वृक्षामुळे जमिनीवर कितीतरी मोठ्या प्रमाणात सावली मिळते आणि बसणा-यांना शीतलता मिळते! 

ह्या ट्रेकमध्ये एक ट्रेक लीडर कसा असावा ह्याचं उदाहरण आलेखच्या रूपाने मी बघत होते. ट्रेक चा लीडर किती महत्वाची व्यक्ती असते आणि ती काय कायापालट करू शकते ह्याचं आलेख सारख दुसरं उदाहरण तोपर्यंत मी पाहिलेलं नव्हतं!
ह्या ट्रेक मुळे आलेख आणि माझ्यातला बाँड खूप बलवान झाला. आजही आम्ही भेटलो कि ह्या ट्रेकची आठवण काढतो! मला वाटतं आलेख हा एक कारण आहे ज्याची लीडरशिप आणि मोटिव्हेशन आठवून मी विशाल आणि एस. जी. बरोबरचे नंतरचे ट्रेक केले आणि एव्हरेस्टचं स्वप्न बघितलं! 

ह्या ट्रेक खूप काही धडे देऊन गेला. विशेषत: माझ्यासारख्या पन्नाशीला आलेल्या मुलीने काय करावे ह्याचं हा ट्रेक उदाहरण होता. उदा. रोज थोडा व्यायाम हवा, क्रम्प येऊ नये म्हणून ट्रेक दरम्यान सतत पाण्याचे घोट पीत राहणं, ट्रेकचा सकारात्मक विचार, ट्रेक लीडरला सहकार्य करणे इ. इ.

खरंतर हा एक-दीड तासाचा ट्रेक! अतिशय सोपा आणि फारशी चढण नसणारा! रेग्युलर ट्रेक करणाऱ्यांसाठी हा ट्रेक काहीच अवघड नाही.  पण ह्या सर्व गोष्टींमुळे आम्हाला जवळ जवळ तीन तास लागले!

वन ट्री हिल पॉइंट ते माथेरान बाजार हा साधारण ५ किमी चा ऊंच ऊंच झाडे असणाऱ्या जंगलातून जाणारा रस्ता अत्यंत विलोभनीय आहे. लाल रंगाची माती आणि सभोवताली अंजनी, वड, पिंपळ इ. सारखी झाडे माथेरानच्या सौदर्यात भर टाकतात. 

हा ट्रेक आहे अतिशय सुंदर! आजूबाजूला धरण, थोडी चढाई, घनदाट जंगल, खतरनाक  राॅक पॅच, वन ट्री हिल पॉइंट, माथेरानच्या सौदर्याची झलक आणि माथेरान बाजारआणि पर्यटकांना माथेरान मधील पॉइंट दाखवण्यासाठी उभे  असलेले घोडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर उभा पुतळा आणि आलेखची लीडरशिप  ....नि:संशय एक ह्दयस्पर्शी अनुभव!






  

वासोटा जंगल ट्रेक, १४ फेब्रुवारी २०१६

वासोटा किल्ला जंगल ट्रेक: १४ फेब्रुवारी २०१६

वासोटा ट्रेक मी तिस-यांदा करत होते. हा ट्रेक त्याच्या निसर्गसौंदर्या मुळे ट्रेकर्स मधे खूप लोकप्रिय आहे. ह्या ठिकाणाला ट्रेकर्स “महाराष्ट्राचं स्वित्झर्लंड” देखील म्हणतात!

हे ट्रेक ठिकाण सातारा जिल्ह्यात येते आणि बामणोली हे ट्रेक पायथ्याचे गाव आहे. ४२६७  फुटावर असलेल्या ह्या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी नाव दिले आहे “व्याघ्रगड” (व्याघ्र म्हणजे वाघ)! आक्रमण करण्यास अतिशय कठीण म्हणून हे नामकरण! वासोट्याचा ज्ञानेश्वरीत अर्थ आहे “ आश्रयस्थान”! असं सांगतात कि अगस्ती ऋषी इथे वास्तव्यास होते आणि त्यांनी आपल्या गुरूंचे अर्थात “वशिष्ठ” (काही ठिकाणी वरिष्ठ असा उल्लेख देखील आहे) ऋषींचे नाव किल्ल्याला दिले. वशिष्ठ नावाचा अपभ्रंश होता होता लोक त्याला “वासोटा” म्हणू लागले!

हा किल्ला कोयना अभयारण्य अर्थात व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत येतो त्यामुळे वनखात्याची परवानगी काढणे अनिवार्य आहे. ट्रेकच्या दिवशी देखील परवानगी मिळू शकते. 









किल्ला वन खात्याच्या अंतर्गत येत असल्याने प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या किंवा अन्य कचरा जंगलात टाकण्यास मनाई आहे. ह्या कडक नियमामुळे आणि वनखात्याच्या कडक तपासणीमुळे हा किल्ला आणि जंगल अत्यंत स्वछ आहे! 


ठिकठिकाणी जंगलात दिसणाऱ्या प्राणी , वृक्ष आणि पक्षांची माहिती देणारे फलक लावलेले आहेत. 




हा ट्रेक पावसाळ्यात आणि रात्रीचा करता येत नाही.

ट्रेक पायथा आणि वनखात्याच्या कार्यालयापाशी पोहोचण्यास “शिवसागर लेक” बोटीने पार करावा लागतो. हा लेक पार करण्यास साधारण एक ते दीड तास लागतो. 





कोयना धरणाच्या बॅक वॉटर ने बनलेला हा लेक सौदर्याचा अप्रतिम अविष्कार आहे! निळशार आणि हिरवीछटा असलेले अथांग पाणी बोटीने कापत असताना सकाळची बोचरी थंडगार हवा अंगावर शहारा आणते आणि उन्हाची एक तिरीप मन प्रफुल्लीत करते! 

बोट पाणी कापत असताना उठणारे आणि लांबवर पसरत जाणारे जलतरंग पाहणे 
यासारखा आनंदी अनुभूती दुसरी नाही! 



चारही बाजूला घनदाट झाडी आणि त्यांमधून येणारे रविकिरण जेव्हा
पाण्याच्या लाटांवर पडतात तेव्हा असं वाटतं कि जणू हिरे चमकताहेत! लखलखणारे जलबिंदू बोटीच्या वेगाने जेव्हा उडतात आणि रविकिरणांनी जेव्हा अधिकचं तेजस्वी होतात तेव्हा डोळे दिपून जातात! एक ते दीड तासाचा हा बोटीचा प्रवास स्वप्नवत वाटतो आणि स्वर्गसुखाचा अनुभव देतो. बोटीचा हा प्रवास संपूचं नये असं वाटलं तर नवल नाही!



मन उल्हासित होत असताना मला तर बोटीवर चित्रित झालेली हिंदी सिनेमातली कितीतरी गाणी आठवत होती.... “माझी नैया ढून्ढे किनारा..”....... “ ओ रे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में..”.... ओ माझी रे, अपना किनारा, नदिया की धारा है...”...............

संपू नये असा वाटणारा हा बोटीचा प्रवास संपतो ते ट्रेक पायथ्याशी! वनखात्याची परवानगी मिळाल्यावर ट्रेक सुरु होतो! घनदाट जंगलातून  किल्ल्यावर पोहोचायला साधारण तीन तास तरी लागतात. अत्यंत चढाईचा ट्रेक आहे. खूप ठिकाणी झाडांची मुळे जमिनीवर पसरलेली आहेत त्यामुळे त्यात पाय अडकणार नाही ना याची काळजी घ्यावी लागते. जंगलातली झाडे इतकी प्रचंड उंच आहेत कि उन्हाची तिरीप जमिनीवर पडत नाही. उंच उंच झाडांच्या सावलीत क्षणभर विसावण्याचा अनुभव आणि तिथल्या शांततेचा अनुभव हा समाधीवतचं!

मी हा ट्रेक तीन वेळा केला. पहिला ट्रेकडी सोबत आणि नंतरचे दोन एस. जी ट्रेकर्स सोबत! तिन्हीच्या आठवणी अनन्यसाधारण आहेत. ट्रेकडी सोबत गेले तेव्हा ट्रेकसाठी माझं शरीर तयार झालेलं नव्हतं. अनुभव नव्हता. त्यात रोजच्या व्यायामाचा अभाव. इतका दम लागत होता कि बस्स! कुठून आले ट्रेकला असं झालं होतं! लिंबू सरबताचा एक एक घोट पीत मी हा ट्रेक पूर्ण केला. ट्रेकडीच्या लीडरने खूप छान साथ केली! ह्याच ट्रेकला माझी आणि शिवची ओळख झाली आणि नंतर सतत ट्रेकिंग टीप्स देऊन त्याने माझी ती बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला! दुसऱ्यांदा मी ट्रेक केला तेव्हा मी ट्रेकचा आनंद घेतला आणि तिसरा ट्रेक मी चक्क ट्रेकिंग पोल/स्टीक न वापरता केला! आजही मला ती आठवण आली की विश्वास बसत नाही. ट्रेकिंग पोल/स्टीक शिवाय तोल सावरण आणि खास करून गुडघा जपणं माझ्यासाठी खूप जिकिरीचं होत असतं. पण शांतपणे, एकाग्रतेने, शरीराचा तोल सांभाळत केलेला हा तिसरा ट्रेक माझ्या आयुष्यातला एक सर्वोत्तम ट्रेक आहे. ह्या ट्रेकच्या वेळी प्रमिला, राहुल, विशाल आणि शिव ने दिलेली साथ आणि प्रोत्साहन आजही मनात कायमचं स्थान टिकवून आहे!


जंगल पार करून वर पोहोचल्यावर हनुमान आणि गणेशाची दगडात कोरलेली मूर्ती तुमचं स्वागत करते. एका बाजूला चालत गेल्यावर पाण्याचे तळे आहे, सिमेंट बनवण्यासाठी वापरला जाणारा चुन्याचा घाणा आहे आणि थोडे पुढे गेल्यावर बाबुकडा!
बाबुकडयाचा परिसर नितांत सुंदर आहे. नवीन आणि जुन्या वासोट्याचा हा सुंदर मिलाप! हरीश्चंद्रगडावरील कोकणकड्या पाठोपाठ दुसरा मोठा कडा! दरीतून येणारा थंडगार वारा, त्याचा वेग, आवाज आणि गंभीरता अवर्णनीय आहे. कड्याजवळ उभं राहून जो निसर्ग देखावा दिसतो त्याने डोळ्यांचं पारण फिटतं! चारही बाजूला डोंगर, घनदाट झाडी, खोलवर दरी आणि मधे साधारण “यु” आकारात उभा बाबुकडा! 


दुसऱ्या बाजूला एक बुरुज आहे आणि माची. जाताना महादेवाचे मंदिर लागते आणि पुढे गेल्यावर नागेश्वराचे शिखर दिसते!


वासोटा हा विखुरलेला आणि पसरलेला किल्ला आहे. वरचा भाग एक-दीड तासात पाहून होतो. घनदाट जंगलामुळे हा ट्रेक संध्याकाळच्या आत पूर्ण करावा लागतो.

परतीचा बोटीतला प्रवास ट्रेकचा शीण नाहीसा करतो! अस्ताला जाणारा सूर्य, मंद सूर्यकिरण, हलकासा थंडगार वारा आणि सायंप्रकाश! हेच दृष्य मनात साठवत ट्रेक पूर्ण झाल्यामुळे आनंद द्विगुणित होतो!








वासोटा हा एक विलोभनीय निसर्गसुंदर ट्रेक आहे. लेकच्या रम्य काठावर बसून सुंदरशी कविता लिहावी, सुबकसं चित्र रेखाटावं, सुरेखसं पुस्तक वाचावं किंवा स्वत:मधेचं रममाण व्हावं असं हे ठिकाण!


“मिशन कश्मीर” या चित्रपटात गीतकार समीरने लिहिलेलं एक सुंदर गीत आहे, ह्या ट्रेकमध्ये तेच गुणगुणावं वाटतं,

“चुपकेसे सून, इस पल की धून,
इस पल में जीवन सारा,
सपनोंकी है दुनिया यही,
मेरी आंखोन्से देखो जरा|
उज्ली जमिन, नीला गगन,
पानी पें बेह्ता शिकारा,
सपनोंकी है दुनिया यही,
तेरी आंखोन्से मैने देखा||”