जांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६




जांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६
जंगल, प्लॅटयू (पठार), पर्वत..सर्व काही एकाच ट्रेकमध्ये! 



ट्रेकर्सना फारसा माहित नसलेला एक नाविन्यपूर्ण ट्रेक! तेजस कडून ट्रेकची माहिती घेतली. तो म्हणे, “मॅडम, तुम्ही करणार...मला माहित आहे ना”....

तेजस आणि माझी ओळख अंधारबन ट्रेक दरम्यान झाली होती. त्याच्या अर्थात “मिस्टेरिअस रेंजर्स”  ह्या ट्रेक ग्रुपसोबत हा माझा पहिलाच ट्रेक होता. ह्या ट्रेकला शिव असणार होता. शिव हा ट्रेकिंगमधला माझा गुरु! त्यांमुळे मी निश्चिंत होते!


तेजसने ट्रेक सहभागींचा वॉटसअप वर गुप केला आणि त्यावर टाकलेल्या एका वाक्याने तेजसची एक झलक डोळ्यासमोरून तरळून गेली. त्या वाक्यानंतर  झालेल्या संवादाने मी अचंबित आणि निरुत्तरित झाले. तो संवाद असा होता............

असो. ठरल्याप्रमाणे रविवारी, १८ तारखेला संभाजी उद्यान येथून ६.३० वाजता निघालो. कामशेतला नाश्ता करून जांभिवली गावातून साधारण १०.३० वाजता ट्रेकला सुरुवात केली. ट्रेक सुरु होण्याआधी सहभागींची ओळख परेड झाली. शिव ने ट्रेक ची कल्पना दिली. किती पायी चालावं लागणार, कुठे टेकडी चढावी लागणार, किती ट्रेक जंगलातून (सावलीतून) आहे, किती ट्रेक उन्हातून आहे ई. सर्व सविस्तर त्याने सांगितलं. ट्रेकच्या मानसिक तयारीसाठी अशी माहिती खूप उपयुक्त ठरते. निदान माझ्यासाठी तरी!

आमच्या गाडीच्या ड्रायव्हरकाकांचा मुलगा, दिगंबर आमच्या सोबत ट्रेक करणार होता. ओळख परेडच्या वेळी तो मला म्हणे, “ तुमचे पाय दुखणार नाहीत का?”...

मी माझ्या पद्धतीने आणि वेगाने ट्रेकला सुरुवात केली. यावेळी सुरुवातीलाचं टोपी घातली आणि जॅकेटच्या कॉलरने मान झाकून घेतली. उद्देश हा की उन्हाचा त्रास होऊ नये. नेहमीप्रमाणे लिंबू सरबत सोबत होतचं!

ढाक बहिरी ट्रेकच्या दिशेने ट्रेक सुरु झाला. हा ट्रेक मी अगोदर केला असल्याने रस्ता माहितीचा होता. इथेच एक मध्यम टेकडी/छोटा पर्वत आहे जो पार केल्यानंतर ढाक बहिरी ट्रेकचा रस्ता सोडून भिवगड ट्रेकला रस्ता आहे. हा रस्ता घनदाट जंगलातून जातो. तेजस आणि टीमने पायलट ट्रेक केला असल्याने आणि त्यावेळी ह्या  मुलांनी नारंगी रंगाची रेडीयम पट्टी ठिकठिकाणी चिटकवल्याने जंगलातून वाट मिळत गेली. अन्यथा ही वाट लक्षात राहण केवळ अशक्य आहे!

जंगलाचं सौदर्य बघायचं तर हा ट्रेक जरूर करावा! उंचच्या उंच आणि हिरव्यागार पानांनी लगडलेली झाडे, झुकलेल्या आणि लोंबकाळलेल्या लहान-मोठ्या फांद्या, आडवी-तिडवी विखुरलेली झाडाची मुळे, सुकलेल्या पानांचा थरचं थर, मुळा-खोडावर उगवलेले मशरूम, वाळविंनी पोखरलेले झाडाची खोड, झाडांची जाळीदार पाने, मध्येचं लहान-मोठे खडक, विविध प्रकारची एकापेक्षा एक सरस अशी वैविध्यपूर्ण रानटी फुले! ... जमीन/पायवाट म्हणून दिसत नाही..... वासोटा, अंधारबन अशा कितीतरी जंगलापेक्षा अतिशय घनदाट असे हे जंगल!

जमिनीलगत आलेल्या झाडांच्या फांद्यामुळे झुकून चालणं, जमिनीवर आडव्या-तिडव्या झाडांच्या मुळात पाय अडकणार नाही याची खबरदारी घेत चालणं, सुकलेल्या पानांच्या जाडसर थरातून सपाट जमिनीचा अंदाज घेत पाय ठेवणं, लहान मोठे खडक हलत नाहीत ह्याची खात्री करणं, पुढची व्यक्ती दिसली नाही तर “बरोबर चाललोय ना” असं वाटतं राहणं........बापरे बाप! किती ही कसरत! जंगलाचं सौदर्य बघावं की खबरदारी घेत चालावं?

जंगल पार होत नाही तो घासदार पठार/मैदान/माळरान! तुरळक झाडे आणि गैर-हरित/वाळलेली गवते! दूरदूर पसरलेल्या ह्या वाळलेल्या गवताचं, स्वत:चं एक सौदर्य होत! काळेभोर खडक आणि काही हरित तर काही निष्पर्ण वृक्षांमधे ही पांढरट, फिकट पिवळी गवते रेखीव आणि उठून दिसत होती. उन्हाने ह्या गवताच्या काड्या चकाकत होत्या. जणू त्यांनाही स्वत:ची अशी एक “रुपेरी कडा” होती! ह्या चकचकीत आणि गुळगुळीत काड्या पायवाटभर पसरल्या होत्या. 

त्या काड्यांवरून चालताना पाय सटकत असला तरी एक जाणीव होत होती की बहरलेल्या हरितपर्णानंतर पानगळीत- गैरहरित पर्ण हा निसर्गाचाचं नियम आहे!

दुपारच्या जेवणानंतर तासाभरानंतर ट्रेक सुरु करणार तर पुढे जायची वाट सापडेना. शिव, तेजस सोबत इतर काही मुले वाटेच्या शोधार्थ इतरत्र पांगली. इकडून तिकडे-तिकडून इकडे वाट शोधण सुरु होत. पायवाटेत वाळलेलं गवत पसरल्याने वाट स्पष्ट दिसून येत नव्हती. ह्या मुलाची शोध मोहीम सुरु होती. “चकवा” “भूलभुलैय्या”..सारखे शब्द ऐकायला मिळत होते. रेडियम पट्टी ऐवजी झाडाला रिबन बांधावी का, ऑईल पेंट ने खुणा कराव्यात का, स्प्रे-पेंट वापरावा का इ. मार्ग समोर येत होते. चाकूने झाडामधे कोरून खुण करण्यापेक्षा कोणते उत्तम मार्ग असू शकतात ह्यावर चर्चा होत होती. जंगलात रहाव लागलं तर काय , परत मागे १० किमी जावं लागणार का, वॉकी-टॉकी असावी का ह्या गंभीर चर्चे पासून मधल्या वेळेत काही खेळ झाले तर काही जण वाळलेल्या गवतावर विश्रांतीसाठी सुखावले. 

नवीन नवीन ट्रेक मार्गांचा शोध तर घ्यायलाचं हवा, मग माणसाची सुरक्षितता महत्वाची कि जंगलाची? असा काही मार्ग आहे ज्याने माणूस सूरक्षित राहील आणि जंगलरुपी निसर्गाचं पूजन होईल? सुवासिनी वटवृक्षाला दोरा गुंडाळतात, “विश ट्री” संकल्पनेत रंगीत कपडा झाडाला प्रार्थना अथवा इच्छापुर्ती दयोतक म्हणून बांधला जातो. अशा प्रकारची भावना जोपासून घनदाट जंगलामधला मार्ग सुकर करता येईल का? चला विचार करूयात!

एका तासाच्या अथक परिश्रमानंतर मुलांना ढाक गावचे एक गृहस्थ भेटले. “बहिरी” या ढाकच्या देवाचे दर्शन करून ते परतत होते. त्यांच्यारूपाने जणू साक्षात ढाकचा देवचं मदतीला आला. ढाक गावात त्यांच्या घरी थोडे विसावलो. त्यांनी गारुआई मंदिरापर्यंत साथ केली आणि त्यांना धन्यवाद देत पुढचा ट्रेक सुरु झाला. ट्रेक मार्ग लक्षात ठेवण किती अद्भुत काम आहे ह्याची जाणीव झाली. खरं तर वाट जवळचं होती पण मिळत नव्हती. फोनला रेंज नव्हती. प्रसंग आलाचं असता तर संपर्काचे साधन नव्हते. दिवस मावळत जाईल तसं प्रसंगाचं गांभीर्य कदाचित जाणवलं असतं. ह्यावेळी प्रत्कर्षाने वाटले कि ट्रेकिंग मधे होणारी वाढ लक्षात घेता आणि त्यानिमित्ताने होणारे गड-किल्ल्यांचे संवर्धन लक्षात घेता बीएसएनएल सारख्या कंपनीने त्यांचे नेटवर्क अशा ठिकाणी मजबूत करावे. ट्रेकमध्ये वाट चुकलेल्या ट्रेकर्सना बाहेर येण्यासाठी जे ग्रुप लगेच धावून येतात त्यांना शतशः प्रणाम!

आता पूर्णत: उतार असल्याने काळजीपूर्वक चालावं लागत होतं. अजिंक्यने ह्या उतारावर माझी सोबत केली. भिवगडच्या पायथ्याशी आलो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. दिगंबर मला म्हणे, “ पाय दुखले नाहीत ना?”.  त्याला मी “दत्त महाराज” म्हणून संबोधत होते. पूज्य मार्गशीर्ष महिन्यात साक्षात “दत्त महाराज” ट्रेकला सोबत करत होते असं वाटलं!

सकाळी १०.३० ते ५.३० ह्या सात तासाच्या अथक ट्रेक नंतर सूर्यास्ताच्या मनोहर दर्शनाने जरा उभारी आली.

भिवगड बेसला पोहोचल्यावर शिव ने भिवगड विषयी माहिती दिली. साधारण ८०० फुट उंचीचा, चढायला सोपा, फारसा माहित नसलेला रायगड जिल्यातील, वडाप गावाजवळील हा एक गड! गडावर पाण्याचे टँक आहेत, गुहा आहे आणि जवळचं पाण्याचा धबधबा आहे. गड तसा छोटा पण अंधार झाल्याने आम्ही वडाप गावाकडे वाटचाल सुरु केली. हा पण खोल उतार. एका हातात काठी आणि एका हातात टॉर्च घेऊन उतरण कसोटीच झालं. आयुष्यात प्रथम कपाळावरून घामाचे थेंब गळत होते!

संध्याकाळी ७.३० च्या सुमारास वडाप गाव सोडले आणि रात्री १०.३० च्या दरम्यान पुण्यात पोहोचलो. ह्या संपूर्ण प्रवासात खूप जणांनी मला सोबत केली. मी एका नवीन ग्रुपसोबत ट्रेक करतेय असं वाटलचं नाही!

अश्रफने ट्रेक दरम्यानची माझी एक पोझ कॅमेऱ्यात कॅच केली. प्रत्येक ट्रेक मधे माझी ही पोझ असतेच असते पण ह्या ट्रेक मधे ती पहिल्यांदा कॅमेऱ्यात आली! थॅक्स अश्रफ!

ह्या ट्रेक मधे सुरुवाती पासून डोक्याला टोपी आणि मान झाकून घेण्याचा फायदा झाला. उन्हाचा त्रास झाला नाही. उन्हामुळे येणारा थकवा, घाम, पाणी-पाणी होणे, गरगरणे इ. ट्रेकमध्ये उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी मान कव्हर करून घेणे किती प्रभावी उपाय आहे ह्याचा अनुभव घेतला. थॅक्स टू विशाल! त्याने मेसेज केला “ मॅम, एक टीप द्यायची आहे फोन करू का?” ..फोनवर म्हणे, “ऊन वाढतयं मॅम..तर ट्रेकच्या वेळी मान झाकून घ्या. तसे केले तर एक तासाने लागणारी तहान दीड तासाने लागते” . ट्रेकिंग टिप्स देणाऱ्या प्रत्येकाचे ह्या निमित्ताने खूप खूप आभार!

शिव, माझा “ट्रेक गुरु”! त्याच्या सोबत ट्रेक करणं म्हणजे ट्रेकिंग कौशल्याने समृद्ध होणं! ती अनुभूती अद्भुतचं!

ह्या ट्रेकमुळे झालेली तेजसची ओळख ही लाखाची गोष्ट! ट्रेक वातावरण लाइव्हली/जिवंत ठेवणारा हा मुलगा! आनंद, उत्साह, जोश आणि उर्जा यांचा अनोखा संगम म्हणजे तेजस! त्याने सुरु केलेल्या “मिस्टेरिअस रेंजर्स” ट्रेकिंग ग्रुपला माझ्या लक्ष लक्ष शुभेच्छा!






















"M" for "Mysterious Rangers!"







२०+ किमी चा हा ढाक बेस ते भिवगड ट्रेक अनन्यसाधारण ट्रेक आहे. इथलं निसर्ग सौदर्य असाधारण आहे. लहान-मोठे डोंगर, घनदाट जंगल, काही ठिकाणी हिरवीगार झाडे तर काही ठिकाणी वाळलेली गवते, कधी सुंदर पायवाट तर कधी अरुंद बंधारा, काही ठिकाणी बेढब खडक तर काही ठिकाणी आखीव-रेखीव खडक, कधी लांबवर पसरलेलं शेत तर कधी पाण्याची छोटी डबकी, कधी पानांनी लगडलेली झाडे तर कधी निष्पर्ण वृक्ष, कधी मोहक फुलांची तर कधी कूसळाची साथ, कधी मृत खेकडे- विंचू, तर कधी सापाची कात, कधी अतिशय थंडावा तर कधी उन्हाचा तडाखा, कधी गावातलं टूमदार घर तर कधी शेताची शोभा वाढवणार मातेचं मंदिर!......

ह्यात नाईट ट्रेकची एक झलक मिळाली तर भारीच अनुभव!

घनदाट जंगल, विस्तीर्ण प्लॅटयू अर्थात पठार, पर्वत, पाण्याचे झरे ह्या सगळ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हा ट्रेक नक्की करावा!



२०१६ सालची सांगता भिवगड ट्रेकने झाली! २०१७ सालात असेच नवीन ट्रेक व्हावेत, नवीन सहकारी मिळावेत, जुनी नाती अधिकाधिक घट्ट होत जावीत, नवीन ट्रेक कौशल्य आत्मसात व्हावीत, स्वत:ची नवीन ओळख होत रहावी आणि माझे ट्रेकिंगचे अनुभव ब्लॉग रूपाने तुमच्यासमोर येत रहावेत हाच नवीन वर्षासाठी संकल्प!


२०१७ साल तुम्हा सर्वांना “फुल टू ट्रेक” जावो हीच ईश्वरेच्छा!



सर्व फोटो आभार : ट्रेक टीम

5 comments:

Unknown said...

Khup ch sundar madam..... Aani evdh kautuk kelya baddal khup khup aabhari.....

Megha said...

Mst....khup sunder...parat ekda trek ...jungle safari zali...vachtana

UB said...

Awesome write-up madam....

Anonymous said...

Khupch chaan Lihila ahe Madam...
Prasanga ani Details agdi samor thakale... Tumchya lekhanitun...
Aabhar

Unknown said...

Khupach sundar lihla ahe ma'am...
Parat ekda trek la gelyagat vatla..
Sampurna trek samor ala kshanbhar