नर्वस नाईनटीज वर सविताची मात: जीवधन ट्रेक, १८ नोव्हेंबर २०१८

"Nervous Nineties"...मुख्यत: क्रिकेट क्षेत्रासंबंधित ही उक्ती!  खेळाडूने ९९ धावा पूर्ण झाल्या आणि त्याचे शतक पूर्ण झाले नाही तर त्याला जबाबदार ही उक्ती. व्यक्तिगत रेकॉर्ड होत असताना आलेल्या ताणाचे हे फलित असे म्हटले जाते!

नुकतीच वयाची पन्नाशी आणि ट्रेक सुरु करून तीन वर्ष पार केलेल्या सविताचे असेच एक व्यक्तिगत रेकॉर्ड आज वाट पाहत होते. हो, आजचा ट्रेक तिचा ९९ वा ट्रेक! ग्रुपमध्ये ९९ व्या ट्रेक मनस्थितीची चर्चा झाली. ९९ वा ट्रेक पूर्ण झाला तरच शंभरीकडे वाटचाल होणार. म्हणून ९९ व्या ट्रेकचे महत्व! मानसिक ताण येण्याची खूप शक्यता. त्याचा परिणाम शारीरिक क्षमतेवर होण्याची शक्यता! सविताचा स्व-संवाद झाला होता. आकडा आज महत्वाचा नक्कीच होता. परंतु आकडेवारी चा विचार न करता ट्रेकचा आनंद घ्यायचा हे तीच निश्चित झालं होत. त्यामुळेच आजचे तिचे वर्तन "Nervous Nineties" च्या एकदम विरुद्ध! ती होती.....जोशात, उत्सुक, शांत, संयमी, स्थिर, एकाग्र,ठाम आणि जिद्दी!

ट्रेकच्या सुरुवातीला झाले हुदहूद्या नावाच्या पक्षाचे दर्शन.



जीवधन ट्रेक! दुसऱ्यांदा... आधीचाच  उत्साह, आनंद आणि ताकद.  पहिल्यांदा केला तो घाटघर मार्गे. आताचा नानाच्या अंगठ्याच्या पायथ्यापासून. 



जीवधन किल्ला नाणेघाट पायथ्यापासून




सविताने नेहमीप्रमाणे संथ आणि स्थिर गती पकडत ट्रेक सुरु केला. सुरुवातीचा पट्टा शेतातून जात होता. वाढलेले गवत. मधूनच गवतातून डोकावणारी रानफुले. 



सूर्य  अगदी डोक्यावर आलेला. हलकासा वाहणारा वारा उन्हाचा ताप शीतल करणारा. मधूनच उडणारे पक्षी आणि फुलपाखरे....



सविताने अलीकडेच ट्रेकिंग सॅक बदलेली. त्यात हायड्रा पॅक साठी एक कप्पा. पाईप बाहेर काढण्याची सोय. त्यामुळे बाटली सॅक मधून बाहेर काढा, पाणी पिऊन झाल्यावर परत ठेवा हे कष्ट नाहीत. पाईप मधून पाणी सहज पिता येते. अगदी चालता चालता सुद्धा. 

शेताची वाट संपून जंगलातून वाट सुरु झाली. दुपारच्या बाराच्या उन्हात घनदाट जंगलात मिळालेल्या शीतल छायेने सविताला दिलासा मिळाला. डोक्यावरची हॅट थोडी सैल करून घामाने ओल्या झालेल्या केसांना तिने शीतल वारा लागू दिला. पाण्याचा एक सिप घेत जंगलातून चालणे तिने चालू ठेवले. 

एवढ्यात आर. के चा आवाज आला. आर. के. अर्थात राजकुमार हा "माची" ह्या संस्थेचा लीडर. माची संस्थेच्या वर्षपूर्ती च्या निम्मिताने आजचा हा जीवधन चा ट्रेक त्याने आयोजित केला होता. 



आर. के च्या आवाजाने सर्वांनीच पावले थबकली. आर. के.  ला एका झाडावर  Bamboo Pit Viper ने दर्शन दिले होते. ह्या ट्रेकची रेकी केली तेव्हा अत्यंत प्रयास करूनही दर्शन न दिलेला हा विषारी सर्प आज मेहरबान झाला होता. 



झाडावर डोळे उघडे ठेऊन ऐटीत पहुडलेला. जंगलाच्या घनदाट सावलीत आणि थंडगार वाऱ्यात जणू सुस्तावलेला. सर्वांचेच कॅमेरे पटापट बाहेर निघाले. त्याची सुंदर हिरवीगार-पोपटी रंगाची छबी टिपण्यासाठी प्रत्येकजण पुढे सरसावला. एखाद्याला चांगली फ्रेम मिळाली तर तो दुसऱ्याला सांगत होता. सर्प अगदी खुशाल शांत अवस्थेत हवे तेवढे फोटो काढून घेत होता. आर. केच्या सूचना चालूच होत्या, "त्याला आवाज ऐकायला येत नाही. त्यामुळे हळू आवाजांत बोलण्याची गरज नाही. फक्त झाड किंवा फांदीला धक्का लागू देऊ नका. हा सर्प रात्री सक्रीय असतो". अर्धा-पाऊण तास सर्पाचे विविध अंगाने फोटो घेणे चालू होते. कोणाचीही पावले तिथून निघायला तयार नव्हती. "वर्षपूर्ती चा ट्रेक सफल झाला" ह्या भावनेने सर्वजण खुश झाले. त्या जोशात पुढच्या ट्रेकला चालू लागले. 

जंगलातून बाहेर आल्या आल्या दर्शन झाले ते जीवधन किल्ला आणि वानरलिंगी सुळक्याचे. किल्ल्याला जोडलेला तरीही आपली वेगळी अशी स्वतंत्र रचना अधोरेखित करणारा हा सुळका! 


सुळक्याकडे जाताना "पाषाणी" नावाच्या सुरेख वनस्पतीची ओळख झाली.



सुळक्याचा पायथ्याशी जाणारा अरुंद रस्ता, एका बाजूला किल्ल्याची झुकलेली भिंत आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. सविताची पावले संथावली. काळजीपूर्वक पावले टाकत, पायवाटे वरून चालण्याकडे संपूर्ण लक्ष  देत तिने चालणे चालू ठेवले. चालताना पाठीवरची सॅक कधी किल्ल्याच्या झुकलेल्या  भिंतीला  तर कधी डोक्याला घासत होती. चालण्यातील कमालीच्या एकाग्रतेने सविताला थोडा ताण जाणवायला लागला. 



वानरलिंगी सुळक्याच्या पायथ्याशी गुहेजवळ विसावा घेण्याचा ठरले तेव्हा तिला हायसे वाटले. 




जीवधनच्या घळीतून नानाच्या अंगठ्याच्या नयनमनोहर दर्शनाने सर्वजण सुखावले.




वानरलिंगी सुळक्याला अर्ध वेढा घालून पायथ्याशी आल्यावर सुळक्याच्या भव्यतेने अचंबित होऊन सविताचे डोळे दिपून गेले. सुळक्याचे राकट सौदर्य पाहून तिच्या मनात आले. "ट्रेकर्स, क्लायबर्स ना हा सुळका इतका मोहित का करतो ते आत्ता कळाले. सुळक्यावर बोल्ट्स, रोप फिट केलेले असताना सुरक्षिततेचे कोणतेही साधन न वापरता सुळक्यावर चढाई म्हणजे सुळक्याच्या सौदर्याला गालबोटच! प्राणावर बेतेल  ते वेगळेच". 



सुळक्यावर चढाई कुठून आणि कशी करतात हे पाहून किल्ल्याकडे तिने मार्गक्रमण सुरु केले. किल्ल्याच्या पायथ्याशी जाणारा हा रस्ता अत्यंत अरुंद. डावीकडे किल्ल्याची भिंत तर उजवीकडे खोल दरी. जपून जाण्याने आणि चालण्यावर मन केंद्रित केल्याने भयंकर ताण आलेला. सविता ह्या एकाग्रतेच्या ताणाने घामाजली. त्यात भर दुपारचे ऊन. विसाव्याला सावली अशी नाहीच. किल्ल्याच्या पायऱ्याजवळ यायला पाऊण तास लागला. सविता थकली होती. तिचा स्टॅमिना खाली जात होता. कधी एकदा किल्ल्यावर पठार लागते असे तिला झाले होते. तरीही गिव्ह अप न करता शारीरिक आणि मानसिक क्षमता पणाला लावत तिने ट्रेक सुरु ठेवला होता. 

मागील वर्षी २१ फेब्रुवारी २०१६ रोजी सविताने हा ट्रेक केला केलेला.  त्यावेळी ह्या बाजूने ट्रेक केला नव्हता. पायऱ्या आल्या आणि मागील वेळी इथून ट्रेक झाला होता ह्याची आठवण तिला आली. दोन वर्षात किती बदल झाला होता. पायऱ्याच्या इथे भली मोठी लोखंडी शिडी लावली होती. 



शिडी लावायला हवी होती का हा प्रश्न मनात येऊन गेला. तो टप्पा चढाईसाठी इतका धोक्याचा  नव्हता कि शिडी लावावी असे तिला वाटले नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने शिडी लावणे हे स्त्युत्य असले तरी किल्ल्याचे सौदर्याचा त्यात नाहक बळी गेला की काय असे तिच्या मनात आले. 

सविता थकल्याची जाणीव इतरांना झाली होती. त्यामुळे तिच्या गतीने ट्रेक सुरु होता. सावधानतेने शिडी चढून गेल्यावर एक रॉक पॅच चढाईचा कस लावणारा. दगडाच्या खोबणीत हाताची बोटे घट्ट रोवून पायाला ग्रीप मिळेल अशी पोझिशन घेत सविताने हा टप्पा बखुबी पार केला. ह्या टप्प्या चढाईसाठी तसा शेवटचा टप्पा. टप्पा पार झाला. सविताला हुश्श झाले. सर्वांनी तिच्यासाठी टाळ्या वाजून तिच्या चढाई साठी आनंद व्यक्त केला. उषाने तिची आनंदी भावमुद्रा कॅमेऱ्यात टिपली. 



जुन्नर दरवाजा

पाण्याचे टाके



गडमाथ्यावर जाणाऱ्या दगडी पायऱ्या हे सर्व सविताला चांगलेच स्मरणात होते. आठवलेली एक एक गोष्ट ती इतरांना सांगत होती..... 

गड माथ्यावर पहिले ठिकाण लागले ते धान्याचे कोठार. टॉर्चच्या प्रकाशात आतील रचना पाहून घेतली. आतल्या एका खोलीत तर चक्क राख मिळाली. सविताच्या मनात आले धान्य वर्षानुवर्ष चांगले रहावे म्हणून त्यावेळी काय पद्धत वापरत असतील? 



गडमाथ्यावर जोड पाण्याचे टाके होते. अजून एक टाके थोडे उताराला. ह्या टाक्याच्या बाजूने पायवाट थेट जाते ते वानरलिंगी सुळक्याकडे.  सविताचे पाय लटपटत होते. सफरचंद आणि लिंबू सरबत घेतल्यावर तिला हुरूप आला. उर्जा आली.



माथ्यावर वाळलेले गवत पायवाटेवर पसरल्याने गवतावरून पाय घसरत होता. गवताचे कुसळ हाताला टोचत होते. संध्याकाळचे  जवळ जवळ साडे चार वाजले होते. गडमाथ्याच्या ह्या टोकावरून वानरलिंगी सुळक्याचे दर्शन म्हणजे लाजवाब!  सविताची नजर हटत नव्हती कि तिथून पाय निघत नव्हता. किती मनोहारी तो सुळका. "खडा पारशी" हे सुळक्याला दिलेले उपनाम. किती सार्थक उपनाम! ट्रेकर्स ना सुळका आपल्याकडे का खेचून घेतो, मोहवितो, भुरळ घालतो हे सविताला आत्ता उमगले. निसर्गाने त्याला अनोखं सौदर्य बहाल केलय. पाहता क्षणी मती गुंग करणारे सौदर्य! 



आर.के च्या आवाजाने नाविलाजाने सर्वजण तिथून निघाले. खाली दरवाजाजवळ आले. 





उतराई साठी एक मोठा रॉक पॅच पार करावा लागणार होता.



सविताला पहिले पाचारण झाले. प्रशांत आणि आर. के. ने उतरायचा डेमो दिला. सविताला विना रोप जमेना. रोप लावला गेला. सविताच काय सर्वजण सुखरूप उतरले.

मागील ट्रेकला ह्या पॅचच्या आठवणी सविताच्या मनात जाग्या झाल्या. घाबरगुंडी उडालेली त्यावेळी. हा पॅच खरतर धोकादायक .  हा रोप फिक्स करायला इथे बोल्ट ठोकलेले आहेत. रोपच्या सहाय्याने सुद्धा ही उतराई तशी परीक्षा घेते. सविताच्या मनात आले इथे शिडी का नाही लावली? अर्थात किल्ल्यावर अवजड अख्खी शिडी अथवा लोखंडी बार आणून ते फिक्स करणे किती जिकीरीचे काम आहे हे ही तिच्या लक्षात आले. 

सर्वजण सुखरूप उतरल्यावर किल्ला उतराई सुरु. संध्याकाळचे साडेपाच- वाजून गेलेले. सूर्यास्त झालेला. अंधारच अधिराज्य सुरु झालेलं. सविता अत्यंत थकलेली. अंधारात किल्ला उतरायला तिला कठीण जावू लागले. टॉर्चच्या प्रकाशात तोल सावरत उतरणे वेळ खावू होते.  प्रशांतच्या हाताला धरून किल्ले उतराई त्या तुलनेत लवकर झाली.

नानाच्या अंगठ्याच्या पायथ्याशी आले तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. सर्वांना भुका लागल्याने यथेच्छ भोजन करून रात्री आठ-साडे आठ वाजता प्रस्थान केले. 



सविता कमालीची थकलेली. गाडीत झोप लागली नाही. डोळे मिटून पडून राहिली. विचारात होती..९९ व्या ट्रेकने तिची चांगलीच दमछाक केली. ९९ आणि १०० दोन ट्रेक झाले असे तिला वाटत होते. सकाळी ११.३० वाजता सुरु केलेला ट्रेक संध्याकाळी सात वाजता पूर्ण झाला होता. सविता गमतीने सर्वांना सांगत होती " माझा ९९ आणि १०० व ट्रेक आज झालेला आहे". कोणीही ते मान्य केलं नाही. "शंभरावा ट्रेक वेगळा असणार" म्हणत सर्वांनी तिचे म्हणणे खोडून काढले. शंभराव्या ट्रेकची वाट पहावी लागणार हे तिच्या मनाने पटवून घेतले.     

ट्रेकच्या विचारातच पुण्यात पोहोचली तेव्हा ११ वाजून गेले होते. 




Nervous Nineties  यशस्वीरित्या पार झाले होते. ९९ वा ट्रेक उत्तम रीतीने पार पडला होता. जीवधन किल्ला आणि खास करून वानरलिंगी सुळक्याने प्रचंड मनोसुख सविताला दिले. त्या सुखाच्या हेलकाव्यात ती "ट्रेकची शंभरी" ची स्वप्न पाहू लागली....................

(सर्व फोटो आभार: उषा बालसुब्रमण्यम, रोहिणी कित्तुरे आणि ट्रेक टीम)

ट्रेकची शंभरी ❤ अर्थात शंभरावा ट्रेक💗 मनात रुजलेला आणि अनावर इच्छित दातेगड ट्रेक करायचा हे तर सविताचे आधीच ठरले होते....

तोपर्यंत हृदयात दाटलेले हृदयातच राहू द्यायचे होते.....

1 comment:

Anonymous said...

Rather, producers use it to create many alternative merchandise in extensive CNC machining range|a variety} of industries. Some of those include aerospace, automotive, communication, laptop, construction, electronics, meals processing and storage, navy, and pharmaceuticals. Non-shear cutting, which is extra accurate, is used specifically for industrial merchandise like airplane wings. These processes include laser beam, plasma, and waterjet cutting services, properly as|in addition to} machining. Sheet metallic fabrication is flexible sufficient for use in industries like aerospace, automotive, construction, robotics, consumer items, and HVAC.