राजमाची नाईट ट्रेक: २०१० आणि २०१७ मधला!


वर्ष वेगळे आणि ऋतू वेगळा! २०१० मधील पावसाळा आणि २०१७ मधील हिवाळा! तो ही जवळजवळ सहा वर्षानंतरचा!

“राजमाची किल्ला” लोणावळ्याजवळील सुप्रसिध्द किल्ला! खूप नावाजलेला!

खूप उत्सुक होते किल्ल्याला भेट देण्यासाठी आणि फरक अनुभवण्यासाठी, ट्रेक आणि स्वत:मधला!

ट्रेक मार्ग तोच....लोणावळ्यापासून पायी १५ किमी! बेस गाव उधेवाडी!

२०१० मधे लोणावळ्यापासून चालायला सुरुवात केली होती तो दुपारी साधारण ४-५ वाजता आणि यावेळी रात्री १२ वाजता!

२०१० साली हा मार्ग जास्तकरून मातीच्या पायवाटेचा होता. ऑगस्ट महिना....नुकताच मुसळधार पाऊस पडलेला! ठिकठिकाणी मातीमय गढूळ पाण्याचे लोट वाहताहेत! रस्ताभर चीकचीक! त्यात रात्रीची वेळ! काय हाल झाले विचारू नका! टॉर्च मुळे जास्तकरून पायाखालचचं दिसत होतंसमोरचं काहीचं दिसतं नव्हतं...खाली किती खोल पाय ठेवायचा आहे याचा अंदाज येत नव्हता....चिखलावरून पाय घसरत होता...जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाय चिखलाने माखलेले...बुटात पाणीच काय पण चिखल पण शिरलेला.. बुटातील त्या निसरड्या चिखलाने आणि रस्त्यावरील चिखलाने पाय घसरत होता...ग्रीप पूर्णपणे ढासळलेली....कपडे मातीने बरबटलेले.....त्यावेळी झाडी पण दाट होती बहुधा..कारण रस्ता चुकवता येत नव्हता आणि कडेने चालावं तर झाडाच्या फांद्या लागत होत्या! कधी एकदा गाव येतयं असं झालं होतं....पण चालतोय चालतोय तरी गाव काही येतं नव्हतं......


हो, पण दिवसा, आजूबाजूला दिसणारं निसर्ग सौदर्य अफलातून! सर्वत्र हिरवगार! पावसाच्या शिडकाव्याने सर्व धुऊन निघालेलं! वातावरण एकदम फ्रेश, स्वच्छ, चकचकीत, टवटवीत! इतकी शुदुध हवा कि श्वासावाटे घेतचं रहावी!

मधे मधे मातीचा रस्ता आजही असला तरि आज हा रस्त्यावर बऱ्यापैकी दगड आढळले! त्यामुळे वाहने जाणे-येणे सोयीस्कर झालेले आहे. यावेळी घरांच्या बाजूला खूप गाड्या दिसल्या. भाड्याने देतात. दहा-अकरा लोकांसाठी रु. १२००! दुकाने, कोल्ड ड्रिंक, कुरकुरे, लेज इ. ची उपलब्धता!

२०१० साली, मला आठवतं रात्री २-३ च्या दरम्यान गावात पोहोचलो. एका घरात झोपलो! पहाटेचा चहा-नाश्ता करून किल्ला बघायला निघालो.





पावसाळ्यातील ट्रेक असल्याने किल्ला खूप सुंदर दिसत होता! हिरव्यागार झाडीमध्ये काळा कभिन्न दगडात वसलेला किल्ला! गावातून किल्ल्याला जायला मातीची पायवाटचं! एकदम आखीव-रेखीव पायवाट! नागमोडी जाणारी! एकदम प्राकृतिक/नैसर्गिक!











किल्ल्यावरची एक एक गोष्ट किती सुंदर दिसत होती. पावसाळ्यातील सुंदरता! खरचं प्रत्येक ऋतूतील सौदर्य काही अजबचं! 







यावेळी बघायला मिळालं कि गावापासून एका ठराविक अंतरापर्यंत सिमेंटच्या फरशांच्यांची वाट बनवलेली आहे. आता ३-४ वर्षात ही वाट बनवली असं गावातल्या एका बाबांनी सांगितलं. 



पायऱ्या संपल्या कि एक मोठा दगडी चौथरा बनवला आहे. २०१० मधे हा  चौथरा नव्हता. यावेळी पहाटे पाच वाजता पोहोचलो तेव्हा तिथेचं विश्रांती घेतली. किल्ल्याच्या रस्त्यावर मोठ-मोठे दगड विखुरलेले होते. दगडी गोळे पायवाटेभर पसरले होते. काही बांधकाम चालू असल्यासारखं! त्यामुळे किल्ल्याच्या प्राकृतिक/नैसर्गिक रूपाला कुठेतरी बाधा आली आहे असं वाटलं. उदयसागर तलाव आणि गोधनेश्वर मंदिराकडे जायला देखील सिमेंटच्या पायऱ्या!

कडाक्याच्या थंडीचे दिवस! दगडी चौथरा थंडगार पडलेला! नाही काही पांघरायला नेलेले आणि नाही काही अंथरायला! थंडीने झोप लागली नाही. १५ किमी चालून आल्यावर कंबर आणि पाठ टेकायला मिळाली एवढचं काय ते!

एकदम तोरणा आठवला. किल्ल्याच्या निम्म्यावाटेपर्यंत सिमेंटचा रस्ता बनवला आहे! वासोटया किल्ल्यावरही एका वर्षात काही ठिकाणी पायवाट जाऊन दगडांची वाट झाली आहे! “किल्ले/गावाचा विकास” या संकल्पनेवर विचार प्रकृतीच्या तुलनेत नकळत होऊ लागला/ करावासा वाटू लागला!

यावेळी किल्ल्याच्या मार्गावर ठिकठिकाणी दगडाच्या चुली, मॅगी बनवणे, शेकोट्या इ. दिसून आले! एका ठिकाणी टेंट टाकलेले! अस्वच्छता फारशी नव्हती हे मात्र उल्लेखनीय!

ऑफिसला कंटाळलेली काहीतरी “चेंज” हवा म्हणून २०१० साली राजमाचीला गेलेले. त्याला “ट्रेक” म्हणतात हे माहित नव्हतं! कोणते शूज घालायचे, ट्रेक दरम्यान कपडे कोणत्या प्रकारचे घालावेत, सामान किती आणि काय असावं, कोणतं कौशल्य असावं इ. इ. काहीचं माहित नव्हतं. आज थोडीफार सुधारणा आहे आणि खूप साऱ्या सुधारणेला वाव देखील आहे! वय पण वाढलंयं.... तेव्हा ट्रेक दरम्यान दम लागत नव्हता...झपाझप चालू शकत होते....वय “बोलतं” म्हणतात......त्यामुळेच यावेळी एक मुलगी मला म्हणे, “ तुम्हाला आन्टी म्हटलं तर चालेलं ना”....... 

परेश आणि प्रशांतच्या पेशन्सचा यावेळी तर कसं लागला!

तेव्हा मी बोलकी नव्हते. एकदम अबोल! त्यामुळे ट्रेक मधला माझा एकही फोटो नाही. फोटो घेण्यास कोणाला सांगितलचं नाही! ट्रेक करताना आणि ६ वर्षापूर्वी मी दिसत कशी होते ह्याचा अंदाज यायला काही मार्गचं नाही!

यावेळी...बापरे...प्रशांत आणि परेशला विचारा....पूर्ण रस्ताभर गप्पांची देवाण-घेवाण सुरु होती! 

श्रीवर्धन आणि मनोरंजन दोन्ही किल्ले चढले.




 







उदयसागर तलाव आणि गोधनेश्वर मंदिर बघितलं. 





येताना मात्र लोणावळ्यापर्यंत गाडीने आले.



यावेळी ट्रेकला पुणे सोडून इतर भागातील ट्रेकर्स आले होते. एक मनालीचा माउंटनियर तर एक सांगलीचा सर्पमित्र! 


मनालीचा माउंटनियर खूप कुशल ट्रेकर आणि लीडर वाटला. त्याच्या छोटया छोट्या हालचालीत त्यातील लीडर दिसून येत होता. हे मी का म्हणते ते सांगते. त्याला हिमालयातील ट्रेक बद्दल विचारत होते. तो म्हणे, “ आपके नी (घुटने) को कुछ् प्रोब्लेम है क्या?” मी ट्रेक करतानाचं त्याने केलेलं निरीक्षण! मी प्रोब्लेम सांगितला. म्हणे, “ हिमालयीन ट्रेक करने से पहले डॉक्टर कि सलाह लो. ५-६ दिन रोज ५-६ घंटे चलना पडता है. उतनी ताकद आपके नी मै है या नही उसकी जाचं करलो. वो फिटनेस है तो कोई दिक्कत नही"

राजमाची किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या आहेत, बरेच सारे अवशेष आहेत....बाले किल्ला, तटबंदी, गुहा , बुरुज, चोर दरवाजा......




श्रीवर्धनवरून दिसणारा सूर्योदय दर खासचं!







२०१० आणि २०१७ मधील राजमाची, उधेवाडी गाव डोळ्यासमोर येतं होतं. राहून राहून वाटतं होतं कि नवीन ट्रेक /ट्रेकमार्ग शोधणे जितकं महत्वाचं.....तितकच महत्वाच हे ही कि दर काही वर्षांनी पुन्हा तोच ट्रेक करणे.......ऋतूनुसार ट्रेकचं सौदर्य अनुभवणे.....दर वर्षाला होणाऱ्या बदलांची दखल घेणे.......प्रकृती आणि विकास, हातात हात घालून जाणे....निसर्ग नियम आहे!

प्रकृती सोबत महत्वाचं हे कि आपल्यातील बदल अनुभवणे.......क्षमतां, कौशल्य, विचार, प्रगल्भता, जागरूकता, दृष्टी, रसिकता..........आणि बरचं काही!




फोटो आभार: एस.जी. ट्रेकर्स- ट्रेक टीम, २०१७ !

No comments: