सिंहगड ट्रेक: २९ जानेवारी २०१७


“सिंहगर्जना”.. जवळजवळ ३०-३२ वर्षानंतर आयुष्याला भिडली! ती देखील ईबीसी ट्रेकच्या सरावाच्या निमित्ताने! आतकरवाडी पायथा ते सिंहगड हा ट्रेक! पुण्यापासून अवघ्या ३० किमी अंतरावर! हे अंतर पार करायला ३० वर्ष लागले!.... मनात घर करून राहिलेलं पण घराबाहेर पाऊल पडलचं नाही.......का?...ठोस कारणाचा विचार करायला लागल्यावर कारण सापडत नाही आणि मग एका उक्तीवर विश्वास ठेवावासा वाटतो, “योग” आल्याशिवाय काही नाही!

सकाळी ६.३० ची बस चुकली...सातच्या बसने निघाले. बसमधली तरुणाई आणि प्रसन्न करणारा गारठा....

साधारण ७.४५ च्या दरम्यान पायथ्याशी गाडी पोहोचली.

रस्ता माहित नव्हता....लोकांच्या मागेमागे निघाले. खूप सारे जण गड उतरत होते. उतरणाऱ्या खूप साऱ्या पुरुषांच्या हातात भाज्यांच्या जुड्या होत्या. निरिक्षण करत संथपणे चढायला सुरुवात केली.

सुरुवातीलाच टॉवर असलेला सिंहगड नजरेच्या टप्प्यात आला. दगडांनी खचाखचं भरलेला रस्ता.. कधी सखल तर कधी उंच... ...कधी फुफाट्याचा रस्ता....कधी पायऱ्या तर कधी अवघड पॅच...प्रत्येक अवघड पॅच असेल तिथे पर्यायी सोपा रस्ता ... खूप सारे शॉट कट्स...




रस्त्याच्या दुतर्फा, काकडी, कैरी, चिली-मिली, अननस, लिंबू सरबत, दही, बिसलरी, मसाला ताक, बिस्कीट इ. विकणारे छोटे छोटे स्टॉल......



मेथी, चंदन बटवा, मुळा, तांबडा माठ, चुका, कांद्याची पात इ. विकणाऱ्या स्त्रिया...



सिंहगडचा झालेला कायापालट दाखवणारा फलक पण चढताना दिसला. 

सुरुवातीला बऱ्यापैकी नागमोडी वळणे असणारा रस्ता..शेवटच्या टप्प्यात थोडा सरळ चढाईचा....आता पुणे दरवाजा, बुरुज/तटबंदी, कठडे स्पष्ट दिसू लागले.....

दरवाज्याच्या जवळच्याचं कठड्यावर अर्धातास विसावले आणि परतीचा प्रवास सुरु केला....परत त्याच संथ गतीने...

दोन गोष्टी करायच्या नाहीत असं मनाशी पक्कं केलं होतं.. नो ट्रेकिंग स्टीक (निदान चढताना तरी) नो घड्याळ (नो टायमर..नो स्टॉप वॉच)!

आजचा उद्देश एकचं होता “आनंद घ्यायचा”! कशाचा आनंद घेतला मी?.... मनाच्या अगतीशील रिलॅक्स अवस्थेचा. “ताई, भाजी घ्यायची का? गावरान भाजी आहे”...”ताई, मसाला ताक घ्यायचं का?” या आरोळीचा......चढणाऱ्या उतरणाऱ्या, अगदी चार वर्षाच्या बाळापासून ते ७०-८० वर्षाच्या क्राऊडचा...सुंदर छोट्या मुला-मुलींशी केलेल्या संवादाचा....त्यांच्या मधे होणाऱ्या गप्पांचा....एक मुलगी तिच्या काकाला गोष्ट सांगत होती...शब्द कानावर आले, “काका, बाबांना किती आश्चर्य वाटेल ना मी चढून गेले ह्याचं”.....एक छोटा मुलगा चक्क घसरगुंडी करत उतरत होता....एक मुलगी तिच्या आईला म्हणे, “ मी पुढे जाते, तुम्ही या”....एकीचा पाय झाडाच्या मुळात अडकला आणि ती पडली तेव्हा आई-बाबा आणि तिचा संवाद....आई मुलीला सांगत होती, “सरळ पाय ठेऊ नको, पाय तिरका ठेऊन उतर”....एक चार-पाच मुलाचा ग्रुप चढत होता, उतरणाऱ्याला विचारले, “किती आहे अजून? अर्धातास? आम्ही सर्वजण चाळीशीच्या पुढेचे आहोत..” मी चढत असताना एकजण म्हणे, “काकू, थोडचं राहिलं आता”......माझ्या पुढे-पाठी कोणी नाही, माझ्या सोबतही कोणी नाही...हवे तितके, हवे त्याचे फोटो.....हवी ती गती....हवा तो वेळ...

येताना खूप सारं समाधान सोबत घेऊन आले....सिंहगड ट्रेक केल्याचं, ट्रेकिंग स्टीक न वापरण्याचं, मनाप्रमाणे दिलेल्या वेळेचं, इतर ट्रेक केल्यानंतर हा ट्रेक अगदी फुसका वाटल्याचं......

सिंहगड ट्रेकची खासियत हीच की, काही विशिष्ट बंधने नाहीत!..........वयाचं बंधन नाही, सोबतीचं बंधन नाही, वारंवारीतेचं बंधन नाही, नियमांचं बंधन नाही, पायताणाचं बंधन नाही, ऋतूचं बंधन नाही, उद्देशाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही, कौशल्याचं बंधन नाही......


इथे असता, तुम्हीचं तुमचे राजे....ह्या गडाच्या राजासाठी!









No comments: