वैराटगड ट्रेक, विथ Travorbis Outdoors, १२ ऑगस्ट २०१८



वयाच्या ५१ व्या वर्षाची सुरुवात मनासारखी झाली. १ जुलै ला मृगगड - उंबरखिंड ट्रेक, २२ जुलैला २ किमीची blindfolded buddy run marathon आणि २९ जुलैला सुधागड ट्रेक!

१२ ऑगस्ट च्या "वैराटगड" या ऑफ बीट ट्रेकची" पोस्ट Travorbis Outdoors च्या ग्रुपवर पाहिली. 



Difficulty level आणि ट्रेकसंबंधी अन्य माहिती जाणून घेण्यासाठी स्वप्नीलला फोन लावला. त्याच्याकडून माहिती मिळताच ट्रेकला जाण्याचे निश्चित करून टाकले.

वैराटगड ट्रेकचा चढायचा मार्ग होता व्याजवाडी मार्गे (पाचवड, जि. सातारा) आणि उतरायचा मार्ग होता गणेशवाडी मार्गे.



रविवारी, १२ ऑगस्ट ला साधारण पावणे अकराच्या सुमारास आम्ही सतरा जणांनी वैराटगड चढायला सुरु केला. गडाची उंची साधारण ३९३३ फुट. खडी चढाई! भुरभुरणारा पाऊस. साधारण अडीच तास प्रवास करून ट्रेक सुरु केला तो थेट चढाईनेच! बापरे! पायाला गोळे आले. धाप पण लागली. ही चढाई सुकर झाली ती स्वप्नीलच्या  strategy मुळे! स्वप्नीलने चार-चार जणांची ओळख ट्रेकच्या एका एका टप्प्यावर विभागून केली. ह्यामुळे चढाईमधे थोडा विसावा मिळत गेला. ओळखी शिवाय विसाव्यामधे पाणी पिता आले, फुललेल्या फुलांचा एकत्रितरीत्या आनंद घेता आला, गडाभोवतीचा निसर्ग, सातारचा परिसर आणि नजरेच्या टप्प्यातील गडकिल्ले न्याहाळता आले.



ह्या गडाकडे तसे फारसे कोणी फिरकत नसल्याने चढायची वाट आखलेली नव्हती. रादर काही ठिकाणी वाट देखील नव्हती. पावसाच्या हलक्याश्या सरींनी ओल्या झालेल्या हिरव्यागार गवताचा पायाला गार गार स्पर्श करून घेत वाट निघत होती. १-२ ठिकाणी दिशादर्शक बाण दिसले. एकावेळी एकच जण जाऊ शकेल अशी पायवाट. आजूबाजूला एकतर दाट झाडी नाहीतर खोल दरी. पावसामुळे काही ठिकाणी निसरडे झालेले. त्यातल्या त्यात सुखाची गोष्ट ही की खडक भरपूर होते पण ते शेवाळाने माखलेले नव्हते. त्यामुळे हाताला आणि पायाला घट्ट पकड मिळाली. काही पॅचेस तर  दोन्ही हाताच्या आधाराने चढावे लागले.

आजूबाजूला फुलेलेल्या फुलांनी दृष्टीसुख दिले. असंख्य रंगांची, आकाराची फुले. हिरव्यागार गवतांच्या कुशीत गार वाऱ्यावर डोलणाऱ्या ह्या विविध रंगी फुलांनी नजर खिळवून ठेवली. ट्रेक मार्ग ह्या फुलांमुळे, गवतात चरणाऱ्या गुराढोरांमुळे आकर्षक भासला. 



दोन अनोखी फुले ट्रेकवर पहायला मिळाली जी आजपर्यंत कुठल्याही गडावर/ ट्रेकमार्गावर बघायला मिळाली नव्हती. उत्सुकतेपोटी त्याची माहिती मिळवली. ह्या फुलाचे नाव आहे झिनिया! 


   
जानेवरी २०१६ मधे झिनियाच्या फुलांना अंतराळात वाढविण्याचा प्रयोग होणार होता. हे झिनिया, आजूबाजूच्या वातारणाला संवेदनशील. त्यामुळे अंतराळात जगवण महाकठीण. स्कॉट केली, या शास्त्रज्ञाने नासाच्या वतीने झाडच जीवनचक्र पूर्ण करायचं निश्चित केल. बीज पेरल, रोप उगवल. पण हवी तशी वाढ नव्हती. विविध प्रयोग सुरु झाले. पाणी कधी द्यायचं, प्रकाशाची तीव्रता कमी-अधिक करणे इ. शेवटी जानेवारी २०१६ मधे यश आलं. दोन टपोरी फुले फुलली. या प्रयोगात झिनिया निवडी मागच कारण, ही फुलं वातावरण बदलाशी संवेदनशील आहेत. ही फुले अंतराळात जगली तर इतर जीवसृष्टी सुद्धा निर्माण करता येईल का या विषयाचे ताळेबंद बांधणे ह्या प्रयोगाने शक्य होणार होते. तर अशी ही झिनियाची गोष्ट. 

दुसरे आहे म्हाळुंगी.

असो.

ट्रेक मार्ग अधिक आकर्षक दिसण्याचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे मानवनिर्मित कचऱ्याचा अभाव. संपूर्ण ट्रेकमार्गावर कुठेही प्लास्टिक, बाटल्या, कागद इ. आढळले नाही. होते ते परिपूर्ण नैसर्गिक सौदर्य!



लांबूनच गडावरील बुरुज आणि पायऱ्या दिसल्या. चढून गेल्यावर दिसला तो गडाचा विस्तार. 


गरमागरम भोजन करून गडफेरी सुरु केली. 




सुरुवात केली ती वैराटेश्वर महादेवाचे मंदिरच्या दर्शनाने. 


गाभाऱ्यातील शिवलिंगावरील पितळी नाग देखण्याजोगा. 



मंदिरा बाहेर नंदी. 


 मंडपात वीरगळ.




दुसऱ्या दिवशी श्रावणातील पहिला सोमवार! पुजारी बाबांनी मनसोक्त आरत्या केल्या. पोवाडा देखील गायला.

गडफेरी करत करत स्वप्नील ने त्याच्या गडअभ्यासाचा ग्रंथ आमच्यासाठी खुला केला. किल्ल्याची तटबंदी....



जुन्या तेव्हाचे शौचकूप...



तट संरक्षणासाठी बांधलेल्या  जंग्या (गोळीबार करण्यासाठी भोके), पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी छिद्रे, गडावरील पहारेदेणाऱ्या सैनिकांसाठी फंजी आणि चोर दरवाजा. 

गडफेरी करताना चोर दरवाजाची खुण आणि स्थळ ध्यानासही येणार नाही. खोल खोल आणि चिंचोळी उतार.


तटप्रदक्षिणा घालताना स्वप्नील ने पाणतळे, गडसदर, सैनिकांची घरे, इमारतींच्या जोती, चौथरे, पाण्याची टाकी इ. गोष्टी सचित्र स्पष्ट केल्या.


गडावर गणपतीची मूर्ती आणि दोन हनुमानाच्या मूर्ती. गणपती आणि एक हनुमान मंदिरात. 



एक हनुमान उघड्यावर आहे.



गडावरील भैरवनाथाच्या मंदिराजवळ सतीशिळा आहे. 

गडावरून केंजळगड, कमळगड, पांडवगड, मांढरदेवी चा डोंगर, जरंडेश्वर इ. दिसतात.
अज्ञातवासात पांडव ज्या विराट राजाकडे राहिले त्याची राजधानी ह्या गडावर होती. प्रजा गडपायथ्याशी असणाऱ्या "विराटनगरी" त राहत होती. गडाला" वैराटगड" नाव त्यावरून पडले असावे ही एक दंतकथा. दुसरी दंतकथा ही की महाभारत काळात विराट किंवा वैराट नावाची जमात ह्या किल्ल्यावर वास्तव्यास होती. या जमातीवरून गडास नाव पडले "वैराटगड"!

गडफेरी पूर्ण करून गड  उतरण्यास सुरुवात केली. गणेशवाडी मार्गे गडउतराई थोडी स्टीफ वाटली. कठीण वाटली. साधारण दीड तासात गडउतराई पूर्ण झाली.



पायथ्याला "वडाचे म्हसवे" म्हणून ओळखले जाणाऱ्या गावातील महाकाय वडाचे दर्शन झाले.


ट्रेक खूप आवडला. ट्रेकर्सची गर्दी नसलेला, निसर्गाच्या कुशीत विसावलेला एक अफलातून ट्रेक! वैराटगडाने साताऱ्यातील किल्ल्याना साद घालण्याची संधी मिळाली! असो.

पुण्यात पोहोचलो तेव्हा रात्रीचे दहा वाजलेले.

स्वप्नील ने ट्रेकर्सचा राबता नसलेल्या किल्ल्याची ओळख करून देऊन त्याच्या ग्रंथ संपदेतील एक नवीन ट्रेक अध्याय आरंभ केला असे फिलिंग आले.


बघू सातारा पुन्हा केव्हा साद घालतोय.....

ट्रेकमध्ये मजा आली तो दोन छोट्या दोस्तांमुळे.



आणि अर्थात ट्रेक टीम मुळे....



फोटो आभार: अमित तागुंदे आणि ट्रेक टीम

No comments: