साखरगड, वर्धनगड, महिमानगड, संतोषगड ट्रेक, ७ ऑक्टोबर २०१८


आज तू येणार म्हणून खुश आहोत आम्ही😃 😃😃😃 स्वप्नील भेटला. त्याच्याकडूनच समजल. तुला म्हणे डेंग्यू झालेला. थोड बरं वाटतय तोच  निघालीस आम्हाला भेटायला.  ऐकणार नाहीस.  अर्थात स्वप्नीलला तुझ्यातील क्षमतेची खात्री आहे म्हणूनच तुला आमच्या भेटीला घेऊन आलाय.

एक ध्यानात घे आम्हा तिघांना भेटण्याच टेन्शन घेऊ नको. एखाद्या गडाला भेटू नाही शकलीस तर पुन्हा भेटशीलच. आम्ही इथेच आहोत तुझ्या स्वागतासाठी. ठीक आहे? चल तर मग........

सातारा जिल्ह्यातील म्हसोबा उपरांगेत आम्ही तिघ वास्तव्यास आहोत. वर्धनगड, महिमानगड आणि संतोषगड.

साखरगड निवासिनी: देवी यमाई अर्थात अंबाबाई:

अंबाबाई देवीच दर्शन तू आत्ताच घेतलस. खूप प्राचीन मंदिर आहे. गाभाऱ्यात देवी अंबाबाई आहे तर मंदिराच्या प्रवेशद्वाराशी नंदी. हे या मंदिराच एक वैशिष्ट्य. मंदिराच्या प्रांगणात भव्यदिव्य दीपमाळा आहेत. एका दीपमाळेवर शिलालेख कोरला आहे. मंदिराच्या पायऱ्या चढून मजबूत अवाढव्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर पायरीवर पण एक शिलालेख आहे. पाहिलास ना?आणि मंदिराचा कळस? देवादिकांच्या किती सुंदर, रेखीव , रंगीत आणि सुबक प्रतिमा कोरल्या आहेत. नुकतेच त्यांचे नूतनीकरण झाले आहे.


मंदिरावर असंख्य दगडी कोरीव शिल्प आहेत.किन्हई गावातील साखरगडावर वसलेल्या ह्या  साखरगड निवासीनी चा नवरात्रात उत्सव भरतो.

वर्धनगड:

सातारा-पंढरपूर मार्गावर पुसेगाव सोडल की वर्धनगड नावाच गाव आहे. गावातून माझ्याकडे यायला पायवाट आहे. गडावर वर्धनीमातेचे मंदिर आहे. ही देवी माता नवसाला पावते. नवस पूर्ण झाला म्हणून काही भाविकांनी पायऱ्या बांधून दिलेल्या आहेत. तू सुरुवातीला ज्या पायऱ्या चढून आलीस त्या पायऱ्या भाविकांची मनोकामना पूर्ण झाली म्हणून बांधलेल्या आहेत.धाप लागतेय ना? हळू ये. आजारातून नुकतीच बरी झालीस आहेस. गड चढायला जास्त कठीण नाही. जास्तीत जास्त अर्ध्या तासात गडावर येशील.हनुमानाचे हे अनाच्छादित मंदिर. "उघडा मारुती" म्हणतात. असंख्य भाविकांनी श्रीराम भक्त  हनुमानाला मंदिर देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही.आलीस की गडाच्या मुख्य दरवाज्याजवळ. अत्यंत मजबूत आणि  भव्य दरवाजा. उंची फारशी नाही त्यामुळे वाकून यावे लागेल. किती थंडावा आहे इथे. इथूनच गड परिसर , गडाची तटबंदी सुरु होते.हनुमानाचे आणि शंकराचे छोटे खानी मंदिर आहे. मंदिराजवळ पाण्याचे मोठे टाके आहे.

ह्या समोरच्या टेकडीवर आहे वर्धनीमातेच मंदिर. जागृत देवी. सभामंडपातील कासव बघितलस का? सुरेख आहे ना? नवरात्र जवळ आलाय ना त्यामुळे लगबग सुरु आहे. साफसफाई, रंगरंगोटी आणि स्पीकर सुविधा.

मंदिराच्या सपाटीवर असणारे हे "आवळे-जावळे' पाण्याचे जोडटाके.गडावरून दिसणारी सातारा-पंढरपूर सुंदर मार्गवळणे. चौफेर गड तटबंदी आहे. तटबंदी सरळसोट नाही. नागमोडी आहे. तटबंदी फारशी उंच नाही. ह्याच कारण की ह्या मार्गावर लक्ष ठेवता याव. सैनिकांना पहारा करता यावा म्हणून फांजी बांधलेली आहे. तिची रचना आजही शाबूत आहे. 

कशी वाटली तटप्रदक्षिणा? गडाच्या सौदर्याचा रत्नजडीत अलंकारासारखी वाटली ना तटबंदी? तू छान मोसमात आली आहेस. सपाटीवर हिरवळ आहे. हिरवळीच्या पार्श्वभूमीवर तटबंदीची कातळ भिंत खुलून दिसते आहे.ध्वजस्तंभ! हे गडाच्या शौर्याचे प्रतिक.

गडाला खूप भारी चोर दरवाजा आहे बरं का. तिकडेच जातोय आपण. पायऱ्या हळू उतर. एकावेळी एकच जण अंगचोरून येऊ शकेल अशी ही चोरवाट."सादिकगड" असे गडाचे नामकरण औरंगजेबाने केले होते.

कसा वाटला किल्ला?आवडला म्हणतेस.😁😁😁😁😁😁

महिमानगड:

आलीस का? तुझीच वाट पाहतोय? भूक लागलीय का? स्वप्नीलने सांगितल आधी गडभेट, मग जेवण. चालतय ना?
गडाची चढण तीव्र आहे. हळू ये. तुझा वेळ घेत ये. दिसली का तटबंदी?


काही पायऱ्या चढून आलीस की पडझड झालेला कमानी दरवाजा आहे.दरवाज्यावर सुंदर हस्तीशिल्प कोरल आहे.हनुमानाचे शेंदूर अर्चित प्रतिमा आहे इथे.


पुढे जाऊ ..समोर बुरुज आणि ढासळलेली तटबंदी दिसतेय ना? इथून पुढे लांब पसरलेली सोंड आहे.


सोंडेवर, माचीवर जाण्यासाठी बुरुजवजा चोर दरवाजा आहे. कमी उंचीचा आणि चटकन ध्यानात येणार नाही अशी त्याची रचना आहे.सोंड किंवा माचीवरून दिसणारा नजारा अलौकिक आहे म्हणतेस? सोनकी फुलली आहे.

गडावर महिमान शाहवली या संताचे वास्तव्य होते. त्यांच्या वास्तव्यामुळे गडाला "महिमानगड" नाव पडले.दोन गड केलेस की तू? भारीच आहेस.

मंदिरात भोजन करा आणि पुढे संतोषगडा कडे जा.

संतोषगड:

उशीर झालाय पोहोचायला तुला ..काही हरकत नाही. थकली नाहीस ना? चढाई आहे जरा खडी. हळूहळू ये. तुषार आहे तुझ्या सोबतीला.

पायथ्याच गाव आहे ताथवडे. गावावरून गडाला "ताथवडे चा  किल्ला" म्हणूनही ओळखतात.

येताना पाटीवर "शिवकालीन मंदिर" वाचलेस ना?आता अंधार होत आहे त्यामुळे काही ठळक अवशेष आपण पाहू. पहिला आणि दुसरा दरवाजा पूर्णत: ढासळला आहे."शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन" ह्या संस्थेने गडाचा कायापालट केला आहे.एकदा दिवसा भेट दे. गडावरच्या वैभवाची तुला कल्पना येईल. आता टॉर्च च्या प्रकाशात आपण फारसे स्पष्ट  पाहू शकणार नाही. 

शिवकालीन विहिरी कडे जातोय आपण. गडावरची सर्वांग सुंदर कलाकृती. विहिरीच्या कोरीव पायऱ्या चक्क बसून उतर. खोल आहे विहीर. पाणी पण आहे. विहीरीच काम अति भव्यदिव्य आणि मजबूत आहे बघितलस ना? काठावरच्या वटवृक्षाच प्रतिबिंब पाण्यात पडत.अतिशय नयनरम्य


काठावर महादेवच मंदिर आहे.

आता जातोय राजसदरे कडे. गवत जरा वाढलय. जपून. इथे थोड हळू दगडी खाच उतरून जायचं आहे. राजसदर प्रशस्त आहे. राजा आणि प्रजा ऐसपैस बसू शकतील. बांधकाम अजून भरभक्कम आहे.

चिलखती बुरुज, गडावरचा अजून एक भारी अवशेष. नजर हटणार नाही अशी कलाकृती. धान्यकोठार खोली वजा आहे.

कसा वाटला गड? एकदा दिवसा नक्की भेट दे.

आपण आता खाली उतरू..अंधार पडलाय आणि साडेसात वाजत आलेत.

तुला मनात धाकधूक होती ना की तू आम्हा तिघांना भेटू शकशील की नाहीस? बघ आत्ता. तिन्ही जणांची भेट झाली तुझी. आम्ही पण खुश आहोत.

साताऱ्या जिल्ह्यात जवळ जवळ २५ गड आहेत. काही छोटे काही मोठे. जमेल तसे पाहून घे.

तुला कमळगड आणि दातेगड खासकरून पाहण्याची इच्छा आहे ना. नक्की पूर्ण होईल. जिद्द कायम अशीच ठेव.

बरं निघा तुम्ही आता. पुण्यात पोहोचायला उशीर व्हायला नको. जय शिवराय!

स्वगत:

गाडीतून पुण्याकडे निघाले. सकाळपासूनचा फेरफटका मारला. मनातल्या मनात . वर्धनगड, महिमानगड आणि संतोषगड! किती सुरेख गड आहेत . उंचीला कमी, चढायचा अवधी कमी. इतिहासाने मात्र परिपूर्ण. दुर्गावशेष संपन्न. मनात आलं ट्रेकिंगची सुरुवात ह्याच गडापासून हा करत नाहीत? ह्या गडांना इतिहास आहे, दूर्गअवशेष संपन्न आहे, किल्ला समजून घ्यायला आणि गड/किल्ल्यांच्या संज्ञा माहित करून घ्यायला ह्यासारखे दुसरे किल्ले नाहीत.

खूप समाधानी आहे. तीन गडांना भेटू शकले. त्यांच्या आपलेपणाने आणि वैभवशाली दुर्गावशेषांनी भारावून गेले. स्वप्नील आणि तुषारने ने माझ्यातला आत्मविश्वास दृढ केला म्हणूनच तीन गडांना भेटू शकले. 

अशाच  काही अनोख्या किल्ल्यांना भेटण्याची इच्छा आहे. स्वप्नील सोबत ही गडभेट अधिक समृध्द होते हे मात्र नक्की.

😪😪😪😪😪😪😪😪😪😪


(डावीकडून: स्वप्नील, अमित, आशिष, मी, मोनिशा, धनश्री आणि सुशील सर)

फोटो, खास आभार: अमित तागुंदे आणि सुशील दुधाने सर

इतके सुरेख गड आणि ट्रेक चे सुंदर नियोजन केल्याबद्दल खास आभार: Travorbis Outdoors👍👍👍👍 
No comments: