रोहिडा ट्रेकचा अनुभव लिहायला घेतला. सुरुवातच सुचेना. इतके वाजता निघालो, इतके वाजता पोहोचलो इ. साच्यात अडकलेल्या अनुभवातून बाहेर यायचे
होते. समोर सोनी टीव्ही मराठी चॅनल सुरु होता. हातात कागद आणि पेन घेतलं. डोळे बंद केले.
ट्रेक बंद डोळ्यासमोर उभा केला. बंद डोळ्यांनी जो नजारा दिसला तो डोळे उघडत
कागदावर चितारला केला.....
गालावर आणि कानावर टचाटच आपटणाऱ्या पर्जन्य सरी!
धुक्याच्या दुलईत निजलेला रोहीडा!
जमिनीत पाय कितीही घट्ट रोवले किंवा माझ्या ट्रेकिंग स्टिक वरची
पकड कितीही घट्ट केली तरी तीन-चार पावले फरफटत नेणारा सोसाट्याचा वारा!
घोंघावणाऱ्या वाऱ्याच्या वेगापुढे न वाकता/न जुमानता
त्याच्याच ताकदीने लयीत डोलणारी गवताची पाती!
डोलदार गवताच्या पात्यात स्वत:चे अस्तित्व टिकवू पाहणारा
जलबिंदू!
शेवाळ विरहीत लहान-मोठे स्वच्छ सुंदर ओबडधोबड खडक!
हिरव्यागार शेतपिक तुकडयांनी सजलेली निसर्ग रांगोळी!
कातळात पडलेल्या भेगांमधून अलगद डोकावणारी, वाढू पाहणारी
हिरवीगार रानफुले!
रखरखत्या कातळाला ओलाचिंब करत वाहणारा पर्जन्य झरा!
अशा निसर्गरम्य वातारणात ट्रेक करणारी मी........
तुफान वायुगतीने भुरकन उडालेली माझी टोपी!
चष्म्याच्या काचेवर विसावलेल्या पर्जन्यबिंदूमुळे अस्पष्ट
दिसणारा ट्रेक मार्ग!
पावसाळी जॅकेटमधे गुडूप झालेला माझा चष्मा!
धापा टाकत टाकत न थांबता, विना चष्मा पूर्ण केलेला ट्रेक!
बहिणीच्या ऑफिस मधील तिची सहकारी माझी ट्रेक साथीदार!
भावाच्या मित्राची मुलगी ही माझी ट्रेक साथीदार!
मागच्याच ट्रेकला साथ देणारी पुन:श्च या ट्रेकला!
मोबाईल कॅमेऱ्याला अचानक मिळालेली सुट्टी!
शेतातील बीन्स (राजमा) टाकून ताटात आलेली गरमागरम रस्सा
भाजी!
सकाळी सहा वाजता निघून दुपारी ३ वाजताच घरी पोहोचविलेला पहिला
ट्रेक!
कॅमेऱ्याच्या फ्रेमने टिपलेले दोन तरुण, उत्साही चेहरे, निहार
आणि गंधार!
किल्ला: समुद्रसपाटीपासून तीन हजार साहशे फुट उंच, ट्रेकिंगची
आवड जोपासायला लावणारा ट्रेक, एकमेकांपासून लपणारे तीन दरवाजे, देवनागरी आणि फारसी
भाषेत कोरलेले शिलालेख, वाघजाई बुरुज आणि देवीचे मंदिर, पाण्याची टाकी, शिवलिंगाचे
अवशेष, चुण्याचा घाणा इ. किल्ल्यावरील काही अवशेष!
ट्रेक सहकारी:
फोटो आभार: ट्रेक टीम, मोनिका आणि सविता.
No comments:
Post a Comment