मृगगड ट्रेक आणि उंबरखिंड स्मारक, १ जुलै २०१८


मृगगड किल्ला! "मृग सदृश" आहे की काय हा विचार पहिल्यांदा चमकून गेला. एक वेगळा किल्ला पहायला मिळणार ही उत्सुकता! पुणे-लोणावळा-खोपोली आणि तिथून पाली रस्त्याने परळी-जांभूळपाडा-भेलीवसावे हा रोडमार्ग! भेलीवसावे अर्थात भेलीव हे किल्ल्याचे पायथ्याचे गाव. मृगगड किल्ल्याला "भेलीव चा किल्ला" असे सुद्धा म्हणतात. 




भेलीव गाव जवळ यायला लागले आणि वरील फोटोतील तीन एकसंध डोंगरांनी लक्ष वेधून घेतले. मधला डोंगर तो "मृगगड"!

भेलीव गावात गाडी थांबली ती शाळेजवळच. तिथेच ओळख परेड झाली. साधारण सकाळी ११ च्या सुमारास ट्रेक सुरु झाला. ट्रेक वाटेवरील मोहक फुले, भातशेते,  पांढऱ्या रंगाने मढलेला मंदिराचा उंच कळस इ. चे डोळादर्शन घेत पाऊले किल्ल्याच्या दिशेने गती घेऊ लागली.




पाऊस बहुधा आदल्या दिवशी हजेरी लावून गेलेला. हिरवेगार कुरण आणि गर्दहरित जंगलातून जाणारी पायवाट...




पायवाट निसरडी नव्हती. जंगलाला बऱ्याच ढोरवाटा होत्या त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र रहात होतो. जंगलवाट काही ठिकाणी चढाईची तर काही ठिकाणी सपाट होती. साधारण पाऊण तासाने जंगलवाट संपली. एका अरुंद रॉक पॅच जवळ आम्ही आलो.  हा रॉक पॅच अतिशय अरुंद, चिंचोळा. एककतार...एकावेळी एकच जण जाऊ शकेल असा.  थोड तिरकं होऊन त्या पॅचमधे घुसावं लागल. पाठीवरची पिशवी कडेच्या दगडांवर घासत होती. पॅच  काही हलणाऱ्या दगडांनी तर काही मातीत घट्ट रुतून बसलेल्या दगडांनी बनलेला . कडेच्या दगडांचा आधार घ्यावा तर काही भाग ओलसर-शेवाळाने साचलेला. त्यावर हाताची पकड बसत नव्हती आणि हात सटकत होता. एका ठिकाणी दगडी पायरी इतकी उंच होती की काही केल्या हाताची आणि पायाची पकड घट्ट रोवून शरीर पुश करणे मला जमेना. ट्रेक सहकाऱ्यांनी मदत केली. 

जितेंद्र बंकापुरे यांच्या अनघाई-मृगगड या 18 एप्रिल 2014 रोजी पोस्ट केलेल्या ब्लॉग मधे या अरुंद रॉक पॅच चा उल्लेख "चिमणी क्लाईब" असा केला आहे. तो शब्द मला खास वाटला. 

ह्या पॅच नंतर अजून एक किंचित अवघड पॅच होता. उतरत्या दगडावर पाणी आणि शेवाळ साचलेले त्यामुळे पाय घसरायची भीती वाटली. 




इथल्या प्लॅटूवर एका बाजूला मृगगडाची माहिती देणारा फलक, एकीकडे गुहेकडे जाणारा रस्ता, एकीकडे गडावर जाणाऱ्या दगडी पायऱ्या तर एकीकडे खाली दिसणारे भेलीव गाव. मनमोहून टाकणारा परिसर! 



गडावर जाणाऱ्या दगडी खोदीव पायऱ्या थोड्या काळजीपूर्वक चढले. कारण त्यांची उंची जास्त होती आणि एका बाजूला खोल दरी! वरच्या पायऱ्या चढण्यासाठी दगडात खोबण्या होत्या ज्यांच्या आधाराने पायऱ्या चढून जाणे तितकेसे अवघड गेले नाही. पायऱ्या संपल्या. पुन्हा एक प्लॅटू; वाऱ्यावर डोलणाऱ्या गवतांनी फुललेला. 

अजून काही पायऱ्या चढून गडाच्या शिखरावर आलो. पुन्हा एक मोठा  प्लॅटू. तिथे होत्या पाण्याच्या टाक्या आणि खूप सारे काही गोलाकार तर काही चौकोनी छोटे खोदीव खड्डे. 





गडाच्या शिखरावर ....अगदी टोकाला! 



मृगगड तसा छोटा. साधारण एका तासाची चढाई. 

दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सर लिखित "गड किल्ले महाराष्ट्राचे" या ग्रंथातील मृगगड किल्ल्याविषयीची  ही माहिती....




मृगगड ट्रेक मला भलताच आवडला. अरुंद रॉक पॅच, दगडी पायऱ्या, आधारासाठी खोबण्या, गुहा, पाण्याच्या टाक्या, दगडात कोरलेला गणपती.. 

गड आवडला म्हणून खुश मी होतेच पण खुशीच अजून एक कारण की वयाच्या ५१ व्या वर्षातील हा माझा पहिला ट्रेक! FYOWs टीम, निखील आणि तृष्णा तसेच अन्य ट्रेक सहकारी यांनी माझा ५० वा वाढदिवस साजरा केला हे ही कारण खुशिचेच! 



असो. 

गडाचे महत्व काय? हा प्रश्न सतावत होता. मृगगडावर लिहिलेले ब्लॉग वाचताना गडाचा उल्लेख "घाटवाटा रक्षक" म्हणून केलेला आढळला. 'प्रहार' या मराठी दैनिकात 21 डिसेंबर 2016 रोजी विवेक तवटे यांच्या घाटरक्षक मृगगड या लेखात  त्यांनी लिहीलय, "देशातून कोकणात वाहतुकीसाठी उतरणारे अनेक घाट महाराष्ट्रात इतिहासकालापासून अस्तित्वात आहेत. नाणेघाटासारख्या प्रसिद्ध घाटवाटेबरोबरच सवाष्णी, नाणदांड, बोराटयाची नाळ, कावळया घाट या घाटांची नावंही चटकन डोळयांसमोर येतात. लोणावळयाच्या ‘टायगर्स लीप’ पॉइंटपासून एक सरळसोट घाट कोकणातल्या भेलीव गावात उतरतो.
भेलीवमधले स्थानिक ग्रामस्थ जरी या घाटाला ‘पायमोडी’ घाट म्हणत असले तरी इतिहासात हा मार्ग ‘सव घाट’ म्हणून प्रसिद्ध आहे. या सव घाटावर बारीक नजर ठेवण्यासाठी मध्ययुगात एका लहानशा, पण भौगोलिकदृष्टया महत्त्वाच्या किल्ल्याची निर्मिती झाली. पुणे-मुंबईवरून एका दिवसात आणि कोणत्याही ऋतूत सहज भेट देता येईल असा एक सदाबहार किल्ला म्हणजेच रायगड जिल्ह्यातला ‘मृगगड’ ऊर्फ ‘भेलीवचा किल्ला".
तर असा हा घाटरक्षक मृगगड! 

गडावर दुपारचे जेवण करून गड उतरलो तेव्हा साधारण २.३०-३ वाजले असतील. लगोलग उंबरखिंड गाठली. ह्या स्मारकाला भेट देण्याची इच्छा आज सफल झाली. 




छत्रपती शिवरायांनी काळाच्या पुढे विचार करून वापरलेल्या युद्धनीतीसाठी आणि त्यांच्या गुप्तहेर खात्याच्या सक्षमतेसाठी हि लढाई प्रसिद्ध आहे. आजूबाजूची भौगोलिक रचना, उंबरखिंडीच्या सभोवती असणारे सह्याद्रीचे अजिंक्य कडे, नदी, घाटवाटा, जंगल, उंच झाडी इ. चा अतिशय बारकाईने विचार करून शत्रूला आपल्या हालचालींचा जरासाही सुगावा लागू न देता, मोक्याच्या ठिकाणी शत्रूला  बेसावध पकडून, चारही बाजूंनी त्याच्यावर  जोरदार आक्रमण करून गाफील अवस्थेत त्याला पकडायचे आणि आपल्या सैन्याचे कमीत कमी किंवा अजिबातच नुकसान न होऊ देता शत्रूसैन्याचे  जास्तीत जास्त नुकसान करायचे अशी ती काळाच्या पुढे जाऊन वापरात आणलेली युद्धनीती. छत्रपती शिवाजी महारांजांचे बुद्धिचातुर्य चा अभिमान वाटावी अशी ही लढाई आणि स्मरणात उभारलेले स्मारक!


उंबरखिंडीचा इतिहास नदीकाठावर शांत बसून अभिमानाने समोर बघत राहण्याचा अनुभव गाठीशी हवाच! 

असो. 

उंबरखिंड स्मारक पाहून परत येताना शेजारच्या चावणी गावचे एक जोडपे भेटले. आजूबाजूला मला फुले-पाने शोधताना पाहून थांबले. एक वेगळ्याच प्रकारचे पान दिसले आणि कुतुहलाने मी ते न्याहाळत होते. जोडपे थांबले आणि म्हणे, " ते लोथ आहे. त्याची भाजी बनवतात. अळूसारखे ते खाजरे असते म्हणून समोर ते झाड दिसत ना ते "नाना बोंडयाच".त्याची "बोक" म्हणजे देठ तोडून लोथाच्या पानात मिसळून भाजी बनवतात. खूप भारी लागते भाजी. शेवाली ची भाजी असते. पण त्याची पाने इथे दिसत नाहीत नाहीतर दाखवली असती"




भाजी ट्रेकला गेले की  तिथले पाने, फुले इ. ची स्थानिक नावे माहित करून घ्यायची इच्छा नेहमीच पूर्ण होते असं नाही. ह्यावेळी ती पूर्ण झाली ह्याच्या ख़ुशीने ट्रेकच्या पूर्णत्वाचे समाधान मिळाले. 

असो.


मृगगड किल्ला मृगसदृश भासला नाही . "मृगगड" नाव का दिले? माहिती तर सापडली नाही. पण गुगल वर गडाविषयी सर्च करताना एक सुंदर गजल समोर आली. विजय कुमार सिंघल यांची ही गजल....


जंगल जंगल ढूँँढ रहा है मृग अपनी कस्तुरी को
कितना मुश्कील है तय करना खुद से खुद की दुरी को||

  


ह्या सुरेख गजलचा भावार्थ शोधत परत भेटूच......लवकरच!

☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝
फोटो आभार: ट्रेक टीम




1 comment:

Anonymous said...

These continuum yield equations, nevertheless, don't keep in mind the crystallographic textures of the fabric. Metal sheets have to be coated with meals grade lacquer and dried at thermal drying oven for steel can making course high precision machining of. At the thermal drying oven, exhaust fuel is delivered out by the blower to eliminate the solvent. This results in the temperature lowering at the drying zone of the thermal drying oven, particularly to unloading.