पाचवा कात्रज टू सिंहगड ट्रेक (दुसरा डे ट्रेक) , १७ जून २०१७

हा पाचवा केटूएस ट्रेक! “एव्हरेस्ट दर्शनाची इच्छा” हे पहिला केटूएस करण्यामागे कारण होतं! “एव्हरेस्ट दर्शन” अर्थात एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक समीटसाठी केलेला सराव आणि प्रत्यक्षात केलेला ईबीसी ट्रेक ह्याचा काय परिणाम झाला आहे ह्याची पडताळणी हे होतं पाचव्यांदा केटूएस करण्यामागचं कारण!

पावसाळयातला दिवसाचा हा ट्रेक होता. ६.३० च्या कोंढणपूर एस.टी. ने कात्रज जुना बोगद्या कडे आम्ही निघालो. साधारण ७ च्या दरम्यान तिथे पोहोचलो. 


नुकत्याच झालेल्या पावसाने पायवाटेची माती दबल्या गेली होती आणि हिरव्यागार कुरणात काळसर-लाल ही मातीची पायवाट खुपचं खुलून दिसत होती. पायवाटे कडील बाजूने दिसणारे वाघजाई मंदिर, कळसावर पसरलेला वटवृक्ष आणि फडफडणारी भगवी पताका जणू निसर्ग पूर्णत्वाला नेत होते. बाजूला असलेल्या वड्याच्या झाडाचे सौदर्य आज काही अलौकिक वाटत होते! हिरवीगार पाने, प्रचंड मोठे खोड, सर्वत्र पसरलेल्या फांद्या आणि वाऱ्याने झुलणाऱ्या अगणित पारंब्या!


वाघजाई मातेचं दर्शन घेऊन सकाळी ७.३० ला ट्रेक सुरु केला. मी, उषा, मयुरी, संगीता मॅडम, शीतल, पूनम, अमित, मयूर, जय, जितीन, यज्ञेश आणि विशाल असा आमचा ग्रुप होता. 

मी आणि उषाने टेकड्या मोजायचा निश्चय केला होता!


पावसाळ्यात दिसणारे काही वर्म्स, बुलबुल, गोगलगाय इ. नी आमचे स्वागत केले. 




पहिली टेकडी पार करताना दोन्ही बाजूला दिसणारा डोंगराच्या कपारीतील कात्रजचा जुना आणि नवीन बोगदयाचा डांबरी रस्ता आकर्षक दिसत होते. 

एकीकडे दिसणारे पुणे शहर, दुसरीकडे, लक्ष्मी आणि कानिफनाथ मंदिराचा परिसर, तिसरीकडे दूरवर दिसणारा वज्रगड आणि पुरंदर आणि चौथीकडे असंख्य टेकड्यांच्या पलीकडे दिसणारा सिंहगड! दिवसाच्या ट्रेकची हीच तर कमाल आहे!

एक –एक टेकडी पार होत होती. उषा आणि मी निसर्गाचा आस्वाद घेत ट्रेक एक्स्प्लोर करत होतो. असंख्य प्रकारची फुले, भूछत्र आणि नव्याने फुटणारे कोंब इ. हा ट्रेक परिसर फुलून गेला होता! 


२-३ पाऊस पडून गेले की केटूएस ट्रेक असा निसर्ग सौंदर्याने लखाखतो! जमिनीवर असंख्य पाने-फुले, कीटक, दोन टेकड्यांना जोडणारी पायवाट आणि एकामागोमाग एक टेकड्यांची रांग! 

ट्रेकचा आनंद अधिक वाढला जेव्हा यज्ञेश ने "कृष्ण आणि हनुमान" हा खेळ घेतला.


  
आता उन्हाचा चांगलाच तडाखा बसत होता. आकाशात काळे ढग दिसत नव्हते की पाऊसाचे कोणतेही लक्षण दूरदूर वर नजर येत नव्हते. त्यामुळे बरेच जण नाराज असले तरी केटूएस ट्रेकचं सौदर्य दिवसा अनुभवण्याची मजा लुटत होते!

प्रत्येक टेकडीची रचना, टेकडीचा चढ आणि टेकडीचा उतार काही खासचं आहेत. सुरुवातीला माती पावसाने दबलेली होती त्यामुळे चढताना किंवा उतरताना ग्रीप मिळत होती. ३-४ टेकड्यानंतर पाऊस झाला आहे हे असं वाटतं नव्हतं आणि त्यामुळे इथे माती थोडी प्रवाहशील होती. उतरताना थोडी खबरदारी घ्यावी लागत होती.




आता थोडं ढगाळ वातावरण तयार झालं होतं. दूरवरच्या डोंगरावर पाऊस पडत होता. तो आमच्यापर्यंत येण्याची वाट पाहत आमचा ट्रेक सुरु होता. दोन मुली पहिल्यांदा ट्रेक करत होत्या आणि त्यांच्या रुपात मी स्वत:ला बघत होते. तोल सावरता येत नव्हता, उतरताना घसरायची भीती वाटतं होती, उभं राहून ट्रेक करणं केवळ अशक्य वाटतं होतं, घसरगुंडी करत दोघी ट्रेक करत होत्या, कोणाचा तरी हातांचा आधार लागत होता, टेकडी चढायला नको वाटतं होतं. ट्रान्सव्हर्स घ्यायला सांगत होत्या. मला तेव्हा पहिल्यांदा कळलं की बऱ्याचशा टेकडयांना साईडने पायवाट आहे! असो. भरीत भर हवामानाने आमची अपेक्षा फोल ठरवल्याने आमच्या सर्वांकडचे पाणी संपले होते!

काही जणांना क्रॅम्प्स यायला लागले होते. चालायला त्रास होऊ लागला होता. खूप जणांनी त्यांना मदत केली, मसाज केला, पायाची बोटे ओढली, विश्रांतीचा सल्ला दिला. उलटी आणि मळमळ ही भावना त्यांचे चित्त अस्थिर करत होती! त्यांना पुरेसा वेळ देऊन आम्ही ट्रेक करत होतो!

१३ टेकड्या आम्ही पार केल्या. अचानक दूरवर दिसणारा पाऊस आमच्यापाशी येऊन धडकला आणि तूफान बरसला! पावसाच्या सरी इतक्या प्रचंड वेगाने बरसत होत्या त्यांचा आवाजाने आसमंत भरून निघाला! आजूबाजूला धुकेच धुके, सोसाट्याचा वारा आणि अंगावर सपासप पडणाऱ्या पावसाच्या सरी! पावसाच्या सरी कानावर, मानेवर, पाठीवर इतक्या जोरात आदळत होत्या की कान झाकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. अचानक कोसळलेल्या पावसाने आम्ही सर्वंच क्षणात ओलेचिंब झालो. थंडीने कुडकुडू लागलो. ट्रेक रस्त्यावर पाण्याचे ओहोळ वाहू लागले.

विशाल मोरे नावाचा मुंबईचा एक क्लायंबर आम्हाला भेटला. तो आम्हाला एका ठिकाणी बसून न राहण्याचा सल्ला देत होता. “क्रॅम्प्स वाढतील त्यामुळे चालत रहा” असं तो म्हणत होता. पण वारा इतका सोसाट्याचा होता की त्याच्या वेगाने आम्ही हेलकावत होतो आणि इतक्या प्रचंड पावसात, सोसाट्याच्या वाऱ्यात आणि घसरड्या मातीत पुढे जाणं आम्हाला धोक्याचं वाटतं होतं. पावसाचा वेग थोडा ओसरला आणि आम्ही एकेकाने पुढे ट्रेकला सुरुवात केली!

एकूण १५ टेकड्या, एस, केटूएस ट्रेक मध्ये  १५ मोठ्या टेकड्या तर खात्रीने आहेत. (लहान टेकड्या १-२ असतील ज्या आम्ही धरल्या नाहीत). प्रत्येक टेकडीच्या टॉप वर आम्ही फोटो घेतला. हाताची दहा बोटांनंतर काटक्यांचा आणि दोन पेन सापडले त्यांचा आधार घेतला. १५ व्या टेकडीवर विशालने शिक्कामोर्तब केला!



१५ टेकड्या पार करून झाल्या तेव्हा पाऊस थांबला होता. पावसाने बरसून सर्वांची इच्छा पूर्ण केली होती! विशाल तर कमालीचा खूष झाला होता. मान्सून हा त्याचा आवडता सिझन!

पावसामुळे सिंहगडावर ट्रॅफिक जाम झालं होतं त्यामुळे आम्ही तिकडे न जाता आतकरवाडीत जेवण केलं. कांदा भजी, पिठलं-भाकरी आणि गरमागरम चहा!



साधारण रात्री ८.३० च्या पीएमटीने निघून ९.३० च्या दरम्यान पुण्यात आलो.

उषाने काढलेले फोटोज, टवटवीत निसर्ग, तूफान बरसलेला पाऊस, शीतल -पूनमचे गमतीदार किस्से इ. मुळे हा परिपूर्ण ट्रेक झाला!

पहिल्या डे ट्रेकच्या (९ जुलै २०१६) वेळी विशाल म्हणाला होता, “मॅम खूप डीटरमीनेशन ने ट्रेक करतात”

आजच्या दुसऱ्या डे ट्रेकच्या (१७ जून २०१७) वेळी मयुरी मला म्हणे, “ व्हॅली ऑफ फ्लावर्स ट्रेक नंतर एका वर्षात तू स्वत:ला किती छान डेव्हलप केलं आहेस”

जितीन म्हणे, “मॅम आपने खुद को फिजिकली बहोत फिट किया है, आपके बॉडी से पता चलता है”

उषा म्हणे, “तुमच्या ट्रेक करण्याच्या वेगात कमालीचा फरक झाला आहे”

संगीता मॅडम म्हणे, “ तू कमाल आहेस हं, चार वेळा हा ट्रेक केलास?”

अमित आणि मयूर म्हणे, “सविता मॅम कडे बघा, त्या कशा ट्रेक करताहेत?”

हे ऐकुन, खरंतर माझा ट्रेक उद्देश सफल झाला. पडताळून पाहण्याचं काम माझ्यासोबत ह्या सर्वांनी केलं होतं!

पहिल्या ट्रेकला हृदयाची धडधड (स्पन्दने) इतकी तीव्र होती (दम खूप लागायचा, तोल जायचा) की मी मला थोड्या थोड्या वेळाने काही मिनिट थांबव लागायचं. दुसऱ्या ट्रेकला असं वाटलं होतं की मी खोलं दरीत उतरतं आहे. तिसऱ्या ट्रेकला (पर्वती एन्ड्युरन्स सराव नुकताच सुरु केला होता) तोल सावरण्यात मी ७०% यशस्वी झाले होते.चौथ्या ट्रेकला, विनाथांबा काही टेकड्या पार केल्या होत्या आणि प्रशांतच्या बरोबरीने ट्रेक लीड केला होता!

ह्यावेळी अमितला म्हटलं देखील, “ट्रेकमधे, मी आणि विशाल दोन टोके असायचो. तो एकदम पुढे आणि मी एकदम मागे”! हे अंतर बऱ्यापैकी कव्हर करायला मला तीन वर्ष लागले!

ह्या पाचव्या ट्रेकमध्ये मला जाणवलं की,

१५ च्या १५ टेकड्या मी विनाथांबा चढून जाऊ शकले.
तोल ढळणं, दम लागणं हे जवळ जवळ ९०% कमी झालयं.
टेकडी चढण्याचं (एकंदरच ट्रेक करण्याचं) स्पीड वाढलं होतं.
ट्रेक मध्ये आणि खास करून उतरताना शरीराचा तोल सांभाळण्याचा काही इशु जाणवलाचं नाही
उतरताना एकदम आत्मविश्वासाने (विना घबराट, विना आधार) पावले टाकत होते.
बऱ्यापैकी उभ्याने (विना घसरगुंडी) ट्रेक करू शकले
ट्रेक करण्यात एक प्रकारचे टेन्शन, दडपण, ताण जाणवला नाही.
पहिली टेकडी पहिली वाटली नाही की शेवटची टेकडी शेवटची वाटली नाही.   
अजिबात थकवा आला नाही.
 यज्ञेश एकदा पळत खाली उतरला त्याला पाहून मी हे आता करू शकेल असं   वाटलं (केलं नाही हे वेगळं, पण हा विचार केटूएस ट्रेकला येण..)

हे तर तांत्रिक परिणाम झाले. शेवटची टेकडी मी उतरले तेव्हा अमितही खूष झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला आनंदित करून गेला. मी त्याला म्हटलही, “मला आता (खास करून केटूएस उतरणं आणि ते ही पावसानंतर झालेली घसरडं) हे जमतयं”.

ह्यावेळी विशालच्या चेहऱ्यावर जो आनंद मला दिसला तो माझ्यासाठी खरा परिणाम आहे”! 

मला असा प्रगतीशील परिपूर्ण ट्रेक करताना पाहून प्रचंड खूष झाला होता तो! कसोटीला "शिष्य" पार उतरला की "गुरु" हा विचार करायला लावणारा मुद्दा असला तरी आज मी विशाल आणि त्याच्या टीमच्या त्याच्या जीवनात हा क्षण आणू शकले की तुलनेत त्यांना ह्यावेळी माझ्याकडे तेवढं वैयक्तिक लक्ष द्यावं लागलं नाही आणि हीचं माझ्यासाठी मोलाची गोष्ट आहे!

हा आतापर्यंचा प्रवास माझ्यासाठी खडतर नक्कीच होता. पण अथक प्रयत्न, गिव्हअप न करणं, सरावातील सातत्य आणि विशालच्या शब्दात “डीटरमीनेशन” यांच हे फलित आहे!

पहिल्या चारही केटूएस ट्रेकने मला काहीतरी साक्षात्कार दिला होता. पहिल्या ट्रेकने फिजिकल फिटनेस आणि सक्षमता यया दृष्टीने मला माझी नवीन ओळख करून दिली होती. दुसऱ्या ट्रेकने मला स्वत:चा अभिमान वाटला, स्वत:च्याचं प्रेमात पाडलं आणि स्व-प्रतिमा उंचावली. तिसऱ्या ट्रेक ने जाणीव करून दिली की ट्रेकिंग साठी एन्ड्युरन्स प्रक्टिस जरुरी आहे. चौथ्या ट्रेकने माझ्या मनात प्रश्न निर्माण केला, “मी पुन्हा पुन्हा केटूएस का करते? आणि पाचव्यांदा ट्रेक केलाचं तर तो मला काय साक्षात्कारी अनुभव देईल?

पाचव्या केटूएस ट्रेक ने मला एका अंतिम सत्याचा साक्षात्कार दिला आहे आणि ते सत्य आहे, “एन्ड्युरन्स सराव”! (किमान माझ्या वयाच्या ट्रेकर्ससाठी तरी)

ह्या २० तारखेला माझं पन्नाशीत पदार्पण होत आहे. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की ४९ व्या वर्षाची सांगता माझ्या आवडत्या केटूएस (कात्रज टू सिंहगड नाही हं ....कानडे टू सोमवार पेठ!😜😜) ट्रेक ने झाली आहे आणि उषा, मयुरी, संगीता मॅडम, शीतल, पूनम, अमित, मयूर, जय, जितीन, यज्ञेश आणि विशाल साथीने ते अधिकचं संस्मरणीय झालं आहे! 

पन्नाशीत असेच काही आव्हानात्मक ट्रेक्स आणि घाटवाटा करण्याचा विचार आहे आणि त्यासाठी तुमची साथ आणि शुभेच्छा असणार आहेत ह्याची मला खात्री आहे! तेव्हा भेटूच पुढच्या ट्रेकला!



फोटो आभार: उषा बालसुब्रमण्यम, मयुरी धोडपकर आणि ट्रेक टीम

No comments: