भेदक आणि न्यारा हर्षगड उर्फ हरिहर गड ट्रेक, १० डिसेंबर २०१७


नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर वरून २० किमी दूर असणाऱ्या निरगुडपाडयासाठी गाडी निघाली आणि रस्त्याच्या कडेलगतचा "घोटी" आणि "इगतपुरी" चा बोर्ड वाचून चक्रावले. आठवणी ताज्या झाल्या! १९९२ साली कामाच्या निमित्ताने कैक वेळा ह्या रस्त्यावरून मी गेले होते. आज कित्येक वर्षानंतर त्याच रस्त्यावरून चालले होते. १९९२ मधे "ट्रेक" हा शब्दाशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नसलेली मी आज त्याच रस्त्यावरून "हरिहर फोर्ट अर्थात हर्षगड" ट्रेकसाठी निघाले होते! असो.

जवळजवळ दीडवर्षापासून प्रतिक्षेत असणाऱ्या किल्ल्याला भेट देण्याचा योग आज आज रविवार १० डिसेंबर २०१७ रोजी आला. खरंतर तब्येत थोडी नरम होती, खोकला होता म्हणून निर्णय होत नव्हता. पण एका क्षणी विचार केला "आज आणि आत्ताचं" आणि माझा होकार कळवून टाकला!

शनिवारी मध्यरात्री पुण्यातून निघून पहाटे पहाटे त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. नाश्ता करून निरगुडपाड्याचा रस्ता धरला. सकाळी ८.१५ ला ट्रेकला सुरुवात केली. निरगुडपाडा गावातून दिसणारा "हर्षगड"!



कैक वेळा ह्या गडाचे फोटो बघितले होते. डोंगरकडयात खोदलेल्या कातळ पायऱ्या! अत्यंत भेदक आणि भयप्रद!  ऐकूनही होते ह्या किल्ल्याविषयी आणि खासकरून किल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांविषयी! "अत्यंत स्टिफ पायऱ्या आहेत, जवळ जवळ ८०-९० अंशातील खड्या पायऱ्या, पायऱ्यामधे खाचा आहेत त्यांना धरून पायऱ्या चढाव्या लागतात, आणि उतरताना पाठमोऱ्या उतराव्या लागतात. पावसाळ्यात खूप स्लीपरी असतात, खाचांमध्ये पाणी साठतं, शेवाळं तयार होतं आणि त्यामुळे हाताला ग्रीप मिळतं नाही, एकावेळी एकचं जणं जावू शकतं, पायऱ्या तीन-ते साडे-तीन फुट उंचीच्या आहेत, धोक्याच्या आहेत" इ. इ. हे सर्व ऐकून नकळत मनात एक घबराहट निर्माण झाली होती. घबराहट मनात घेऊनचं मी ट्रेकला सुरुवात केली!

मित्रपरिवार असल्याने तसे रमत-गमत गेलो. 




निरगुडपाडयापासून किल्ल्याच्या पायथ्याशी जंगल वाटेने साधारण दीड तासात आम्ही पोहोचलो! १-२ ठिकाणी चढायला जरा अवघड असणारे रॉकी पॅचेस पार करून आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी आणि कातळात खोदलेल्या त्या दगडी पायऱ्यांपाशी येऊन ठेपलो. माझी नजर किल्ल्याच्या महादरवाज्यावर खिळली! शेंदरी रंगातील दरवाजा आणि त्यावर फडकणारा भगवा ध्वज हे काळ्याकभिन्न डोंगर पायऱ्यांमधे आकर्षक आणि मोहक दिसत होते. कित्येक ट्रेकर्स, नॉन-ट्रेकर्सना भुरळ घालणारा-मोहिनी घालणारा, मंत्रमुग्ध करणारा, आपल्याकडे खेचून घेणारा हाच तो महादरवाजा आणि ह्याच त्या काळीज चिरत जाणाऱ्या कातळ पायऱ्या!

हरिहर उर्फ हर्षगड, नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकरांगेत विसावलेला एक प्राचीन ऐतिहासिक किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ११२० मीटर उंचीवर असणारा हा किल्ला  दगडात कोरलेल्या खड्या आणि तीव्र चढाईच्या अनोख्या पायऱ्यांमुळे आकर्षित करतो! असो.

मी पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि क्षणभर हात-पाय थरथरले! ती घबराहट डोळ्यासमोर आली. त्या पायरीवर तशीच एक क्षण थांबले. शरीर स्थिर होऊ दिलं आणि सकारात्मक निश्चय करून पायऱ्या चढायला लागले! चित्त एकाग्र करून आणि लक्ष फक्त चढण्याकडे ठेऊन, एक स्थिर वेग ठेऊन, महादरवाज्यापर्यतच्या त्या धोकादायक समजल्या जाणाऱ्या, साधारण तीस एक पायऱ्या मी एका दमात चढून गेले! खालच्या पायरीवर पाय ठेऊन वरच्या पायरीच्या दगडी खाचेत /खोबणीत हात घट्ट रोवून पायऱ्या सहज चढता आल्या! दोन्ही बाजूला डोंगरकडा आहे त्यामुळे संरक्षण मिळतं. काही पायऱ्यांवर तळपाय उभा पूर्ण फिट बसतो तर काही पायऱ्यांवर तो अर्धवट बसतो. काही ठिकाणी ह्या पायऱ्या वळण घेतात त्याठिकाणी पायरी छोटी होते. एका ठिकाणी दोन पायऱ्यांमधले अंतर हे पाय टेकवण्यासाठी थोडे जास्त होते. सुदैवाने एकही पायरी अशी वाटली नाही जिला खाच/खोबणी नव्हती. त्यामुळे चढणं सुकर झालं!   पायऱ्या चढून गेल्यावर मनात आलं "मी उगाच बाऊ करून घेतला होता"!. पावसाळ्यात पाणी आणि शेवाळामुळे पायऱ्या धोकादायक ठरू शकतात आणि  उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेने दगड तापून हाताला चटका देऊ शकतात. आत्त्ताच्या सीझनमध्ये सकाळी सकाळी किल्ला चढलात आणि चढण्या-उतरण्याचे काही नियम पाळले, खबरदारी घेतली तर तर ह्या पायऱ्या चढायला-उतरायला  घाबरण्याचे काही कारण नाही!


पायऱ्या चढून महादरवाज्याच्या आत गेले. दगडात कोरलेल्या शेंदूर फासित एका  मूर्तीने लक्ष वेधून घेतले. 


थोडे आत गेले आणि नेढे पाहून त्याचे वेगळेपण लक्षात आले. दगडात कोरलेले हे नेढे अधांतरी आहे आणि इथे दगडातील एक भलीमोठी कपार तयार झालेली आहे. 



बोगद्यातून गेल्यासारखे खाली वाकून पुढे गेले आणि पुन्हा शिडी/जिन्यावजा दगडी पायऱ्या लागल्या. वळणाच्या ह्या पायऱ्या थोड्या जास्त उंचीच्या आहेत आणि खोदलेल्या आहेत. ह्या साधारण ८०-९० पायऱ्या सावकाश चढून गेले.

ह्या पायऱ्या पाहून /चढून मन थक्क झालं. त्यांची रचना, उंची, लांबी, रुंदी, मान झुकवत नेऊ घालणारी कातळ कपार आणि खाली अचाट भेदक दरी, आधारासाठी पायऱ्यात विसावलेल्या खोबण्या, बाजूला डोंगर कडा! .शत्रूला ध्यानात धरून किती छ्पव्या पद्धतीने गडाची रचना केलेली आहे.हे गड/किल्ले कसे तयार झाले असतील? कोणी बनवले असतील? कडेलोट करण्याच्या कितीतरी जागा! असो. 

पुन्हा एक दगडी चढणं चढून किल्ल्याचे पठार आले. पाण्याचे कुंड आणि तलाव, हनुमानाचे मंदिर, चौथऱ्यावर नंदी आणि शिवलिंग यांच्या प्रतिमा आहेत. दगडी धान्य/दारू कोठार आहे. 



किल्ल्याची फेरी पूर्ण करून, सकाळच्या थंडगार हवेत फ्रेश होऊन मग किल्ल्याचा माथा असणारा एक कातळटप्पे असलेली साधारण ५०-६० फुट उंचीची टेकडी आहे. ही टेकडी पाहून मला कलावंतीणीचा बुरुज आठवला!




ही टेकडी/गडमाथा चढायला आत्मविश्वास थोडा कमी पडत होता. पायाला ग्रीप मिळेल, पाय खाचेत रोवला जाईल आणि हाताला वर पकड मिळून शरीराला पुश करता येईल असे मला वाटतं नव्हते. मित्रांनी गाईड केले, चढायला मदत केली आणि हा बुरुज चढून गेले. इथून नजरा विलोभनीय दिसत होता. अंजनेरी किल्ला, ब्रम्हगिरी पर्वत आणि वैतरणा धरणाचा जलाशय हे उठून दिसत होते!

मित्रांच्या सहाय्याने ही टेकडी उतरले आणि हुश्श झालं! उतरताना पायऱ्या पाठमोऱ्या न उतरता वरच्या पायरीच्या खाचेला पकडत, तिरकी उभी राहत, एक-एक पायरी मी सावकाश उतरले. साधारण ३ वाजता आम्ही निरगुडपाडयात आलो. जेवण करून संध्याकाळी ४ वाजता पुण्याकडे परतीचा प्रवास सुरु केला. वाटेत नारायणगावात गरमागरम मसाला दुध पिऊन साधारण ११ च्या दरम्यान पुण्यात पोहोचलो!

दीड वर्षांच्या प्रतिक्षेत असलेला हा ट्रेक पूर्ण झाल्याचे समाधान घेऊन मी आले तर होतेच पण माझ्या ज्या मित्र-मैत्रिणीमुळे हा ट्रेक मी पूर्ण करू शकले त्यांच्यामधे माझ्याबद्दल असणारा आदर, काळजी, स्नेह, जपणूक, जिद्द इ. च्या अनुभवामुळे मी हेलावून देखील गेले होते! 

मी ट्रेक करताना त्यांनी काढलेले माझे काही नॅचरल फोटो मला तर भलतेच आवडले!



फेसबुक वर ते फोटो मी अपलोड केले आणि किल्ल्याबद्दल अधिक जाणून घेऊन काही मुलींनी ते ट्रेक-साहस करण्याची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली. ट्रेक करण्याचा आणि यथार्थ फोटो अपलोड करण्याचा उद्देश सफल झाल्याचे आंतरिक समाधान, हरिहर ट्रेकने मला दिले!



ट्रेक सहकारी: प्रशांत शिंदे, स्मिता राजाध्यक्ष, ओंकार यादव, विठ्ठल भोसले, प्रतिक शहा, विश्वंभर कुलकर्णी, मृणालिनी कुलकर्णी आणि श्रीकांत शर्मा.

फोटोसाठी खास आभार: ओंकार यादव, प्रशांत शिंदे आणि विश्वंभर कुलकर्णी

ओंकार, हा फोटो तर भन्नाटचं! कित्येकांच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या!




No comments: