सुखाची नॉट आउट खेळी @ कोथळीगड, १ मार्च २०२०


ब्लॉगच शीर्षक लिहितानाचा आनंद काय वर्णू? पूर्णत्वाची भावना असते विशेषच! "एक टप्पा आउट" ते "नॉट आउट" हा प्रवास भावविभोर अनुभूतीच!

ब्लॉग शीर्षकामध्ये "नॉट आउट" लिहिताना,  काही महिन्यापूर्वीच लिहिलेल्या " एक टप्पा आऊट @ कोथळीगड, २५ ऑगस्ट २०१९" ह्या ब्लॉग शीर्षकाची आठवण आली. रादर त्यावेळचा कोथळीगड ट्रेक डोळ्यासमोर आला. (लिंक)

https://www.savitakanade.com/2019/08/blog-post_27.html
पायाला क्रॅॅम्प आल्याने ट्रेक अपूर्ण राहिला......

MaChi Eco and Rural Tourism संस्थेचा "कोथळीगड ट्रेक" जाहिरात वाचून अपूर्ण ट्रेक पूर्णत्वास जाऊ शकतो हि आशा निर्माण झाली.  योगाने त्याच वेळी अमेरिकेहून आलेल्या Alison Pack ने hiking ला जाण्याची इच्छा प्रकट केली होती. ट्रेकची माहिती तिला पाठवतच तो ट्रेकसाठी तयार झाली. सविता मिंडे, संगीता शालगर देखील तयार झाल्या. मनोज परदेशी सरांची आठवण झाली. मागील काही वर्ष ते ट्रेक करण्याची इच्छा बोलून दाखवत होते. त्यांना कोथळीगड ट्रेकबद्दल सांगताच तेही तयार झाले. बरोबर त्यांचे दोन छोटे भाचेपण.  प्रशांत , अकुंश हे माची तर्फे. अक्षय अंकुशचा मेव्हुणा. थोडक्यात काय आमचा सवंगडी  ग्रुप तयार झाला!

रविवारी १ मार्च ला निघालो. आंबिवली गावात पोहोचलो ते सकाळी साडेदहाला! पुढे कच्चा रस्ता. ड्रायव्हर ने गाडी नेतोय असं दाखवल आणि लगेच नकार दिला. झाल...आलं का पायपीट करण्याची नौबत! पण काय आहे ना, ट्रेक ही गोष्ट सोपी असेल तर तो ट्रेक कसला? ते hiking कसलं? तुमची will power, stamina, patience, tolerance etc हे गुण तपासण्याचा मार्ग ट्रेक आहे ना...

असो. २५ ऑगस्ट २०१९ ला ज्या कच्च्या वाटेवरून चालून पार थकून गेले होते त्याच रस्त्यावरून पुन्हा चालायला सुरुवात केली. प्रशांतचा मागून आवाज आला " मॅॅडम, आज पूर्ण करायचाय ट्रेक". त्याला "हो" म्हणाले खरी पण विचार आला कि तेव्हाही ट्रेक पूर्ण झालाच असता.  पायाला क्रॅॅम्प येण हे माझ्या हातात नव्हतं ना.....घोट घोट पाणी पिणे, एका गतीने चालणे, श्वासाची एकच स्पंदन पकडणे, उन्ह आणि ह्युमिडीटी लक्षात घेऊन त्याप्रमाणे  काळजी  घेऊन ही क्रॅॅम्प  आला तर मी काय करणार ना? त्या ट्रेकचा ह्या ट्रेकवर परिणाम होणार नाही ह्याची दक्षता घेण हे माझ्या नक्कीच हातात होत. असा ट्रेक करायचा जणू पहिल्यांदाच ट्रेक करत आहे. असो.

पायपीट सुरु केली. वळणावळणाचा चढाईचा कच्चा रस्ता. कच्चा म्हणजे फुफाटा नुसता.....चालण्याची माझी माझी गती..मागच्या ट्रेकच्या काही आठवणी पण मन:पटलावर उमटल्या....

रस्त्याच्या एका वळणावर कोथळीगड खूपच विलोभनीय दिसतो. व्ह्यू पॉइंट आहे म्हणा ना..मग फोटो तर मस्ट आहेत. स्वत:ला निसर्गाच्या हाती सोडत स्वत:ला शोधण्याचा हाच तर टप्पा! आनंद, सकारात्मक उर्जा देणारा मौल्यवान क्षण!मिळालेल्या उर्जेने पुढचा पल्ला चालायला सुरुवात केली. काही वेळातच गडाचा पायथा आला. आंबिवली पासून पेठ, म्हणजे गडाचे पायथ्याचे गाव..इथे यायला साधारण दीड तास लागला.

पाणी पिऊन, थोडासा विसावा घेऊन गड चढाई सुरु केली. पुन्हा माझी माझी गती...मागच्या ट्रेकला ज्या जागेवर पायाला क्रॅॅम्प आला होता ती जागा आठवली. हीच ती जागा जिथून समोर पदरगड आणि मागे सिद्धगड अफलातून दिसतो. मागच्या वेळी हवामान पावसाळी होते. काळे मेघ दाटलेले, हिरवाई ओसंडून फैलावलेली, शीतलता...आत्ता चे हवामान कडक उन्हाळी, तप्त....खरंतर हि गडचढाई फार कठीण नाही. फार वेळखाऊ नाही. मी मात्र माझा वेळ घेऊन चढाई करत होते. गडाचा बलाढ्य सुळका समोर दिसला....क्षणात तैलबैला आठवला,... वानरलिंगी डोळ्यासमोर आला....दोन अवाढव्य तोफा, वाऱ्याने फडफडणारा भगवा ध्वज आणि मागे बलाढ्य कोथळीगड! ट्रेक करण्याचे हेच तर सुख!


सुप्रसिद्ध  नाट्यअभिनेते श्री. प्रशांत दामले याचं एका नाटकात एक गाणं आहे..ते थोडसं आपल्या सुखाच्या कल्पनेनुसार असं....

मला सांगा...
सुख म्हणजे नक्की काय असतं?
काय पुण्य असतं कि ते...
सह्याद्रीच्या कडेकपारीत मिळतं!

पुण्यभावना गाठीशी बांधत पुढे चालत गेल्यावर भैरवनाथाची शेंदूर अर्चित प्रतिमा! पुण्यभावना नतमस्तक आपसूकच झाली.


लागुनच पाषाणात कोरलेल्या शिल्पकलेने समृद्ध गुहेने अचंबित केलं. भला मोठा सभामंडप. मंडपात देवीची शेंदूर अर्चित प्रतिमा! खांबावर कोरलेली शिल्पकला बेमालूम! गुहेत दोन उपगुहा!

गुहेतील खांबावरील सुरेख कोरीव शिल्पकला..


दरवाज्यावरील सुबक कोरीव कामकोरीव शिल्प...
गुहेच्या सुरेख नक्षीदार कमानीतून दिसणारा पदरगड किती मोहक, किती मनोहारी...नजर हटत नाही...तप्त उन्हातून आल्यावर थंडावा देणाऱ्या गुहेत लालभडक रसदार कलिंगड मिळाल तर? शीण कुठल्या कुठे पळून जाईल ना? देव भलं करो प्रशांतच. दोन कलिंगड गडावर घेऊन आला. ते खाण्यात जे स्वर्गसुख मिळालं म्हणता त्याच मोजमाप नाही.थंडगार , नितळ पाण्याच्या टाके शेजारून गडमाथ्यावर जायला कातळात खोदलेल्या अद्भुत पायऱ्या. त्या चढताना मनात आलं बरं झालं आपण चढताना अन्य कोणी नाही, नाहीतर चढाई अवघड झाली असती. सुरक्षितता हीच कि एकावेळी एकानेच त्या वळणदार पायऱ्या चढाव्यात. संपूर्ण एकाग्रतेने! आनंद घेत...

काही पायऱ्या चढून गेल्यावर नक्षीदार चौकटीची छोटी गुहा!दुसरीकडे गडमाथ्यावर सुळक्यावर नेणाऱ्या उंच उंच दगडी पायऱ्या! त्या चढून गेल्यावर चढाईची खरी परीक्षा!काहीसा भीतीदायक रॉक पॅॅच! ताशीव गुळगुळीत आडवे तिडवे दगड. खूप खबरदारी घेऊन चढावे लागले. हा टप्पा पार केला आणि उंची दरवाजा दिसला. अलीकडेच शिवदुर्ग मंडळाने लोकार्पण केलाय. दरवाज्यातून प्रवेश केल्यावर पुन्हा काही पायऱ्या! पायऱ्या संपल्या कि गड माथा! आटोपशीर. गडफेरी आटोपशीर! भवताल मोहक! सह्याद्री पर्वतरांगा नजर जाईल तिथपर्यंत पसरलेल्या! मन भरत नसतच हो अशा ठिकाणी!फोटो काढून गडउतराई सुरु केली. उतराई खरी कसं पाहणारी. स्वत:च कसब तपासणारी. नाहीतर आहेच खोल दरी पोटात घ्यायला!

प्रशांत, अंकुश, अक्षय यांनी एकेकाला सुरक्षित उतरवले. पाण्याच्या टाक्यातील थंडगार पाणी बाटल्यात भरून गडाच्या दुसऱ्या दरवाजाने उतरण्यास सुरुवात केली. मी मात्र माझ्या माझ्या गतीने....

गडपायथ्याला वीरगळ दिसली.गडपायथ्याशी आलो तेव्हा साडेचार वाजलेले. महत्वाचा चढाईचा टप्पा पूर्ण झाला होता. माझ्या पेक्षाही प्रशांत आणि अंकुश खुश ! अपूर्ण ट्रेक आज पूर्ण झाला होता. पूर्णत्वाचे हे फिलिंग अवर्णनीय! आत्मिक समाधान, आत्मिक शोध, साधना, तपस्या..हे सर्व ह्या एका क्षणात सामावलेलं!

पोटाच समाधान पण महत्वाच हो....तांदळाची भाकरी, टोमॅॅटो घालून बनवलेलं चविष्ट पिठलं, कांदा-लसूण-टोमॅॅटो घालून तेलावर परतलेला खरपूस ठेचा, मऊशार भात आणि तिखट वरण! आत्मिक शांतता पोटात दोन घास गेल्यावरच मिळते हो!परतीची फुफाट्यातील उतराई जरा ताणली. थकलेल्या शरीरावर मनावर नाराजीने चढाई केली....

शरीर गाडीत विसावलं. गाडी पुण्याकडे धावली.....झोपाळलेल्या मनाला चहाने तरतरी आली...

गाडीच्या वेगाने रात्री अकरा वाजता पुणे गाठलं!

घराकडे जाताना मग Action Reply..... ट्रेकमधील क्षणांचे काही highlights तर मस्ट आहेत ना...

पूर्ण झालेला कोथळीगड ट्रेक....अर्थात पेठचा किल्ला! एक संरक्षक ठाणं. मराठ्यांचे शस्त्रागार ठाणे. इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचा कारण थेट तळकोकणावर ताबा मिळवता येतो.Alison Pack  ही अमेरिकन सवंगडी किती सहज रूळली ....भारतातलं तीच हे पहिलं hiking...नक्कीच सुखावली असणार....सविता मिंडे, नुकत्याच लिहिलेल्या घनगड ट्रेक ब्लॉग चा आनंद लहरीवर कोथळीगडाचे तरंग उमटले असणार...संगीता शालगर, .ईबीसी ट्रेकची प्रक्टिस म्हणून त्यांना चांगलच पिदडल....कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...


अक्षय,  माझे काही छान फोटो काढणारा....


मनोज सर, सह्याद्रीच्या कडेकपारीत स्वत:ला नव्याने भेटले.....रोनित, बेदुंध राहत, ट्रेकचे काही unique फोटो काढत स्वत:च वेगळेपण बेमालूम उमटवल...आमचा  "यो यो", कित्ती कित्ती गोड...राज ची हुबेहूब छबी...ट्रेक, त्याची थेरी, imagination ने ओसंडून वाहिला...त्याच्यामुळे एक तरल चैतन्य निर्मिती झाली.....त्याच्या दिलखुलास, भीडभाड न बाळगता बोलण्याने ट्रेक किती हलकाफुलका वाटला...वाटलं ह्याची भेट व्हायची म्हणून मागचा ट्रेक अपूर्ण राहिला....


अंकुश, सच्चा ट्रेक लीडर


प्रशांत, अहो मनसोक्त कलिंगड स्वत: खाऊन भरघोस दुवा मिळणारा हाच तो..लक्षात येतय ना मित्रांनो, सुख म्हणजे काय असतं? अहो..सह्याद्रीच्या कडेकपारीत असे सवंगडी  connect होणं....
लिहिता लिहिता मनात आला एक विरोधाभास....ट्रेक हा खेळ साहसाचा, घट्ट मनाचा, तंदुरुस्त शरीराचा, ..परंतु त्याचं वर्णन किती सौम्य, तरल, हळवं......

कोथळीगड, एक रम्य आठवण....एक नॉट आउट खेळी!

कशी वाटली?

भेटूच पुढच्या नॉट आउट खेळामध्ये...सुखाची एक परिभाषा शोधायला....


❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

No comments: