ट्रेक टू तिकोना, ईबीसी प्रक्टिस ट्रेक विथ गिरिप्रेमी टीम, १२ मार्च २०१७


 "गिरिभ्रमणाच्या छंदाची जोपासना करण्यासाठी निसर्गाने ज्या अमूल्य देणग्या दिल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे सह्याद्री! सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या लांबच लांब रांगा, त्यातून मुख्यत: पूर्वेकडे फाटलेले फाटे, त्याच्यामधे विखुरलेल्या खोल खोल दऱ्या, काळेकभिन्न कातळकडे, बेलाग सुळके, डोंगरदऱ्यांत पसरलेली निबिड अरण्ये, नाना प्रकारच्या हजारो वनस्पती, स्वच्छंद विहार करणारे पशु-पक्षी, देश आणि कोकण यांना जोडणारे अनेक घाट-अशा विविध रूपातून मोहिनी घालणारी ही निसर्गसंपत्ती! त्याचबरोबर संरक्षणासाठी आणि सभोवतालवर नजर ठेवण्यासाठी तत्कालीन राजकर्त्यांनी या डोंगरावर बांधलेले किल्ले,कातळात खोदलेली कलात्मक, अदभूत लेणी, गुंफा, शिलालेख इ. मानवनिर्मित शिल्पसंपत्ती! निसर्ग व मानव यांनी निर्माण केलेल्या कलाकृतीचा सुंदर मिलाफ सह्याद्रीतचं पाहायला मिळतो”... “सांगाती सह्याद्रीचा” ह्या सह्याद्री प्रकाशनाच्या पुस्तकातील या यथार्थ वर्णनाची अनुभूती आज तिकोना ट्रेक करताना आली!तिकोना अर्थात वितंडगड! समुद्र सपाटीपासून ३५०० फुट उंची असणारा हा किल्ला! ट्रेक करताना नजरेच्या टप्प्यात आलेल्या काही गोष्टी,
  • श्री. शिवदुर्ग संवर्धन, पुणे यांच्यातर्फे लावलेली संवर्धनाची कामे दाखवणारी पोस्टरची रांग आणि मावळ्याच्या वेशातील शिवदुर्ग संवर्धनकार, सुजीत
  •   किल्ल्याचे संवर्धन जपणारे संदेशात्मक फलक
  •  किल्ल्याचा इतिहास सांगणारे देणारे नकाशे आणि सचित्र वर्णनात्मक बोर्ड

  • मेठ, वेताळ दरवाजा, महाद्वार आणि चोर दरवाजा, बाले किल्ला इ. किल्ल्याची  अविभाज्य अंग
  • किल्ल्याची महती वाढवणारा चपेटदान मारुती, श्री. वितंडेश्वराचे मंदिर, तळजाई मंदिर इ.
  •   बुरुज, तटबंदी, गडावर फडकणारा तेजस्वी भगवा झेंडा 
  •    एका दरवाज्यावर हातावर गुळ देवून स्वागत करणारा शिवदुर्ग संवर्धनकार

ह्या पाऊलखुणांमुळे किल्ल्याचं भग्न स्वरूप लोप पावून एक चालता-बोलता इतिहास डोळ्यासमोर उभा राहिल्याचं फिलिंग येत होतं!

किल्ल्यावरून दिसणारा तुंगचा सुळका (कठीणगड) आणि लोहगड-विसापूर किल्ला, पवना नदीवरील धरणाचा निळाशार जलाशय ह्या किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालत होते! तिकोना (त्रिकोणाकृती) नाव कसं पडलं आणि छत्रपती शिवरायांनी ह्या किल्ल्याला “वितंडगड” नाव का दिलं हे शोधून काढावं असं वाटलं! असो.गिरिप्रेमी सोबत हा दुसरा प्रक्टिस ट्रेक होता. तिकोना पिकनिक रिसोर्टच्या सुंदर वातावरणात ट्रेक सहभागींची ओळख झाली. 

एबीसी,ईबीसी, पिके पीक .इ. ट्रेकचे सहभागी ट्रेकला आले होते. 
ट्रेक वाईज गिरिप्रेमी लीडरचीही प्रत्यक्ष भेट यावेळी झाली. आमची ट्रेक लीडर आहे, वर्षा बिरादर!

ईबीसी २२ एप्रिलच्या बॅचचे आम्ही, मी, तन्मय, प्रीती, रोहिणी विनोद आणि वर्षा! ट्रेक आणि ट्रेक सहकाऱ्यांसोबत निर्माण होणारा बॉन्ड, प्रक्टिस ट्रेकची ही सर्वांगसुंदर कल्पना अलौकिकचं नाही का?

गिरिप्रेमी कडून करून कसून घेतल्या जाणाऱ्या प्रक्टिसची एक झलक यावेळी अनुभवायला मिळाली. तिकोना किल्ला चढायला सुरुवात झाली आणि एका टप्प्यापर्यंत चढून गेल्यावर तिथे उभ्या असलेल्या दिनेशने सांगितले “इथून परत खाली उतरायचे आहे आणि चढून परत इथपर्यंत यायचे आहे”! बापरे...किल्ला १०% पण चढून गेलो नव्हतो आम्ही तर ही परीक्षा! “नाही” म्हणण्याचा स्कोपचं का पण अधिकार देखील नव्हता! उतरलो आणि चढून परत तिथपर्यंत पोहोचलो! ट्रेक सुरु झाला!
आता किल्ल्याच्या थोड्या थोड्या टप्प्यावर उभे होते, भूषण, आशिष, अंकित, आणि आनंद! बाले किल्ल्यावर उभा होता दिनेश!  आशिष आहे त्या ठिकाणापर्यंत चढून गेलो की तो सांगायचा, “भूषणला भेटून या”...अंकित म्हणायचा, “आशिषला भेटून या”...इ .बालेकिल्लाच्या पायऱ्या चढून उतरायच्या आणि परत चढायच्या! तुम्हाला न्याहाळायला आहेचं, डॉ. सुमित वर आणि दिनेश खाली! पायऱ्यांवर चढायला आणि उतरायला मदत आणि मार्गदर्शन करायला होतीच वर्षा! ह्या पायऱ्या चढायला आणि उतरायला कडेला आधारासाठी रबरी वायर स्क्रूने फिट केलेली असली तरी ती वायरवरची नसली तरी तारेवरची कसरत नक्कीच होती! बापरे....कसून प्रक्टिस काय असते, ह्याचा आम्ही भूमिका करत असलेला चालता-बोलता चित्रपट आमच्याचं डोळ्यासमोर आम्हाला दिसत होता! यावेळी तर काय ह्या गिरिप्रेमीच्या लीडर्सना आमची नावे पण पाठ झाली होती! “सविता मॅडम, ओके ना?”, “सविता मॅडम, गुड, कीप गोइंग”....बापरे! प्रोत्साहित करता करता कसून प्रक्टिस कशी करून घ्यायची हे ह्या लोकांकडून शिकावं!

आपला गुडघा, कंबर, पायाचे गोळे, भणाणतं ऊन..कशाचीचं पर्वा-तमा नाही!

मजा आली पण खूप! आता वाटतं होतं आपण ईबीसी ट्रेकला निघालोय आणि ते साहस कदाचित साध्य असेलही पण सिद्ध करणं हे कसोटीचं आहे!

सुवर्णा आणि मी सोबतीने प्रक्टिस करत होतो. ती म्हणे, “सविता, आप मुझे महात्मा गांधीजी की याद दिला रहे हो. आज समझ में आ रहा है वो हाथ में काठी क्यों लेते थे! भराभर चलने में आसनी हो जाती है!”. मी तिला म्हणाले, “उन्होने “सत्याग्रह” किया था, सत्य का आग्रह! हम “ट्रेकाग्रह” करेंगे, ट्रेक का आग्रह!”!

दुपारच्या फक्कड जेवणानंतर ट्रेकसंबधी सूचना, भूषण, आनंद, दिनेश आणि डॉ. सुमित यांनी दिल्या! ट्रेकचं चित्र आधिक स्पष्ट व्ह्ययला तर त्याने मदत झालीचं पण ट्रेकच्या तयारीसाठी ती माहिती महत्वाची ठरली! पीपीटी प्रेझेन्टेशन पाच विभागात मांडलं होतं, १. प्रिपरेशन २. ट्रेव्हलिंग ३. स्टे-इन-काठमांडू ४. अक्च्युल ट्रेक ५. क्लोजर आणि डिपार्चर.

आवश्यक कागदपत्रे, किती पैसे जवळ बाळगायचे, मोबाईल सीम कार्ड आणि चार्जीग, क्लोदिंग ई. बद्दल अत्यंत उपयुक्त टिप्स त्यांनी दिल्या. बदलत्या हवामानाला सामोरे जाण्यासाठी शक्यतो आंघोळ न करणे, अॅन्टी फंगल पावडर वापरणे, मांसाहार आणि कोल्डड्रिंक्स टाळणे, पहिले तीन दिवस हळू चालणे, लीडरला विचारल्याशिवाय कोणतेही मेडिसिन न घेणे गरम पाणी पिणे इ. सारख्या प्रक्टिकल टिप्स मिळाल्या.

शेवटी दोन जीवनसंदेश मिळाले,

  •    वॉटर इज द बेस्ट मेडिसिन
  •  कीप युवरसेल्फ ड्राय आणि वॉर्म

खूप छान वाटतं होतं, आम्हा ट्रेक सहभागींमध्ये एक बॉन्ड तयार होत होता आणि भूषण, आनंद, आशिष, अंकित, दिनेश यांना प्रत्यक्ष बघूनचं ट्रेकची प्रेरणा मिळतं होती! ह्या सर्वांचा आपापसातील भाव मनाला स्पर्शून जात होता! भूषण भरभरून आशिषचं कौतुक करत होता, आनंद भूषणचं इ इ. हे पाहताना परिपूर्ण वाटतं होतं.

डॉ. सुमितने दिलेल्या “सांगाती सह्याद्रीचा” ह्या पुस्तकातील काही वाक्ये मनात घोळतं होती,

गिरीभ्रमणाच्या छंदामुळे निसर्गाच्या विराट रूपाचं इतकं भव्य दर्शन घडतं की माणसाचा अहंकार, त्याची आढ्यता सारं काही त्याच्यापुढे गळून पडतं. असं म्हणतात की हे उत्तुंग पर्वत माणसाला त्याचं खुजेपण दाखवून देतात पण तरीही माणसाचं कौतुक हे की निसर्गाच्या प्रत्येक आव्हानावर मात करण्याची त्याची इर्षा!”


गिरिप्रेमी आणि ह्या एव्हरेस्टरच्या साथीने आम्ही ट्रेक सहभागी अशीचं एक इर्षा बाळगून आहोत. तुमच्या शुभेच्छा असाव्यात ही सदिच्छा!

No comments: