केटूएस (कात्रज टू सिंहगड) नाईट ट्रेक: ४-५ मार्च २०१७


चौथ्यांदा केटूएस ट्रेक! तिसऱ्या आणि चौथ्या ट्रेकमध्ये केवळ दीड महिन्याचे अंतर!

तिसऱ्या केटूएस ब्लॉगची सुरुवात!
“केटूएस ट्रेक....तिसऱ्यांदा?....का?.... कशासाठी?
जाहिरात तीच....रात्रीचा ट्रेक...१६-१७ टेकड्या...१५ किमी अंतर.....
आधीचे दोन्हीवेळचे अनुभव...... थोडे चांगले...थोडे “नको तो ट्रेक” असे वाटणारे.....तरीही.....

तिसऱ्या केटूएस ब्लॉगचा शेवट!
केटूएस ट्रेक....तिसऱ्यांदा?....का?.... कशासाठी? प्रश्नचिन्ह आहेचं..........शोध सुरूचं आहे.......

आजचा चौथा केटूएस! 
सुरुवात तीच....शेवटही कदाचित तोच?.....

तन्मय, प्रीती, सुवर्णा, स्वाती आणि श्रद्धा....माझ्या ह्या पाच मैत्रिणी ट्रेकला जात होत्या. ४ तारखेला सकाळी ८ वाजता तन्मय आणि माझ्यात संवाद झाला. तिने ट्रेकला येण्याबद्दल विचारलं. म्हटलं, “ मी येत नाहीये. तीन वेळा केटूएस झाला ना. बास आता”. ती म्हणे, “बघ, ये. मजा येईल. मेसेज कर काय ठरवतेस ते”......

९.३० पर्यंत मनाचा आढावा घेत होते. “जाऊ की नको”....विचार सुरु होता....

नाईट ट्रेक......झोपेला दांडी....१६-१७ टेकड्या, १५ किमी अंतर, ७ ते १० तास चालणं....टेकडी चढा आणि उतरा......पहिल्या दोन आणि शेवटच्या तीन खतरनाक उंचीच्या आणि पेशन्स आजमावणाऱ्या टेकड्या....६-७ कसोटी पणाला लावणारे उतरणीचे पॅचेस....प्रवाहशील माती (घसारा, स्वप्नीलकडून हा शब्द माहित झाला)....ग्रीप घेत, तोल सांभाळत चढणं आणि उतरणं.... शेवटची टेकडी....ठणकणारे शरीर....ताठरलेले डोळे....

मनाचा आढावा घेत असताना हे सगळं डोळ्यासमोर येत होतं...पण का कुणास ठाऊक अंतरंगातली साद “नकारात्मक” नव्हती!

९.३० वाजता प्रशांत आणि माझ्यात हा संवाद झाला..

९. ४३ वाजता विशालला फोन केला. तो म्हणे, “तुम्ही कॉन्फीन्डंट असाल तर जा”!

त्याच्याशी बोलतानाचं ट्रेक करण्याचं निश्चित केलं!

सकाळी ८ ते ९.४५ हा पावणे दोन तासाचा विचार कालावधी! वेळेसहित हे का लिहित आहे हे लवकरचं कळेल तुम्हाला.......असो.

संध्याकाळी ७.३० वाजता आम्ही ट्रेक पार्टीसीपंट स्वारगेटला नटराज हॉटेलजवळ जमलो. एक मुलगा ट्रेकसाठी मुंबईवरून येणार होता....तो आल्यावर विशालने ट्रेकची माहिती दिली आणि रात्री ९ च्या कोंढणपूर बसने ट्रेकसाठी निघालो!.. मधल्या वेळेत काहीजण कंटाळले, काहींना भूक लागली, काहींनी जेवणं करून घेतले, काहींनी हा वेळ कसा वाचवता येईल ह्याच्या सूचना दिल्या......पेशन्सचा कसं लागायला इथूनचं सुरुवात झाली होती!

आज ट्रेक कोऑर्डीनेटर होते, प्रशांत, तौसीफ आणि यज्ञेश! रात्री १०.१५ ला आम्ही वाघजाई मंदिराजवळ पोहोचलो. तिथे २० ट्रेक पार्टीसीपंटची ओळख परेड झाली. प्रशांत ने ट्रेकची माहिती दिली. सगळ्यांकडे भरपूर पाणी आणि टॉर्च आहेत ह्याची त्याने पुन्हा एकदा खात्री करून घेतली गेली आणि रात्री १०.३० ला ट्रेकला सुरुवात झाली!

मी, नेहमीप्रमाणे आधी वाघजाई देवीला नमस्कार करून आशार्वाद घेतला आणि ट्रेकला सुरुवात केली!

प्रशांत पुढे, मध्ये तौसीफ आणि मागे यज्ञेश अशी रचना होती. सुरुवातीला वेगळ्या रस्त्याला लागलो. काही अंतर मागे येऊन पुन्हा सुरुवात झाली.

टेकड्या पार झाल्यानंतर पठारावरून दिसणारे पुणे शहराचे सौदर्य बघण्यासाठी थोडं थांबत होतो. दिव्यांच्या झगमगाटाने डोळे दिपून टाकणारे पुणे! जुना पुणे-बेंगलोर हायवे, धावणाऱ्या गाड्या, पांढरे-पिवळे-लाल दिवे आणि आकाशातील पिवळट-नारंगी अर्धचंद्र! पुणे शहर चंद्राला न्याहाळतोय की चंद्र पुणे शहराला असा संभ्रम पडावा! कित्येकजण पौर्णिमेच्या रात्री केटूएस ट्रेक करतात ते आकाशात दिसणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राचे सौदर्य, पृथ्वीवर पसरलेला चंद्रप्रकाश, आकाशातील लखलखता तारकापुंज आणि शहरातील दिव्यांचा झगमगाट पाहण्यासाठीचं!

साधारणपणे १ वाजता जेवायचा ब्रेक घेतला आणि पुन्हा ट्रेकला सुरुवात केली.

आता हळूहळू माझे डोळे झोपेने ताठरत होते. प्रशांतला विचारलं की, “केटूएस कॅपिंग होऊ शकत नाही का? पौर्णिमेच्या रात्री किती सुंदर कॅपिंग होईल. काही ठिकाणं टेंट टाकण्यासाठी उत्तम आहेत. सकाळी ४ वाजता ट्रेक सुरु करायचा आणि ५-५.३० ला सिंहगड गाठायचा”. प्रशांतला पण आयडिया आवडली!

यावेळी मी सुरुवातीपासून एक कॉस्टंन्ट स्पीड ठेवलं होतं. ट्रेक दरम्यान फारसं बोलत नव्हते. लक्ष फक्त ट्रेकवर. जेव्हा काही सेकंदाचा ब्रेक घेत होतो तेव्हा बोलतं होते. यावेळी ही पहिल्यांदा हेड टॉर्च वापरली. पहिल्या ट्रेकला शिव ने हेड टॉर्च  वापरण्याचा सल्ला दिला होता. हेड टॉर्च वापरण्याचे काही फायदे –तोटे जाणवले. सुरुवातीला त्याच्याशी जुळवून घ्यायला वेळ लागला. हात त्यामुळे रिकामे राहत होते हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे. आधीच्या ट्रेकला तर माझ्या एका हातात टेकिंग स्टिक आणि दुसऱ्या हातात टॉर्च! त्याने खूप त्रास झाला, हात आखडले, दुखू लागले अशातला भाग नाही पण जिथे कोणाच्या तरी हाताची मदत लागत होती तिथे त्या व्यक्तीला मदतीला हात देण्याअगोदर माझी टॉर्च हातात घ्यावी लागायची. हेड टॉर्च मधे ते झालं नाही. फक्त होतं होतं काय की खाली बघायचं असेल तर मान पूर्ण १८० अंशात खाली ठेवावी लागत होती. कदाचित मी एकचं बटनावर लाईट वापरली म्हणून असेल, पण ते मला खूप लक्षात ठेऊन आणि बारकाईने करावं लागत होतं. दुसरं असं होतं होतं की काही सेकंद कुठे थांबलो तर हेड टॉर्चची लाईट समोरच्या व्यक्तीच्या एकदम डोळ्यावर येत होती. त्यांमुळे थांबल की टॉर्च बंद करावा लागत होता. माझ्या उंची मुळे कदाचित हे जास्त त्रासदायक होतं होतं. त्यात गंमत ही होत होती की टॉर्च बंद करायला आणि पुन्हा ती चालू करायला मी विसरत होते! पण खूप उपयुक्त गोष्ट वाटली. मी स्टिक वापरत नसते तर त्याच्या फायद्याची कल्पना तुम्ही पण करू शकाल!

आता शेवटच्या दोन टेकड्या राहिल्या होत्या आणि सकाळचे सहा वाजून गेले होते. शेवटची टेकडी चढायला तर लख्ख उजाडले होते. टॉर्च बंद करावी लागली. मी पहिल्यांदा उजेडात शेवटची टेकडी पार करत होते. ह्या टेकडीवर एक निबंध लिहिला जाऊ शकतो, सॉरी तो शोधनिबंधही असू शकतो असं वाटलं. जर पार्टीसिपंटच्या भावनांची व्हिडीओ क्लिप घेतली तर अफलातूनचं! एक क्लिप इथे आणि एक क्लिप ट्रेक पूर्ण करून सिंहगडावर जाऊन काही क्षण विश्रांती घेतल्यावर! भावनांचा परमोच्च आलेख तुम्हाला बघायला मिळेल. असो.

तर ही शेवटची टेकडी....अति ऊंच चढाईची, ताणलेल्या पेशन्सची वाट लावणारी, चिडचिड उदभवणारी, रस्ता चुकलाय की काय हा संभ्रम निर्माण करणारी, लीडरला लाख दुषणे देणारी, “मुद्दाम तर इकडून आणलं नाही ना?” असा त्रागा उफाळून आणणारी, “का आले मी ट्रेकला” असा मनाशी विसंवाद करून स्वत:ची चिडचिड करून घेणारी, “आता परत मी केटूएसचं काय पण कुठल्याचं ट्रेक करणार नाही” हे स्वत:च्या मनाला बजावून फुसका निर्णय घ्यायला लावणारी, पायातले गेलेले त्राण आणि मनाची शक्ती ह्यांमधे द्वंदयुद्ध घडवून आणणारी, कधी एकदाचा डांबरी रस्ता दिसतोय ह्याची आस डोळ्यांना लावणारी, ह्या ट्रेकिंग ग्रुपसोबत परत ट्रेकला येणार नाही हा निर्णय तिथल्या तिथे घ्यायला लावणारी, आनंदाची जागा वैतागाने-संतापाने व्यापून टाकणारी, एकाचं ठिकाणी ठाण मांडून बसायला भाग पाडणारी, शक्य झालेचं तर त्या परिस्थितीत आगीत तेल ओतणारी, स्वच्छ सुंदर कपडे मातीने बरबटवणारी, घामेजलेल्या शरीराला हलकासा गारठा देणारी, अंधाराला प्रकाशाची चाहूल देणारी, भुकेची जाणीव करून देणारी, कधी एकदा दोन कप चहा प्यायला मिळतोय अशी भावना ओतप्रोत करणारी, “अजून किती टेकड्या राहिल्यात?” ह्या प्रश्नाला पूर्णविराम देणारी, “अजूनही एक टेकडी असू शकते” अशी खोचक प्रश्न विचारायला लावणारी, “फक्त १० मिनिट राहिलेत” असं सांगत आलेल्या लीडरकडे  नाराजीच्या कौतुकाने पाहणारी, इतरांच्या भावनांचा स्वत:वर परिणाम न होऊ देता आल्या परिस्थितीला शांतपणे सकारात्मकतेने तोंड द्यायला लावणारी, भावनांच्या आगीत होरपळणाऱ्या पार्टीसिपंटच्या तडतडणाऱ्या ज्वाला अंगावर घेत शिट्टी वाजून “कीप मुव्हिंग” म्हणत शांतता आणि संयम राखायला लावणारी, भावनिक युद्धाच्या परिस्थितीत “कर्म करं” असा डावपेची संदेश देणारी, योगा-मेडिटेशन-प्राणायाम यांचा धच्चा उडवणारी, एकमेकातील संवाद-विसंवाद पराकोटीला नेणारी, प्रत्येकाची सुखं-दुख्खं एकाच पातळीवर आणणारी, एकमेकांना भावनिक, शारीरिक, मानसिक आधार देणारी, कधी एकदाचे आडवे पडतोय-पाठ टेकवतोय- घरी जातोय असा स्व-संवाद करायला लावणारी, सिंहगडावरची झुणका-भाकर, खर्डा, कुरकुरित कांदाभजी, मटक्यातले दही ह्या सर्वांच्या मोहाला बळी न पाडणारी, सिंहगडावरची लालबत्ती विसरून आपले डोळे पांढरे करायची क्षमता बाळगणारी, “लागलो बाबा एकदाचे डांबरी रस्त्याला” म्हणतं मनातली आग शांतपणे विझवणारी.....बापरे....टेकडी एक आणि भावना अनेक अनेक! किती प्रचंड ताकद ह्या टेकडीत आहे बघितलतं ना! आपल्या भावनांची परिसीमा आजमावयाची असेल तर केटूएस हा ट्रेक एकदातरी अवश्य करावा! शेवटची ही टेकडी तुम्हाला एका प्रश्नाने अस्वस्थ करू शकते आणि तो प्रश्न आहे, योगा-प्राणायाम-मेडिटेशन, एन्ड्युरन्स बिल्डींग पलीकडेही काही आहे का? वेळेचं गणित मी जे मांडत होते ते ह्याचं साठी. निर्णय काही क्षणाचा असो नाहीतर काही मिनिट-तासांचा..ह्या वेळेपलीकडेही काही आहे का?

कदाचित हा ट्रेक पार्टीसिपंट म्हणून न करता एक ट्रेक लीडर म्हणून करायला हवा हे त्या प्रश्नाचं उत्तर असावं!😜😜

ही शेवटची टेकडी पार करताना सर्वांगसुंदर असा सूर्योदयाचा आनंद घेता आला नसेल तर नवलचं!


डोंगरांची रांग पार करून जीप मध्ये बसले तेव्हा सुख काय असतं ते कळालं. माझ्या मनात एकचं विचार होता, “मी चौथ्यांदा केटूएस पूर्ण करू शकले”! हा ट्रेक मला खूप मोठा जीवन कृतार्थ करणारा संदेश देऊन गेला! दीड महिन्यापूर्वीच मी हा ट्रेक केला होता. त्यावेळी मी सगळ्यात मागे होते, दम लागला की मधे मधे थांबव लागत होतं, परेश सतत माझ्या सोबतीला होता.. आणि आज? मी प्रशांतच्या अल्मोस्ट बरोबरीने आणि एक एक टेकडी विनाथांबा पार! कुठल्याही वळणावर क्षणभर विसावा घ्यावा वाटला नाही. अवघड पॅचेस सोडता आधाराविना आणि सोबतीविना मी ट्रेक करू शकले. प्रशांत म्हणालाही, “तुम्ही इंडिपेंडंटली ट्रेक करत होता”...तर “बॅक लीडर ते फ्रंट लीडर” हा साथ प्रवास पार करायला फक्त दीड महिना लागला! मलाचं आश्चर्य वाटतं होतं. प्रशांत म्हणत होता, “मॅडम आज लीड करताहेत”...यज्ञेश म्हणे, “मॅडम, आज एकदम आघाडीवर?”....तौसीफ म्हणे, “मॅडम, प्रगती जबरदस्त आहे”....काय सुखावणारं फिलिंग होतं म्हणून सांगू! राहून राहून विशाल, परेश आणि राहुल डोळ्यासमोर येत होते! ते असायला हवे होते, खासकरून राहुल, असं वाटतं होतं! अर्थात प्रशांत हा मोठा साक्षीदार होताचं! कशामुळे हे शक्य झालं? केवळ आणि केवळ एन्ड्युरन्स बिल्डींग चा सराव, प्रक्टिस! रोजचा काहीना काहीतरी प्रकारचा व्यायाम! दीड महिन्यापूर्वी ट्रेकला आले तेव्हा मी नुकतचं ईबीसी ट्रेक साठी रजिस्टर केलं होतं आणि आज ट्रेक आले तेव्हा दीड महिन्याचा व्यायाम माझ्या पाठीशी होता! ईबीसी ट्रेकची तयारी म्हणून एन्ड्युरन्स बिल्डींग साठी काही एक व्यायाम प्रकार दररोज करत होते. त्याचाचं हे फलित होतं! “ट्रेकिंग” करायचं असेल तर दररोजचा व्यायाम जरुरीचा आहे ही जाणीव पहिल्यांदा मला झाली! नाहीतर “ट्रेकिंग” कडेचं मी एक “व्यायाम प्रकार” म्हणून पाहत होते! आहे ना गंमत! असो.

साधारण पावणे आठ च्या दरम्यान आम्ही सिंहगडावर पोहोचलो. सचिनच्या धाब्याकडे जाताना माझेच शब्द मला आठवत होते, “केटूएस करून सिंहगडावर आल्यावर सचिनच्या धाब्याकडे जायचं म्हणजे दुसरा केटूएस ट्रेक करण्यासारखं आहे”!

सचिनच्या धाब्यावर बूट काढून चटईवर बसल्यावर काय वाटतं ना ते प्रत्येकाने अनुभवावं! खूप थकले होते, तळपाय ठणकतं होते. त्यात भर म्हणून की काय, पुणे दरवाजापर्यंत मी फक्त सॉक्स घालून गेले काय  आणि परत चढून आले काय त्याची जादू मला अनुभवता आली. तळपायांना चांगलाचं व्यायाम झाला आणि चक्क ते ठणकायचे बंद झाले. त्यामुळे मला बरचसं फ्रेश वाटू लागलं!

चहा, कांद्याच्या चटणीसोबत कुरकुरीत कांदाभजी, झुणका-भाकरी इ. तुटून पडतं आणि  आस्वाद घेत फीडबॅक सेशन झालं! सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मला म्हणे, “मॅडम शेवटच्या टेकडीबद्दल लिहाचं”...आपल्या भावना व्यक्त करताना प्रत्येक जण लेखक-कथाकार  झाला होता, विनोदवीर झाला होता, फिलॉसॉफर झाला होता!

“पब्लिक ट्रान्सपोर्टची वाट न पाहता गाडी अरेंज करावी, ज्यांना सचिनच्या धाब्यापर्यंत यायचं नाही त्यांच्यासाठी काही पर्याय असावा” अशा काही सूचनाही आल्या. तर “ट्रेकची सविस्तर माहिती आधी मिळू शकली नाही, वेबसाईटवर जो नंबर दिला होता त्यावर संपर्क होऊ शकला नाही” सारख्या प्रतिक्रियाही आल्या. प्रशांत, तौसीफ आणि यज्ञेशच्या लीडरशिपचं कौतुकही तेवढचं झालं. प्रत्येकाची नावानिशी केलेली ट्रेक दरम्यानची चौकशी प्रत्येकाला स्पर्शून गेली. ट्रेक दरम्यानचं कोआर्डीनेशन जबरदस्त भावलं! सर्व पार्टीसिपंट येईपर्यंत वाट पहिली ही जमेची बाजू वाटली. एसजी ट्रेकर्स सोबत परत ट्रेक करण्याची आणि दिवसाचा केटुएस करण्याची इच्छा कित्येकांनी बोलून दाखवली!

प्रशांत, तौसीफ आणि यज्ञेशने ट्रेक खूप सुरेखरित्या हाताळला. प्रशांतने तर सुवर्णाकडे वैयक्तिक लक्ष दिलं आणि काही ठिकाणी तिने स्वतंत्रपणे उतरण्याचा प्रयत्न करावा म्हणून प्रोत्साहित केलं. फीडबॅक देताना सुवर्णाने प्रशांतने दाखवलेल्या पेशन्सचं, तिला केलेल्या सहकार्याचं आणि इतर मुलांना गाईड केल्याचं कौतुक केलं!

खूप मुलींनी यज्ञेशचं कौतुक केलं. पायात त्राण नाहीत, पुढे पाऊल टाकण्याची ताकद नसताना ट्रेक पूर्ण करायला लावण्याचं कसब त्याने दाखवून दिलं. हे करण्यात त्याला स्वप्नीलची मोलाची साथ मिळाली. 

यावेळी पार्टीसिपंट जबरदस्त होते. प्रत्येकजण प्रत्येकाला अवघड पॅचेस पार करायला पुढे सरसावत होता! विशेषत: मुले! थॅन्क क्यू मुलांनो!

एका मुलीने मला विचारलं, “चार वेळा ट्रेक करण्याचं मोटिव्ह काय?”....उत्तर नव्हतं माझ्याकडे! आता वाटतयं कि ट्रेकला जायचं कि नाही हा विचार करताना “नकारात्मक साद न जाणवणे” हाच तो मोटिव्ह असावा!

माझा फीडबॅक चार ट्रेकचा सारांश होता. प्रत्येक केटूएस ट्रेक ने मला काय साक्षात्कारी अनुभव दिला ते मी शेअर केलं! पहिला ट्रेक होता क्षमतांची जाणीव करून देणारा, दुसरा होता सेल्फ एस्टीम वाढवणारा, तिसरा होता परत परत हा ट्रेक मी का करते ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला लावणारा आणि आजचा चौथा ट्रेक होता ह्याची जाणीव करून देणारा की ट्रेक कडे फक्त एक व्यायाम प्रकार म्हणून न पाहता ट्रेकिंगसाठीही एन्ड्युरन्स बिल्डींग मस्ट आहे हा साक्षात्कार देणारा!  

मनात येतयं पाचव्यांदा ट्रेक केलाचं तर तो काय साक्षात्कारी अनुभव देईल?

साधारण १०.३० वाजता आम्ही सिंहगड सोडलं आणि ११.४५ च्या सारसबाग गाडीने (नं ५० ) परतीचा प्रवास सुरु केला!

प्रवास परतीचा होता पण आठवणी परतत नव्हत्या! ट्रेकमधला क्षण नी क्षण डोळ्यासमोर येत होता! एक अद्भुत ट्रेक! एक अलौकिक अनुभव!


हा ट्रेक तुम्हीपण करून बघा आणि “सेल्फ रीयलायझेशनची प्रोसेस” अनुभवा!


फोटो आभार : केटुएस ट्रेक टीम 

2 comments:

UB said...

As always....beautifully penned down your experience.....way to go madam!

Unknown said...

Nice blog, thanks for begin a inspiration for us!!