एव्हरेस्ट बेस कॅम्प (ईबीसी) ट्रेक, २२ एप्रिल २०१७ ते ८ मे २०१७: भाग १: ईबीसी ट्रेक पूर्व सराव

भाग १: प्री-ईबीसी ट्रेक

ट्रेकिंग पार्श्वभूमी: २ ऑगस्ट २०१५ हीच ती तारीख, मी नियमितपणे ट्रेकिंग सुरु केलं, २५ ऑक्टोबर २०१५ हाच तो दिवस, पहिल्यांदा “मा. एव्हरेस्ट दर्शन” ची आशा माझ्या मनात रुजली, १२ जानेवारी २०१७ हाच तो दिवस, एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक चा निर्णय पक्का झाला आणि २ मे २०१७ हाच तो दिवस, एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या धरतीवर “मा. एव्हरेस्ट दर्शन” मला लाभलं!

ईबीसी ट्रेकचा निर्णय पक्का झाला तेव्हा माझ्या पाठीशी होता सह्याद्री पर्वत रांगेतील साधारण ३० ट्रेकचा अनुभव आणि ह्या ट्रेक दरम्यान मला मिळालेले ट्रेकिंग चे तांत्रिक धडे!

ईबीसी ट्रेक निर्णय: अडीच वर्ष सह्याद्री मधे ट्रेक केल्यानंतर वाटलं ईबीसी ट्रेक करायचा तो “आज आणि आत्ताचं”!

गिरिप्रेमी ऑफिस भेट आणि ईबीसी ट्रेक निर्णय: गार्डियन गिरिप्रेमी इस्टीटयूट ऑफ माउंटनिअरिंग (जीजीआयएम) च्या इमेल वर १२ जानेवारीला सकाळी इमेल केलं आणि त्यांनी संध्याकाळी ६ वाजता गिरिप्रेमीच्या आपटे रोड वरील ऑफिसमधे भेटायला बोलवलं! भूषण हर्षे ह्या एव्हरेस्टरने माझ्याशी बातचीत केली. अर्ध्या-पाऊण तासाच्या बातचीत मध्ये भूषणचं बोलतं होता आणि मी ऐकत होते! त्याने ट्रेकची माहिती दिली, काय सराव करायचा हे सांगितलं, पत्रक दिलं! "हा ट्रेक टेक्निकल नाही. सरासरी ६ तास तुम्हाला दररोज चालावं लागतं. सहा तासाचे ७-८ तास लागले तरी चालतात. तुमच्या गतीने तुम्ही जाऊ शकता". त्याच्या सांगण्याचा सगळा कल ह्या गोष्टीकडे होता की “ट्रेक टफ नक्कीच आहे पण असाध्य नाही”! .हां एक गोष्ट होती जी खूप सारं टेन्शन घालवणारी होती ती म्हणजे, हा ट्रेक टेक्निकल नव्हता! मी मनात धरून गेले होते की मला माझं वय, ट्रेक अनुभव, व्यायाम इ. विचारलं जाईल. पण मला चांगलच आश्चर्य वाटलं, त्याने मला त्याबद्दल काहीचं विचारलं नाही! मनात आलं ह्या गोष्टी मॅटर करत नाहीत का? एका एव्हरेस्टरने जेव्हा ह्या गोष्टी विचारल्या नाहीत तेव्हा का? का? का? हा प्रश्न सतावत राहिला. असं असतानाही मी जेव्हा तिथून निघाले तेव्हा माझा निर्णय पक्का झाला होता! गेलात ना चक्रावून?

दोन गोष्टी होत्या ज्यामुळे निर्णय पक्का झाला! पहिली गोष्ट होती खुद्द गिरिप्रेमीचं ऑफिस! इथे एव्हरेस्ट आणि अन्य हिमालयीन पीक एक्सपीडीशनचे पोस्टर्स होते, मेडल्स होते, फोटोज होते आणि वर्तमानपत्रातील कात्रणे होती. हे सर्व इतक शिस्तीत, नीटनेटकं आणि एकदम काटकोनात! एकही गोष्ट चुरगळलेली नाही की त्यावर कसले डाग नाहीत. सगळ्या गोष्टी अगदी जिथल्या तिथे! अफलातून प्रेझेंटेशन! हे सर्व पाहिलं आणि बोलतीचं जणू बंद झाली! उष:प्रभा पागे मॅडमच्या मुलाखतीचं एक कात्रण तिथे लावलं होतं, “पर्वत, स्त्री-पुरुष भेद मिटवतात”! मला वाटतं १९७० च्या काळातील त्यांच्या ट्रेकवर आधारित ती मुलाखत होती! श्री. उमेश झिरपे सरांची काही प्रकाशित लेखांची कात्रणे पण बोर्ड वर चिटकवलेली होती. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इतकी प्रचंड ताकद होती की काही क्षणात त्या मनावर ठसा उमटून गेल्या!.

दुसरी गोष्ट होती ती खुद्द भूषण हर्षे! त्याचं संवाद कौशल्य, मुद्देसूद बोलण आणि आत्मविश्वास! त्याला ऐकताना त्याच्यामधला आत्मविश्वास माझ्यात परावर्तीत कधी झाला कळूनचं आलं नाही!

ह्या दोन्ही गोष्टी अशा होत्या ज्यांनी निर्णय घ्यायला मला स्कोप दिलाचं नाही. ऑफिसच्या त्या वास्तूने आणि परावर्तीत आत्मविश्वासाने माझा ईबीसीचा निर्णय पक्का केलेला होता!

निर्णयानंतर: १३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी पर्यंत गोष्टी पटापट घडत गेल्या. विमानाचं तिकीट बुक झालं, ट्रेकची कागदपत्रे तयार झाली, मेडिकल टेस्ट झाल्या आणि कागदपत्रे सुपूर्त झाली!

भूषणने मला २२ एप्रिल ट्रेकची तारीख सुचवली कारण त्या तारखेच्या बॅच मध्ये पुण्याच्याच दोन मुली होत्या, तन्मय माविनकुर्वे आणि प्रीती पाठक! तन्मयने मला काठमांडूचे फ्लाईट डीटेल्स पाठवले आणि मी तीच फ्लाईट आयटनरी फॉलो करायचं ठरवलं. पण झालं काय माझं फ्लाईट बुकिंग २१ एप्रिल ऐवजी चुकून २२ एप्रिलचं झालं! त्यामुळे मला ट्रेकच्या तयारीसाठी काठमांडूमध्ये वेळ कमी मिळणार होता! आव्हानांना इथूनचं सुरुवात झाली होती!

घरच्यांची, ऑफिसची आणि ट्रेकिंग फ्रेंडची प्रतिक्रिया: माझ्या भावाला आणि बहिणीला मी निर्णय सांगितला. समीर, माझा भाऊ लगेच म्हणे, “तुला काही शॉपिंग करायचं असेल तर आपण करू. पैशाची काही मदत हवी असेल तर तसे सांग”! सरिता माझी बहिण म्हणे, “तायडे, ट्रेक अवघड आहे. अल्टीट्युड आहे, थंडी खूप असते, खूप चालावं लागत, ब्रीदिंग महत्वाचं आहे, तुला खूप सराव करावा लागेल. ह्या सगळ्याचा विचार कर. दोन्ही –चारही बाजूने विचार कर. पण तुला जमेल आणि नाही जमलं तर डोंट वरी”...

बहिणीचे शब्द ऐकल्यावर “पाठींबा” ह्या शब्दाचा अर्थ लक्षात आला! पूर्णत: चारही अंगाने विचार करून निर्णय घेतला आहे ना ह्याची जाणीव करून देऊन धीर देण आणि प्रोत्साहन देण हा आहे “पाठींबा” शब्दाचा अर्थ!

२४ एप्रिल ते १० मे अशी १७ दिवसांची रजा मला लागणार होती आणि ती मिळण केवळ अशक्य आहे हे मला माहित होतं. मी त्यांना सांगितलं तुम्ही ठरवा अन्यथा मी नोकरी सोडणार आहे. रजा मंजूर झाली पण मी जाईपर्यंत खडूसपणे टोमणे मारले गेले. “लोकांना हिमालयात जायचयं, एव्हरेस्टवर जायचयं....” आणि हे भर मिटिंग मध्ये बरकां! असो.

आमच्या ट्रेकिंग ग्रुप मधून दोन रिअॅक्शन आल्या. एक रिअॅक्शन होती, “शॉकिंग न्यूज आहे ”..दुसरी होती, “तुम्ही डायरेक्ट बोर्डाची परीक्षा द्यायलाच निघालात की..लय भारी”!

मी गिरिप्रेमी सोबत ट्रेकला जातेय ही गोष्टीला माझ्या ट्रेक सहकाऱ्यांनी फुल सपोर्ट केला. "मग काही काळजी नाही. भारतातील नं १ संस्था आहे ती. त्यांनी केलेले मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच ध्येय साध्य करायला मदत करेल"

गिरिप्रेमी सोबत जातेय म्हणल्यावर माझ्या घरचे निश्चित झाले आणि ती माझ्यासाठी सर्वात महत्वपूर्ण आणि मानसिक स्थैय देणारी गोष्ट होती!

ईबीसी ट्रेक सराव: गिरिप्रेमी ने हिमालयातील हाय अल्टीटयूड ट्रेकच्या तयारीसाठी दोन महिन्याचा ट्रेनिंग प्रोग्राम दिला होता. तो पाहूनचं दडपण आलं. ह्या प्रोग्राम मध्ये दोनचं गोष्टी अशा होत्या ज्या मी करत होते त्या होत्या, हायकिंग /ट्रेकिंग आणि स्टेप क्लायबिंग (पर्वती चढणे हे ह्या प्रकारात मोडत असेल तर)! त्यातल्या ९९% गोष्टी मी आधी कधीच केल्या नव्हत्या आणि काही शब्द तर मी प्रथमचं ऐकत होते. त्यात समावेश होता, जॉगिंग, सायकलिंग, पुश अप्स, पूल अप्स, क्रन्चेस, स्क्वाट्स, प्लांक पोझिशन, स्ट्रेचिंग, सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम, मेडिटेशन आणि ब्रीदिंग एक्झरसाईझ! हे सगळे करण्याचा कालावधी पण होता ३० मी ते ६० मी! बापरे.... ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या ज्यांना शास्त्रीय आधार आहे आणि त्या एका तज्ञ व्यक्तीकडून शिकण महत्वाचं होतं आणि त्याला तसा वेळ देणं देखील तितकचं जरुरीच होतं. रोजच्या नोकरीच्या धावपळीत हा मानसिक आणि शारीरिक वेळ काढायचा कुठून? आणि आयुष्यात आधी कधीच न केलेल्या गोष्टी आता ट्रेकच्या दोन महिने आधी करायच्या? दुसऱ्या बाजूला हा पण विचार की हा प्रोग्राम उगाचच तर तयार केला नसेल ना, त्याला नक्कीच काहीतरी महत्व आहे....बापरे! क्लास लावणं, जिम लावणं हे मला काही पटतं नव्हतं! ह्यासाठी की ह्याची माझ्या शरीराला सवयचं नव्हती! आणि ज्याची शरीराला सवय नाही तो प्रयोग करायला मन धजावत नव्हतं! घरच्या घरी काही गोष्टी मी माहितीच्या आधारावर करू शकले असते जसे, सूर्यनमस्कार, योगा, प्राणायाम, मेडिटेशन आणि ब्रीदिंग एक्झरसाईझ इ. त्यातल्या काही गोष्टी मी केल्या देखील, पण का कुणास ठाऊक त्या गोष्टी मला एक मानसिक-भावनिक स्थिरता ठेऊन करता येईनात! त्यामुळे त्याचे अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत ह्याची मला जाणीव झाली.

ज्या गोष्टी आयुष्यात आतापर्यंत मी कधी केल्या नाहीत त्या करण हा विचार तर मी केव्हाचं बाजूला केला होता. जॉगिंग, रनिंग सारख्या गोष्टी माझं मेनापॉजल वय लक्षात घेऊन मी केव्हाचं बाद केल्या होत्या!

हाय अल्टीट्युड ट्रेक मध्ये जिथे ऑक्सिजन कमी होत जातो तिथे प्राणायाम, मेडिटेशन सारख्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ह्याची जाणीव मला होती पण का कुणास ठाऊक त्या शास्त्रीय पद्धतीने शिकल्याशिवाय करायच्या नाहीत असं माझं मन मला सांगत होतं. शास्त्रीय पद्धतीने ह्या गोष्टी, शरीराने  शिकायला दोन महिने हा खूप कमी कालावधी आहे असं मला वाटतं होतं. माझा आतला आवाज मी ऐकला; पण ईबीसी ट्रेक करून आल्यावर विपश्यना-मेडिटेशनचा सात दिवसांचा कोर्स करून तो अनुभव घेण्याचा निश्चय मात्र मी नक्कीचं केला! 

ह्या सरावावर मी इतका विचार केला की बस्स! काहीजण कळकळीने मला काही गोष्टी करायला सांगत होते. त्यांच्या भावना, उद्देश मला समजतं होता. पण मला माहित होतं ते मी करू शकत नाही; निदान आता ह्याक्षणी तरी नाही! बापरे......एक आठवडा भयानक मानसिक त्रासातून गेले! शेवटी एक दिवस शांत बसले आणि स्वत:लाच प्रश्न केले, “सविता, हे काय चाललयं? ईबीसी ट्रेक तुला करायचायं पण त्यासाठीची तयारी तुला तुझ्या पद्धतीने करायची आहे...स्वत:ला ओळख, स्वत:च्या शरीराला ओळख, स्वत:च्या मनाला-भाव-भावनांना ओळख, स्वत:च्या जीवनशैलीला ओळख आणि त्यानुसार सरावाचा निर्णय घे. ह्या सर्वाच्या ओळखीची हद्द; पार करायची ही वेळ नाही. समजा तू ठरवलेल्या प्रोग्राम कमी पडला असा अनुभव तुला आला तर तो तुझ्यासाठी धडा असेल!”...मन शांत झालं आणि माझा सरावाचा प्रोग्राम मी ठरवला (सॉरी गिरिप्रेमी टीम)! रादर जे मी करत होते तेच सुरु ठेवायचा निर्णय मी घेतला! त्यात इतर कशाचीही भर मी घातली नाही! तो प्रोग्राम असा होता, बुधवार आणि शनिवार सकाळी, पर्वती च्या पायऱ्या ३ ते ५ वेळा चढणे-उतरणे, मंगळवार आणि गुरुवार संध्याकाळी हनुमान टेकडी ३-४ वेळा चढणे-उतरणे आणि शनिवार-रविवारी एखादा ट्रेक! बस्स हाच तो प्रोग्राम! हा प्रोग्राम असा होता ज्याची माझ्या शरीराला सवय होती! आणि हा प्रोग्राम निश्चित केल्यावर जी मानसिक-भावनिक शांतता/स्थिरता मला मिळाली ती कदाचित कुठेतरी पुढे कामी आली!

हा सराव करताना तब्येत सांभाळण हे देखील एक आव्हान समोर होतं. आजारी पडू नये, काही शारीरिक इजा होऊ नये, हिमोग्लोबिन वाढवणे इ. सारख्या गोष्टी महत्वाच्या होत्या आणि मी त्या काटेकोरपणे पाळल्या!

ईबीसी ट्रेक साठी सराव: आधी सांगितल्या प्रमाणे पर्वती चढणे-उतरणे हा आठवड्यातून दोन दिवस सराव होता. सकाळी ६ वाजता स्वारगेटला जाणारी ५ नं ची बस पकडायची आणि स्वारगेट ते पर्वती पायी. बुधवारी ३ फेऱ्या तर शनिवारी ५. कधी सुट्टी असेल तर जास्तीचा सराव व्हायचा. सकाळी ६ वाजताची ही बस प्रवाशांनी खचाखच भरलेली असायची. अगदी शेवटच्या पायरी वर ही लोक उभे! प्रवास करून आलेले, सामान सोबत असणारे, झोपेत पेंगत असणारे हे प्रवाशी! ह्या बसला प्रकाश खैरमोडे नावाचे कंडक्टर


असायचे( अजूनही आहेत) ते पायरीवर उभे असणाऱ्या लोकांना ओरडून सांगायचे, “मॅडम ला आत येऊ दया. वाट दया त्यांना जरा”..आवाज एकदम खणखणीत..त्याचवेळी एकदम विनम्र! सकाळी सकाळी छान हसून स्वागत करायचे. स्वारगेट आलं की जोरात आरोळी देणार, “झोपलेले जागे व्हा, स्वारगेट आलं, आपापलं समान घेऊन उतरा, दुसऱ्याचं सामान घेऊन उतरू नका”. प्रत्येक स्टॉप चं नाव घेऊन लोकांना जागे करायचे. त्यांच आणि माझ्यात दोन शब्दांचा संवाद असायचा, तिकीट काढताना मी “नमस्ते” म्हणणार आणि ते ही “नमस्ते” म्हणून प्रत्त्युत्तर देणार आणि स्वारगेट आलं की मी म्हणणार, “येते बाबा”..ते म्हणायचे “या”...बस्स. जवळ जवळ तीन –साडेतीन महिने हा सिलसिला चालू राहिला आणि आजही सुरु आहे! त्यामुळे माझ्या सरावा मध्ये त्यांच मोठ योगदान आहे असं मला वाटतं!

पर्वती व्यतिरिक्त हनुमान टेकडी आणि सिंहगड ह्या दोन ठिकाणीही सराव केला. ह्या सरावामध्ये विशाल काकडे आणि शिवप्रसाद पेंडाल यांनी खूप मोलाची साथ दिली. ह्या मुलांनी माझा चढण्या-उतरण्याचा वेळ नोट करण्यापासून ट्रेक दरम्यान मला ईबीसी ट्रेक लक्षात घेऊन मौलिक मार्गदर्शन केले!

राहुल जाधव ने पूर्व-ईबीसी आहार याबद्दल संवाद केला, आलेख प्रजापती ने प्राणायाम, मेडिटेशन आणि ब्रीदिंग बद्दल सांगितलं, श्री. शिवानंद गोखले आणि श्री. शिरीष माने सरांनी वेळोवेळी मौलिक टिप्स दिल्या, अमित डोंगरे, राजकुमार डोंगरे, परेश पेवेकर, स्मिता राजाध्यक्ष, प्रशांत शिंदे, ओंकार यादव आणि एस. जी. ट्रेकर्स चे असे अनेक मेम्बर्स ने नेहमीच माझं कौतुक करून मला प्रोत्साहित केलं!

ह्या काळातच मिलिंद राजदेव याने सह्याद्री मित्रांच्या ब्लॉग ची एक लिंक पाठवली. मी त्यांना इमेल केलं आणि त्या ब्लॉगलिस्ट मधे त्यांनी माझं नाव मिळवलं. ही गोष्ट मला स्वत:ला प्रेरणा देणारी होती!

माझे ट्रेक ब्लॉग वाचून नेहमीचं सर्वांच्या छान प्रतिक्रियांनी मला अधिकाधिक ट्रेक करण्यास आणि तयार ब्लॉग लिहिण्यास प्रोत्साहन दिल. त्यातलीच ही एक प्रतिक्रिया,



जानेवारी ते एप्रिल ह्या काळात एस. जी. ट्रेकर्स बरोबर मढेघाट, कलावंतीण दुर्ग, केटूएस, वासोटा आणि राजमाची ट्रेक केले. त्यांनी आम्हा एबीसी आणि ईबीसी ला जाणाऱ्यांसाठी दोन ट्रेक आयोजित केले, केटूएस आणि राजमाची! त्यातल्या केटूएस ट्रेक ब्लॉगची ही लिंक!

http://savitakanade.blogspot.com/2017/03/blog-post.html   

केटुएस चार वेळा केल्यावर परेश पेवेकर ची ही प्रतिकिया नक्कीच खास होती,



कलावंतीण ट्रेक ला अमित डोंगरे माझ्याबरोबर होता. ट्रेक नंतर त्याच्या ह्या प्रतिक्रियेने मी निश्चितचं प्रेरित झाले. 

शेवटी शेवटी तर असं झालं होत कि ब्लॉग लिहिण्यासाठी तरी ईबीसी ट्रेक समीट करायचा! असो. 

राजमाची ट्रेकच्या वेळी एस. जी ट्रेकर्स ने आम्हाला “शिवप्रतिमा” ही शुभेच्छा भेट दिली!




या काळातचं एव्हरेस्टर आनंद माळी ह्याच्या बरोबर ताम्हिणी जंगल ट्रेल हा एक अनएक्सप्लोअर्ड ट्रेक केला!   http://savitakanade.blogspot.com/2017/03/blog-post_28.html


ईबीसी ट्रेक चा सराव म्हणून जीजीआयएम ने दोन ट्रेक आयोजित केले होते, विसापूर फोर्ट ट्रेक आणि तिकोना ट्रेक! 

विसापूर ट्रेक दरम्यान श्री. उमेश झिरपे, गणेश मोरे, आशिष माने आणि दिनेश कोतकर यांचे मार्गदर्शन  लाभले.


विसापूर ब्लॉग वर उमेश सर, गणेश आणि आशिष च्या मिळालेल्या प्रतिक्रियांनी माझ्या ईबीसी ट्रेकच्या निर्णयाला उभारी मिळाली.

तिकोना ट्रेक च्या वेळी सरावाची झलक आणि ईबीसी ट्रेकची माहिती हे कायमचं प्रोत्साहित करत राहीलं! http://savitakanade.blogspot.com/2017/03/blog-post_14.html

२६ फेब्रुवारी २०१७ रोजी जीजीआयएम ने “Introduction to High Altitude Trekking” वर एक वर्कशॉप आयोजित केला. ह्यामध्ये Acclimatization, High Altitude Sickness, Acute Mountain Sickness, Training for High Altitude आणि High Altitude backpacking इ. वर मार्गदर्शन केले. ह्या वर्कशॉपचं एक वैशिष्ट मला जाणवलं ते हे की मार्गदर्शन करताना सर्वांचा एकच दृष्टीकोन होता, “हे ट्रेक साध्य आहेत”!. “तुम्ही खूप काहीतरी अवघड करायला निघाला आहात” असा आविर्भाव त्यात जाणवला नाही आणि त्यातच त्या वर्कशॉपच्या यश आणि आमचं प्रोत्साहन सामावलं होतं!

ईबीसी ट्रेकला जाण्या अगोदर उष:प्रभा पागे मॅडमशी संवाद व्हावा आणि त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद लाभावेत अशी खूप इच्छा होती. एक दिवस धाडस करून त्यांना फोन केला आणि त्या फोनवरील संवादातून मला जे प्रोत्साहन मिळाल, जो धीर मिळाला त्याने माझं आत्मसामर्थ्य वाढण्यास मदत झाली!

यामध्ये एक गोष्ट मी कटाक्षाने केली होती ती म्हणजे, ईबीसी ट्रेक बद्दल काहीही वाचन केलं नाही. गुगुलवर काही माहिती बघितली नाही, ट्रेक व्हिडीओ बघितले नाहीत....मी ठरवलं होतं ट्रेक करायचा तर एकदम ओपन माइंडने! ट्रेक बद्दल मला जे वाटलं ते विचार, भाव-भावना, निष्कर्ष, ठोकताळे, तर्क माझे असावेत!

ट्रेकला जाण्याच्या १५ दिवस आधी सराव बंद करून शरीराला विश्रांती द्यावी आणि आहाराकडे जास्त लक्ष द्यावं असं सुचवलं होतं. पण अशावेळी आव्हाने नाही आली तर नवलचं! मी सुट्टीवर जाणार म्हणून ऑफिसकडून काही कामे खडूसपणे लादली गेली तर काही आपसूकच डोक्यावर आली. एरवी कामे निघणार नाहीत ती कामे एकापाठोपाठ एक पुढे आली! आहे त्या वेळात ही कामे पूर्ण करण्याचं टेन्शन मागे लागलं. मग कसली आलीय शारीरिक विश्रांती आणि आहाराकडे विशेष लक्ष! शारीरिक, मानसिक आणि भावनिक शांततेचा असा धुव्वा उडाला! असं वाटलं निघण्याच्या दोन दिवस आधी देखील सुट्टी टाकायला हवी होती. असो.   

२२ एप्रिल, जायची तारीख जवळ यायला लागली, गरम कपड्यांची आणि सुचवलेल्या इतर गोष्टींची खरेदी झाली. यादीनुसार सर्व गोष्टी घेतल्या. कागदपत्रे घेतली.

“एव्हरेस्ट दर्शन” ही इच्छा माझी होती पण ट्रेकला निघताना माझी इच्छा माझी एकटीची राहिली नव्हती. माझ्या सर्व ट्रेक सहकाऱ्याची ती इच्छा झाली होती!

२२ तारीख उजाडली, सर्व गोष्टींची फेरतपासणी केली. आर. के. (राजकुमार डोंगरे)


आणि ललिता (त्यांची पत्नी) ने येऊन शुभेच्छा दिल्या. 
एक शुभेच्छा अशी देखील होती,




त्यानंतर ओंकार यादव, प्रतीक शहा, राहुल आवटे, कविता कुंभार आणि रोहिणी कित्तुरे यांनी मी पुणे एअरपोर्टला निघेपर्यंत सोबत केली. मी कॅब मध्ये बसणार तर राहुल जाधवचा फोन आला. मी सामोरे जात असलेली एन्झायटी त्याच्या फोनमुळे क्षणात कुठल्या कुठे गायब झाली. माझ्या सर्व ट्रेक सहकाऱ्यांची उणीव त्याच्या फोनने भरून निघाली!

ईबीसी ट्रेक सुरु करण्याआधीचा हा टप्पा सरावासाठी महत्वपूर्ण होता. सरावाने माझ्यात खूप काही बदल झाले. सरावाचा हा अनुभव ईबीसी ट्रेक साठी “बेस” आणि “बेस्ट” ठरला!

सरावाचे अनुभव:

  • ·   पर्वती एन्ड्युरन्स सराव सुरु केला तेव्हा काही पायऱ्या चढून गेलं की घशाला इतकी कोरडं पडायची की बस्स! साधारणत: तोंड आणि घसा तसाही थोडा ओलसर असतो पण चढताना तो ओलसरपणाही जाणवायचा नाही. कधी एकदा पाणी पिते असं होऊन जायचं. पण सराव जसा जसा चालू ठेवला तसं तसा घसा कोरडा पडायचं कमी झालं.
    ·     पर्वती चढताना सुरुवातीला खूप दम लागायचा. ३-४ वेळा थांबावं लागायचं. पण सरावाने  न थांबता पायऱ्या चढायला मदत झाली.
    ·        पायांना बळकटी येण्यास मदत झाली.
    ·      एखाद्या ट्रेकला गेले तर दम लागायचा आणि काही अंतर चालून गेलं की थांबव लागायचं. सरावाने अंतरात वाढ झाली.
    ·        गुडघे मजबूत होण्यास मदत झाली.
    ·        सराव करून आल्यावर दिवसभर ताजेतवानं वाटायचं.
    ·    दडपणखाली सराव न करता सरावातील आनंद आणि आनंदाने सराव करायला मी शिकले.
    ·        स्वयंशिस्त आणि स्वयंआनंद ह्या गोष्टींच महत्व मला जाणवलं.
    ·     सरावामध्ये एकाग्रता आणि ध्येयाकडे लक्ष किती महत्वाचं आहे हे शिकले (दहा किलो वजनाची गोष्ट आठवतेय ना?)
    ·        सरावात सातत्याचे महत्व लक्षात आले.
    ·        आपल्या गतीने, आपल्या क्षमतेने हवे ते साध्य करता येऊ शकतं ह्याची जाणीव झाली
    ·     ह्या प्रवासात एक गोष्ट लक्षात आली....जगात एकच व्यक्ती आहे जी तुमचं ऐकून घेते आणि साथ देते! ती व्यक्ती आहे "तुमच मन"! तुमच्या भावनांनुसार तुम्हाला  साथ देण्याची ताकद फक्त ह्या मनात आहे! अदृश्य असं हे मन! साथीला घेऊन काय चालले सदृश्य साथीची गरजही पडली नाही!
    ·      सुरुवातीच्या काळात ट्रेकिंग कडे मी एक व्यायाम प्रकार म्हणून पाहत होते. पण नंतर लक्षात आले ट्रेकिंग करण्यासाठी एन्ड्युरन्स सराव किती महत्वाचा आहे!
    ·    तन्मय ने, पर्वती सरावात भरघोस साथ केली. तिने केलेल्या अनेक हिमालयीन ट्रेक चे अनुभव शेअर करून तिने मला हिमालयीन ट्रेक साठीच्या छोट्या छोट्या टिप्स दिल्या.
    ·  हनुमान टेकडीची चढाई-उतराई पर्वती पेक्षा अगदीच सोपी. पण इथला हरित निसर्गवृक्ष लागवड, सूर्यास्त आणि शुद्ध हवा यामुळे खूप प्रसन्नता अनुभवली.
    ·    सिंहगड ट्रेक करताना ठरवलं होतं की ट्रेकिंग स्टिक वापरायची नाही. सिंहगड नंतर जेव्हा जेव्हा केला स्टिक न वापरता केला.

  •  मला बरेचजण विचारायचेमॅडम, तयारी कशी सुरु आहे?” माझं उत्तर असायचं “मी समाधानी आहे”....मला माहित नव्हत मी केलेला सराव पुरेसा आहे कि नाही पण मी समाधानी असल्याची भावना मला जास्त प्रोत्साहित करणारी होती.
शिवप्रसाद पेंडाल, राहुल जाधव, आलेख प्रजापती, मिलिंद राजदेव, प्रतीक खर्डेकर ज्ञानेश्वर गजमल, शंकर स्वामी, अनिकेत घाटे ही मुले आहेत ज्यांनी ट्रेकिंगच्या सुरुवातीच्या काळात मला ट्रेकिंगचे तांत्रिक धडे देऊन माझा ट्रेकिंगचा पाया मजबूत केला! ह्यांच्या योगदानाबद्दल तुम्ही ह्या ब्लॉगच्या भाग-३ मध्ये वाचालचं! तुमच्या लक्षात आले असेलच की ईबीसी ट्रेक साठी मी बहुविध व्यायाम प्रकार केले नाहीत. ईबीसी ट्रेक मी करणार होते, ते फक्त आणि फक्त ट्रेकिंगच्या जोरावर! ट्रेकिंग म्हणजे, स्टॅमीना, एन्ड्युरन्स आणि फिटनेस!

विशाल काकडे, हा एक असा मुलगा आहे ज्याच्या सोबत मी ईबीसी पूर्वी २५ ट्रेक पूर्ण केले होते. त्याने अडीच वर्षातील माझी प्रगती आणि आत्ताचा माझा सराव जवळून बघितला होता. माझ्या सरावात मला साथ केली आणि प्रत्येकवेळी, प्रत्येक ट्रेकला कौतुकाचे मेसेज सतत लिहून मोटिव्हेट केलं. 


ईबीसी पूर्वीच्या राजमाची ट्रेक नंतर त्याची पूर्णत: खात्री झाली आणि लगेचच मला मेसेज केला, “ईबीसी, ईझिली करताल मॅम तुम्ही”! 

तेव्हा १९-२० वय असणाऱ्या ह्या मुलाने, माझ्या आयुष्यातील  ट्रेकिंगचा टप्पा कसा समृद्ध केला ह्या विषयी ह्या ब्लॉगच्या भाग-३ मध्ये तुम्ही वाचालचं!




प्री-ईबीसी ट्रेकिंग काळ हा खरचं महत्वाचा होता. सातत्याने केलेल्या सरावाने मला आत्मविश्वास दिला. ट्रेक सहकाऱ्यांच्या विशेषत: विशालच्या प्रोत्साहनामुळे घेतलेला निर्णय तपासून पाहण्याचा प्रश्नचं आला नाही! 

तुम्हीच विचार करा ना ज्याचा प्री-ईबीसी काळ इतका समृद्ध, संपन्न आहे, त्याचा ईबीसी ट्रेक समीट का होणार नाही? आणि अर्थातच पर्वती शिवमंदिर, तळ्यातला गणपती, महालक्ष्मी माता, चतुश्रुंगी यांचा वरदहस्त!

ट्रेकला निघाले तेव्हा माझ्या सोबत होत्या, माझ्या घरच्यांच्या आणि ट्रेक सहकाऱ्यांच्या भरघोस शुभेच्छा, मी समाधानी असलेला सराव, राहुलच्या फोनने वाढलेले मनोबल आणि विशालचा माझ्यावरचा प्रचंड आत्मविश्वास!

(क्रमशः)

भाग २: ईबीसी ट्रेक समीट
भाग ३: पोस्ट ईबीसी ट्रेक 









2 comments:

UB said...

Madam, as always beautifully written....waiting for the 2nd and 3rd parts....you are an inspiration....kharya arthane 'HIRKANI' aahat tumhi.....Salute to you!!

Shruti Raut said...

mesmerizing as always..and well said about vishal. he makes you complete new things easily..while reading this blog i just remembered your initial trekking days..u have come a long way savita mam..and miles to go yet!we are lucky to have you