पांडवगड,१४ जानेवारी २०१८


पांडवगड, एक ऑफबीट ट्रेक, महाभारतातील पांडवांचा गडाशी असलेला संबंध आणि “ट्रॅव्होरबिस आउटडोअर्स” ह्या ग्रुपने उल्लेख केलेले “पॅनारोमिक पांडवगड” हे नाव, ह्या गोष्टींनी हा ट्रेक करण्यास मला उद्युक्त केले.

सकाळी ६.३० वाजता पुण्यातून निघून वाईमार्गे मेणवली गावातून गडाच्या पायथ्याशी पोहोचून साधारण ९.३० वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली.

गिरिदुर्ग प्रकार, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगा, समुद्र सपाटीपासून साधारण ४००० फुट उंची, वाईपासून अवघ्या ५-६ किमी अंतर हे ह्या गडाचे बाह्यवर्णन! श्री. प्रमोद मांडे सरांनी त्यांच्या पुस्तकात या गडाचे केलेले वर्णन खालीलप्रमाणे,


गडावर तीन मार्गांनी जाता येते, मेणवली मार्गे, शेलारवाडीतून आणि धावडी मार्गे!खरंतर, प्रत्येक मार्गाचे आपले असे एक विशिष्ट असते. शेलारवाडी पर्यंत गाडी जाते, धावडी मार्ग अलीकडेच बांधलेल्या पायऱ्यांचा मार्ग आणि मेणवली मार्ग तसा ऑफबीट आणि जरा लांबलचक! आम्ही मेणवली मार्ग निवडला कारण, गडाच्या विस्तार आणि व्याप्तीचे आकलन व्हायचे असेल तर अशा लेन्दी आणि ऑफबीट मार्गाने प्रथम जावेअसे आमचा मित्र “स्वप्नील खोत” म्हणतो! (स्वप्नील बद्दल काही लिहिणे म्हणजे सह्याद्रीत चमकणाऱ्या ह्या “काजव्याला दिवा दाखवण्यासारखे” आहे! त्यापेक्षा त्याच्यासोबत ट्रेक करून तुम्हीच तो अनुभव घ्यावा असे मी सुचवेन). असो.
 
९.३० वाजता गड चढायला सुरुवात केल्यावर साधारण तासाभराने आम्ही पहिल्या माचीवर येऊन ठेपलो. माचीवरून महाबळेश्वर आणि धोम धरणाचा जलाशय नेत्रसुखद दिसत होता. महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे पर्यटन स्थळ आणि ब्रिटीश काळापासून प्रसिध्द असलेल्या जवळजवळ ३३ पॉइंट्समुळे जास्त प्रसिद्ध असले तरी “क्षेत्र महाबळेश्वर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री आणि वेण्णा या पाच नद्या उगम पावतात आणि इथे ह्याला "पंचगंगा मंदिर" असे म्हणतात. धोम धरण म्हणजे मेणवलीपासून साधारण ६ किमी अंतरावर “धोम” नावाचे गाव आहे. धौम्य ऋषींच्या नावावरून ह्या गावाचे नाव धोम पडले असे सांगतात. धोम गाव कृष्णा नदीच्या काठावर वसलेले असून नदीवर बांधलेल्या धरणाला धोम धरण म्हणून ओळखले जाते.धोमचे नृसिंह मंदिर प्रख्यात आहे (संदर्भ:आदित्य फडके लिखित :"साताऱ्याच्या मुलखात" हे पुस्तक, पान नं. १६४ आणि ९१) असो.


नेत्रसुखद ह्या परिसराशिवाय माचीवर भैरवनाथाचे मंदिर आणि मंदिराबाहेर काही प्राचीन अवशेष बघायला मिळाले.


भैरवनाथाच्या मंदिराला वळसा घालून दुसऱ्या माचीकडे कूच करताना उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला होता. वाळलेल्या गवताची  पायवाट कापीत, खाली खड्ड्यांचा अंदाज घेत, कूसळांपासून स्वत:चा बचाव करत आम्ही चाललो होतो. आता एका घराजवळ येऊन ठेपलो. घरातील मावशी म्हणे, पावसाळ्यात आजूबाजूला सगळीकडे आधी पाऊस पडतो त्यानंतर पांडवगडावर पाऊस येतो. आजूबाजूचा सर्व परिसर ओला असतो पण पांडवगड कोरडाच दिसतो. त्याची कहाणी अशी सांगितली जाते की पर्जन्यराजाच्या आगमनाच्या वेळी पांडव जेवायला बसले होते. पांडवांनी पर्जन्यराजाला विनंती केली की “आमचे भोजन होईपर्यंत इथे पडू नकोस” म्हणून हा पाऊस आधी आजूबाजूला बरसतो आणि मग पांडवगडावर”!

घराजवळील झाडाखाली क्षणभराची विश्रांती उरकून जवळचं असणाऱ्या विहिरीचे थंडगार पाणी पिऊन आम्ही दुसऱ्या माचीच्या दिशेने ट्रेक सुरु केला. गडावर जायला अनेक पायवाटा आहेत. माचीकडे जाणाऱ्या खड्या चढाची वाट न पकडता आम्ही जंगलाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. जंगलाची ही वाट थोडी नागमोडी, घनदाट झाडांची सावली देणारी होती. ही वाट मळलेली नव्हती त्यामुळे वाटेचा शोध घेत आम्ही चाललो होतो. वाटेवर सागाच्या झाडांची वाळलेली पाने विखुरलेली होती. चालताना त्या पानांचा "सरसर" असा आवाज येत होता! आम्ही थोडे पुढे गेलो आणि लक्षात आले की जंगलातील ही वाट गावकऱ्यांनी काट्या-कुट्यांनी बंद करून टाकली आहे. अजूनही २-३ वाटा अशाच रीतींने बंद केलेल्या आढळल्या. माघारी येऊन खड्या चढाईच्या मळलेल्या मार्गाने गडावर जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. साधारण पाऊण तासाने आम्ही गडाच्या दुसऱ्या माचीवरील बुरुजावर येऊन पोहोचलो. इथून धोम धरण जलाशयाचा विस्तार दिसून येत होता!

आता आमची वाटचाल बालेकिल्ल्याच्या दिशेने सुरु झाली. गडाचे प्रवेशद्वार, कातळात कोरलेल्या पायऱ्या, गडमाथ्याच्या कपारीतून जाणारी पायवाट, पाण्याच्या टाक्या पाहत पाहत हनुमानाच्या मंदिराजवळ आम्ही आलो. बालेकिल्ल्याच्या वाटेवर पत्र्याची शेड उभारलेल्या मंदिरात दगडात कोरलेली शेंदूर रचित ही मूर्ती आहे. 





जवळच सुस्थितीतील चुण्याचा घाणा आहे. इथून काहीच पावलांच्या अंतरावर गडाच्या दुसऱ्या भक्कम दरवाज्यातून प्रवेश केल्यावर “पांडजाई” (पांडवजाई) देवीचे मंदिर आहे. मंदिरासमोर "विष्णुपद”, शिवलिंग, नंदी आणि इतर प्राचीन वाड्याचे आणि तटबंदीचे अवशेष बघायला मिळाले. 

बालेकिल्ला छोटा असला तरी गडमाथ्यावर असणाऱ्या विस्तीर्ण पठारामुळे ह्या किल्ल्याचे सौदर्य वाढते. आजूबाजूच्या महाबळेश्वर डोंगररांगामध्ये हा तसा एक तुटक किल्ला! ६ मी. उंचीचा नैसर्गिक कातळसुळका हे गडाचे एक खास वैशिष्ट्य!गडमाथ्यावर उभे राहिले की ३६० डिग्री अंशातून आजूबाजूचा परिसर आणि डोंगर रांगा दिसणारा हा एक अद्वितीय किल्ला! म्हणूनच उल्लेख करतात “पॅनारोमिक पांडवगड”! कोळेश्वर, रायरेश्वर, कमळगड, रोहिडा, महाबळेश्वर आणि मांढरदेवी इ. गडांच्या रांगा पठारावरून दिसतात. 

१९९१-९२ मध्ये सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला. किल्ल्यावरून राज्यावर देखरेख ठेवण्याचं महत्व ध्यानी ठेऊन जे अनेक किल्ले बांधले गेले त्याच हेतूने बांधलेला हा किल्ला! पुढे. इ.स. १६७३ मध्ये पांडवगड शिवरायांनी ताब्यात घेतला. इस. १७०१ मधे किल्ला मोगलांच्या त्याब्यात गेला. नंतर लगेचच मराठ्यांनी परत त्याचा कब्जा घेतला. नंतरच्या काळात १८१७ मधे त्रिंबकजी डेंगळयांनी ब्रिटीशांशी दिलेल्या एका झुंजीत त्यांना या गडाचा उपयोग झाला. अखेर १८१८ मधे मराठेशाही बुडाली तेव्हा इतर किल्ल्याबरोबर हा किल्ला इंग्रजांनी जिंकला. (संदर्भ: पांडुरंग पाटणकर लिखित "चला ट्रेकिंगला", पान नं १३२-१३३). आता गडावरील जमीन मॅपको कंपनीच्या नावावर आहे. 



गडाच्या धावडीमार्गाच्या वाटेवर पांडवलेणी आहेत. पहिल्या क्रमांकाच्या लेण्यामध्ये आठ विहार आहेत तर दुसऱ्या लेण्यामध्ये स्तूप आहे. (संदर्भ: आदित्य फडके लिखित :"साताऱ्याच्या मुलखात" हे पुस्तक, पान नं. २०)

दुसऱ्या माचीपासून बालेकिल्ल्यापर्यंत गड बघायला आम्हाला साधारण दीड तास लागला. गड उतरलो तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. उतरतीच्या मार्गावर नजर मागे पांडवगडाच्या दिशेने वळत होती. ह्या गडाचा विस्तार खरोखरचं अचंबित करत होता! 

भगवान चिले सरांनी त्यांच्या “गडकोट” ह्या पुस्तकात पांडवगडाचे वर्णन “वाईचा मुकूटमणी” असे केले आहे. आहे ना किती यथार्थ, समर्पक नामकरण! 


आता उत्सुकता होती ती नाना फडणवीस वाडा आणि मेणवली घाट बघण्याची! वाई पासून ३ किमी असणारे मेणवली गाव, नाना फडणवीस यांनी कृष्णा नदीच्या काठावर बांधलेल्या वाड्यामुळे आणि काठावर बांधलेल्या अमृतेश्वरच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे!

बाहेरून वाड्याची रचना गढीवजा वाटली. बाहेर गणेशाची मूर्ती आहे आणि वाड्याची माहिती दर्शवणारा फलकही आहे.



मेणवली घाट, अत्यंत शांत, रम्य आणि पवित्र स्थळ !



कृष्णाकाठी बांधलेल्या अमृतेश्वरच्या मंदिरात ६ ते ७ फुट खाली शिवलिंग आहे असे म्हणतात परंतु अंधार झाल्याने आम्हाला ते दिसू शकले नाही. मंदिरासमोरील एका मंडपात एक अजस्त्र घंटा बांधलेली दिसली. घंटेवर पोर्तुगीजांचे चिन्ह असून इ.स. १७०६ ही अक्षरे कोरली आहेत. ही घंटा म्हणजे, इ.स. १७३८ सालामध्ये पोर्तुगीजांबरोबर झालेल्या युद्धामधील विजयाचे प्रतीक आहे!


मावळतीच्या सूर्यप्रकाशात कृष्णामाई नदीच्या घाटावर ध्यानमग्न अवस्थेत बसण्याच्या अनुभूतीने ह्या ट्रेकचा शेवट ही सर्वांग सुंदर गोष्ट मला वाटली!

तिळगूळ सेवन करून गडावर मकरसंक्रात सणसाजरा, सणाच्या स्मृतीरूपाने भेट मिळालेला पतंग, आणि नवीन ट्रेक सहकाऱ्यांची ओळख आणि त्यांच्या सोबत ट्रेकदरम्यान झालेल्या गप्पा ह्यामुळे ट्रेकचा आनंद द्विगुणीत झाला!


ह्या ट्रेकचा मेन लीडर "रोहित काबदूले" होता. रोहितला भेटून मी त्याला प्रथमचं भेटत आहे असं वाटलं नाही. त्याच्या सोबत खूप चटकन आणि छान झालेले असोसियेशन माझ्या नेहमीचं स्मरणात राहिल.  असो. 


  

वरुणराजानेही ज्यांच्या विनंतीचा मान राखला त्या पांडवांचा लाभलेला अधिवास, धोम धरणाचा सुंदर जलाशय, कृष्णामाई नदीच्या तीरावरील मेणवली घाटाची पवित्रताघनदाट विलोभनीय वनश्री, प्रचंड विस्तारलेल्या दोन माची, बुरुज, बालेकिल्ला, पांडजाई देवीचे मंदिर आणि नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या कमळगड, मांढरदेवी, रायरेश्वर डोंगरांच्या सुरम्य रांगांनी नटलेला असा हा पांडवगड!  


धावडीमार्गे ट्रेक करून “पांडवलेणी” बघण्याची उत्सुकता आता प्रबळ झाली आहे! त्यावेळी भेटूचं!

मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा!


ट्रेक सहकारी (उजवीकडून): स्वप्नील खोत, रोहित काबदूले, दीप्ती सावंत आणि सचिन सावंत.

फोटो आभार: ट्रेक टीम

No comments: