लिंगाणा किल्ल्यासंबंधित क्लायंबिंग,
रॅपलिंग, शिवलिंग, केव्ह्ज, रायलिंग पठार इ. अगणित बातम्या मी
दोन वर्षापासून ऐकत होते, वाचत होते आणि फोटो देखील पाहत होते. कमीत कमी “लिंगाणा
दर्शन” तरी व्हावं ही इच्छा तेव्हापासून मनात रुंजी घालत असली तरी ती काही केल्या
पूर्ण होत नव्हती. “लिंगाणा दर्शन” होणार तरी कसं हा प्रश्न सतत मनात घर करून होता!
एक दिवस “गार्डियन गिरिप्रेमी
इंस्टीटयूट ऑफ माउंटेनिअरिंग (जीजीआयएम)” संस्थेची “निसर्गानंद” इव्हेंट अंतर्गत
“ट्रेक टू रायलिंग पठार” हो पोस्ट वाचली आणि “लिंगाणा दर्शन” ही इच्छा पूर्ण होणार
ह्या आनंदाने ट्रेकसाठी कन्फर्मेशन लगेचच करून टाकलं!
दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी
सकाळी ६.१५ ला फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेटपाशी ग्रुप भेटला आणि समोर “उष:प्रभा
पागे” मॅडम ना बघून चकित झाले. मॅडम ट्रेकला आहेत हे कळाल्यावर तर आकाश ठेंगणे
झाले! एव्हरेस्ट बेस कॅम्प (ईबीसी) समीट केलेल्याचं सर्टिफिकेट मॅडमच्या हस्ते
प्रदान झालं होतं तरी त्याच्या सोबत ट्रेक करायला मिळावा ही इच्छा आज पूर्ण होत
होती!
साधारण पावणेसातच्या सुमारास आम्ही
पुण्यातून निघालो, ८.३० ला वेल्हे गावातील हॉटेल मधे नाश्ता करून मोहरीचा रस्ता
धरला. मढेघाटला जाणारी वाट, गुंजवणी धरणाचा जलाशय, वाटेवरचा तोरणा, रायगड, लिंगाणा
सुळका मागे टाकत जाताना कच्चा फुफाट्याचा रस्ता लागला. लालसर मातीची धूळ उडू लागली
आणि गाडी मोहरी गावात येऊन पोहोचली. गावातील एका घराच्या अंगणात सहभागींची ओळख
परेड झाली.
जीजीआय तर्फे चालणाऱ्या “आव्हान” “निर्माण” प्रकल्पातील मुले, ईबीसी ट्रेकसाठी नाव नोंदवलेले आणि रायलिंग पठार ट्रेकसाठी आलेले असे एकूण आम्ही ४६ सहभागी होतो. ह्या ओळख परेड दरम्यान “अभिजित बेल्हेकर” सर पण ट्रेकला आहेत हे कळालं आणि “सोने पे सुहागा” अशी स्थिती झाली! लोकसत्ता वर्तमानपत्रात सरांचे येणारे लेख वाचून, प्रसंगी त्याची कात्रणे जपून ठेवून माझ्या ज्ञानाचा आलेख वाढवत ठेवण्याचा प्रयत्न मी केलेला/रादर करत आहे. असो.
जीजीआय तर्फे चालणाऱ्या “आव्हान” “निर्माण” प्रकल्पातील मुले, ईबीसी ट्रेकसाठी नाव नोंदवलेले आणि रायलिंग पठार ट्रेकसाठी आलेले असे एकूण आम्ही ४६ सहभागी होतो. ह्या ओळख परेड दरम्यान “अभिजित बेल्हेकर” सर पण ट्रेकला आहेत हे कळालं आणि “सोने पे सुहागा” अशी स्थिती झाली! लोकसत्ता वर्तमानपत्रात सरांचे येणारे लेख वाचून, प्रसंगी त्याची कात्रणे जपून ठेवून माझ्या ज्ञानाचा आलेख वाढवत ठेवण्याचा प्रयत्न मी केलेला/रादर करत आहे. असो.
ओळख परेड नंतर अभिजित सर “ट्रेक
आणि ट्रेकर” याबद्दल बोलले. पाने, फुले, पक्षी, प्राणी, तिथे राहणारे लोक, घरे,
घराची रचना, त्या ट्रेकचा इतिहास, त्याचे महत्व, भूभाग, पाण्याचा स्त्रोत इ.
गोष्टींचा अभ्यास ट्रेकर ने करावा हे सांगताना त्यांनी सांगितलेल्या खासकरून दोन
गोष्टी खुपच महत्वाच्या वाटल्या. एकतर ट्रेकच्या “नोंदी” ठेवाव्यात आणि दुसरे ह्या
गोष्टी एका ट्रेकर कडून नाही झाल्या तर तो “ट्रेकर नाही तर पोर्टर” आहे! ह्या दोन
गोष्टींचा प्रचार आणि प्रसार व्हावा ह्या उद्देशाने हे संस्कार रुजवणाऱ्या
सरांसारख्या व्यक्ती किती मोलाचं कार्य करत आहेत ह्याची जाणीव झाली!
रायलिंग पठारच्या दिशेने ट्रेक
सुरु झाला. वाटेत जंगलातून जाताना (आणि परतताना सुद्धा) उषा मॅडम फुले, पाने,
वनस्पती यांची माहिती देत होत्या. त्याच्या बोटॅनिकल नावापासून, त्याच मराठी नाव,
त्याचा उपयोग अगदी सर्व! खाजकुयरी, निळी अबोली, एकपाकळी (...बापरे सर्व नावे
माझ्याही लक्षात नाहीत) अशा कित्येक पानाफुलांची माहिती त्यांनी दिली. वयाच्या
पंचाहत्तरीला ट्रेकचा हा उत्साह, पाना-फुलांचे सर्वांगीण ज्ञान हे पाहून क्षणभर मी
“लिंगाणा दर्शन” हा हेतू विसरून गेले होते.
साधारण पंचेचाळीस मिनिटात रायलिंग
पठारावर पाऊल पडलं आणि अजस्त्र, अभेद्य, विराट आणि अफाट अशा लिंगाणा किल्ल्याचे
दर्शन झाले! समोर लिंगाणा आणि पार्श्वभूमीवर रायगड! रायगड मधला “राय” आणि लिंगाणा
मधील “लिंग” अशी फोड होऊन “रायलिंग” हे नाव पडलं! रायलिंग पठारावरून समोर दिसतो
लिंगाणा आणि मागे रायगड.पण गंमत वाटली “रायलिंग च्या नावात पहिला “रायगड” आहे आणि
मग “लिंगाणा”! असो.
अभिजित सरांनी यावेळी उल्लेख केला
की ट्रेकला येण्याआधी ते श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना भेटले. त्यांनी सागितले, “लिंगाणा
किल्ल्यावर शिवलिंग आहे म्हणून ह्या किल्ल्यावर फक्त हिंदू धर्माचे कैदी ठेवले
जायचे. अन्य कैदी वासोट्या किल्ल्यावर ठेवले जायचे”. कोकण, घाटमाथा आणि देश
यांची माहिती देताना अभिजित सरांनी घाटवाटा जसे लिंगाण्याच्या सभोवताली असणाऱ्या
बोराट्याची नाळ, बोचेघळ, सिंगापूर नाळ, आग्या नाळ, गोप्या घाट, शेवत्या घाट, कावळ्या घाट या
पूर्वीच्या दळणवळणाच्या मार्गांची आणि कोकणदिवा किल्ल्यांची ओळख करून दिली.
उषा मॅडने सांगितले की हिरा पंडित
आणि त्यांच्या १३ जणांच्या टीमने लिंगाण्यावर १९७५ मधे पहिली चढाई केली. १९७८ मधे
लिंगाण्यावर चढाई करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या! आठवण सांगताना त्या म्हणे,
“लिंगाणामाची मधून बबन नावाच्या मुलाला आम्ही विचारल. तो लिंगाणा चढायला तयार
झाला. माकडासारखा भराभर तो लिंगाणा चढला. आम्ही विनारोप चढलो फक्त शेवटच्या २५
फुटावर आम्ही रोपचा आधार घेतला. तेव्हा ११ वर्षाचा असणारा बबन आता ५० वर्षाचा आहे.
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आम्ही त्याला आवर्जून बोलवलं होतं”!
पहिली महिला, जिने लिंगाणा सर केला
त्या आमच्यासोबत होत्या! वाव काय फिलिंग होतं!
रायलिंग पठाराबरोबर “बोराट्याची
नाळ” चढणे आणि उतरणे, खासकरून ईबीसी ट्रेकला जाणाऱ्यांसाठी हा प्रक्टिस ट्रेक
यावेळी ठेवला होता. वेळेअभावी २५ मिनिट उतरण्याची मर्यादा होती. “जाऊ की नको” हा
विचार गुडघेदुखी मुळे सुरु होता. एकाक्षणी ठरवलं “हीच ती वेळ आणि हाच तो क्षण”!
रायलिंग पठारावरून ही नाळ उतरण्याचा पहिलाचं पॅच जबरदस्त स्लीपरी होता. नाळ उतरत
असताना लक्षात आलं की इथले दगड चांगलेच घट्ट रोवले गेलेले होते. त्यामुळे उतरणं
आणि चढणं सोपं गेलं. “भोरांद्याचे दार” उतरण्याच्या तुलनेत ही नाळ उतरणं सोपं
वाटलं. तिथली दगडे म्हणजे पसरलेले छोटे तुकडे जे हलत होते! असो. बोराट्याची नाळ
चढणं आणि उतरणं हा अनुभव ही पदरात आला!
ह्या संपूर्ण ट्रेकमधे आमच्या
छोट्या वरदची सोबत खूप आनंद देऊन गेली. वरद हातोळकर हा माझ्या मैत्रिणीचा मुलगा.
अचानक ट्रेकला भेटला. त्याचे “आव्हान” प्रकल्पातील अनुभव तो सांगत होता.
त्याच्यावर आणि ट्रेकला आलेल्या अन्य मुलांवर आउटडोअरचे जे संस्कार होत आहेत ते
पाहून पालकांचं कौतुक करावसं वाटलं!
“रायलिंग पठार” खरं तर साधा सोपा
ट्रेक! (ट्रेकिंग ग्रुप्स, ट्रेकर्स त्याला कदाचित ट्रेक मानतही नसतील) पण त्याने
माझी “लिंगाणा दर्शन” ही दोन वर्ष मनात साठलेली इच्छा पूर्ण केली. इच्छापूर्तीची
मानवंदना लिंगाणा किल्ल्याला देताना बद्ल्यात इच्छापूर्तीचे दान ही त्याने माझ्या
पदरात टाकले. उषा मॅडम आणि अभिजित सर ह्यांची साथ देऊन “आजि सोनियाचा दिनु| वर्षे अमृताचा
घनु|” (सगळा दिवसचं सोन्याने उजळून निघाला आणि आकाशातून अमृताचा वर्षाव झाला)
तद्वत अलौकिक अनुभव मला दिला!
लिंगाणा जितका विराट, विशाल,
महाकाय त्याच तोडीच ह्या दोघांच कार्य! वाटलं रायलिंग पठार पण आज त्यांच्या
स्पर्शाने पुनीत झाले!
“लिंगाणा किल्ला” आणि "रायलिंग पठार" त्यांच्याविषयी भरभरून लिहिण्याची एक संधी मला नक्कीच देतील पण आजचा हा ट्रेक अनुभव उषाताई आणि
अभिजित सर खास तुमच्यासाठी!
जीजीआयएम (खासकरून अंकित, विशाल
आणि सिद्धार्थ), श्री. जयंत तुळपुळे सर, भूषण आणि दिनेश यांचे धन्यवाद, ज्यांच्यामुळे हा “सोनियाचा” दिवस माझ्या आयुष्यात
आला!
फोटो आभार: ट्रेक टीम
No comments:
Post a Comment