"विशेष आणि स्वमग्न" मुलांसाठी पर्वती चढणे स्पर्धा, स्वयंसेवक भूमिकेतील माझा अनुभव!

बुधवार ७ फेब्रुवारी २०१८

पर्वती पायथ्याचे शनिमंदिर भाविकांऐवजी आज "विशेष आणि स्वमग्न" मुलां-मुलींनी गजबजून गेलयं! सहा ते तीस वर्षा वरील वयोगटातील ही मुले-मुली! 



प्रत्येक चेहऱ्याची वेगळी ठेवण! पालक-शिक्षकांनी बसवलेल्या जागी निमूट बसलेत, पिवळा; हिरवा; लाल; निळा; पांढरा असा विविध रंगी पोशाख परिधान केलाय, उजव्या मनगटावर बांधलेली रिबन दुसऱ्या हाताने गोल गोल फिरवण्यात काहींजण मग्न आहेत, “नवक्षितिज” अक्षरे कोरलेल्या टोपीशी काहीजण खेळतायेत, काहींचा चेहरा टोपीखाली लपून गेलाय पण त्याच भान आहे कुणाला?, काही मुला-मुलींच्या मुखातून स्पष्ट-अस्पष्ट शब्द बाहेर पडतायेत तर काही जणांच्या मुखातून फक्त अस्फुट आवाज येतोय,काहींजण भिरभिरणाऱ्या; भेदरलेल्या नजरेने चहुबाजूला पाहतायेत, काहीजणांच्या चेहऱ्यावरची हास्याची सुरेख लकेर नजर वेधून घेतेय, काही मुला-मुलींच्या चेहऱ्यावर सूचना समजल्याचे हावभाव, काहीजण मान खाली घालून हाताच्या बोटांशी, खेळताहेत....... मुले-मुली स्वत:च्याच विश्वात मस्त आहेत!  

मंदिराबाहेर पावसाची रिमझिम सुरु आहे, वातावरण ढगाळ आहे, मंदिरात दर्शनासाठी भाविकांची ये-जा सुरु आहे, पालक; शिक्षक; आयोजक; ह्यांची स्पर्धेची गडबड सुरु आहे..

एरवी शाळेत दिसणारी ही मुले-मुली! आज सुसज्ज आहेत “पर्वती चढणे” स्पर्धेसाठी! डोक्यावर निळी टोपी, गळ्यात ओळखपत्र, वयोगटानुसार हातात रंगीत रिबन घालून.....

६ ते १२ वर्ष वयोगटातील ४-५ मुली आणि मी त्यांची स्वयंसेवक! मुली एका ओळीत उभ्या राहिल्यात, मान्यवरांच्या हस्ते “फ्लॅग ऑफ” होण्याची वाट पाहत! एकेकीच नाव पुकारल गेलं आणि आपलं नाव ऐकुन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहिला! “मी..मी” म्हणत एकजणीने आनंदाने जागीचं गिरकी घेतली, एकीने उड्या मारत टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला, एकीच नाव पुकारलं आणि दुसरीने “ही ही” म्हणतं तिच्याकडे निर्देश केला!


मुलींच्या देहबोलीत टोटल परिवर्तन बघत होते मी! चेहरा आणि शरीर अभिव्यक्त झालेलं, अंगात उत्साह संचारलेला, स्पर्धेचं स्फुरण भिनलेलं आणि भेदक-भिरभिरलेल्या नजरेत एक चंदेरी आशा पल्लवित झालेली!

सर्वजण पळण्याच्या आवेशात उभ्या! कमरेपासून वरील शरीर पुढे झुकलेले, एक हात मागे-एक पुढे, एक पाय पुढच्या पायरीवर तर एक मागच्या पायरीवर स्थिरावलेला.....मान्यवरांच्या हातातील पांढरा झेंडा आकाशाकडे झेपावला आणि “पळा” आवाज ऐकुन मुली सुसाट धावल्या!

एक मुलगी जोशात इतकी सुसाट धावली की काही पायऱ्यातच दमली. हात आणि मानेने “नाही, नाही” म्हणत चक्क मागे फिरली! परतण्यापासून तिला थांबवलं, शांत उभे राहण्यास सांगितलं, तिचा श्वास स्थिर होण्याची वाट पाहिली, पाणी विचारलं, माझ्या हाताला धरून हळूहळू पायऱ्या चढण्यास प्रोत्साहित केलं! हळूचं मग विचारलं “आता पळणार?” दुसऱ्याच क्षणी माझा हात सोडून ती धावली!

एकामागून एक मुले-मुली पायऱ्या चढून येतं होते. काहीजण कठड्याचा आधार घेऊन तर काही स्वतंत्रपणे! काहीजण थांबत तर काहीजण न थांबता एका स्थिर गतीने! काही मुले-मुली तर अक्षरक्ष: धावताहेत....बाजूला उभे आम्ही स्वयंसेवक टाळ्या वाजून त्यांना प्रोत्साहन देतोय....

मी विचार करतेय....ह्यांना तहान लागली असेल का, घसा कोरडा पडला असेल का? पायात गोळे आले असतील का? पाणी विचारावं का?.....

अशातच एक मुलगी चढून येताना दिसली. तिची आई थोडीशी दमलेली वाटली. आईला म्हटलं, “थोडा वेळ थांबा तुम्ही. मी जाते तिच्या सोबत”. त्यांनी  मुलीला विचारलं, “जातेस मावशीबरोबर?”. धाप लागलेल्या अवस्थेतही मुलगी हसली आणि लगेचचं आईचा हात सोडून तिने माझा हात पकडला! “स्पर्श, सोबत आणि सूरक्षितता” ह्या त्रिगुणी भावनेने मी सुखद शहारले!


टाळ्या वाजवून सुहास्य वदनाने प्रोत्साहन, वेळप्रसंगी हाताचा आधार, तोल सावरण्यास मदत,  पाठीवर प्रेमाची एक हलकीशी थाप, धाप लागलीय तर पाठ चोळून देणं, प्रोत्साहन पर टाळी हातावर देणं, “गुड, व्हेरी नाईस, गुड गोइंग, कम ऑन बेटा, थोडचं राहिलं आता, संऽऽऽपल” ह्यासारखे शब्दोच्चार! एक स्वयंसेवक म्हणून मी हे केलं.....  

प्रोत्साहन त्यांना मिळत गेलं आणि आत्मपरीक्षण माझं होत गेलं-----

जवळपास शंभर मुला-मुलींनी स्पर्धेत भाग घेतलेला! मुला-मुलींसोबत त्यांचे पालक आणि शिक्षक ओघाने स्पर्धेत उतरलेले!

वर्तन समस्या आणि स्वमग्नतेच्या विविध श्रेणीतील ही मुले-मुली! पर्वती चढताना मात्र एकाचं श्रेणीत गुंफली गेलेली, "प्रगती आणि परिवर्तनाची श्रेणी!"

बक्षिस वाटप विजेत्यांसाठी !  सुखद क्षण आणि आनंदी जल्लोष होता प्रत्येकासाठी!


मुला-मुलींच्या वर्तनाचा थक्क करणारा आलेख! त्यांचा उत्साह, उर्जा, आत्मविश्वास, धैर्य आणि क्षमते पलीकडे स्वत:ला झोकून देण्याची लीलया अचंबित करणारी!


नवक्षितीज संस्था (डॉ.नीलिमा देसाई), निटॉर इन्फोटेक, सह्याद्री ट्रेकर्स फौंडेशन (श्री. सुरेंद्र दुगड), झेप (श्री. राजाभाऊ पाटणकर), रोटरी इंटरनॅशनल नवक्षितीज प्रकल्प (सुबोध मालपाणी) आणि रोटरी क्लब ऑफ गांधीभवन (गणेश जाधव) इ. संस्थाच्या सामुदायिक सहकार्यातून आजची ही स्पर्धा आयोजित झालेली. "विशेष" मुला-मुलींनी शाळाबाहय जगाला आणि निसर्गातील आव्हानांना  सामोरं जावं, त्यांच्यातील लपलेल्या क्षमता बाहेर याव्यात ह्या उद्देशाने ही स्पर्धा ठेवलेली आणि अशा प्रकारच्या स्पर्धेचं (ट्रेकिंग इ.) हे दहावं वर्ष!

सह्याद्री ट्रेकर्स फौंडेशनने दिलेल्या आर्थिक सहकार्यातून स्वमग्न मुले ह्या वर्षीच्या स्पर्धेत सहभागी झाली, झेप संस्थेचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी ऑन फिल्ड खूप मोलाचं योगदान दिलं, रोटरी क्लब संस्थेचा सहा वर्ष सातत्याने सहभाग........   

नवक्षितिज संस्थेच्या टीमचे मुला-मुलींसाठीच्या ह्या स्पर्धेसाठी अथक परिश्रम.....


पर्वती “उतरत” घराकडे परतत होते ....अंतरंगात ओसंडून वाहणारा “अति” विशेषपणा “खाली येत होता” ......“विशेष” पणा स्वच्छंदपणे आकाशाकडे भरारी घेत होता!

धन्यवाद!

स्वयंसेवक म्हणून भूमिका निभावण्याची संधी मला दिल्याबद्दल "झेप" संस्थेचे खास आभार!

फोटो आभार: गणेश आगाशे सर

No comments: