शिलालेख आणि डोलणाऱ्या दीपमाळांंनी समृध्द देवी यमाई-तुकाईचे श्री. क्षेत्र राशीनराशीन गाव अहमदनगर जिल्यातील कर्जत तालुक्यातील. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमारेषेवर वसलेले. भिगवण पासून साधारण २५-३० किमी. 

कुमारगावच्या पेशवाईतील मुत्सद्दी अंताजी माणकेश्वर यांची कुलदेवता ही राशीन ची यमाई🙏

नवव्या -दहाव्या शतकातील हे मूलस्थान. साधारण सतराव्या शतकाच्या सुमारास  उभारलेल आताच हे यमाई-तुकाईचं देवीचं मंदिर. या देवीचा उल्लेख रेणुका, जगदंबा, भवानी असा केलेला देखील आढळतो. मंदिराचे प्रवेशद्वार अत्यंत आकर्षक आणि गगनला भिडणारे!
आत प्रवेश केल्यावर भला मोठा सभामंडप! सभामंडपात मंडपाकृती चौथऱ्यावर स्थानापन्न सिंहप्रतिमा! समोर अजून एक प्रवेशद्वार!


मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर मध्यभागी खालील शिलालेख आहे.  


सुप्रसिध्द लेखक श्री. महेश तेंडूलकर यांनी मंदिराच्या प्रांगणात असणाऱ्या शिलालेखांचे वाचन केले आहे. त्यानुसार वरील शिलालेख असा आहे, श्री. तेंडूलकर सरांनी त्यांच्या "मराठी-संस्कृत शिलालेखांच्या विश्वात" पुस्तकात पान नं ३४५ वर त्याचा अर्थ सांगितला आहे तो पुढीलप्रमाणे: शालिवाहन शकाच्या १७०४ व्या वर्षी शुभकृतनाम संवत्सरातील श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी कसबे राशीन येथील भुजंगअया यांचा मुलगा महादाप्पा शेटे यांनी मंदिराचे बांधकाम किंवा बांधकामाला सुरुवात केली. 


मंदिरद्वारातून प्रवेश केल्यावर उजवीकडे एक भला मोठा नगाराखाना आहे. 
मंदिराच्या प्रांगणात आहेत ह्या सुरेख, सुबक, भव्यदिव्य, गगनचुंबी, विविध रंगात नक्षीकाम असलेल्या "डोलणाऱ्या दीपमाळा". दक्षिण बाजूच्या दीपमाळेवर जाण्यासाठी बाहेरून पायऱ्या आहेत. उजवीकडील दीपमाळेस आतून जिन्याप्रमाणे पायऱ्या आहेत. बांधकाम खाली दगड आणि वर विटांचे आहे. जिन्याने वर गेले की अगदी वर एक आडवा लाकडी दांडा आहे. तो धरून हलवला की दीपमाळ हलते. ही आश्चर्यजनक रचना इथे बघायला मिळते. एरवी बंद असलेले जिने फक्त दसऱ्याच्या दिवशी खुले होतात. 
दीपमाळे समोरील गाभाऱ्याच्या डाव्या बाजूच्या दुसऱ्या कमानीवर अजून एक शिलालेख दिसला. तो शिलालेख असा, 


सरांच्या वाचनानुसार वरील शिलालेख हे दर्शवतो,शिलालेखाचा सरांनी सांगितलेला अर्थ आहे (पान नं ३४६): शालिवाहन शकाच्या १७०६ व्या वर्षी कोर्धीनाम संवत्सरातील पौष शुद्ध एकादशी या दिवशी (बुधवारी) कसबे राशीन येथील भुजंगअप्पाचा मुलगा महादाप्पा शेटे यांनी दरवाजाचे' बांधकाम केले किंवा बांधायला सुरुवात केली. 

गाभाऱ्याच्या मागील बाजूस ओवऱ्या असून काही मूर्ती चौथऱ्यामधे स्थापित आहेत.इथे ओवरीच्या दर्शनी भागावर खालील शिलालेख आहेसरांच्या वचनानुसार शिलालेख असा आहे,शिलालेखाचा सरांनी सांगितलेला अर्थ आहे (पान नं ३४७): शालिवाहन शकाच्या १७१० व्या वर्षी किलकनाम संवत्सरातील चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) या दिवशी सोमवारी कसबे राशीन येथील महादाप्पाचा मुलगा सदाशिव शेटे यांनी मंदिराचे बांधकाम पूर्ण केले किंवा बांधायला सुरुवात केली. 

मंदिराच्या आवारात गणपतीची शेंदूर अर्चित, दुर्वाफुलांच्या हाराने नटलेली प्रतिमा एकटक पाहत रहावे अशी.मंदिराच्या गाभाऱ्यात उजवीकडील राशीनची यमाई आणि डावीकडील तुळजापूरची 

तुकाई अशा दोन सुरेख-सुबक मूर्ती आहेत. मूर्तींच्या चेहऱ्यावर तेज पाहत पाय तिथून निघत नाही.
मंदिराचा कळस विविध रंगातील आकर्षक देवदेवतांनी फुललेला आहे.मंदिराच्या बाहेरील सभामंडपात वीरगळ, सतीशिळा आहेत. तसेच खरूजाई देवीची प्रतिमा आहे.शिलालेख, यमाई-तुकाई देवी, डोलणाऱ्या दीपमाळा अशी संपन्नता लाभलेले राशीनचे हे वैभवशाली मंदिर. त्याची सुंदरता खालील फोटोतून तर दिसतेच परंतु प्रत्यक्ष पाहून ते सौंदर्य नजरेत साठवणे ही अनुभूती अलौकिकच!संदर्भ: श्री. महेश तेंडुलकर लिखित, "मराठी- संस्कृत शिलालेखांच्या विश्वात". पान नं ३४५ ते ३४७ 

फोटो आभार: टीम-फिरस्ती महाराष्ट्राची आणि Deepinder Kapany sir
खास आभार: अनुराग वैद्य आणि शंतनू परांजपे. ब्लॉग साठी आवश्यक संदर्भ या दोघांनी पुरवले. 

राशीन चे वैभव बघण्यासाठी उत्सुक फिरस्ती-टीम 😇😇😇आपल्या प्रतिक्रिया ब्लॉग खाली नक्की पोस्ट करा. 

धन्यवाद!

पुढील ब्लॉग मधे वाचू एका अनोख्या मंदिराची कहाणी..............

2 comments:

Suprasad Puranik said...

मस्त👌👌

Maharashtrachi Shodhyatra said...

फारच सुरेख माहिती दिली मॅडम तुम्ही असेच संदर्भासहित लेख लिहा खूपच छान...!!! :)