कभी अलविदा ना कहना: SSC Batch 1983, स्नेहभेट सोहळा, २८ नोव्हेंबर २०२१

 

१९८३ ते २०२१! परिवर्तनाची तीन तपे! वयाच्या १५-१६ वर्षापासून ते वयाच्या ५३-५५ पर्यंतचा आमुलाग्र बदलाचा कालखंड! किशोरावस्थेतून प्रौढावस्थेत पदार्पणाचा एक सुंदर प्रवास! ह्या सुंदर प्रवासात परिवारातील सर्वच सदस्य, काही नातेवाईक, जवळचे स्नेही यांची साथ! पण किशोरावस्थेतील त्या सवंगड्यांची साथ? मिळालीच नाही असे नसले तरीही बहुतांश जणांना ह्या साथीची हुरहूर लागुनच राहिली. त्या साथीसाठी ते आसुसलेलेच राहिले.......

साथीच्या भेटीच्या आतुरतेची आणि किशोरावस्थेपासून ते थेट प्रौढावस्थेपर्यंतच्या प्रवासाची ही कहाणी! कहाणीच दुसरंच पान उलटायला लागली तब्बल ३८ वर्ष! 

तो क्षण! साथीचा, भेटीचा! मिसरूड फुटल्यापासून ते आजोबा होण्यापर्यंत आणि परकर-पोलक्यापासून साडीतील आजी होण्यापर्यंतचा प्रवास अनुभवण्याचा तो क्षण! आई-वडिलांच्या संसारातील तेव्हाच आपण एक उमलतं फुलं! आज, आपला संसारवृक्ष फुलांनी सजलेला!  असा हा स्वप्नगत प्रवास! किशोरावस्थेतील सवंगड्याच्या साथीसाठी आसुसलेल्या प्रौढ डोळ्यांमधील तुप्तीचा क्षण!

१९८३ ते २०२१


साल १९८३! आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील श्री. भैरवनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातून इयत्ता दहावीनंतर काळाच्या प्रवाहात विखुरलेल्या सवंगड्यांची ही गाथा! ३८ वर्षांची सुवर्णाक्षरात लिहिलेली संघर्षगाथा! स्फुर्तीगाथा!



२८ नोव्हेंबर २०२१! भेटीसाठी आसुसलेल्या डोळ्यांना सुशांत करणारा हाच तो सुदिन! श्री. काळभैरवनाथ जयंती! 


महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी हा तर दुर्मिळ योग! ह्या योगावर सकाळपासूनच सवंगड्यांची पाऊले गोविंद हॉटेल च्या दिशेने वळली. 


फुलांनी सजलेले सभागृह, नाश्ता-जेवणाचा थाट, शिक्षकवृंद आगमनासाठी विराजमान रेड कार्पेट, श्री. भैरवनाथ विद्यालयाच्या इमारतीने आणि रयत शिक्षण संस्थेच्या लोगोने नटलेले दिमाखदार बॅनर, विद्यालयाची साक्ष देणारा सेल्फी पॉइंट, श्री. गणेश, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजेसाठी सजलेल्या प्रतिमा, माईक आणि साउंड सिस्टमची रेलचेल, हार-तुरे, गुलाबपाकळ्यांचा मंद सुवास, औक्षणाचे तबक, स्वागतासाठी उत्सुक फटाक्यांची लडी, कवी केशवसुतांच्या कवितेतील तुतारी, सुवर्णासारखे चकाकणारे सन्मान चिन्ह, शाल-श्रीफळ, पेढ्यांचा घमघमाट ......बापरे केवढी ती पूर्वतयारी!

ह्या तयारीच्या कित्येक दिवस आधी तयारी झाली ती सवंगड्यांच्या स्नेह्भेटीच्या आयोजनाची! ठिकाण ठरवणे, कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करणे, सूत्र-संचालन आणि निवेदन करणे, सवंगड्यांना आणि शिक्षकांना आमंत्रणात्मक फोन, कामाचे आपापसात वाटप, कॉन्फरन्स कॉल, सामानाची यादी, येणाऱ्या सवंगड्यांची यादी, कार्यक्रम रटाळ होऊ नये याची दक्षता घेत प्रकट मनोगत आणि विविधगुणदर्शन सादरीकरण, वैयक्तिक पातळीवर कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्याचे नियोजन, ह्यात स्मार्ट पोशाख काय असावा हे देखील आलं बरका!  

थोडसं टेन्शन, थोडासा ऑकवर्डनेस, थोडीशी हुरहूर, थोडीशी बेचैनी, थोडासा अनकम्फर्टनेस....हे थोडसंच बरका! जोडीला हे ही होते ना,  प्रचंड उत्साह आणि भेटीची प्रचंड ओढ.......

किशोरावस्था खूपच मागे राहिली. आज थेट प्रौढावस्था! शाळेतील एकाच बाकावर बसलेल्या, एकाच वर्गात, एकाच तुकडीत असलेल्या सवंगड्याला आज संबोधायचे तरी कसे? एकेरी कि आदरार्थी! अरे-तुरे की अहो-जाहो! गळाभेट करायची की दोन हात जोडत नमस्कार करायचा! स्नेहस्पर्श करायचा की दोन हात लांबच बरा बाबा! चेहऱ्यावर ओळखीचे भाव आणायचे की कपाळावर अनोळखीची आठी! मनसोक्त बोलायचे कि हातचे राखत बोलायचे! आपण जे आज आहोत तसेच सामारे जायचे की इम्प्रेशनसाठी थोडा मेकओव्हर चालेल! तेव्हाची झालेली कुरबुर, किशोरावस्थेतील हृदयस्पंदन आठवून मनातल्या मनात ओशाळायचे की "भले-बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर, या वळणावर" हे प्रगल्भ भाव सोबत न्यायचे! पटतय ना? अशाच काहीशा भावना होत्या ना?

सकाळचा प्रहर! ह्या भावनांसहित उत्साहाचा झरा ओथंबून वाहत एक एक जण दाखल होत होता! ३८ वर्षाच्या प्रचंड मोठ्या कालखंडानंतर समोर येत होता मैत्रीचा नवीन रूपातील झरा! एकदम निर्मळ, खळाळता, सरत्या वयाच्या अनुभवाने चकाकणारा,तजेलदार...सुहास्य वदनाने "ओळखलत का?" विचारलेल्या या सहज प्रश्नावर तितकच सहज उत्तर "नाही" किंवा "हो"! सवंगडी समोर आला आणि सर्वच सहज होऊन गेलं! अनोळखीपणातही ओळखीचे हास्य फुटले! नव्यारुपात अनुबंध गुंफत गेले! वीण घट्ट होत गेली! जवळजवळ चाळीस नवफुलांची ही वीण! विविधरंगी, विविधढंगी! एकदम आकर्षक, ताजीतवानी, सुगंधित....

१९८३ दहावी इयत्तेतील माजी विद्यार्थी/विद्यार्थिनी आणि शिक्षकवृंद यांचा एकत्रित सेन्ह्भेट सोहळा, २८ नोव्हेंबर २०२१! आमंत्रित शिक्षकवृंद- एरंडे सर, बेंडे मॅडम, चासकर सर, यादव सर, पठाण सर, देशमुख सर, देसाई सर, पाडळे सर, कदम सर, सुतार सर!

आमच्यातील काही मित्रांनी काही शिक्षकांचा आदल्या दिवशी सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला! खूप खेद वाटला कि त्या शिक्षकांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही! माझ्यासाठी यादव सर आणि पठाण सर यांची भेट खूपच खास झाली असती. असो. पुढच्या वर्षी!

मन १९८३ मध्ये रमलं ना


आदरणीय श्री. एरंडे सर, श्री. चासकर सर आणि मा. बेंडे मॅडमचे आगमन झाले!

मा.श्री. एरंडे  सर

मा. बेंडे बाई

मा. श्री. चासकर सर

फटाक्यांची आतिषबाजी आणि सनई-चौघडयांच्या मंजुळ वाद्यात औक्षण आणि पुष्पवृष्टी ने स्वागत! वातावरण एकदम पुलकित झाले!

गुरुजन स्थानापन्न झाले. 


कार्यक्रमाची निवेदिका सुनीता भागडे-थोरात हिच्या सुमधुर आवाजातून स्वागतपर पंक्ती सभागृहात उमटल्या,

सज्ज सारे लोक आहेत, क्षण आले अमृताचे

उजळलेला गंध आहे तेज चैत्र पौर्णिमेचे

त्या मनालाही कळले, भाव माझ्या या मनाचे

गोड मानुनी घ्या शब्द माझे स्वागताचे!




सरतेशेवटी सुनीताच्या निवेदनाला सुरुवात झाली! तिच्याकडे निवेदन आले कसे? गंमतशीर किस्सा आहे बरं का! रामदास वाळूंजचा मला फोन आला "निवेदन कोणी करेल का? प्रोफेशनल पण चालेल" मी म्हटल, " प्रोफेशनल कोणी कशाला? त्यात आत्मीयता येणार नाही कदाचित. सुनीता भागडे करेल. उत्तमरित्या करेल"! मला जाम कॉन्फिडन्स! खरतरं तिला बोलताना मी कधीही ऐकल नव्हतं. दोन गोष्टींवर मी तुरंत तीच नाव घेतलं, एक ती शिक्षिका आहे, दुसरं फोटोत पाहिलेली तिची देहबोली! सुनीतासोबत चर्चा झाली, रामदास, मी, जितेंद्र, सुनीता यांचा कॉन्फरन्स कॉल झाला. सुनीता तयार झाली. कार्यक्रमाच्या आधी तिने लिहिलेले स्क्रिप्टचे वाचन झाले. भन्नाट स्क्रिप्ट! वरच्या काव्यपंक्तीतून तुमच्या लक्षात आलेच असेल ना!

वाद्यांच्या तालावर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ...या गणेश मंत्राने, श्री. गणेश, छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे एरंडे सर आणि बेंडेबाईंच्या हस्ते पूजन आणि दीपप्रज्वलन!



सुनील शिंदे, रोहिदास तांबडे हे सवंगडी आणि शिंदे सर, लावंड सर, ढगे सर, होनराव सर हा शिक्षकगण! दोन मिनिट स्तब्ध राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

मी सहनिवेदिका! 



डायस जवळ उभं राहून स्नेह्भेट सोहळा पाहताना मन आनंदाने उचंबळत असताना मन एक ग्वाही देत होतं कि इच्छा तिथे मार्ग असतोच! ३८ वर्षानंतर प्रत्यक्ष आणि २ नोव्हेंबर २०१८ मध्ये whatsapp ग्रुप तयार झाल्यावर प्रथमच भेटलोचं ना!



आदरणीय गुरुजन एरंडे सर, चासकर सर आणि बेंडे बाई यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 


तद्नंतर
तिघांनी आपापले मनोगत व्यक्त केले. 



त्यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी हे नाते आजच्यासारखे नव्हते. त्या नात्यात एक अंतर होते, वचक होता, भीती होती, विनम्रता होती! ते नाते तेव्हा जितके आदरयुक्त होते ते आता तेवढेच खेळीमेळीचे आहे. काळानुसार होत गेलेला बदल! शिक्षक बाहेर भेटले तर अनौपचारिकता मी कधी अनुभवली नाही. एक आहे मात्र, माझी आई आणि माझ्या प्राथमिक शाळेतील शिक्षिका गोरे बाई, भूमकर बाई यांचे नाते एकदम सहज, सुंदर, मनमोकळे होते. असो.

आतापर्यंत वाटत होतं मीच खूप कष्ट घेतले, अभंग मळ्यातून शाळेत पायी जा, अकरावीत तर अवसरीतून सकाळी ७ ची एस.टी नाही मिळाली तर साधारण तीन किमी गायमुख पर्यंतचे अंतर पायी जा आणि तिथून मिळेल त्या वाहनाने मंचरच्या महात्मा गांधी महाविद्यालयात वेळेवर पोहोचा. किती ही पायपीट! बेंडे बाई याचं मनोगत ऐकताना जाणवलं एक हाडाचा शिक्षक काय असतो. मंचर वरून अवसरीतील श्री. भैरवनाथ महाविद्यालयात वेळेत पोहोचायला त्यांनीही किती कष्ट घेतलेत. किती पायपीट केलीय. शिक्षक म्हणून तर आहेच पण एक स्त्री म्हणून त्यांच्या संघर्षगाथेला मानाचा मुजरा! श्री. एरंडे सरांची आठवण म्हणजे वर्गात आल्यावर हातातील घड्याळ काढून ते टेबल वर ठेवण्याची स्टाईल! चासकर सर म्हणजे एकदम शांत! जवळजवळ ३५ वर्ष शिक्षकीधुरा समर्थपणे पेलणारे हे सर्व शिक्षक!

रूपरेषेनुसार आमच्या वर्गमित्र-मैत्रिणीचा सन्मान! शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह! सन्मान चिन्हाची निवड, जवळजवळ साठ चिन्ह मिळवण्याची धडपड, आमच्या ज्या मित्रांनी केली त्यांना कोपरापासून दंडवत! कार्यक्रमाची शोभा त्या चिन्हाने द्विगुणीत झालीच पण नंतर हे सन्मान चिन्ह प्रत्येकाच्या घरात- कार्यालयात दिमाखाने पोहोचले!



अरे हो, विसरलेच की!  सहनिवेदिका म्हणून माझे कार्य होते वर्गमित्र-मैत्रिणीची ओळख त्यांनी पाठवलेली माहिती वाचून करून देणे. नाव, नोकरी/व्यवसाय, कुटुंब, छंद इ. ह्यामाहितीचा चार्टपेपरवर छान कोलाज बनवला! माहितीचाही सन्मान असा केला! हो, माहितीचा सन्मान! कारण ती फक्त ओळखपर माहिती नाहीये तर तो किशोरावस्था ते प्रौढावस्था हा प्रवास आहे! आज जिथे आहोत तिथे पोहोचण्याची वैयक्तिक शौर्य-संघर्षगाथा आहे! काळाला अनुसरून पुढची पिढी घडवण्याची स्फुर्तीगाथा आहे!



आमच्या संगीता भूमकर-गोरे हिने स्व-रचित छान कविता ऐकवली! वर्गातील किस्से सांगितले. स्मिता शेवाळे-वाघमारे! पुढे येऊन बोलण्यास कचरत होती! पुढे आली आणि जे बोलली त्याने तिच्याविषयीचा आदर अधिक दृढ झाला. धाडस लागतं ते सांगायला कि "मी गृहिणी आहे आणि ती माझी निवड होती"! आत्मसन्मान तो हाच! एक चांगल हृदय हेच त्याच चिन्ह! 

आमची मैत्रीण शारदा शिंदे-गावडे! प्रथमच समोर येऊन बोलली! लग्नानंतर, मुलांचा जन्म झाल्यावर शिक्षण घ्यायचं हे किती कठीण! पण जिद्दीने शिक्षिका झाली! स्वत:च्या पायावर उभी राहिली, स्वत:ची एक ओळख निर्माण केली! तशाच आमच्या हौसा भोर, मीरा भोर, सुनीता भागडे आणि सविता गुरव-शेंडे! स्त्री म्हणून जो लढा देत त्या यशस्वी झाल्या त्यांना माझ्याकडून स्तुतीवर्षाव आणि स्तुतिसुमने! 



मीरा भोर आणि माझी कहाणी यानिमित्ताने शेअर केली! दर वर्षी असे ४-५ वर्ष मी तिच्या घरी बैलपोळ्याला रात्री जेवायला असायची! तीच खास आग्रहाच आमंत्रण असायचं! तिची आई पुरणाची पोळी, गुळवणी करायची. चिमणीच्या प्रकाशात त्या भोजनाचा घेतलेला आस्वाद आजही आठवतो. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिच्या आईची भेट झाली. मी कृतज्ञ झाले!



महेंद्र अभंग! त्याच्याआधी त्याच्या मुलीशी माझं बोलणं झालं! एकदा तर मस्त गप्पा झाल्या! महेंद्रची एक खासियत आहे. आमच्या शाळेच्या whatsapp ग्रुप वर अगदी अगदी आवश्यक आहे तिथेच हा व्यक्त होतो. मला नेहमी कौतुक वाटतं हे कसं जमतं? मी तर लगेच प्रतिक्रिया देते. किंचितही संयम नाही. शिकायला हवं! असो. त्याच्या कडून अजून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, ती आहे कॅलीग्राफी! २८ तारीख ठरली तेव्हा मी मेसेज केला "कॅमेरा आणणार का?" विचारणा आली, "हस्तलिखित आणू का?"! बाप्पा! सुखद पण जोराचा धक्काच की! २८ ला भेटलो आणि त्याची कॅलीग्राफी हस्तलिखित बघितलं! अचंबित, थक्क करणारी कला! लिखाणासाठी जे लिहील ते ही तितकचं निवडक! कॅलीग्राफीच प्रात्यक्षिक पाहताना तर मज्जा आली! "कला जोपासण" हे त्याच्यासाठी जणू श्वासघेण्याइतकी सहज गोष्ट! 




जितेंद्र अभंग! सर्वांच लाडकं नाव "जितु"! त्याला पाहून सर्वांची एकच प्रतिक्रिया होती," वर्गात असताना केवढा बुटका होता, इतका उंच कसा झाला?" ३८ वर्षानंतर भेटल्यावर काय काय टिपलं जात ते लक्षात येतयं ना मित्रांनो! whatsapp ग्रुप वर आमचा "जितू" एकदम फेमस! तो सुप्रसिद्ध गायक किशोरकुमार यांचा फॅन आणि आम्ही सर्व त्याचे/त्याच्या गाण्याचे फॅन! गेट-टुगेदर ठरवलं कि जितूच गाणं पाहिजेच! हे ठरलेलंच होतं! आत्तापर्यंत त्याच्या गाण्याची रेकार्डिंग ऐकत होतो, आज प्रत्यक्ष गाणं सादर करताना बघणार! म्युझिक सिस्टीमच्या साथीने प्रक्टिस करून स्टेजवर गाण्यासाठी समोर आला. पहिलंच गाणं "पल पल दिल के पास". एकच प्रतिक्रिया, "तो आला.. त्याने गायलं.. त्याने जिंकल"! लाजवाब! आमचे शिक्षकसुद्धा संमोहित झाले! एक सल राहिली जी पुढच्या स्नेहभेट सोहळ्यात भरून निघेल. ती आहे जितेंद्र च्या तोंडून गाण्याचा हा प्रवास ऐकण्याचा! गाण्याची आवड आहे हे उमगण्यापासून ते प्रती किशोरकुमार होण्यापर्यतचा प्रवास! तुम्हालाही ऐकायला आवडेल ना? 



विजय शिंदे! जेवढ कानावर आलं त्यानुसार कार्यक्रमाची आर्थिक बाजू हाताळणार आमचा हा मित्र! आर्थिक बाजू हा अत्यंत नाजूक, संवेदनशील घटक! किती समर्थपणे पेलला ह्याच फलित म्हणजे कार्यक्रमाच यश! 



आनंदराव शिंदे! थोर व्यक्तिमत्व. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्लामसलतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


३८ वर्षापूर्वी सतत पुस्तकात डोकं, अभ्यास, मार्कांशी स्पर्धा, दहावीच्या वर्गात कोण पहिलं येणार, किती मार्क पडणार?..कदाचित हीच मैत्रीची आणि भविष्याची परिभाषा होती! ३८ वर्षानंतर, वर्गातून बाहेर पडलो आणि मैत्रीची -भविष्याची परिभाषादेखील बदलली! मार्क, स्पर्धा, अभ्यास यापलीकडे मैत्रीचं-भविष्याच सीमोल्लंघन झालं!

सुनीताच्या निवेदनाने सर्वांची मने जिंकली! गोड आवाज, स्पष्ट उच्चार, सहज देहबोली, सुहास्यवदन आणि बहारदार स्क्रिप्ट! दोघींनी आधी ठरवल्याप्रमाणे मी "मम" म्हणणारी सहनिवेदिका! सुनीताला निवेदनाची कौतुकाची थाप एरंडे सरांकडून मिळाली.



अंतिम रूपरेषा ज्या वर्गमित्रांच्या चर्चेतून तयारी झाली त्यांना शतशः नमन! कार्यक्रम कुठेही रटाळ, कंटाळवाणा होणार नाही, प्रत्येकाला न्याय मिळेल असा त्याचा आराखडा! जबरद्स्तच!



दहा-दहाच्या गटाने वर्गमित्र-मैत्रिणीचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार, त्यांचे मनोगत आणि जितेंद्रचे गाणे! 








आमचा मित्र सुनील भोर! त्याचा मुलगा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "झिम्मा" चित्रपटाचा भारतातील Executive Producer! काहीवेळा वडिलांच्या जीवनपट मुलाच्या रुपात समोर येतो हेच खरं! Salute to Sunil Bhor! दत्तात्रय रामभाऊ शिंदे! एस.टी. महामंडळ, ठाणे येथे कामाला!. फोनवर आमचं बोलणं झालं. काही आठवणी निघाल्या! एस.टी च्या संपामुळे त्याला येता आलं नाही परंतु फोनवरच्या आमच्या गप्पा स्मरणात राहिल्या! रामदास वाळूंज! एकदम उत्साही व्यक्तिमत्व! ठरल्याप्रमाणे कार्यक्रम व्हावा यासाठी जीवतोड मेहनत केली ह्या मित्राने! 




नंदू टेमकर, पशुवैद्यकीय डॉक्टर द्त्तात्रय शिंदे, आनंदराव शिंदे, जयसिंग शिंदे यांचे अनुभवाचे बोल आणि आयुष्यात संघर्ष करताना गिरवलेला धडा ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले! खरोखरच वंदन त्या जिद्दीला!





सुनीता, तिच्या निवेदनात मैत्री, दोस्ती, यारी मधील बालपण, तारुण्य आणि प्रौढत्व याब्ब्द्ल सुंदर शब्दात सांगते,

बालपणीचे निरागस बंध, तारुण्यातील उनम्मत गंध

प्रौढपणीचा समदार संग, अवघे आयुष्य रंगारंग

मौज लुटुया दोस्तीसंग!

आहे ना यथार्थ! दोस्तांच्या संगतीतील मौज जितेंद्रच्या "दिवाना लेके आया ही दिलका तराना" अधिकच खुलली! मजरूह सुलतानपुरी गाण्यात म्हणतात," आज का दिन है कितना सुहाना, झूम रहा प्यार मेरा, पूरी हो दिलकी सारी मुरादे खुश रहे यार मेरा"!




सोमनाथ खोल्लम! माझं बालपण ज्या घरात गेलं त्या घरात सध्या हा राहतो. जायचं राहून गेलं. पण बालपणीच्या त्या वास्तूची कृतज्ञता म्हणून त्याच्यासोबत जितेंद्र च्या गाण्यावर ताल धरला! संजय शिंदे! कोरोनाच्या काळात फोन यायचा तेव्हा म्हणायचा "कोरोना वैगैरे काही नसतं, अजिबात घाबरायचं नाही. बिनधास्त राह्यचं काही होत नाही". किती आधार वाटायचा त्या शब्दांचा! आग्रह करूनही तो समोर मनोगत व्यक्त करायला आला नाही. विजय म्हणतो "पडद्यामागचा कलाकार" असा हा आमचा मित्र! त्याच्या मैत्रीची थोरवी मीच माझ्या शब्दात व्यक्त केली! मातीतून वर आला तरी मातीशी जवळीक साधणारा असा संजय! Down to Earth! या मित्राबद्दल मला जरा Soft Corner आहे. आदरयुक्त प्रेम आहे. म्हणूनच तर जितेंद्रच्या गाण्यावर त्याच्यासोबत दोन पावल थिरकली! 



अविनाश शिंदे! असा एक मित्र ज्याच्या उंचीमुळे त्याला सर्वांनीच ओळखलं! वर्गात सर्वात जात उंची असलेला आमचा मित्र! शरीराची उंची आहेच हो पण कामदेखील उंचीच करतो. एका इंजिनियर कंपनीत "फायनान्स" मॅनेजर आहे!  



सुग्रास भोजन, बासुंदीचा घमघमाट, सोबत मनसोक्त गप्पा! घड्याळाचा काटा सरसर धावत होता. सुनीताने निवेदनात जिवलग मित्र कोणाला म्हणावे याबद्दलचे थोर लेखक पु.ल. देशपांडे यांचे विचार ऐकवले, "ज्याच्याजवळ मनातील भाव व्यक्त करताना लज्जा, संकोच वाटत नाही, फसवावेसे वाटत नाही, पापपुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही, ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो, ज्याच्याजवळ पराभवाचे शल्य उघड करायला कमीपणा वाटत नाही, ज्याच्या दुखा:शी आपण एकरूप होऊ शकतो, तो खरा मित्र. मित्र हि जीवनातील अत्यावश्यक गरज आहे, निकोप राहण्यासाठी, कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळण्यासाठी मित्र हवाच"!

आज ह्या कार्यक्रमात सर्वांना भेटल्यावर तुम्हाला मैत्रीबद्दल काय भाव निर्माण झाले, पुढच्या स्नेहभेट सोहळ्यात नक्की व्यक्त करूयात. काहीजण समोर येऊन व्यक्त झाले नाहीत. पुढच्या स्नेहभेटीत नक्की व्यक्त होऊयात! 

खूप सारे आमचे मित्र ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. खूप हळहळ वाटली असेल ना! आम्हाला तर तुमची खूप उणीव भासली. मित्रांनो, खास तुमच्यासाठी हा वृतांत!

दहावीच्या निरोप समारंभात जवळजवळ प्रत्येकाच्या ओठी एकच काव्यपंक्ती ऐकायला मिळत होती,

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट

एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ

दहावीनंतर खरोखरच सर्वजण विखुरले! संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेले! आयुष्यात आपल्या सवंगड्याला पुन्हा भेटू हि आशा बहुधा सर्वांनी सोडलीच असावी. पण "इच्छा तेथे मार्ग" ह्याचा प्रत्यय ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला. ३८ वर्षांनी सर्वजण भेटले. काहीजणांनी आपल्या भावना ह्या लिहून व्यक्त केल्या.

भेटीचा आजचा क्षण संपूच नये असं वाटतं असताना जितेंद्र चं "चलते चलते मेरे ये गीत याद रखना" या गाण्याने काय धमाल आणली! वन्स मोअर मध्ये तर सर्वांनी गाण्यावर ठेका धरला! सभागृह दणाणून गेल. संगीताचे सप्त सूर एकमेकात मिसळले. सवंगडी धुंद होत थिरकले. मैत्रीची हीच तर ताकद आहे! त्याक्षणी सर्वजण १५-१६ वर्षांचे सवंगडी झाले! मनसोक्त झुमले!


अहो, हि तर छायाचित्रे आहेत, नृत्याचा प्रत्यक्ष आनंद घ्या खालील व्हिडीओ क्लिपद्वारे...  "कभी अलविदा ना कहना" या खालील ओळीवर क्लिक करा आणि जितेंद्र च्या आवाजाची जादू  अनुभवा!

कभी अलविदा ना कहना.....

कार्यक्रमाची सांगता शाळेतील प्रथेप्रमाणे "वंदे मातरम" गीताने करण्यात आली.



स्नेहभेटीच्या आजच्या दिवसाचे शेवटचे काही क्षण! किती ती गडबड, लगबग! जायची घाई तर होतीच पण पाय निघत नव्हता. Selfie Point मध्ये फोटो घेण्यासाठी लगबग, ग्रुप फोटो साठी रेलचेल..बाप्पा! गप्पागोष्टी संपतच नव्हत्या! हे राहिल..ते करायचय...बापरे! सर्वात सुंदर भावना काय होती माहित आहे...तो क्षण निरोपाचा नव्हता!   




मित्रांनो ह्या नोटवर "चलते चलते" ह्या गाण्यातील एका ओळीने हा वृतांत इथेच थांबवते,

"हम लौट आएँगे, तुम यूहीं बुलाते रहना..कभी अलविदा ना कहना"

मित्रांनो,

कभी अलविदा ना कहना!





पुन्हा भेटूच! परत परत भेटूच! 


(फोटो आभार: सवंगडी आणि फोटोग्राफर)

 


 

 


No comments: