किल्ले साल्हेर ट्रेक समीट , १ जानेवारी २०२३

साल्हेर किल्ला, सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला, नाशिक जिल्ह्यातील सेलबारी-डोलबरी रांगेतील किल्ला, गुजरात मधील डांग आणि महाराष्ट्रातील बागलाण प्रांत यांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावरील किल्ला, सहा घाटवाटे वर लक्ष ठेवणारा हेर तो साल्हेर, भगवान परशुरामांची तपोभूमी, सह्याद्रीचे मस्तक, मराठा-मुघल रणसंग्राम, धोडप, चौल्हेर, इखारीया, मांगी-तुंगी, तांबोळ्या, न्हावीगड, हनुमान टेकडी, मुल्हेरगड, हरगड, मोरागड, सालोटा, भिलाई, पिंपळा, टकारा, गवळण सुळका इ. इथून दिसणारे किल्ले, साल्हेर विजय दिवस...

साल्हेर किल्ल्याविषयी हे सर्व गुगुल वर वाचून आणि आमचा मित्र स्वप्नील खोत ह्याला साल्हेर किल्ल्याबद्दल मनभरून बोलताना ऐकून ह्या किल्ला पाहण्याची उत्सुकता होती. पुण्यातून सहसा कोणता ट्रेक ग्रुप इथे ट्रेक आयोजित करत नाही. म्हणूनच Woods to Coast ह्या ग्रुप ने २०२३ नवीन वर्षाचा सूर्योदय साल्हेर किल्ल्यावरून अनुभवायचे ठरवले तेव्हा मी लगेच बुकिंग करून टाकले. ह्यावेळी मी प्रथमच पोर्टर कम ट्रेक सहायक हा पर्याय निवडण्याचे ठरवले. मनीषाने ने तसा तो उपलब्ध करून दिला. ह्या निवडीमागे दोन कारण होते, एकतर पुण्याहून साधारण नऊ तासांचा प्रवास करून गेल्यावर ट्रेक सहायकामुळे ट्रेक समीट होण्याची शक्यता वाढणार होती. दुसरे पहाटे चार-साडे-चारच्या अंधारात ट्रेक होणार होता. मला मदतीची गरज पडणारच होती. ती मदत हाताशीच असावी हा उद्देश होता!

शनिवार, ३१ डिंसेबर ला दुपारी २.३० च्या दरम्यान आमचा १० जणींचा ग्रुप पुण्यातून निघाला. साल्हेरवाडी या साल्हेरच्या पायथ्याच्या साल्हेर फोर्ट कॅम्प कृषी पर्यटन ला रात्री दहा वाजता पोहोचलो. रात्रीच्या कडाक्याच्या थंडीने आमचे स्वागत केले. सर्वांग थरथरंत होत इतकी प्रचंड थंडी! कुडकुडणाऱ्या कापणाऱ्या हातांनीच जेवण केलं. रात्री ११.३० वाजता झोपून पहाटे ३.३० वाजता उठून चहा घेऊन पहाटे ४.३० वाजता ट्रेक सुरु केला. नितीन माझा ट्रेक सहायक होता. एका हातात ट्रेकिंग स्टिक आणि दुसऱ्या हातात टॉर्च घेऊन ट्रेक सुरु केला. कित्येक वर्षांनी रात्रीचा ट्रेक करत होते. एक समाधान होत कि मला मदत लागेल तेव्हा नितीन बाजूलाच होता. 

गाईड आणि नितीन सोबत साल्हेर किल्ला समीटवर

काही अंतर पार केल्यानंतर मला कुठे हाताच्या आधाराची गरज पडेल हे नितीन च्याच लक्षात यायला लागलं. शक्यतो लागेल त्याच ठिकाणी त्याची मदत घेऊन मी ट्रेक करत होते. सुरुवातील कच्ची पायवाट होती. नंतर छोट्या मोठ्या दगडांचा रस्ता सुरु झाला. बांधकामाला जसे दगड लागतात तसे दगड ट्रेक वाटेवर विखुरलेले. दगडांचीच ट्रेकवाट म्हणूयात. हे दगड सुटे होते त्यांमुळे अंधारात खूप काळजीपूर्वक. घाई न करता पाउल टाकावे लागत होते. काही ठिकाणी तर चक्क निसरडे -निमुळते रॉक पॅॅचेस होते. कातळात खोदलेल्या पायऱ्या - काही पायऱ्या सहज पाय ठेवता येईल अशा तर काही थोड्या उंच. कसरत होती. कंबरेला जर्क बसला तर काय? नितीन होता त्यामुळे ती सुरक्षा मिळाली. हा किल्ला नक्की प्रकार काय आहे हा विचार करत रात्रीचा ट्रेक सुरु होता. किल्ल्याबद्दलच गूढ दिवसाच्या प्रकाशातच उलगडणार होतं!

काही दरवाज्यांचे फोटो माझ्यासाठी नितीन ने काढले. 

 

एका विसाव्याच्या क्षणी नितीन कडून माझा फोटो काढून घेतला. 

साधारण सकाळी सातच्या दरम्यान आम्ही दोघांनी चौथा दरवाजा पार केला होता. पूर्व क्षितिजावर उगवतीचे रंग /किरण पसरू लागले होते. किल्ल्याच्या माथ्यावरून नवीन वर्षाचा रविउदय  थोड्या उशिराने माझ्या नशिबात होता. म्हणून हे उगवतीचे रंग मनात आणि नवीन वर्षाच्या माझ्या आयुष्यात सामावून घेतले. 


पहाटेच्या उगवतीच्या रंगात आणि प्रकाशात साल्हेर किल्ल्याचा परिसर पाहून त्याच्या गडसमृद्धतेची कल्पना आली. किती सुळके, किल्ले ढगांच्या आणि उगवतीच्या रंगात उजळू पाहत होते. 


किल्ल्याच्या माथ्यावरून नजारा काय असेल ह्याची उत्सुकता शिगेला पोहोचली. समुद्रसपाटीपासून १५६७ मी म्हणजे ५१४१ फुट उंचीवर स्थिरावलेला हा किल्ला, त्यात रात्रीचा जवळजवळ ९ तासांचा प्रवास, फक्त सादर चार तासांची अशांत झोप. मी थकले होते. किल्ल्याच्या पठारावर आल्यावर पुन्हा भगवान परशुराम मंदिरासाठी अर्थात किल्ल्याच्या माथ्यावर चढाई! उशिराने का होईना नवीन वर्षाची सुरुवात रविकिरणांच्या आणि सूर्यदेवाच्या दर्शनाने झाली. 

ग्रुप मधील एका सखीने माथ्यावर टिपलेला हा सुंदर रवीकिरण

किल्ल्याच्या माथ्यावरील भगवान परशुरामाचे मंदिर आणि पादुकांचे दर्शन घेत नवीन वर्षाची सुरुवात!



किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारे दृश्य रादर सुंदर बागलाण प्रांत नजर स्थिरावून घेत होता. 



आमचा स्वनिल म्हणतो तसं " हे साल्हेर प्रकरण नक्की काय आहे?" हा प्रश्नच! साल्हेर किल्ला, साल्हेर किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारा गडसमृद्ध बागलाण प्रांत समजून घ्यायला किमान दोन दिवस तरी हवेत आणि हवा सोबत त्याच उंचीचा स्वप्निल सारखा एक दमदार गडअभ्यासक!

साल्हेर किल्ला समीट! मोहरले होते. समाधानाने मन फुलले होते.


Woods to Coast च्या ट्रेक आयोजक मनीषा आणि मंदिरा सोबत फोटो हा तर सार्थकतेचा क्षण!


चंदेरी ढगाच्या/धुक्याच्या  आणि सोनेरी सूर्याच्या प्रकाशात दिमाखात झळकणारा बागलाण प्रांत शांत चित्ताने नजरेत आणि मनात साठवून घेत राहिले.

ग्रुप फोटो नंतर गड उतराई चालू केली. 


गड उतराई दरम्यान तलाव, पाण्याची टाके, गुहा इ. पाहता आले. 


रेणुकामातेचे मंदिर आणि मंदिरावरील कोरीव नक्षीकाम अगदीच सुंदर!


गड उतराई वरून दिसणारा साल्हेरचा अजत्र, अवाढव्य, विस्तीर्ण गडपरीघ बघतच रहावा असा.


गड उतराईला मी आणि नितीन पुढे आलो. गड उतरताना साल्हेर किल्ल्याची, रात्रीच्या अंधारात न दिसलेली नयनमनोहरता डोळे दिपवणारी!

कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि दरवाजा विलक्षणीय!


साधारण अडीच तासात गड उतराई करून खाली आलो. येताना नितीन शी छान गप्पा झाल्या. 

ट्रेक च्या आधी, ट्रेक समीट आणि ट्रेक नंतर च्या आमच्या छबी तुमच्याही मनात भरतील.


साल्हेर ट्रेक समीट माझ्यासाठी खास म्हणावा लागेल. या ट्रेक मध्ये कित्येक वर्षांनी मी रात्रीचा ट्रेक केला, सलग नऊ तास प्रवास, चार तासांची झोप असं थकवणार शेड्युल असताना चार तासांचा ट्रेक करणं हे माझ्यासाठी एक आव्हान होतं. मी समाधानी कि हे आव्हान मी लीलया पार करू शकले. अर्थात त्यात ट्रेक सहायक ही निवडलेली कार्यपद्धती खूपच कामास आली. मला हवे असेल तिथे नितीन माझ्या मदतीला शेजारीच होता. "इतका लांबचा प्रवास करून गेल्यावर ट्रेक समीट झाला नाही" हि खंत त्यामुळे वजा झाली! नितीन ने अतिशय प्रामाणिकपणे, संयमाने त्याची भूमिका पार पाडली. 

खरंतर मनात होतं कि सालोटा ट्रेक पण करता यावा. इतकं लांब जात होतो पण Woods to Coast ची ट्रेक Itinerary फक्त साल्हेर होती. मला एकदा विचार आला हि एक दिवस थांबून निदान सालोटा तरी करून याव. साल्हेर-मुल्हेर- सालोटा- हरगड-मोरगड हे सर्व करायला कदाचित मला काही दिवस थांबव लागलं असतं. शिवाय हे सर्व सलग कदाचित मी करूही शकले नसते.  एक  विचार  हा ही होता की  एका वेळी एकच किल्ला. छान वेळ देऊन बघायचा.  ही कल्पनाही  भारीच. नाही का? 

२०२३ नवीन वर्षात बागलाण प्रांतात प्रवेश आणि साल्हेर किल्ला समीट केल्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात समाधानकारक झाली. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला समीट केल्याचे समाधान मनाशी बाळगत पुणे गाठले. 

आमचा मित्र स्वप्नील त्याच्या एका पोस्ट मध्ये म्हणतो,


ह्याच बागलाण प्रांतात माझा प्रवेश झाला हा क्षण माझ्यासाठी लाख मोलाचा! 

साल्हेर ट्रेक समीट चा माझा अनुभव वाचल्याबद्दल धन्यवाद!

फोटो आभार: ट्रेक टीम आणि नितीन शिंदे

तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!


No comments: