जिंदादिली @ मोरगिरी ट्रेक १४ जानेवारी २०२३

"मोरगिरी"  या ट्रेकबद्दल Instagram वर वाचलं . Off Beat ट्रेक आहे लक्षात आलं. मोरगिरी किल्ला पाहण्याचं कुतूहल मनात दाटून आल. काही दिवसांपूर्वीच Trinity Adventures ह्या ग्रुप बद्दल ऐकललं. Social Media वर ग्रुप बद्दल शोधताना  Instagram  वर ग्रुप ची माहिती मिळाली . तिथेच  "मोरगिरी " ट्रेक ची पोस्ट पहिली !

तुंग , तिकोना , कोराईगड यांच्याच चौकटीतील हा किल्ला . कधी ऐकल्याच आणि वाचल्याचं आठवेना . कुतुहलापोटी  आधी गुगल वर माहिती आणि अलीकडेच  पोस्ट केलेले व्हिडिओ पहिले. पोस्ट मध्ये दिलेल्या फोन नंबर वर संपर्क करून माहिती घेतली. फोनवर सुरेन्द्र शी बोलताना माझ्या मर्यादा त्यांना स्पष्ट केल्या. त्यांचा होकार मिळाल्यावर लगेच ट्रेकच बुकिंग केलं 

ट्रेकच्या आदल्या दिवशी मोरगिरी चा ग्रुप फॉर्म झाला तेव्हा समजलं  की सुरेन्द्र जालिहाल आणि चेतन केतकर या २०१२ मधील एव्हरेस्ट एक्सपीडिशन नागरी मोहिमेतील हे दोघे एव्हरेस्टर आहेत ! त्यांच्या भेटीचे आणि सोबत ट्रेक करण्याचे कुतूहल १४ जानेवारी उजाडण्याची वाट पाहू लागले . 

आम्ही १५ जण! चेतन आणि संदेश मेहता हे On Field Leaders होते ! गाडीत सँडविच आणि फ्रूट प्लेट नाश्ता आणि लोणावळा मार्गे लायन्स पॉइंट ला चहा घेऊन साधारण सकाळी ८.३० वाजता बेस व्हिलेज ला पोहोचलो . "किल्ले मोरगिरी कडे " नावाचा आणि मोरगिरी किल्ल्याची माहिती देणारा फलका ने  लक्ष वेधले . 


इथे पोहोचण्यासाठी आम्ही लोणावळा मार्गे, भुशी धरण, आय.एन.एस. शिवाजी वरून Aamby Valley Junction ला जाणे. तिथून एक रस्ता Aamby Valley ला जातो आणि दुसरा तुंग किल्ल्याकडे. तुंग किल्ल्याच्या रस्त्याने साधारण दीड किमी अंतरावर  जांभूळणे गाव आहे. जांभूळणे हे बेस व्हिलेज आहे. 

फलकाच्या पार्श्वभूमीवर माझा फोटो लगोलग काढून घेतला . 


वेळ  न वाया घालवता ट्रेक सुरू केला . गावातून किल्ल्याकडे जाताना गावाची झलक मोबाईल मध्ये टिपली . 


ट्रेकमार्ग सुरू झाला तोच छानशा घनदाट झाडीमधून ! बोचरी थंडी , झाडीत हलकेसे डोकावणारे सूर्य किरण आणि  वाटेवर दिसलेली विविध रंगी रानफुले असा ट्रेकचा सुरुवातीचा नजारा !

 
ह्या घनदाट झाडीतून ट्रेक करताना भारीच वाटलं 


कितीतरी ट्रेक मध्ये अशा प्रकारची झाडी अनुभवली . एकापेक्षा एक सुंदर ! मन लुभावणारी! अशा गर्द झाडीतली शांतता  म्हणजे अगदीच स्वत:ला स्वत:च्या जवळ आणण्याचा अनुभव !

साधारण अर्धा तास ह्या झाडीतून चढाई केल्यानंतर एक भलं  मोठ्ठ पठार आलं. इतकं विस्तीर्ण  पठार मी प्रथमचं पहिलं. साधारण एक किलोमीटर लांब नक्कीच असावं . हे पठार अतिशय मोहक ! पावसाळ्यात ह्या पठारापर्यंत येऊन सभोवतालचा नजारा नजरेत साठून घ्यावा. 


डोंगररांगा धुक्यात लपेटलेल्या !  कोराईगड, भातराशी चा डोंगर , विसापूर, लोहगड, कोराईगड डयूक्स नोज इ. किल्ल्याच्या रांगा चेतन ने लोकेट करून दाखवल्या . धुक्यामुळे visibility तितकीशी नसली तरी त्यामुळे "मोरगिरी" किल्लाचं  लोकेशन चांगलचं ठळक जाणवलं ! भर उन्हाळ्यात जेव्हा visibility अत्यंत स्पष्ट असते तेव्हा ह्या डोंगररांगा समजून घ्याव्यात. इतका विलोभनीय हा परिसर !  




पठारा वरून दिसणारा मोरगिरी किल्ला अगदीच दिलखेचक !


पठारावर आम्हा ट्रेक सहभागींची ओळख झाली. तीन छोटे (अर्जुन , वरद आणि साची ) 



आणि आम्ही नऊजण ! नऊ मधील सात जण साठ ते पंचाहत्तर वयोगटातील ! हा ट्रेक म्हणजे ह्या " न अवघे पाऊणशे वयमान " या पंक्तीला सार्थ करणाऱ्या "जिंदादिल " ट्रेक सहभागींची ट्रेकगाथाचं !


पठारावरून मोरगिरी किल्ल्याकडे ट्रेक चा श्री. गणेशा केला तो छोट्या अर्जुनने !


सभोवतालचा परिसर नजरेत साठवून घेत किल्ल्याची चढण जिथे सुरू होते तिथे पोहोचलो !


इथली चढण ही एकदम खड्या उंचीची ! सुरुवातीला त्याच सूंदरशा गर्द झाडीतून ! खूप सारी वाहती माती अर्थात घसारा अर्थात स्क्री! काही ठिकाणी किंचित अवघड चढण !

इथून खरी कसरत सुरू होते! किल्ल्याचा माथा गाठेपर्यंत ट्रेकर चा शारीरिक आणि मानसिक कसं लागतो ! 

सुरुवातीला एक निमुळता किंचित अवघड रॉक पॅच होता . अवघड अशा दृष्टीने की एका बाजूला खोल दरी आणि दगडाच्या हलक्याश्या खाचेत  पाय ठेवत शरीराचा तोल सांभाळायला किंचित कसं लागणारा ! आधारासाठी दोरखंड बांधलेला होता. चेतन आणि संदेश यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने आम्ही ऐकऐकाने, दोघात पुरेसे अंतर ठेवतं, संयमाने तो पॅच पार केला . इथे सावधगिरी लक्षात घेता फोटो काढले नाहीत .

आतापर्यंत उन्हाचा तडाखा वाढला होता. हा रॉक पॅच  पार केल्यानंतर एका विसाव्याच्या क्षणी !


इथे काही पाण्याची टाकी बघायला मिळाली. 


इथेच आहे जाख मातेचे गुफा मंदिर ! गडमाता !


इथे अजून एक निमुळता रॉक पॅच, त्यानंतर शिडी आणि त्यानंतर गड माथ्याकडील चढाई !

हा रॉक पॅच पार करण्याचा अनुभव माझ्यासाठी एका थरारा पेक्षा कमी नव्हता ! दरीकडे निमुळता होतं जाणारा , गड कपारी आणि बांधलेल्या दोरखंडाचा आधार ! चेतनच्या  मार्गदर्शनाखाली सर्वांनी हा पॅच  लीलया पार केला. 

आता शिडी चढाई ! आमचे सात  जिंदादिल शूरवीर!


  
आणि ही मी ! फोटोसाठी सुहास्य !


शिडी  पार केल्यानंतर सात ते आठ कातळातील दगडी पायऱ्या पार केल्यावर गड माथा ! बोचरी हवा असली तरी सूर्याचे प्रखर किरण मनोदिलासा !

गड माथ्यावरून चौफेरचे दृश्य  पाहून ह्या किल्ल्याची महती लक्षात येते . माथ्यावरून दिसणार तुंग किल्ला हा लाजवाब ! टेहळणी साठी ह्या किल्ल्याचा चौफेर उपयोग होत असावा.


इथे काही दृश्य चेतनने द्रोण च्या सहाय्याने टिपली ! . 


द्रोण मार्फत घेतलेली गडाची ही काही छायाचित्रे :




द्रोण चे शूटिंग आणि त्याचा भाग होण्याचा आनंद ह्या ट्रेकच्या निमित्ताने मिळाला. 





गडअभ्यासक श्री. प्रमोद मांडे यांच्या पुस्तकात मोरगिरी किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती आहे ती अशी,



गड उतराईच्या अशाच एका मनमोहक पॅच वर अनुभवलेला सुंदर क्षण !


गड उतराईची सावधगिरी सर्वांच्याच लक्षात आलेली . कातळतील पायऱ्या, शिडीउतार  , दोन रॉक पॅचेस, उतराईच्या वाटेवर असणारा घसारा, काही ठिकाणच्या अरुंद पायवाटेवर एक बाजूला दरी तर दुसऱ्या बाजूला कातळ कपारीचा आधार ! 

शिडीउतार साठी चेतनने मला दोरखंडचे सुरक्षा कवच दिले! 

हे सर्व किल्ल्याचे कठीण मार्ग असले तरी ते सुलभ आणि सुरक्षित झाले चेतन आणि संदेश मुळे ! चेतन सारख्या एक एव्हरेस्टर ह्या कठीण गोष्टी त्याच्या तांत्रिक कौशल्याने, संयमाने, अनुभवाने  आणि मार्गदर्शने अत्यंत सुलभ केल्या ! ह्या सर्व ठिकाणी चेतन ची देहबोली, लीडरशिप अनुभवायला मिळाली हे ह्या ट्रेकला गेल्याचे वैशिष्ट्य !

सात शूरवीरांची ट्रेक दरम्यानची "जिंदादिली " अचंबित करणारी ! त्यांचा उत्साह , उमंग, प्रसन्नता, धैर्य , सकारात्मकता, समतोलपणा, एकमेकांना प्रोत्साहित करण्याची त्यावेळेची गरज, आधार देत एकमेकांना सामावून घेण्याची वृत्ती  आणि त्यातही जपलेल्या Sense of Humor ! Hats Off!!!!!

मोरगिरी ट्रेक माझ्यासाठी नेहमीच आठवणीत राहील  . ही "जिंदादिल " व्यक्तिमत्व, चेतन आणि संदेश च्या  लीडरशीप   निरीक्षणातून शिक्षण आणि बच्चे कंपनी मधील झळकलेली  " प्रगल्भता " !

अजून दोन गोष्टीमुळे हा ट्रेक विस्मरणातून जाणार नाही. प्रथमच मला झालेला उन्हाचा त्रास आणि कित्येक दिवस मनात ट्रेक करणे बंद करण्याचा विचार जो ओळख परेडच्या वेळी मी व्यक्त केला.असो. 

गड उतार झाल्यानंतर सुग्रास भोजनाचा आनंद!



भोजनानंतर चेतनने  सांगितला  त्याचा एव्हरेस्ट शिखर समिट चा अनुभव !निश्चितच सर्वांसाठीच प्रेरणादायी! 

तैलबैला च्या पार्श्वभूमीवर आम्ही सारेजण !


परतीच्या प्रवासात  सोबत आणलेला माईक हातात धरून उदय सर, औदुंबर सर आणि आशीष सर यांनी गायलेली काही सुरेख गीते,

ये राते ये  मौसम नदिका किनारा .. 
होंठोसे छुलो तून मेरा गीत अमर करदो .. 
मेरे मेहबूब कयामत होगी .. 
आने  से उसके आये  बहार .. 
मेरे नैना सावन भादो .. 
तुम भी चलो, हम भी चले......
 
म्हणजे " Cherry on the Top"!
 
मित्रहो , हा  ट्रेक चा अनुभव माझ्यासाठी अत्यंत जीवनसमृद्ध करणारा! तुम्हाला माझा  हा अनुभव नक्कीच माझ्या जीवनसमृद्धतेची कल्पना देईल अशी आशा करते !

उद्याच्या मकरसंक्रात सणाच्या तुम्हाला सर्वांना गोड शुभेच्छा!

पुन्हा भेटुच !

धन्यवाद !

------------------------------------------------------------------------------------------------
फोटो  आभार : ट्रेक टीम   
खास आभार: चेतन केतकर आणि संदेश मेहता आणि Trinity Adventure Team







3 comments:

Milind Marathe said...

फारच सुंदर प्रवास वर्णन. फोटो सहित पोस्ट केल्याने अगदी स्पॉट वरच असल्यासारखे वाटले. व आता लवकरच या ट्रॅक वर जायची प्रबळ इच्छा झाली. पण सध्या घरच्या अडचणीमुळे शक्य नसले तरी जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्कीच भेट देईन. असो. यात फक्त एक सूचना करावीशी वाटली ती म्हणजे या ट्रॅक पर्यंत पोचण्यासाठी मार्ग दिला असता तर अजून सोपे झाले असते. तुम्हास पुढील ट्रिप/ट्रॅक साठी शुभेच्छा.

Savita Kanade said...

अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद! तुमच्या सूचनेनुसार ट्रेक पर्यंत पोहोचण्याचा मार्ग नक्कीच ब्लॉग मध्ये टाकते.

Anonymous said...

खूप सुंदर नादच खुळा सविता