जोर ते महाबळेश्वर ट्रेक, ५ फेब्रुवारी 2023

ट्रेकच्या आदल्यादिवशी बहिणाबाईंचा फोन आला, " उद्याच्या ट्रेकसाठी super excited  आहे" . खूप कमी वेळा असं झालयं मी तिला ट्रेकला येण्याबद्दल विचारलं आणि ती लगेच तयार झाली. त्यामुळे "super excited" हा शब्द आणि त्यामागील भावना लक्षात येऊन मी पण " super super excited" होते.  बहिणाबाई सोबत येणार ही excitement तर होतीच त्याच्याजोडीला हा ट्रेक करण्याची इच्छा पूर्ण होणार ही excitement सुद्धा होती. 

रात्री छान झोप झाल्याने ट्रेकच्या दिवशी पहाटे लवकर उठून -आवरून साडे-पाचला फर्ग्युसन कॉलेज च्या गेटला हजर झाले. पहाटेचा फर्ग्युसन कॉलेज चा रस्ता न्याहाळत असतानाचं आम्हाला ट्रेकला घेऊन जाणारी गाडी समोर पार्क झाली. बहिणाबाई पाच मिनिटात आल्याचं. हळूहळू सर्वजण आले. ग्रुपमध्ये अंकित आणि हेमा मॅॅडम ओळखीच्या होते. गाडी सुरु झाल्यावर एबीसी, ईबीसी ट्रेकला जाणाऱ्यांच्या गप्पा रंगल्या. 

सातारा रोडच्या एका हॉटेल मध्ये इतरांची ओळख झाली. गप्पा झाल्या. माझ्या आणि बहिणीच्या गप्पागोष्टी चालूच  होत्या. नाश्त्यासाठी गाडीतून उतरलो तर चांगलीच थंडी होती. अंगात अगदी हुडहुडी भरली. नाश्ता करताना थंडीने तळहाताची बोटे उड्या मारत होती.  

जोर च्या दिशेने गाडी धावायला लागली. वाई मार्गे धोम धरणाचा जलाशय सोबत घेत गाडी धावत होती. खिडकीतून तारेवर बसलेले पक्षी दिसत होते. हा रस्ता तसा अगदी निर्मनुष्य आणि निर्वाह्क. आमचीच काय ती गाडी ह्या रत्यावर धावत होती. एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला धोम धरणाचा जलाशय! जलाशयातील पाणी गाडीतून अगदी शांत, नितळ दिसत होत. इतकं नितळ की चेहरा त्यात पाहून नट्टा-पट्टा करता येईल. काही ठिकाणी सूर्याचे किरण थेट पाण्यावर पडल्याने ते परावर्तीत होऊन डोळे दिपत होते. तो पूर्ण परिसर नितांत सुंदर, निसर्गरम्य, शांत होता. असं, वाटतं होत गाडीतून उतरावं आणि निसर्ग भ्रमंतीचा आनंद घेत चालत रहावं. 

ह्या आनंदात अजून एक भर पडली. महाबळेश्वर चा Needle Hole Point or Elephants Head Point  अर्थात हत्ती माथा अचानक नजरेस पडला. कित्ती सुरेख दिसत होता. एका वेगळ्याच कोनातून मधली गॅॅप/फट इतकी निखालस स्पष्ट होती की आभाळ आरपार चिरत होती. किंचित धुकं, हिरवीगार झाडी, धोम धरणाचा शांत हिरवा-निळाजलाशय आणि निळ्याशार आभाळाखाली  ठळक दिसणारा हत्ती माथा! जोर गाव जवळ येईपर्यंत हा केट्स पॉईट सोबत करत होता. सारखी इच्छा होतं होती कि गाडीतून खाली उतरावं आणि त्याची सुरेख छबी कॅमेऱ्यात घ्यावी. 

अखेर गाडीची चाके थांबली. ट्रेकचा आरंभबिंदू येऊन ठेपला. बऱ्यापैकी मोठ मैदान. मैदानात गावदेवता कुंभारजाई देवीच मंदिर. आजूबाजूला अंजनीची झाडं. झाडाची निळी-जांभळ्या रंगाची फुले सुकून किंचित फिकी जांभळट-गुलाबीसर झालेली.  

अंकित ने ट्रेक सहभागींची ओळख घेतली. ह्या ट्रेकचे खास वैशिष्ट्य आणि आकर्षण होते " मिन्ग्मा शेरपा"! उस्तुकता होती त्यांचे अनुभव ऐकण्याची!

कुंभारजाई देवीचे दर्शन घेतले. जोर ते महाबळेश्वर अर्थात कुंभारजाई ते महाबळेश्वर शिवालय असा हा भक्ती मार्ग!



काही अंतरावरच एक छोटा सुंदरसा पूल होता. सकाळच्या सोनेरी सूर्यकिरणात हा पूल आणि आजूबाजूचा परिसर "गोल्डन गोल्डन" झालेला. 


पूल पार केला आणि ट्रेकला सुरु झाला. निलगिरीच्या उंच उंच किंचित विरळ झाडामधून जाणाऱ्या पाऊलवाटेवरून जाताना सर्वांगावर पडलेले सूर्यकिरण फक्त ह्याच बिंदूवर अनुभवले. मी असं का म्हणते ते तुम्हाला पुढे कळेलच. 

पाऊलवाटेवरून पुढे पुढे जाताना विरळ निलगिरीची झाडे जाऊन विविध प्रकारची एकमेकांना घट्ट सोबतीने उभी हिरवीगार झाडे सोबत करू लागली. पाऊलवाट आता उंच उंच जात होती.   

नाश्ता करून गच्च झालेलं पोटाने चालण्याचा वेग मंदावला.  चॉकलेट, सफरचंदाच्या आग्रहाला नकार द्यावा लागला. 

आता झाडी वाढली होती. गर्द घनदाट जंगलातून मार्गक्रमण चालू होत. जंगलाची अशी काही वैशिष्ट्य समोर येत होती. गर्द हिरव्यागार झाडासोबत पायवाटेवर येणारी झाडांची मुळे विखुरली होती, 


काही ठिकाणी दगडांची रेलचेल



काही ठिकाणी दबलेल्या मातीची वाट



काही ठिकाणी हलकासा घसारा...

जंगलातून चढाई करताना शीतलतेचा अनुभव येत होता. संपूर्ण चढाई वृक्षांनी वेढलेल्या जंगलातूनच. झाडांची हिरव्या पानांनी लगडलेल्या फांद्या डोक्यावर शीतल छाया देत होत्या. जणू जंगलआपला वरदहस्त आमच्या डोक्यावर धरून त्याच्या आशीर्वाद रुपी  छायेतून आमचा ट्रेकमार्ग सुलभ करत होता!

वाटेत दोन वाटाडे भेटले. ते गाईड म्हणून काम करतात. त्यांनी सांगितल्यानुसार साधारण अर्धा तास चढाई केल्यानंतर काही पायऱ्या लागल्या. 


पायऱ्या चढून एका वळणानंतर पुंन्हा काही कातळात खोदलेल्या पायऱ्या.


ह्या पायऱ्या चढून गेल्यावर छोटासा व्ह्यू पॉईट लागला. इथून खालचा धोम धरणाचा निळाशार जलाशय अत्यंत विलोभनीय दिसत होता. ह्या ठिकाणी आम्हा बहिणींचा फोटो तो बनता था!

काही जणींनी "तुम्ही जुळ्या बहिणी आहात का?" असं विचारलही! ट्रेकच्या सुरुवातीनंतर ह्या ठिकाणी आम्ही एकत्र भेटलो. हो, आमच्या बहिणाबाईनी चढाई मध्ये बाजी मारली!

ह्या व्ह्यू पॉईट वरून दिसणारा कमळगड, कोळेश्वरचे पठार हे अंकित ने दाखवलं बहिरीच्या घुमटीबद्दल आणि इथून केल्या जाणाऱ्या ट्रेकबद्दल ही सांगितलं जसे चंद्रगड आर्थरसीट, जोर-बहिरीची घुमटी-आर्थर सीट, कमळगड-कोळेश्वर पठार इ. 


इथून काही पायऱ्या पुन्हा... 


एक सुंदरसे गणपती मंदिर .


गणेशाचे दर्शन घेऊन काही मीटर अंतर गेल्यावर महाबळेश्वर शिवालयाकडे नेणाऱ्या पायऱ्या..


हा जंगल ट्रेक इथे संपला. हा ट्रेक काही गोष्टींसाठी खास वाटला,

१. ट्रेकच्या सुरुवातीपासून जे चढाई ते ट्रेक संपेपर्यंत

२. आम्ही केलेला ट्रेक २.३० तासांची खडी चढाई. उतराई नाही.

३. ट्रेकमार्गावर पठार नाही

४. संपूर्ण ट्रेक घनदाट झाडीच्या शीतल छायेमधून

५. ट्रेक संपल्यानंतर सर्वांगाला सूर्याच्या किरणांचा स्पर्श झाला. मधले २.३० तास सूर्य किरणांची तिरीप तेवढी अनुभवली.

६. धोम धरणाच्या कृष्णा नदीचा सुंदर जलाशय

 ७. जोर ते महाबळेश्वर ट्रेक हा दोन भक्तीपिठांना जोडणारा जंगल ट्रेकमार्ग

महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा मंदिर, अतिबळेश्वर मंदिर यांना भेट दिली.  दुपारचे जेवण केले. आता उत्सुकता पूर्ण होण्याची वेळ होती. हो, मिन्गमा शेर्पा सरांचे अनुभव ऐकण्याची!

कमलजा माता मंदिर. मिन्गमा शेर्पा सरांनी अनुभव सांगायला सुरुवात केली. 


पोर्टर पासून सुरु केलेला प्रवास , तांत्रिकदृष्ट्या सक्षम होत, विविध एक्सपीडीशन करेपर्यंत. अत्यंत रोमांचक आणि प्रेरणादायी! गढवाल जिल्ह्यातील मा. कामेत एक्सपीडीशन हे पहिले. २८ दिवसात त्यांनी ८००० फुटावरील ५ माऊंंटन पीक एक्सपीडीशन केले. आजच्या तारखेला असे ६ एक्सपीडीशन त्यांनी केले आहेत. मा. एव्हरेस्ट एक्सपीडीशन त्यांनी सात वेळा केला आहे. विविध वैयक्तिक आणि देशीय ग्रुप ना त्यांनी एक्सपीडीशन साठी मार्गदर्शन केले आहे. त्यांचे रेस्क्यूचे आणि जीवनाचा अंत होणार असे वाटणारे प्रसंग ऐकताना  तरअंगावर अक्षरशः काटा आला. 

Giripremi Adventure Foundation मुळे त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली आणि ट्रेक मध्ये त्यांची साथ मिळाली.  मिन्ग्मा शेर्पा सरांच्या पुढील एक्सपीडीशन साठी त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. 


मिन्ग्मा शेर्पा सरांनी सांगितलेल्या अनुभवांचा मागोवा घेत पुण्याच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला...

---------------------------------------------------------------------------

खास आभार: Giripremi Adventure Foundation (GAF)

                    मिन्ग्मा शेर्पा सर

                    अंकित सोहोनी आणि अखिल काटकर (GAF)

                    सर्व ट्रेक सहभागी

No comments: