लेकर हम दिवाना दिल.... @१२ जानेवारी २०२४

लेकर हम दिवाना दिल

फिरते हैं मंझिल मंझिल

कही तो प्यारे किसी किनारे

मिल जाऊं तुम अंधरे उजाले......

मजरुह सुल्तानपूरी यांनी लिहिलेल, आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेल\ "यादों की बारात" सिनेमातील हे गीत! या गाण्यातील, "लेकर हम दीवाना दिल..."  या ओळींचा अर्थ सांगणारा हा प्रवास , हा ब्लॉग!

हा सुरेल प्रवास सुरु झाला तो १ डिसेंबर २०२३ पासून. जेव्हा संगीत सफरचं हे पोस्टर माझ्याकडे आलं. 


पोस्टर बघत होते तोच पाठोपाठ जितेंद्र चा फोन. त्याचा पहिला स्टेज performance! वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात! पुणे ते वाशी प्रवासाचा विचार नंतर आला. निर्णय त्याआधीच केला होता. मी जायचं ठरवलं होतं. 

जितेंद्र हा माझा वर्गमित्र! आम्ही दहावी इयत्तेपर्यंत ऐकाच शाळेत शिकलो. १९८३ ची आमची बॅॅच! दहावी नंतर सगळे इकडे तिकडे विखुरले गेले. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी भेटलो. जवळजवळ ३८ वर्षांनी ! " कभी अलविदा ना कहना" ! ह्या एका वचनावर! 

"कभी अलविदा ना कहना " अर्थात पूर्णविराम कुठेही नाही. प्रवास अखंडित चालूच.....

जितेंद्रच्या गाण्याच्या कार्यक्रमाला जायचं ठरवल्यावर मन /हृदय एकदम " दिवाना" स्थितीत!  म्हणजे काय? पुढे वाचत जा...अर्थ समजत जाईल.!

जितेंद्र, अविनाश, स्मिता आणि मीरा. यांच्यासोबत फोनाफोनी झाली. वाशीला जायचं कसं ह्याचा रिसर्च झाला. अविनाश जवळ तिकीट आले. अविनाश ने प्रोग्राम ठरवला. 

दुपारी २.१५ च्या शिवनेरी ने हम ये दिवाना दिल लेकर वाशी कि तरफ निकल पडे| फ्रेंड्स ना भेटण्यासाठी एक उत्सूक दिल! २८ नोव्हेंबर २०२१ दिवसाच्या आठवणीत रमलेल "दिल"!

प्रवासात छान डुलकी झाली. रिफ्रेश झाले. स्मिता आणि अविनाश सोबत संपर्कात राहून ५ वाजता नेरूळ ला उतरले. हे दोघेही चकित. वेळेच्या खूप आधीच  पोहोचले. 


अविनाश, मी आणि स्मिता त्याच्या घरी गेलो. त्या दोघांना पाहून " दिवाना दिल खुश हो गया"!  पुर्नभेटीच्या आनंदात तुडुंब भिजलेल !

अविनाशच्या कुटुंबियांना भेटून नातेसंबंधाची कडी एकमेकाशी जोडली गेली. 


संजय, नारायण आणि सुनील यांच्या सोबत मिसेस अविनाश यांनी केलेला जेवणाचा खासम खास बेत. गुळाची जिलेबी आणि मासवडी! ते पाहून "दिवाना दिलाने  आत्मसंतुष्टी अनुभवलेली! पारंपारिक लज्जतदार, चविष्ट,  खाद्यपदार्थ ची चव चाखून "दिल दिवाना हो गया"!  त्या मासवडीची चव कायम जिभेवर राहिल. 


गाण्याच्या कार्यक्रमाची वेळ ८.३० ची. थोडी वेळेची घाई झाली. पण मज्जा आली. अविनाश ने हे सर्व घडवून आणलं आणि २०२१ नंतर किंचित थंड पडलेली संवाद साखळीला सोन्याची झळाळी आली!

खरंतर पृथ्वी थिएटर पाहण्याची प्रबळ इच्छा. पण "दिवाना दिल" पहिलं आलं ते विष्णुदास भावे नाट्यगृहात! 


नाट्यगृहाची फेरी मारत "दिवाना दिल" खूप हळवं झालं.वडिलांच्या स्मृतीत. वडिलांना संगीत नाटकांची अतिशय आवड. अत्यंत जुन्या कलाकारांची संगीत नाटके पाहण्याचा भाग्य त्यांनी आम्हाला दिलं बालगंधर्व, शांता जोग, जोत्स्ना भोळे, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, गणपतराव बोडस, पठ्ठे बापूराव, भक्ती बर्वे, प्रभाकर पणशीकर, काशिनाथ घाणेकर, श्रीराम लागू यांचे फोटो पाहून वडिलांनी त्यांच्याबद्दल सांगितलेली एक एक गोष्ट आठवणीत आली. माझी बहीण इथे असती तर दोघी मिळून ह्या अशा अनेक आठवणींना उजाळा दिला असता. असो. 

नाट्यगृहाच्या आवारात जितेंद्र आणि विजयच्या कुटुंबियांची भेट झाली. "दिवाना दिल" त्याचा परमोच्च आनंदाचा क्षण अनुभवत होता! 


हे सर्व अनुभवत असताना "दिवाना दिल" म्हणे " यावर ब्लॉग तर हवाच! म्हणून हा सारा प्रपंच!

नाटकाची अरे नाही, संगीत सफर ची तिसरी घंटा झाली! पडदा सरकला आणि समोर आला जितेंद्र! ह्या गाण्याच्या मैफिलीच ओपेनिंग जिंतेंद्र च्या गाण्याने आणि ते गाणं होतं " दिवाना लेके आया है दिलका तराना..."!  जितेंद्र चा सोलो performance ! 

माझा "दिवाना दिल" मात्र गाणं ऐकत होतं, रेकॉर्ड करतं होतं, ओठ गाणं गुणगुणत होतंआणि त्याचवेळी काही काळ मागे गेलं होत. 

साधारण २०२१ वर्षाच्या शेवटी शेवटी जितेंद्र ने आपली गाण्याची आवड मूर्त रुपात पुढे आणण्यासाठी सुरुवात केली. आमच्या २८ नोव्हेंबरच्या गेट-टुगेदर मधे त्याने गाणी गाऊन धमाल आणली. त्यानंतर त्याच्या गाण्याच्या रिहर्सल्स सुरु राहिल्या. आपल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून. त्या रिहर्सल्स चे रेकॉर्डिंग आम्हाला आनंद देत होते. कधी गाडीत, कधी अवसरीला, कधी त्याच्या मुंबईच्या घरी रिहर्सल्स सुरु होत्या. त्या गाण्यावर आम्हा प्रत्येकाचा अभिप्राय  होताच. दोन वर्षाचा हा कालावधी. जितेंद्रची गायनाची कला आणि प्रयास आज त्याला ह्या स्टेज वर घेऊन आलेले! त्याला स्टेज वर गाताना पाहताना हे सर्व डोळ्यासमोर आले. "दिवाना दिल" इतका भावूक झाला की त्या भावना व्यक्त करण्यासाठी लिखित शब्दांचा आधार घ्यावा लागला. इयत्ता दहावीत असताना पुसटसा आठवणारा आमचा मित्र, एकदम ३८ वर्षांनी भेटतो काय आणि पुढच्या दोन वर्षातच तो गाण्याच्या ह्या टप्प्यावर येतो काय. किती सुंदर आहे हा प्रवास! 

हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे, देख के तुमको दिल डोला है आणि अर्थात लेकर हम दिवाना दिल....एक सोलो, दोन duet आणि एक ग्रुप song ...जितेंद्र ला ऐकताना मन तुप्त झाल, त्याची गायकी, आत्मविश्वास, देहबोली, शब्द फेक, comfortless, स्टेज वरचा सहज वावर  खूप सगळचं लाजवाब! 

पुण्यावरून वाशीला आलेला माझा "दिवाना दिल" ह्याची तर अनुभूती घेण्यासाठी आसुसला होता! रात्री १२ वाजेपर्यंत हे आनंदी गायीकीचे घोट पीत होतो तरी तहान भागलेली नव्हतीच......

जितेंद्र सोबत इतरही गायकांची गाणी कमाल होती! निवेदन सुद्धा अतिशय सुंदर!

९ ते १२ हा वेळ संगीत सफर मध्ये असा काही रमला की बस्स! वाद्यवृंद तर एकदम भन्नाट! एकसे एक वाजवत होते. त्यांच्या वादनाने गायकांची गायकी अधिकच बहरून आली. 

ह्या सर्वांची गायकी ऐकताना प्रेक्षक म्हणून आम्हीच कमी पडलो कि काय असे वाटले. 

१२ जानेवारीची रात्र स्मिताकडे राहिले. रात्री १२ नंतर मुंबई कशी दिसते ह्याचे डोळासुख छानच! स्मिताच्या मुलाला आणि मुलीला भेटून हा "दिवाना दिल" blessed होता. ईश्वराचे आभार त्याने अशा एका वळणावर आमची पुर्नभेट घडवली जिथे एकमेकांबद्दल फक्त आणि फक्त कृतार्थता आहे!

१३ जानेवारीची सकाळ आमच्या लहानग्या हितार्थी च्या निरागस हास्याने उजाडला.  


मीराच्या येण्याने आनंद द्विगुणीत झाला. मग काय गप्पा, नाश्ता, सुग्रास जेवण आणि मनभर फोटोग्राफी! 


जितेंद्र चे गाणे हा आमच्या गप्पांचा गाभा! पुण्यात त्याच्या गाण्याचा कार्यक्रम व्हावा हीच आता इच्छा! 

घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. "दिवाना दिल" म्हणत होता " चलं पुने कि ओर निकल जाये"! प्रगती एक्प्रेस मध्ये ह्याच घड्याळाचे काटे मागे जात होते. दोन दिवसांच्या सुरेल चित्रपटात रमत होते.  किती सुंदर होते ते दोन दिवस! नातेसंबंधाचे, संवादाचे, भावनांचे, गप्पांचे, आनंदाचे, सुरेल गान मैफिलीचे, जिभेवर रेंगाळणाऱ्या चविष्टभोजनाचे आणि सुरेख आठवणींचे!

पुण्यात आलेय पण मन अजूनही तिथेच रेंगाळतयं! तिथेच गुंतलयं! सारखं सारखं जितेंद्र च्या गाण्याचे रेकॉर्डिंग ऐकतयं! फोटो पाहतय!.....मुठी एवढं दिल पण किती जागा आहे त्यात हे सर्व सामावून घेण्यासाठी! 

मित्रांनो, समजला ना " लेकर हम दिवाना दिल" चा अर्थ! दिल दिवाना अर्थात आसुसलेला होता, जितेंद्र चा स्टेज performance पाहण्यासाठी, मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत होणाऱ्या संवादासाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी, चविष्ट खाण्यासाठी आणि त्यांच्या सोबत घालवलेले क्षण फोटोत टिपण्यासाठी!

तर अशी ही जितेंद्र च्या गाण्याची संगीत सफर आणि माझी पुणे ते वाशी प्रवास सफर!

आवडली ना???

पुन्हा भेटूच! 

लेकर हम दिवाना दिल.....फिर आयेंगे! फिर मिलेंगे! 

जोर ते महाबळेश्वर ट्रेक, ५ फेब्रुवारी 2023

ट्रेकच्या आदल्यादिवशी बहिणाबाईंचा फोन आला, " उद्याच्या ट्रेकसाठी super excited  आहे" . खूप कमी वेळा असं झालयं मी तिला ट्रेकला येण्याबद्दल विचारलं आणि ती लगेच तयार झाली. त्यामुळे "super excited" हा शब्द आणि त्यामागील भावना लक्षात येऊन मी पण " super super excited" होते.  बहिणाबाई सोबत येणार ही excitement तर होतीच त्याच्याजोडीला हा ट्रेक करण्याची इच्छा पूर्ण होणार ही excitement सुद्धा होती. 

रात्री छान झोप झाल्याने ट्रेकच्या दिवशी पहाटे लवकर उठून -आवरून साडे-पाचला फर्ग्युसन कॉलेज च्या गेटला हजर झाले. पहाटेचा फर्ग्युसन कॉलेज चा रस्ता न्याहाळत असतानाचं आम्हाला ट्रेकला घेऊन जाणारी गाडी समोर पार्क झाली. बहिणाबाई पाच मिनिटात आल्याचं. हळूहळू सर्वजण आले. ग्रुपमध्ये अंकित आणि हेमा मॅॅडम ओळखीच्या होते. गाडी सुरु झाल्यावर एबीसी, ईबीसी ट्रेकला जाणाऱ्यांच्या गप्पा रंगल्या. 

सातारा रोडच्या एका हॉटेल मध्ये इतरांची ओळख झाली. गप्पा झाल्या. माझ्या आणि बहिणीच्या गप्पागोष्टी चालूच  होत्या. नाश्त्यासाठी गाडीतून उतरलो तर चांगलीच थंडी होती. अंगात अगदी हुडहुडी भरली. नाश्ता करताना थंडीने तळहाताची बोटे उड्या मारत होती.  

जोर च्या दिशेने गाडी धावायला लागली. वाई मार्गे धोम धरणाचा जलाशय सोबत घेत गाडी धावत होती. खिडकीतून तारेवर बसलेले पक्षी दिसत होते. हा रस्ता तसा अगदी निर्मनुष्य आणि निर्वाह्क. आमचीच काय ती गाडी ह्या रत्यावर धावत होती. एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला धोम धरणाचा जलाशय! जलाशयातील पाणी गाडीतून अगदी शांत, नितळ दिसत होत. इतकं नितळ की चेहरा त्यात पाहून नट्टा-पट्टा करता येईल. काही ठिकाणी सूर्याचे किरण थेट पाण्यावर पडल्याने ते परावर्तीत होऊन डोळे दिपत होते. तो पूर्ण परिसर नितांत सुंदर, निसर्गरम्य, शांत होता. असं, वाटतं होत गाडीतून उतरावं आणि निसर्ग भ्रमंतीचा आनंद घेत चालत रहावं. 

ह्या आनंदात अजून एक भर पडली. महाबळेश्वर चा Needle Hole Point or Elephants Head Point  अर्थात हत्ती माथा अचानक नजरेस पडला. कित्ती सुरेख दिसत होता. एका वेगळ्याच कोनातून मधली गॅॅप/फट इतकी निखालस स्पष्ट होती की आभाळ आरपार चिरत होती. किंचित धुकं, हिरवीगार झाडी, धोम धरणाचा शांत हिरवा-निळाजलाशय आणि निळ्याशार आभाळाखाली  ठळक दिसणारा हत्ती माथा! जोर गाव जवळ येईपर्यंत हा केट्स पॉईट सोबत करत होता. सारखी इच्छा होतं होती कि गाडीतून खाली उतरावं आणि त्याची सुरेख छबी कॅमेऱ्यात घ्यावी. 

अखेर गाडीची चाके थांबली. ट्रेकचा आरंभबिंदू येऊन ठेपला. बऱ्यापैकी मोठ मैदान. मैदानात गावदेवता कुंभारजाई देवीच मंदिर. आजूबाजूला अंजनीची झाडं. झाडाची निळी-जांभळ्या रंगाची फुले सुकून किंचित फिकी जांभळट-गुलाबीसर झालेली.  

अंकित ने ट्रेक सहभागींची ओळख घेतली. ह्या ट्रेकचे खास वैशिष्ट्य आणि आकर्षण होते " मिन्ग्मा शेरपा"! उस्तुकता होती त्यांचे अनुभव ऐकण्याची!

कुंभारजाई देवीचे दर्शन घेतले. जोर ते महाबळेश्वर अर्थात कुंभारजाई ते महाबळेश्वर शिवालय असा हा भक्ती मार्ग!



काही अंतरावरच एक छोटा सुंदरसा पूल होता. सकाळच्या सोनेरी सूर्यकिरणात हा पूल आणि आजूबाजूचा परिसर "गोल्डन गोल्डन" झालेला. 


पूल पार केला आणि ट्रेकला सुरु झाला. निलगिरीच्या उंच उंच किंचित विरळ झाडामधून जाणाऱ्या पाऊलवाटेवरून जाताना सर्वांगावर पडलेले सूर्यकिरण फक्त ह्याच बिंदूवर अनुभवले. मी असं का म्हणते ते तुम्हाला पुढे कळेलच. 

पाऊलवाटेवरून पुढे पुढे जाताना विरळ निलगिरीची झाडे जाऊन विविध प्रकारची एकमेकांना घट्ट सोबतीने उभी हिरवीगार झाडे सोबत करू लागली. पाऊलवाट आता उंच उंच जात होती.   

नाश्ता करून गच्च झालेलं पोटाने चालण्याचा वेग मंदावला.  चॉकलेट, सफरचंदाच्या आग्रहाला नकार द्यावा लागला. 

आता झाडी वाढली होती. गर्द घनदाट जंगलातून मार्गक्रमण चालू होत. जंगलाची अशी काही वैशिष्ट्य समोर येत होती. गर्द हिरव्यागार झाडासोबत पायवाटेवर येणारी झाडांची मुळे विखुरली होती, 


काही ठिकाणी दगडांची रेलचेल



काही ठिकाणी दबलेल्या मातीची वाट



काही ठिकाणी हलकासा घसारा...

जंगलातून चढाई करताना शीतलतेचा अनुभव येत होता. संपूर्ण चढाई वृक्षांनी वेढलेल्या जंगलातूनच. झाडांची हिरव्या पानांनी लगडलेल्या फांद्या डोक्यावर शीतल छाया देत होत्या. जणू जंगलआपला वरदहस्त आमच्या डोक्यावर धरून त्याच्या आशीर्वाद रुपी  छायेतून आमचा ट्रेकमार्ग सुलभ करत होता!

वाटेत दोन वाटाडे भेटले. ते गाईड म्हणून काम करतात. त्यांनी सांगितल्यानुसार साधारण अर्धा तास चढाई केल्यानंतर काही पायऱ्या लागल्या. 


पायऱ्या चढून एका वळणानंतर पुंन्हा काही कातळात खोदलेल्या पायऱ्या.


ह्या पायऱ्या चढून गेल्यावर छोटासा व्ह्यू पॉईट लागला. इथून खालचा धोम धरणाचा निळाशार जलाशय अत्यंत विलोभनीय दिसत होता. ह्या ठिकाणी आम्हा बहिणींचा फोटो तो बनता था!

काही जणींनी "तुम्ही जुळ्या बहिणी आहात का?" असं विचारलही! ट्रेकच्या सुरुवातीनंतर ह्या ठिकाणी आम्ही एकत्र भेटलो. हो, आमच्या बहिणाबाईनी चढाई मध्ये बाजी मारली!

ह्या व्ह्यू पॉईट वरून दिसणारा कमळगड, कोळेश्वरचे पठार हे अंकित ने दाखवलं बहिरीच्या घुमटीबद्दल आणि इथून केल्या जाणाऱ्या ट्रेकबद्दल ही सांगितलं जसे चंद्रगड आर्थरसीट, जोर-बहिरीची घुमटी-आर्थर सीट, कमळगड-कोळेश्वर पठार इ. 


इथून काही पायऱ्या पुन्हा... 


एक सुंदरसे गणपती मंदिर .


गणेशाचे दर्शन घेऊन काही मीटर अंतर गेल्यावर महाबळेश्वर शिवालयाकडे नेणाऱ्या पायऱ्या..


हा जंगल ट्रेक इथे संपला. हा ट्रेक काही गोष्टींसाठी खास वाटला,

१. ट्रेकच्या सुरुवातीपासून जे चढाई ते ट्रेक संपेपर्यंत

२. आम्ही केलेला ट्रेक २.३० तासांची खडी चढाई. उतराई नाही.

३. ट्रेकमार्गावर पठार नाही

४. संपूर्ण ट्रेक घनदाट झाडीच्या शीतल छायेमधून

५. ट्रेक संपल्यानंतर सर्वांगाला सूर्याच्या किरणांचा स्पर्श झाला. मधले २.३० तास सूर्य किरणांची तिरीप तेवढी अनुभवली.

६. धोम धरणाच्या कृष्णा नदीचा सुंदर जलाशय

 ७. जोर ते महाबळेश्वर ट्रेक हा दोन भक्तीपिठांना जोडणारा जंगल ट्रेकमार्ग

महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा मंदिर, अतिबळेश्वर मंदिर यांना भेट दिली.  दुपारचे जेवण केले. आता उत्सुकता पूर्ण होण्याची वेळ होती. हो, मिन्गमा शेर्पा सरांचे अनुभव ऐकण्याची!

कमलजा माता मंदिर. मिन्गमा शेर्पा सरांनी अनुभव सांगायला सुरुवात केली. 


पोर्टर पासून सुरु केलेला प्रवास , तांत्रिकदृष्ट्या सक्षम होत, विविध एक्सपीडीशन करेपर्यंत. अत्यंत रोमांचक आणि प्रेरणादायी! गढवाल जिल्ह्यातील मा. कामेत एक्सपीडीशन हे पहिले. २८ दिवसात त्यांनी ८००० फुटावरील ५ माऊंंटन पीक एक्सपीडीशन केले. आजच्या तारखेला असे ६ एक्सपीडीशन त्यांनी केले आहेत. मा. एव्हरेस्ट एक्सपीडीशन त्यांनी सात वेळा केला आहे. विविध वैयक्तिक आणि देशीय ग्रुप ना त्यांनी एक्सपीडीशन साठी मार्गदर्शन केले आहे. त्यांचे रेस्क्यूचे आणि जीवनाचा अंत होणार असे वाटणारे प्रसंग ऐकताना  तरअंगावर अक्षरशः काटा आला. 

Giripremi Adventure Foundation मुळे त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी आम्हाला मिळाली आणि ट्रेक मध्ये त्यांची साथ मिळाली.  मिन्ग्मा शेर्पा सरांच्या पुढील एक्सपीडीशन साठी त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. 


मिन्ग्मा शेर्पा सरांनी सांगितलेल्या अनुभवांचा मागोवा घेत पुण्याच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला...

---------------------------------------------------------------------------

खास आभार: Giripremi Adventure Foundation (GAF)

                    मिन्ग्मा शेर्पा सर

                    अंकित सोहोनी आणि अखिल काटकर (GAF)

                    सर्व ट्रेक सहभागी

जिंदादिली @ मोरगिरी ट्रेक १४ जानेवारी २०२३

"मोरगिरी"  या ट्रेकबद्दल Instagram वर वाचलं . Off Beat ट्रेक आहे लक्षात आलं. मोरगिरी किल्ला पाहण्याचं कुतूहल मनात दाटून आल. काही दिवसांपूर्वीच Trinity Adventures ह्या ग्रुप बद्दल ऐकललं. Social Media वर ग्रुप बद्दल शोधताना  Instagram  वर ग्रुप ची माहिती मिळाली . तिथेच  "मोरगिरी " ट्रेक ची पोस्ट पहिली !

तुंग , तिकोना , कोराईगड यांच्याच चौकटीतील हा किल्ला . कधी ऐकल्याच आणि वाचल्याचं आठवेना . कुतुहलापोटी  आधी गुगल वर माहिती आणि अलीकडेच  पोस्ट केलेले व्हिडिओ पहिले. पोस्ट मध्ये दिलेल्या फोन नंबर वर संपर्क करून माहिती घेतली. फोनवर सुरेन्द्र शी बोलताना माझ्या मर्यादा त्यांना स्पष्ट केल्या. त्यांचा होकार मिळाल्यावर लगेच ट्रेकच बुकिंग केलं 

ट्रेकच्या आदल्या दिवशी मोरगिरी चा ग्रुप फॉर्म झाला तेव्हा समजलं  की सुरेन्द्र जालिहाल आणि चेतन केतकर या २०१२ मधील एव्हरेस्ट एक्सपीडिशन नागरी मोहिमेतील हे दोघे एव्हरेस्टर आहेत ! त्यांच्या भेटीचे आणि सोबत ट्रेक करण्याचे कुतूहल १४ जानेवारी उजाडण्याची वाट पाहू लागले . 

आम्ही १५ जण! चेतन आणि संदेश मेहता हे On Field Leaders होते ! गाडीत सँडविच आणि फ्रूट प्लेट नाश्ता आणि लोणावळा मार्गे लायन्स पॉइंट ला चहा घेऊन साधारण सकाळी ८.३० वाजता बेस व्हिलेज ला पोहोचलो . "किल्ले मोरगिरी कडे " नावाचा आणि मोरगिरी किल्ल्याची माहिती देणारा फलका ने  लक्ष वेधले . 


इथे पोहोचण्यासाठी आम्ही लोणावळा मार्गे, भुशी धरण, आय.एन.एस. शिवाजी वरून Aamby Valley Junction ला जाणे. तिथून एक रस्ता Aamby Valley ला जातो आणि दुसरा तुंग किल्ल्याकडे. तुंग किल्ल्याच्या रस्त्याने साधारण दीड किमी अंतरावर  जांभूळणे गाव आहे. जांभूळणे हे बेस व्हिलेज आहे. 

फलकाच्या पार्श्वभूमीवर माझा फोटो लगोलग काढून घेतला . 


वेळ  न वाया घालवता ट्रेक सुरू केला . गावातून किल्ल्याकडे जाताना गावाची झलक मोबाईल मध्ये टिपली . 


ट्रेकमार्ग सुरू झाला तोच छानशा घनदाट झाडीमधून ! बोचरी थंडी , झाडीत हलकेसे डोकावणारे सूर्य किरण आणि  वाटेवर दिसलेली विविध रंगी रानफुले असा ट्रेकचा सुरुवातीचा नजारा !

 
ह्या घनदाट झाडीतून ट्रेक करताना भारीच वाटलं 


कितीतरी ट्रेक मध्ये अशा प्रकारची झाडी अनुभवली . एकापेक्षा एक सुंदर ! मन लुभावणारी! अशा गर्द झाडीतली शांतता  म्हणजे अगदीच स्वत:ला स्वत:च्या जवळ आणण्याचा अनुभव !

साधारण अर्धा तास ह्या झाडीतून चढाई केल्यानंतर एक भलं  मोठ्ठ पठार आलं. इतकं विस्तीर्ण  पठार मी प्रथमचं पहिलं. साधारण एक किलोमीटर लांब नक्कीच असावं . हे पठार अतिशय मोहक ! पावसाळ्यात ह्या पठारापर्यंत येऊन सभोवतालचा नजारा नजरेत साठून घ्यावा. 


डोंगररांगा धुक्यात लपेटलेल्या !  कोराईगड, भातराशी चा डोंगर , विसापूर, लोहगड, कोराईगड डयूक्स नोज इ. किल्ल्याच्या रांगा चेतन ने लोकेट करून दाखवल्या . धुक्यामुळे visibility तितकीशी नसली तरी त्यामुळे "मोरगिरी" किल्लाचं  लोकेशन चांगलचं ठळक जाणवलं ! भर उन्हाळ्यात जेव्हा visibility अत्यंत स्पष्ट असते तेव्हा ह्या डोंगररांगा समजून घ्याव्यात. इतका विलोभनीय हा परिसर !  




पठारा वरून दिसणारा मोरगिरी किल्ला अगदीच दिलखेचक !


पठारावर आम्हा ट्रेक सहभागींची ओळख झाली. तीन छोटे (अर्जुन , वरद आणि साची ) 



आणि आम्ही नऊजण ! नऊ मधील सात जण साठ ते पंचाहत्तर वयोगटातील ! हा ट्रेक म्हणजे ह्या " न अवघे पाऊणशे वयमान " या पंक्तीला सार्थ करणाऱ्या "जिंदादिल " ट्रेक सहभागींची ट्रेकगाथाचं !


पठारावरून मोरगिरी किल्ल्याकडे ट्रेक चा श्री. गणेशा केला तो छोट्या अर्जुनने !


सभोवतालचा परिसर नजरेत साठवून घेत किल्ल्याची चढण जिथे सुरू होते तिथे पोहोचलो !


इथली चढण ही एकदम खड्या उंचीची ! सुरुवातीला त्याच सूंदरशा गर्द झाडीतून ! खूप सारी वाहती माती अर्थात घसारा अर्थात स्क्री! काही ठिकाणी किंचित अवघड चढण !

इथून खरी कसरत सुरू होते! किल्ल्याचा माथा गाठेपर्यंत ट्रेकर चा शारीरिक आणि मानसिक कसं लागतो ! 

सुरुवातीला एक निमुळता किंचित अवघड रॉक पॅच होता . अवघड अशा दृष्टीने की एका बाजूला खोल दरी आणि दगडाच्या हलक्याश्या खाचेत  पाय ठेवत शरीराचा तोल सांभाळायला किंचित कसं लागणारा ! आधारासाठी दोरखंड बांधलेला होता. चेतन आणि संदेश यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने आम्ही ऐकऐकाने, दोघात पुरेसे अंतर ठेवतं, संयमाने तो पॅच पार केला . इथे सावधगिरी लक्षात घेता फोटो काढले नाहीत .

आतापर्यंत उन्हाचा तडाखा वाढला होता. हा रॉक पॅच  पार केल्यानंतर एका विसाव्याच्या क्षणी !


इथे काही पाण्याची टाकी बघायला मिळाली. 


इथेच आहे जाख मातेचे गुफा मंदिर ! गडमाता !


इथे अजून एक निमुळता रॉक पॅच, त्यानंतर शिडी आणि त्यानंतर गड माथ्याकडील चढाई !

हा रॉक पॅच पार करण्याचा अनुभव माझ्यासाठी एका थरारा पेक्षा कमी नव्हता ! दरीकडे निमुळता होतं जाणारा , गड कपारी आणि बांधलेल्या दोरखंडाचा आधार ! चेतनच्या  मार्गदर्शनाखाली सर्वांनी हा पॅच  लीलया पार केला. 

आता शिडी चढाई ! आमचे सात  जिंदादिल शूरवीर!


  
आणि ही मी ! फोटोसाठी सुहास्य !


शिडी  पार केल्यानंतर सात ते आठ कातळातील दगडी पायऱ्या पार केल्यावर गड माथा ! बोचरी हवा असली तरी सूर्याचे प्रखर किरण मनोदिलासा !

गड माथ्यावरून चौफेरचे दृश्य  पाहून ह्या किल्ल्याची महती लक्षात येते . माथ्यावरून दिसणार तुंग किल्ला हा लाजवाब ! टेहळणी साठी ह्या किल्ल्याचा चौफेर उपयोग होत असावा.


इथे काही दृश्य चेतनने द्रोण च्या सहाय्याने टिपली ! . 


द्रोण मार्फत घेतलेली गडाची ही काही छायाचित्रे :




द्रोण चे शूटिंग आणि त्याचा भाग होण्याचा आनंद ह्या ट्रेकच्या निमित्ताने मिळाला. 





गडअभ्यासक श्री. प्रमोद मांडे यांच्या पुस्तकात मोरगिरी किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती आहे ती अशी,



गड उतराईच्या अशाच एका मनमोहक पॅच वर अनुभवलेला सुंदर क्षण !


गड उतराईची सावधगिरी सर्वांच्याच लक्षात आलेली . कातळतील पायऱ्या, शिडीउतार  , दोन रॉक पॅचेस, उतराईच्या वाटेवर असणारा घसारा, काही ठिकाणच्या अरुंद पायवाटेवर एक बाजूला दरी तर दुसऱ्या बाजूला कातळ कपारीचा आधार ! 

शिडीउतार साठी चेतनने मला दोरखंडचे सुरक्षा कवच दिले! 

हे सर्व किल्ल्याचे कठीण मार्ग असले तरी ते सुलभ आणि सुरक्षित झाले चेतन आणि संदेश मुळे ! चेतन सारख्या एक एव्हरेस्टर ह्या कठीण गोष्टी त्याच्या तांत्रिक कौशल्याने, संयमाने, अनुभवाने  आणि मार्गदर्शने अत्यंत सुलभ केल्या ! ह्या सर्व ठिकाणी चेतन ची देहबोली, लीडरशिप अनुभवायला मिळाली हे ह्या ट्रेकला गेल्याचे वैशिष्ट्य !

सात शूरवीरांची ट्रेक दरम्यानची "जिंदादिली " अचंबित करणारी ! त्यांचा उत्साह , उमंग, प्रसन्नता, धैर्य , सकारात्मकता, समतोलपणा, एकमेकांना प्रोत्साहित करण्याची त्यावेळेची गरज, आधार देत एकमेकांना सामावून घेण्याची वृत्ती  आणि त्यातही जपलेल्या Sense of Humor ! Hats Off!!!!!

मोरगिरी ट्रेक माझ्यासाठी नेहमीच आठवणीत राहील  . ही "जिंदादिल " व्यक्तिमत्व, चेतन आणि संदेश च्या  लीडरशीप   निरीक्षणातून शिक्षण आणि बच्चे कंपनी मधील झळकलेली  " प्रगल्भता " !

अजून दोन गोष्टीमुळे हा ट्रेक विस्मरणातून जाणार नाही. प्रथमच मला झालेला उन्हाचा त्रास आणि कित्येक दिवस मनात ट्रेक करणे बंद करण्याचा विचार जो ओळख परेडच्या वेळी मी व्यक्त केला.असो. 

गड उतार झाल्यानंतर सुग्रास भोजनाचा आनंद!



भोजनानंतर चेतनने  सांगितला  त्याचा एव्हरेस्ट शिखर समिट चा अनुभव !निश्चितच सर्वांसाठीच प्रेरणादायी! 

तैलबैला च्या पार्श्वभूमीवर आम्ही सारेजण !


परतीच्या प्रवासात  सोबत आणलेला माईक हातात धरून उदय सर, औदुंबर सर आणि आशीष सर यांनी गायलेली काही सुरेख गीते,

ये राते ये  मौसम नदिका किनारा .. 
होंठोसे छुलो तून मेरा गीत अमर करदो .. 
मेरे मेहबूब कयामत होगी .. 
आने  से उसके आये  बहार .. 
मेरे नैना सावन भादो .. 
तुम भी चलो, हम भी चले......
 
म्हणजे " Cherry on the Top"!
 
मित्रहो , हा  ट्रेक चा अनुभव माझ्यासाठी अत्यंत जीवनसमृद्ध करणारा! तुम्हाला माझा  हा अनुभव नक्कीच माझ्या जीवनसमृद्धतेची कल्पना देईल अशी आशा करते !

उद्याच्या मकरसंक्रात सणाच्या तुम्हाला सर्वांना गोड शुभेच्छा!

पुन्हा भेटुच !

धन्यवाद !

------------------------------------------------------------------------------------------------
फोटो  आभार : ट्रेक टीम   
खास आभार: चेतन केतकर आणि संदेश मेहता आणि Trinity Adventure Team