कातळधार वॉटरफॉल ट्रेक, २ ऑगस्ट २०१५


एप्रिल २०१५ रोजी एस.जी ट्रेकर्सच्या उल्हास व्हॅली ट्रेक बद्दल फेसबुक वर वाचण्यात आलं.  ट्रेकची माहिती घेण्यासाठी विशालला फोन केला. तो होता विशाल आणि माझ्यातील पहिला संवाद! काही कारणाने ह्या ट्रेकला मला जाता आलं नाही पण  ऑगस्टच्या कातळधारसाठी माझं जाणं मात्र निश्‍चित झालं. एस. जी. ट्रेकर्स बरोबरचा हा माझा पहिला ट्रेक असणार होता!

शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर भेटायचं ठरलं होतं. मी विशालला पहिल्यांदाच भेटणार होते. कोण आहे, दिसतो कसा, वय काय काहीच अंदाज नाही. क्त ३-४ वेळा फोनवर बोलणं झालं होतं तेवढचं. त्यातून मी एकटी, सोबत कोणीही नाही. शिवाजीनगरवर विशालच्या आधी मला शिव भेटला. तो आणि मी ट्रेकडी सोबत वासोटा जंगल ट्रेक ला एकत्र होतो. म्हणाला, स्टीक घेतली का, बरं केलंत त्याने मला स्टीक बद्दल विचारलं. स्प्रिंग असलेली स्टीक असते आणि ती कशी काम करते हे त्यानेच मला सांगितलं. कोणीतरी ओळखीच आहे हया विचारानेच हुश्श झालं!

नंतर एक मुलगा आला. छोटा पण कमालीचा कॉन्फीडंट! त्याने मला बघितलं आणि जवळ आला, शेकहँड साठी हात पुढे केला आणि म्हणाला, सविता मॅडम ना?, मी विशाल”. ही विशालची आणि माझी पहिली ओळख!

मला वाटतं पावसाळ्यातला हा माझा पहिलाच ट्रेक होता. मला काहीच अंदाज येत नव्हता की मी नक्की काय तयारी करायची आणि ट्रेकला सामोरे कसे जायचे. ह्या ट्रेकला देखील पावसाळी हवामान! ढग दाटून आलेले. मधूनच पावसाच्या सरी बरसत होत्या. मला भिजायचे नव्हते. वाटल, भिजले, आजारी पडले तर ऑफिसला जायचे वांदे. म्हणून पावसाच्या हलक्याश्या सरी आल्यावर लगेचच मी पान्चो चढवला. 

ट्रेकला सुजाता कोठावडे नावाची एक मुलगी होती. तीच्या बरोबर ओळख झाली आणि मग ट्रेकची सुरुवात आम्ही बरोबरचं केली. विशाल, मी आणि सुजाता बोलतं बरोबर जात होतो. विशालने १-२ सेल्फी पण घेतले.

लोणावळा, उल्हास व्हॅली जवळ हा वॉटरफॉल आहे. लोणावळ्यापासुन राजमाचीच्या रस्त्याला मधेच डावीकडे एक रस्ता आहे जो कातळधारला जातो. हा उतरणीचा रस्ता होता. मधे मधे पावसाचे पाणी साचले होते. अत्यंत निसरडा रस्ता आणि तो डिसेंडिंग! मी काळजीपुर्वक, स्वत:ला सावरत उतरत होते. ह्या ट्रेकसाठी खोल खाली दरीत उतरावे लागते. हा वॉटरफॉल जंगलात इतका आत आहे कि कल्पनाही करता येणार नाही. ही उतरणं  पूर्णपणे जंगलातून होती. छोटीशी पायवाट आणि आजूबाजूला घनदाट झाडी. गटात गॅप पडली तर शोधण मुश्कील व्हावं. अशा ह्या गर्द-घनदाट जंगलात रस्ता चुकण्याची तेवढीच घनदाट शक्यताही!

साधारण दोन तास उतरण पार केल्यानंतर हळूहळू धबधब्याचा आवाज ऐकायला येऊ लागला आणि एका क्षणाला ट्रेक च्या पहिल्या टप्प्याशी येऊन पोहोचलो. तिथून ते दोन धबधबे दिसत होते, उंचावरुन कोसळत येणारे आणि खाली खोल दरीत जाणारे! "कातळधार" का म्हणत असतील हे धबधबे बघितल्यावरच लक्षात येतं. उंच काळ्या कभिन्न पाषाणातून कोसळणारी पाण्याची ही वेगवान धार! दिसतेचं इतकी सुंदर की बस्स! समान अंतरावरून वाहणाऱ्या दोन पाणधारा! ऐटीत, स्वत:च्याच मस्तीत कोसळणा-या! एकमेकांना ना भिडत आपला आपला स्वाभिमान जपणा-या! किती हा गर्वाभिमान! ऐकमेकात समरूप व्हायचं आहे हे माहित असूनही, समरूप होईपर्यंत आपला आपला स्वाभिमान टिकवणा-या....आपलं आपलं अंतर कायम राखणाऱ्या!....एक समर्पक गाणं आठवतयं...."दोन ध्रुवावर दोघे आपण......."

दुसरी कडे वाटावं, शंकराच्या जटेतून वाहणारी गंगाच जणू! शुभ्र, निर्मळ, नितळ, पवित्र! खाली तलावात स्वत:ला झोकून देऊन तांडव निर्माण करत होती! भयानक घनदाट जंगलातून आल्यावर ह्या दोन धारा बघितल्या की देह्भान हरपून जातं! असं वाटतं इथेच बसून रहाव आणि उडणारे पाणतुषार अंगावर झेलतं रहाव! धरतीवर कोसळणा-या धारेचे संगीत ऐकत राहून मंत्रमुग्ध व्हावं! शीण नाहीसा करण्याची जादू असणारे हे धबधबे! उत्कृष्ट, निसर्गरम्य रमणीय परिसर, हलकासा पाऊस आणि कोसळणार्‍या पांढर्‍या शुभ्र धारांचा आवाज! जी आत्मसंतुष्टता मिळाली ती शब्दातीत!

आता शेवटचा टप्पा पूर्ण करायचा होता. लांबुन हा पॅच खूप कठीण वाटतं होता. निसरडा वाटतं होता. आधी जी मुले जात होती त्यांच्या तो पॅच क्रॉस करण्याच्या पद्धतीवरुन मातीचा तो चढ पावसाने चांगलाच डेंजरस वाटत होता. म्हटल, मी इथेच थांबते”. मला खात्री वाटत होती की तो पॅच मी चढून जाऊ शकणार नाही. शिव ने माझे शब्द ऐकले. लगेच म्हणे, मॅडम, तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. हा पॅच क्त पूर्ण करायचाय. चला मी आहे”. त्याने हाताचा आधार देऊन तो पॅच पूर्ण करुन दिला. आज मला शिवचे वाक्य आठवलं आणि त्याने घेतलेला पूढाकार आठवला की मन हेलावून जातं!

आता ह्या कातळधारा जवळून दिसत होत्या. मुले-मुली खाली पाण्यात उतरली. मी काठावर बसून शांतता स्वत:त सामावून घेत होते. उन्हाची एक तिरिप आल्यावर ह्या धारा सूर्य स्पर्शाने उजळून निघत होत्या. सप्तरंग उधळतं होत्या! 

पावसामुळे शहारलेली त्वचा उन्हाची तिरीप आल्यावर ऊब देत होती. अंगावर उडणारे पाणतुषार आणि ऊन्हाची तिरिप! वाव...हा संयोग अनुभवण्यासारखाचं!

आता भूकेची चाहूल लागली होती. सरचंद नेलं होतं ते खाल्लं. साधारण दिड-तासाने ट्रेक परतीला सुरुवात केली. आता मात्र चढ होता. भयानक स्टिफ आणि निसरडा....माझ्या सोबत रोहित आणि दीपक होता. दम लागला की थांबत, गप्पा मारत आम्ही ट्रेक पूर्ण केला. 

परतीच्या ट्रेकमधे गुरुदास चौहान आणि मी त्याच्या आणि माझ्या कामाबद्दल खूप गप्पा मारत आलो. त्यामूळे लोणावळ्यापर्यंतचा वेळ छान गेला. परतीच्या प्रवासात पाऊस कोसळला. जवळजवळ दीड-तास! मी पान्चो अंगावर चढवण्याचा कंटाळा केला, सॅक भिजली, मोबाईल भिजला!

पावसाळयात चष्मावरुन पाणी निथळायला लागल्यावर ट्रेक करणं किती महाभयंकर होऊन बसतं हयाचा अनुभव मी हयावेळी घेतला. चष्मा पाण्याने ओला झाल्यावर समोरच, आजूबाजुच, खालंच काहीच स्पष्ट दिसत नाही. चष्मा काढून ठेवावा तर अजूनच धोका. ओला चष्मा कपडयाने/कागदाने पुसावा तर काच अगदी पांढरट होऊन जाते आणि मग तर अजिबातच काही दिसत नाही. चांगला पर्याय हाच की तो उन्हानेच कोरडा होऊ देणे. पण ऊन्हाची तिरिप येणार कधी? शेवटी काय तर ६-७ छोटया टीशू पेपरने चष्मा पुसावा लागतो तेव्हा कुठे त्यातून स्पष्ट दिसायला लागतं. पावसाळयात ट्रेक करताना चष्मा भिजणं आणि त्यामूळे स्पष्ट न दिसणं हा काळजी देणारा विषयचं होऊन बसतो.

पावसाळ्यातील हा ट्रेक एक शिकवण होता. स्वत:चा तोल सावरत ट्रेक करण्यापासून ते जवळ कोणत्या गोष्टी हव्या इथपर्यंत! जास्तीची चप्पल आवश्यकच! ट्रेक शूज, सॉक्स पाण्याने ओलेचिंब होतात आणि तसा ओलेपणा काही तास जपला तर थंडी वाजायला लागते, पायाची बोट ताठरतात, बधीर होतात, मुंग्या येतात वगैरे. 

"कातळधार ट्रेक" हा पावसाळ्यातला एक सर्वांगसुंदर ट्रेक आहे. ह्या धारा प्रतीक आहेत अभिमानाच्या, स्वाभिमानाच्या, पावित्र्याच्या, सौदर्याच्या आणि समरूपतेच्या!

हा ट्रेक फ्रेंडशिप-डे चं निमित्त साधून आला होता. परतीच्या प्रवासात विशालने सर्वांना फ्रेंडशिप बँड दिले! माझ्या आयुष्यात मिळालेला पहिला फ्रेंडशिप बँड! एका क्षणी असं वाटलं आपण काय गमावलयं आणि काय कमावलयं! कातळधार ट्रेक आठवला की मला तो फ्रेंडशिप बँड आठवतो! तो हातात घेण्यापासून तो हातात घालेपर्यंत अगणित भाव-भावनांना मी सामोरी गेले.....त्या कातळ पाणधारा आणि डोळ्यातील ह्या शीतल पाणधारा! बरसण हा समान गुणधर्म!

असो. पुण्यात यायला १० वाजून गेले होते.

ट्रेक मस्त झाला. एस.जी. ट्रेकर्स वरचा विश्‍वास दृढ झाला. परंतू एका नवीन ट्रेकर्स सोबत मी जेव्हा ट्रेक करायचं ठरवलं तेव्हा कोणत्या प्रकारची मनस्थिती मी अनुभवली आणि अधिकाधिक ट्रेक मी हयांच्यासोबत का करु शकले हयाबद्दल एक पुर्ण अनुभव मी लिहिणार आहे. तुम्हाला त्याविषयी त्यात वाचायला मिळेलच.

विशाल बद्दल काय लिहू१९-२० वर्षाच्या मुलाच्या ट्रेक हॅन्डल करण्याच्या पद्धतीने मी अतिशय प्रभावित झाले. ट्रेकभर मी त्याचं निरिक्षण करत होते. त्याच्या बरोबरचा हा माझा पहिलाचं ट्रेक होता. सहभागी ओळखीचे नव्हते. पण विशालने हे जाणवूच दिले नाही ही हा माझा पहिला ट्रेक आहे, सहभागी ओळखीचे नाहीत किंवा मला सोबत कोणी नाही आणि मी एकटीच ट्रेकला आलेली आहे! पहिल्याच भेटीत आपला छाप पडण्याची आणि नातं घट्ट करण्याची कला ह्या मुलाकडे आहे!

एस. जी. ट्रेकर्स बरोबर ट्रेक्स सुरु केलेल्याला येत्या ऑगस्ट २०१६ ला  एक वर्ष पुर्ण होईल. हया एका वर्षात त्यांच्या बरोबर आजच्या जुलै तारखेला १५ ट्रेक्स मी केले आहेत.


एका नवीन ट्रेकर्स सोबत सुरु केलेला हा प्रवास कसा वृद्धिंगत होत गेला, का वृद्धींगत होत गेला, काय शिकवत गेला, काय नाती जपत गेला हया सर्वाचा विशाल हा एक मुख्य आणि महत्वाचा साक्षीदार आहे!

No comments: