कलावंतीण दूर्ग: ४ ऑक्टोबर २०१५


हा ट्रेक पनवेलच्या भागात येतो त्यामुळे इथे ऑक्टोबरच ऊन आणि हयुमिडीटी भयानक होती. ट्रेकला सुरुवात झाली आणि भयानक घाम यायला लागला. पाणी पित होते तरिही ते कमी पडत होतं. घामाने पुर्ण अंगच नव्हे तर डोक्यावरचे केसातून देखील घाम निथळत होता. ठाकुरवाडी पुढे चालायला सुरुवात केली आणि नंतर पुढे पाऊल टाकवेना. त्यात पायाला क्रॅम्प आला. विशाल सोबत होता. त्याला म्हणलं, विशाल इथुन पुढचा ट्रेक करण अवघड दिसतयं मी नाही येतं. मी इथेच थांबते”. डीहायड्रेशन होऊन काही झालं तर सगळयांनाच त्रास म्हणून मी ट्रेक करण्याचं टाळलं. विशाल मला प्रोत्साहन देत होता, पुढच्या पायर्‍यांपर्यंत चला”.. पण का कूणास ठाऊक मला पुढचं पाऊल टाकवतचं नव्हत. मी ठाकुरवाडीत थांबते”.असं विशालला सांगितलं. त्याच्या लक्षात आलं आणि त्याने मग समजून घेतलं. पण बिचार्‍याला टेंशन आलं असाव की मॅडमला एकटं कसं वाडीत सोडायचं. एक ट्रेक लीडर म्हणून माझी जबाबदारी त्याच्यावर होती. त्याची मनस्थिती माझ्या लक्षात आली. त्याला म्हटल, तुम्ही काळजी करु नका मी काळजी घेईन”. त्यानं मला एका हॉटेलच्या इथं बसायला सांगितलं. त्या हॉटेल मालकाला माझी काळजी घ्यायला सांगितली आणि मग तो पुढे ट्रेकसाठी गेला. 

हॉटेल मालक, त्याची बायको आणि आजूबाजूची लोक हयांच्यासोबत गप्पा रंगल्या.त्यांच्या घरात लोकप्रिय अभिनेता, सलमान खानचे एक स्केच होते आणि १-२ फोटो देखील होते. हयालोकांनी मग सांगितलं की तिथं जवळचं सलमान खानं चं फार्म हाऊस आहे. त्याची देखभाल हे ठाकूर आदिवासी लोक करतात. सलमान खान १-२ वेळा कलावंतीण दुर्ग चढलेला आहे असं त्यांनी सांगितलं. हया आदिवासी पाडयाला तो मदत करतो. कपडे, साडया पूरवतो. मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलतो. काही लोकांच्या अंगात बिईंग हयुमन हया एनजीओचे टी-शर्ट दिसतं होते. हया लोकांना सलमान खानबद्दल आदर आहे. त्याच्या सोबत काढलेले फोटो ते अगदी आनंदाने दाखवत होते आणि त्याच्या गोष्टी आनंदाने सांगत होते.

हे आदिवासी लोक तिथ नागली आणि वरई पिकवतात.नागलीची भाकरी आणि वरईचा भात बनवतात. गावात चौथी पर्यंत शाळा आहे.अ‍ॅन्थ्रोपोलॉजी मधे डिग्री घेतल्यानंतर आज ठाकुर आदिवासींना प्रथमच जवळून बघत होते आणि त्यांच्याशी संवाद साधत होते. त्यामुळे ट्रेक पुर्ण झाला नसला तरिही मी समाधानी होते.

असो. गडावरुन परत यायला लोकांना जवळजवळ ४.३० वाजले होते. त्यानंतर तांदळाची भाकरी, पिठलं, बटात्याची भाजी, भात इ. चं जेवण केलं आणि मग गड उतरायला सुरुवात केली. गड उतरताना अंधार पडायला सुरुवात झाली होती. पुण्यात यायला रात्रीचे १० वाजून गेले होते.

हा माझा एकच ट्रेक जो अपुर्ण राहिला. मी कारणाचा विचार करत होते. हयुमिडीटी आणि रणरणतं उन हेच कारण असाव. पण त्याची तीव्रता इतकी होती की पाणी पिऊनही काही रक पडला नाही. एकदा हा ही विचार आला की ट्रेक साठी हा कालावधी योग्य नव्हता का? पण माझ्याइतका त्रास कोणाला झाला नाही. काहीवेळा असंही होतं की ट्रेक ९-१० च्या दरम्यान कधी कधी त्याही पेक्षा उशीराने सुरु होतो. सूर्य डोक्यावर येण्याची वेळ असते, हवा/वारं /झाडं नसतात आणि त्यामूळे थकवा अति जाणवतो. 

हा ट्रेक माझ्यासाठी एक शिकवण होता. माझ्या वयाच्या स्त्रियांनी स्वत:ला ट्रेकसाठी कसं तयार करायचं? पहिली आणि महत्वाची गोष्ट आणि ती ही मुलींच्या बाबतीत ही येते की स्वच्छतागृहांचा अभाव. ट्रेकच्या ठिकाणी अशी काही व्यवस्था जवळ जवळ नसतेच. पाणी खूप प्यायचे असते नाहीतर पायाला क्रॅम्प्स येतात आणि डिहायड्रेशनचा धोका निर्माण होऊ शकतो.
 
दूसरं असं की स्वत:च्या शरीराच्या आवश्यकतेनुसार, ट्रेक सुरु करण्याआधी काही तरी खाणे आणि ट्रेक च्या दरम्यान पाणी, लिंबू पाणी, टँग मिश्रित पाणी, ईलेक्ट्रॉल, ग्लूकोन-डी एक एक घोट पीत राहणे किंवा सुकामेवा खात राहणे. ग्लूकोन-डी एकदम पिण्याचे टाळावे नाहीतर मळमळल्यासारखे वाटते. बाजारात ऑरेंज गोळया मिळतात त्या उत्तम. 

पाठीवर कमी ओझे आणि आपल्याला पेलता येईल एवढेच असावे. पाण्याच्या २-३ बाटल्या आवश्यकच असतात. 

शरीर थकले, दम/धाप लागत असेल तर उभ्या उभ्या क्षणभर विश्रांती घेणे.

हया वयात शरीराचा तोल सावरणे कधीकधी जिकीरिचे होते अशा वेळी ट्रेकिंग स्टीक/पोल वापरणे. हयाने तोल सावरण्यास मदत होतेच शिवाय गूडघा आणि कंबरेवर अतिरिक्त भार येत नाही.

इतर अनेक गोष्टी आहेत ज्या ईटरनेटवर उपलब्ध आहेत किंवा ट्रेकच्या माहितीत त्याचा उल्लेख असतो.


हा ट्रेक पुर्ण करण्याची इच्छा आहे, बघू कधी योग येतोय ते!

No comments: