मिड-अर्थ: हरिश्चंद्रगड ट्रेक व्हाया पाचनई रूट:
६-७ फेब्रुवारी २०१६
हरिश्चंद्रगड ट्रेक! एकदा तरी हा ट्रेक करावा असं प्रत्येक ट्रेकरचं स्वप्न!
अनेक वेळा हा ट्रेक करावा असं ट्रेकर्सचं स्वप्न! प्रत्येक मोसमात हा ट्रेक करावा
असं ट्रेकर्सचं स्वप्न! मी ट्रेकर नसले तरिही, ट्रेकिंग सुरु केल्यापासून हे
स्वप्न उराशी बाळगून होते. गुगलवर खूप वाचलं होतं..फेसबुकवर खूप फोटो बघितले होते!
हरिश्चंद्रगड ट्रेकचे तीन मार्ग आहेत, पाचनई-सर्वात सोपा मार्ग, तोलारखिंड
मार्गे-मध्यम कठीण मार्ग आणि नळीच्या वाटेने-अत्यंत कठीण मार्ग!
पाचनई सोडता उरलेल्या मार्गाने हा ट्रेक मला करता येणार
नाही असं माझं मतं झालं होतं. अर्थात जे वाचलं, ऐकल आणि पाहिलं ते बघून! त्यांमुळे
पाचनई मार्गे कोणत्या ग्रुपचा हा ट्रेक आहे का ही शोधमोहीम सुरु होती. अशातच एस.जी.ट्रेकर्सची
पोस्ट बघितली आणि स्वत:च्याचं मताविरुद्ध जाण्याचं धाडस करण्याचा निर्णय घेतला.१७
जानेवारी २०१६ रोजी एस.जी सोबत, तोलारखिंड मार्गे नाईट ट्रेक मी केला आणि प्रत्येक
ट्रेकरला हा ट्रेक का करायचा असतो ह्याची अनुभूती आली!
हा ट्रेक परत परत करणारे ट्रेकर्स आहेत हे माहितचं होतं.
आयुष्यात एकदाचं हरिश्चंद्रगड ट्रेक केला असा ट्रेकर बहुतेक नसावाचं! हा ट्रेकच
असा आहे, एकदा माणूस (तो ट्रेकरचं हवा असं नाही हं) तिथे जाऊन आला की तो परत
जातो...परत परत जात राहतो!
का कुणास ठाऊक पण पाचनई मार्गे ट्रेक करण्याची इच्छा अजूनही
तशीच मनात स्थिरावून होती आणि एक दिवस मिड-अर्थ ची पोस्ट आली. मी तर जाण्याचं
निश्चित केलचं पण सरिता, माझ्या बहिणीलाही येण्यासाठी प्रवृत्त केलं! बहीण
येण्याचं एक कारण हे होतं की मिहीर मुळ्ये हा मिड अर्थ चा कोऑरडीनेटर, सरिताच्या
ऑफिसमधील तिच्या मैत्रिणीचा मुलगा होता!

थोडक्यात काय हा ट्रेक, शंकराला वाहणाऱ्या तीन पाने असलेल्या बिल्वपत्राचा योग साधून आला होता....एक पाचनई मार्ग, दुसरा बहिणीसोबत ट्रेक आणि तिसरा मिहीर!

थोडक्यात काय हा ट्रेक, शंकराला वाहणाऱ्या तीन पाने असलेल्या बिल्वपत्राचा योग साधून आला होता....एक पाचनई मार्ग, दुसरा बहिणीसोबत ट्रेक आणि तिसरा मिहीर!
मिड अर्थ ने ट्रेकची जी आयटनरी बनवली होती ती अफलातून आणि
नाविन्यपूर्ण होती! वाचल्या वाचल्या मला ती आवडली होती. शनिवार, ६ फेब्रुवारीला
साधारण सकाळी ११च्या दरम्यान पुण्यातून निघून “संध्याकाळचा कोकणकडा सूर्यास्त
आणि रविवारी सकाळी तारामतीचा सूर्योदय!” भन्नाटच कल्पना! दोन दिवस
हरिश्चंद्रगडाला देण्याची तयारी मात्र असायला हवी होती!
पुण्यातून खाजगी वाहनाने निघून आम्ही साधारण दुपारी एक-दीड
च्या दरम्यान पाचनई गावात पोहोचलो. मिहिरने ओळख परेड घेतली, जेवण केले आणि साधारण
दोनच्या सुमारास ट्रेक सुरु केला. ग्रुप तसा छोटा होता. १०-१२ जण असू आम्ही.
त्यामुळे सर्वजण एकत्रचं ट्रेक करत होतो. मिहीरच्या अंदाजाने संध्याकाळी चारपर्यंत
आम्ही गडावर पोहोचणे अपेक्षित होते आणि आम्ही साडे-तीनला गडावर पोहोचलो!
ह्या वाटेवर एक जरा कठीण असा रॉक पॅच आहे. तो जरा सांभाळून
पार करावा लागतो. एका वेळी एकच जण इथून चढू-उतरू शकतो. अन्यथा ही कठीण वहिवाट
नाही!
पाचनई मार्ग हा गडावर जाण्याचा सर्वांग सुंदर मार्ग वाटला
मला! एकतर थकायला न लावणारा, गडावर तुलनेने जलद गतीने पोहोचवणारा, तितकाच मनमोहक
आणि वाटेतला तो अतीव सुंदर, अथांग आडवा पसरलेला कातळ कभिन्न पाषाण कडा!
ह्या
कड्याच्या इथे आम्ही स्वत:ला भरपूर वेळ दिला. आजूबाजूचे अफलातून निसर्गसौंदर्य आणि
ह्या कड्याच्या खाली विसावण्याची अनुभूती! माणूस जेमतेम उभा राहू शकेल इतकीच
त्याची उंची! थंडाई देणारा, शीण घालवणारा, मन आणि शरीर ताजेतवाने करणारा असा हलकासा
गार वारा! आणि कड्याखालील शीतल सावली! असं वाटावं की हा कडा ह्याच साठी तयार झाला
असावा. लोकांनी यावं आणि कड्याखाली थोडं विसावं! श्रीकृष्णाने करांगुलीवर पहाड
उचलला आणि मथुरा-द्वारकावासीयांना आश्रय मिळाला त्याचीचं आठवण हा कडा पाहून होते!
दीड तास चालल्यावर लांबून जेव्हा शंकराचे मंदिर दिसले
तेव्हा मी जाम खूष झाले! “अरे आलो पण आपण” असे झाले! नुकताच तोलारखिंड मार्गे
केलेला ट्रेक आठवत होता. हा मार्ग लेंदी, लांबलचक, थकवणारा आणि स्टॅमीना पारखणारा
आहे!


मंदिरातच रात्री झोपण्याची योजना असल्याने सामान तिथेच स्थिरावले.
सूर्यास्ताची वाट पाहत, गार वारा अंगावर झेलतं असताना
मनमुराद मिळणारा चहा आणि मॅगी!
वाव...अफलातून बेत! मिहीर आणि मिड-अर्थचं हे करू शकतं!!

सूर्यास्ताचा दरवळ मनात साठवतचं आम्ही मंदिरापाशी परत आलो.
झोपण्यासाठी टेंट ची व्यवस्था करण्याचा विचार करत असतानाचं मंदिराच्या आवारात साप
दिसला. साप विषारी आहे की नाही ही चर्चा झाली....सगळेच घाबरले आणि आवारात
झोपण्याचा बेत रद्द झाला!
घरातील चिमणीच्या प्रकाशात फक्कड जेवण झाले! शेकोटी पेटवली
गेली.
शेकोटीची झळ आणि अंगावर येणारे अग्नितुषार त्या गारठ्यात ऊब पसरून गेले!
गडावरचे घरगुती जेवण, शेकोटी आणि टेंट मधे निद्रा हा पण एक
रोमँटीक, सुखद अनुभवच! निद्रा अर्थात झोप ही पण एक अजब अवस्था आहे! आली की
आली....आल्हाददायक वातावरणातही ती येते, रोमँटीक वातावरणातही ती येते, प्रकाशातही
ती येते, अंधारातही ती येते, उघड्यावही ती येते, बंदिस्त खोलीतही ती येते, घरातही
ती येते गडावरही ती येते, आपल्या गावातही ती येते, परक्या गावातही ती येते, शांततेतही
ती येते, गोंधळ-गोंगाटातही ती येते! आहे ना अजब-गजब अवस्था!
सकाळी पाच वाजता उठलो. गारठा चांगलाच जाणवत होता. स्वेटर,
कानटोपी अंगावर विसावलेचं होते! अशा गारठ्यात गरम गरम चहा! एक कप....दोन---तीन....
टॉर्च घेऊन तारामती पीक कडे निघालो. एक बऱ्यापैकी मोठा, पण तितकासा कठीण
नसणारा रॉक पॅच आम्ही पार केला आणि पाहतो तो काय आम्ही तारामती पीक वर होतो! एरवी
अंधारात किमान एक-दीड तास लागणारा वेळ हा रॉक पॅच पार केल्याने केवळ अर्धा-पाऊण तासातच
कव्हर जाहला!


तेच सोनेरी किरण आपल्या चेहऱ्यावर पसरवून “सोनेरी व्हा, स्वयं-प्रकाशित व्हा” असा आपल्याला संदेश देणारा... तो तेजोगोल!
गाणी आठवत होती....ओंकार स्वरूपा तुज नमो.....सुर्व्या आला तळपून गेला...गगन सदन तजोमय....गानवंदना....हेच होत सूर्याला अर्घ्य!
उगवते सूर्यबिंब मनात साठवत तारामती पीक उतरायला सुरुवात
केली. हा रस्ता देखील अति सुंदर होता पण थोडा लांबलचक होता. उतरायला जवळ जवळ एक
तास लागला. खाली गेल्यावर मस्त पोहे खाल्ले, चहा घेतला आणि थोडी विश्रांती घेऊन गड
उतरायला सुरुवात केली. गड उतरत असतानाही मागे मागे वळून बघितलं जात होतं. हेच ह्या
स्थळाचं वेगळेपण!
हरिश्चंद्रगड हा एक कथापुराण आहे, एक शिवालय आहे,
कलात्मकतेचा एक नमुना आहे, एक सौदर्यविष्कार आहे, पवित्रलंकार आहे आणि एक शौर्य
आहे!
अशा ठिकाणी येणारी तरुण पीढी जेव्हा दारूच्या बाटल्या
फोडते, सिगरेटी फुंकते तेव्हा मन विषण्ण होतं. कोणी बदलाव हे? स्वत: तरुण पिढीने, गडावर
राहणाऱ्या रहिवाशांनी की आणखी कुणी? गडाचं पावित्र्य राखता येत नसेल तर ह्या
पिढीला इथे येण्याचा अधिकार आहे का? हे खरचं ट्रेकर्स आहेत का?
ह्या ट्रेकच्या निमित्ताने मिहीरला जवळून पाहता आलं. अतिशय
संवेदनशील, लाघवी, मृदुभाषी, समजूतदार मुलगा! ग्रुपला मॅनेज करताना तो किती चांगला
लीडर आहे हे पण लक्षात येत होत. वेळेचं गणित त्याने इतकं सुंदर जमवलं होतं की
सगळ्या गोष्टी जशा ठरवल्या होत्या तशाच त्या झाल्या!
मिहीर, यु आर सिम्पली ग्रेट!
मिहीर, यु आर सिम्पली ग्रेट!

हरिश्चंद्रगड ट्रेक दोनवेळा, दोन वेगळ्या मार्गाने करता आला
ह्याचं असीम समाधान आहे आणि नळीच्या वाटेने ट्रेक करण्याचं स्वप्न मनात तग धरून
आहे! बघुयात हरिश्चंद्रगड पुन्हा कधी साद देतोय ते!
1 comment:
Post a Comment