अंधारबन!
------ताम्हिणी घाटातून कोकणात उतरणारा एक घाटमार्ग!
------पिंपरी डॅम ते भिरा डॅम ह्यांना सांधणारा,
साधारण १३ किमी. चा एक ट्रेकमार्ग!
-----पिंपरी, ता. मुळशी, जि. पुणे पासून सुरु होणारा
आणि पाटनुस, ता. माणगाव, जि. रायगड इथे संपणारा रेंजमार्ग!
-----कुंडलिका व्हॅली, कोसळणारे धबधबे, पाण्याचे झरे ह्यांची
सोबत करणारा एक जलमार्ग!
-----१३ किमी च्या पट्ट्यात पुणे आणि रायगड
जिल्ह्यांच्या कडेवर वसलेल्या "हिरडी" गावाला जोडणारा जंगलमार्ग!
-----साधारण २८०० फुट (८५० ते ९०० मी) उंचावरील पठारावर विविध रानफुलांनी
गजबजलेला जैवमार्ग!
-----तैलबैला, घनगड, सरसगड इ. गडांच्या कुशीतून जाणारा पर्वतमार्ग!
असं हे
वैविध्यपूर्ण अंधारबन!
“आउटडोअर
व्हेंचर्स” ह्या ट्रेकिंग ग्रुप सोबत मी हा
ट्रेक करणार होते!
पिंपरी ह्या बेस
गावात साधारण ११ वाजता उतरलो तेव्हा गावाला धुक्याच्या चादरीने वेढलेलं होतं. पिंपरी धरणाचा जलाशय अफलातून दिसत होता!
ट्रेकच्या सुरुवातीलाचं बेडूकरावांनी दर्शन दिले. गवताच्या पांघरूणात मस्त
सुस्तावला होता! १-२ मिनिटाने हालचाल केली, डोकं वर काढलं आणि परत निपचित पडून
राहिला! त्याच्या ह्या हरकतीचे आश्चर्य वाटले जरी असले तरी त्याच्या ह्या अवस्थेचा
फोटो काढण्याची यथेच्छ संधी मिळाल्याने मी आणि विभा (ट्रेक कोऑर्डीनेटर) खुश झालो!
थोडीशी पुढे
गेले तर काय एक छोटूसं फुलपाखरू पाना-फुलाला गोंजारत होतं. फुलपाखराची ती हालचाल मी
निरखून पाहत होते आणि चक्क त्याला काहीही फरक पडत नव्हता! माझ्या चाहुलीने ते
दूरवर उडून गेलं नाही की जवळच्या इतर फुलांवर घोंघावतही राहिलं नाही!
ह्या आनंदातचं
पुढचा ट्रेक सुरु केला. कुंडलिका व्हॅलीचे निसर्गरम्य चित्र हा या ट्रेकचा एक नयनमनोहारी व्ह्यू पॉइन्ट आहे.
ट्रेकमार्गावरील धबधबे आणि झऱ्याच्या पाण्याची पातळी विलक्षण घटली होती.
आता समोर मनमोहक रानफुलांची सलग रेलचेल पाहून अत्यानंद झाला! एकेका फुलाचा किमान एक तरी फोटो काढण्यासाठी मोबाईल बाहेर आला, फोकस अॅडजेष्ट झाला आणि डोळ्यांवरचा चष्मादेखील हनुवटीवर विसावला! ट्रेकच्या सत्तर टक्के भागापर्यंत, म्हणजे हिरडी गावापर्यंत फुलेचं फुले! काही फुले एकटीचं डोलत होती, काही आपल्या भावंडासोबत बागडत होती. काहींनी स्वत:ला झाडाच्या पानात लपवलं होतं. काहींनी पाणझरा तर काहींनी खळाळत्या पाण्याला बांध घातलेल्या दगडगोटयांना आपलसं केलं होतं!
ट्रेकमार्गावरील धबधबे आणि झऱ्याच्या पाण्याची पातळी विलक्षण घटली होती.
आता समोर मनमोहक रानफुलांची सलग रेलचेल पाहून अत्यानंद झाला! एकेका फुलाचा किमान एक तरी फोटो काढण्यासाठी मोबाईल बाहेर आला, फोकस अॅडजेष्ट झाला आणि डोळ्यांवरचा चष्मादेखील हनुवटीवर विसावला! ट्रेकच्या सत्तर टक्के भागापर्यंत, म्हणजे हिरडी गावापर्यंत फुलेचं फुले! काही फुले एकटीचं डोलत होती, काही आपल्या भावंडासोबत बागडत होती. काहींनी स्वत:ला झाडाच्या पानात लपवलं होतं. काहींनी पाणझरा तर काहींनी खळाळत्या पाण्याला बांध घातलेल्या दगडगोटयांना आपलसं केलं होतं!
तेरडा आणि सोनकी |
गालगोंडा आणि रानहळद |
चाहोळा आणि रानआलं |
गेंद आणि जांभळी चिरायत |
वरून डावीकडे: रानवांगी आणि कारवीकळी खालून डावीकडे: रानअबोली आणि युट्रीक्यूलॅरिया |
ढाल तेरडा |
अंधारबन, साधारण दोन मोठे धबधबे सोडले की हे वन अधिकचं दाट होतं जातं. मग ऊन-सावलीचा खेळ!
दुतर्फा घनदाट झाडी आणि मधून जाणारी पायवाट!
हे वन दाट होत गेलं आणि बागडणारी फुले कुठल्या कुठे गायब झाली! इथे दिसत होती फक्त उंच उंच झाडी आणि विविध आकाराची पाने. काही झाडांची पाने दुमडल्या गेली होती आणि पानाखालची चंदेरी बाजू वर आल्याने उन्हाच्या प्रकाशात ती झळाळत होती. ठिकठिकाणी चकाकणारी ही पाने जंगलाचे सौदर्य खुलवत होती!
पावसाने ओले आणि थोडेसे कुजलेले खोड आणि त्यावर उगवलेली विविध आकाराची, रंगाची मशरुम्स! काही ठिकाणी ह्या मशरुम्स मुळे चक्क नक्षीकाम झालेले पहायला मिळतं होते!
रानफुले, मशरुम्स, अंधारलेलं वन इ. आनंद घेत ट्रेक सुरु होता. सुरुवातीला लागलेली धुक्याची चादर
कुठल्या कुठे उडून गेली होती आणि तळपते सूर्यकिरण चटका लावत होते! प्रत्येक
झऱ्यावर पाणीग्रहण होतं होतं आणि शरीरावर घेतलेल्या पाण्याच्या तुषारांनी आलेली
शीतलता पुढील ट्रेकसाठी उभारी देत होती!
दुपारी साधारण तीनच्या दरम्यान आम्ही हिरडी (ता. रायगड) गावात पोहोचलो. ट्रेकच्या
मध्यमार्गावर हे एकचं गाव आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असणारे २०-२५ घराचं गाव.
गावात घरगुती एक हॉटेल आहे जे ट्रेकर्स साठी चहा-नाश्ता, जेवणाची व्यवस्था करतात.
गावात ताडा-माडाची झाडे बघायला मिळाली. दिवाळीनंतर ह्या झाडांपासून, इथले आदिवासी
लोक ताडी गोळा करतात जी ३-४ महिने टिकते आणि पंचवीस रुपये ग्लास अशी विकली जाते.
ह्या गावाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते इथलं पेशवेकालीन शिवमंदिर! गावातून ५-७
मिनिटाच्या अंतरावर भात शेतीच्या बांधावरून जात तलावाकाठी हे मंदिर आहे!
मंदिराच्या आवारात पाण्याचे कुंड आणि नंदी शिल्प आहे.
भिकाजी मेंगडे ह्या ७०-८० वर्षाच्या बाबांच्या
माहितीनुसार, कुंडातील ह्या पाण्याचे उगमस्थान गुप्त असून पाण्याचा मार्ग
मंदिरातील गोमुखातून बाहेर येऊन शिवलिंगावर त्याचा अभिषेक होतो! महाशिवरात्रीला
इथे शिवोत्सव भरतो!
मंदिरावर मोडी लिपीत काही लिहिले आहे, ते अस्पष्ट झाले आहे आणि
ते नक्की काय लिहिलेले आहे ह्याचा शोध लागला तर ह्या पवित्र स्थळाच्या माहितीत भर
पडेल.
मंदिराचा कळस गोपूरसमान असून त्यावर ॐ चित्रित केला आहे! गावातील घरांपासून थोडे
दूर असलेल्या ह्या मंदिर भागात नीरव शांतता आणि प्रसन्नता अनुभवास येते!
हा ट्रेक केला तर ह्या मंदिराला भेट द्यायला विसरू नका!
हिरडी गावातून आम्ही उतरायला सुरुवात केली आणि पावसाने अचानक हजेरी लावली! जो बेमालूम कोसळला तो पायथ्यापर्यंत! उतारावरील दगडमार्गावर गढूळ पाण्याचे लोट वाहू लागले. उतरायचा वेग कमी झाला.
हिरडी गावातून आम्ही उतरायला सुरुवात केली आणि पावसाने अचानक हजेरी लावली! जो बेमालूम कोसळला तो पायथ्यापर्यंत! उतारावरील दगडमार्गावर गढूळ पाण्याचे लोट वाहू लागले. उतरायचा वेग कमी झाला.
ट्रेकमधला हा
टप्पा अगदीचं कंटाळवाणा! दगडधोंड्यांची वाट संपता संपत नाही! सपाट जमीन पायाखाली
येण्यासाठी मन तरसलं!
शेवटचा मोठा झरा
लागला आणि पायथा जवळ आल्याच्या जाणीवेने हुश्श झालं! तरीपण पायथ्याशी, पाटनुस गावात यायला पंधरा-वीस मिनिट लागले! थोडक्यात काय
पावसामुळे उतरणीला जवळजवळ अडीच तास लागले!
ह्या ट्रेक
प्रवासात “विवान” नावाच्या
साधारण १० वर्षाच्या मुलाच्या कुटुंबाशी ओळख झाली. विवानला निसर्गाची आवड आहे
म्हणून हे सर्वजण ट्रेकला आले होते. मला कौतक वाटलं ह्या गोष्टीचं! मुलाची आवड
जपणारे, त्याला पाठींबा म्हणून त्याच्यासोबत कष्टप्रद ट्रेक
करणारे पालक, ट्रेक दरम्यान खूप कमी पाहायला मिळतात! माझी
ट्रेकची सुरुवात ऐकून ते म्हणे, “हा चांगलाच छंद लावून
घेतलाय तुम्ही स्वत:ला....रिटायर्ड होण्याच्या वयात तुम्ही ट्रेक सुरु केला, कमाल आहे”. असो.
संध्याकाळी ७.३०
वाजता आम्ही पाटनुस सोडलं आणि रात्री ११ वाजता पुण्यात पोहोचलो!
ह्या वर्षीच्या
मोसमात सततच्या जोरदार पावसाने “जाण्यास
धोकादायक” असा शिक्कामोर्तब झालेला, नदीच्या
पाण्याची पातळी वाढल्याने परतीला पाठवलेला, नदीप्रवाहात
काहींना सामावून घेतलेला... असा हा ट्रेक, पासचा जोर थोडा कमी झाल्यावर ह्या महिन्याच्या
सुरुवातीला ठेवल्याने आम्हाला मात्र आनंद आणि सुखद आठवणी देऊन गेला!
अंधारबन, विचार करताना, हे ठिकाण इतर कशापेक्षाही “रानफुलांची जैवभूमी” म्हणून नावारूपास यावे असे
मला मनापासून वाटले!
फ्रेंड्स, खारीच्या वाटयाने का होईना, करूयात का
ह्यासाठी प्रयत्न?
रानफुलांची ओळख: श्री. राजकुमार डोंगरे
मन:पूर्वक धन्यवाद !
पुढील ट्रेक ब्लॉगमध्ये ह्या "वना" विषयी सविस्तर लिहायला मला जास्त आवडेल..वनाचा प्रकार, झाडे, पानांचे प्रकार इ. .बघू शक्य होतयं का ते.......
४ सप्टेंबर २०१६ रोजी केलेल्या ट्रेकचे वर्णन वाचण्यासाठी खालील लिंक फॉलो करा:
No comments:
Post a Comment