ॐ गं गणपतये नम:
भाद्रपद शु. १२, प्रदोष आणि उत्तराषाढा नक्षत्रावर
“मिस्टेरीअस रेंजर्स” ह्या ट्रेकिंग ग्रुपचे आम्ही १५ जण “गणपती गडद केव्ह्ज” ला
भेट देण्यासाठी निघालो. डोंगर, जंगल आणि खडकात खोदलेल्या लेण्यात विसावलेल्या, श्री. गणेशाचं दर्शन गणेशोत्सवात घेण्यासाठी एक सुंदर
मुहूर्त जुळून आला होता.
माझ्या असं वाचनात आलं की गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री.
गणेश आपल्या भक्तांसाठी पृथ्वीतलावर अवतरतो थोडक्यात गणेशोत्सव म्हणजे निराकार
गणेशाची साकार रुपात अनुभूती! ट्रेकच्या माध्यमातून ही अनुभूती घेण्यासाठी खालील गणेश
आराधना करून आम्ही निघालो,
||वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभं
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा||
सकाळी सहा वाजता पुण्यावरून प्रस्थान केलं. आळेफाटा-कल्याण
रोड मार्गे माळशेज घाटातून मार्गक्रमण करत सोनावळे, ता. मुरबाड, जि. ठाणे हे
पायथ्याचं गाव गाठलं! पुण्यापासूनचा साधारण १५० किमी चा हा प्रवास करून सकाळी
११.४५ च्या दरम्यान आम्ही सोनावळे गावात पोहोचलो. गावाच्या मुखाशीच असलेल्या ह्या
बोर्डने लक्ष वेधून घेतलं! “श्री. गणेश लेणी चॅरिटेबल ट्रस्ट, सोनावळे” आमच्या
गाईड कडून ह्या ट्रस्ट ची अधिक माहिती कळाली जी खाली ओघाने वाचायला मिळेलचं
ट्रस्टचे दोन कार्यकर्ते आणि आमचे गाईड यांच्या
मार्गदर्शनाखाली आम्ही १२ वाजता ट्रेक सुरु केला. ट्रेक मार्गावर गाईडशी बोलताना
हे समजलं की ह्या “गणेश लेण्या” अर्थात खडकात खोदलेल्या गुहा (स्थानिक लोक गुहांना
“गडद” म्हणतात), साधारण ५०० मी. उंचावर असून जंगलातून पायवाट तिथपर्यंत
जाते. जैवविविधतेने नटलेल्या ह्या जंगलात विविध प्रकारची फुले, फुलपाखरे, महुआची
झाडे (ज्यापासून औषधी गुणधर्म असलेली दारू बनवतात) तर आहेतच पण पट्ट्याचा वाघ,
बिबट्या ही हिंस्त्र श्वापदे देखील आहेत.
ट्रेकचा रस्ता सुरु झाला तो मुळी चढाईनेचं! आजूबाजूला घनदाट
जंगल, लहान-मोठे आकार असलेली झाडे आणि पाने, रंगीबेरंगी रानफुले, खळाळणारे झरे आणि
आजूबाजूला दिसणारे असंख्य धबधबे हे चढाईने आलेला थकवा घालवत असले तरी पडत असलेल्या
पावसाने निसरड झालेलं होतं आणि ह्या मार्गावर चढण्या-उतरण्यासाठी अवघड असलेल्या ३-४
पॅचेसमुळे ट्रेकमध्ये थोडं थ्रिलिंग पण आलं! हे पॅचेस पावसामुळे दगडावर साचलेल्या
शेवाळामुळे, निसरत्या चिखलामुळे, दोन दगडातील उंच अंतराने आणि अरुंद पायवाटे मुळे थोडे
आवाहनात्मक वाटले. एकमेकांना मदत करत साधारण दुपारी दोनच्या दरम्यान आम्ही
लेण्यांजवळ पोहोचलो.
लेण्यांकडे जाणारी पायवाट खूपचं अरुंद वाटली आणि एका बाजूला
दरी असल्याने तिथून काळजीपूर्वक जावे लागले. लेण्यांकडे जाता जाता तो अखंड खडक पाहत
असताना जाणवले की साधारण १८०-२०० मी. लांबीच्या दगडात ह्या लेण्या कोरलेल्या आहेत.
एका बाजूला लेण्या, दुसऱ्या बाजूला धसाई धरणाचे पाणी, लेण्यांवरून कोसळणारा प्रचंड
मोठा धबधबा आणि पाण्याच्या धबधब्याच्या आवाजा व्यतिरिक्त असणारी असीम शांतता...
जंगलमार्गातून दूरवरून आकर्षक दिसणाऱ्या ह्या लेण्या
प्रत्यक्ष पाहताना खुपचं साध्या पण विलोभनीय वाटल्या आणि दगडात कोरलेल्या ह्या
लेण्यांच्या उत्पत्तीबद्दल आणि श्री. गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेबद्दल1 असंख्य प्रश्न मनात निर्माण झाले.
गाईडच्या माहितीनुसार, प्राचीन काळात पुणे-कल्याण/
कल्याण-मुरबाड-नाणेघाट ह्या व्यापारी मार्गावरील व्यापाऱ्यांच्या विसाव्याचे हे एक
ठिकाण होते. ह्या लेण्यांमध्ये विसाव्यासाठी १०-१२ खोल्या आहेत, पाण्याचे कुंड
आहेत आणि ते झाकण्यासाठी लाकडी फळी जोडण्याची व्यवस्थाही केलेली आहे. सोनावळे
गावाजवळील डोंगरात कोरलेल्या ह्या हिंदू लेण्या दोन मजली असून खालच्या मजल्यावर
विसाव्याच्या खोल्या तर वरच्या मजल्यावर गणेश मंदिर आहे.
गणेश मंदिराच्या
प्रवेशद्वारावर गणेश प्रतिमा कोरलेली आहे. गणेश मंदिर बंद करण्यासाठी दरवाज्याची
व्यवस्था ही आहे. गणेश मंदिरात प्रवेश करण्यासाठी दगडात कोरलेल्या ६-७ पायऱ्या
(खोबण्या) आहेत.
मंदिरात प्रवेश करताच समोर प्रचंड मोठे ध्यानधारणा/प्रार्थनास्थळ/
सभामंडप असून आणि समोर शेंदूर लेपित गणेशमूर्तींचे दर्शन घडते. ह्या उजव्या
सोंडेच्या गणेशमूर्ती आहेत. उजव्या सोंडेच्या मूर्ती खूप शक्तिशाली आणि जागृत असतात
आणि त्यामुळेचं ह्या स्थळाचे धार्मिक महत्व अनन्यसाधारण आहे अशी माहिती गाईडने
दिली.
ह्या मूर्तींच्या मागेच एक भुयारी मार्ग आहे (सध्या तो बंद आहे) जो शिवनेरी गडावर निघतो असे गाईडने सांगितले.
बाजूलाचं राम-लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची मूर्ती आहे.
गणेशाचे हे मंदिर चार खांबावर उभे आहे.
वरच्या बाजूने लेण्यांवर कोसळणारा प्रचंड मोठा धबधबा, गणेश
मंदिरावर अभिषेक करण्यावत भासला मला!
गणेश मंदिराच्या बाहेरील निसर्ग नजरा हा अप्रतिम आहे. घनदाट जंगल, धसाई धरणाचा जलाशय आणि कोसळणारा धबधबा!
जैवविविधतेने नटलेल्या ह्या जंगलात ट्रेक मार्गावर बरीच
फुले नजरेत आली जसे, शिंदोळी (जंगली हळद/रानहळद), कळलावी (अग्निशिखा), विविध
आर्किड्स इ.
अफाट जंगलात, नाणेघाट, जीवधन, दुर्ग-ढाकोबा, सिद्धगड,
गोरखगड किल्ल्याच्या वेढलेल्या खडकात वसलेल्या ह्या लेण्या अप्रतिम कलाकृतीचा
नमुना आहे.
काही वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ह्या
लेण्यावरील धबधब्यावर रॅप्लिंग होतं, लेण्यांना भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही
जमेची बाजू असली तरी भेट देणाऱ्यांनी लेण्यांमध्ये लिहिलेली नावे पाहून जनजागृतीची
किंवा ट्रस्ट कडून अशा गोष्टींवर बंधन आणण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशी मनीषा
निर्माण झाली!
आमचा परतीचा प्रवास साधारण ३.३० वाजता सुरु केला.
मध्यमार्गावर असलेल्या धबधब्यात भिजण्याचा आनंद ट्रेक सहभागींनी घेतला.
सुरस
भोजनाचा आस्वाद घेऊन संध्याकाळी ७ वाजता निघून पुण्यात ११.३० ला पोहोचलो.
परतताना एका ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठिकाणाला भेट
देण्याचे समाधान होते आणि गणेशोत्सवात साकार रूपातील दर्शन घडलेल्या ह्या “गणेश
लेण्यां” मुळे मन तृप्त होते!
ट्रेकच्या निमित्ताने दर्शन झालेल्या ह्या अनुभूतीचा शेवट श्री.
गणेशाच्या एका श्लोकाने करते,
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे|
माथा शेंदूर झरे वरी बरे, दुर्वांकुराचे तुरे|
माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोनी चिंता हरे|
गोसावसुत वासुदेव कवी रे, त्या मोरयाला स्मरे||
गणपती बाप्पा मोरया||
मित्रहो, डोंगराच्या कुशीत वसलेल्या आणि खडकात खोदलेल्या लेण्यासहित ह्या शांततामय रम्य ठिकाणाला एकदा तरी अवश्य भेट द्या!
फोटो आभार: ट्रेक टीम
ट्रस्ट बद्दल थोडेसे: साधारण दोन-तीन वर्षापूर्वी हे ट्रस्ट स्थापन
झालं. “गणपती गडद” ट्रेक मार्गावर काही सुधारणा त्यांच्याकडून करण्यात येत आहेत, जसे,
रस्ता बांधणी, प्रशिक्षित गाईड नेमणूक, आपत्कालीन व्यवस्थेत सोय, भेट देणाऱ्यांची
नोंद, गाईड सक्तीचा, दर महिन्याच्या चतुर्थीला गणेशापूढे दिवाबत्ती आणि लेण्याची
स्वच्छता, ट्रेकर्स, पर्यटक, भाविकांची राहणे-खाण्याची व्यवस्था, वाहनाची
व्यवस्था, मोठ्या झऱ्यांचा पाण्याचा जोर दगड टाकून आणि त्याला लोखंडी तारेने आवळून
ताब्यात आणला आहे जेणे करून झरे पार करणे सोपे जावे आणि अनहोनी होण्यास अटकाव
व्हावा, ट्रेक मार्गावर ट्रेकर्सच्या विसाव्यासाठी गार्डन बांधण्याचा ट्रस्टचा
विचार आहे आणि त्यासाठी मुरूम येऊन पडला आहे आणि पावसाळा संपला की त्याचे काम सुरु
होईल, रस्त्यालगत वृक्षारोपणाचेही काम सुरु आहे, वरच्या पठारावर पाण्याची टाकी
बांधून झऱ्याचे पाणी पाईप लाईनने टाकीत साठवले जाणार आहे जेणे करून “गणेश
दर्शनाला” येणाऱ्या लोकांची पाण्याची गरज भागली जावी, ट्रस्ट गुहेची स्वच्छता
राखण्यासाठीही प्रयत्नशील आहे, ह्या “गणेश लेण्या” ट्रेकर्स आणि भाविकांपर्यंत
पोहोचविण्यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील आहे, आलेल्या ट्रेकर्स, भाविकांसाठी सुरस
अन्नाची व्यवस्थादेखील हे ट्रस्ट करत आहे! लेण्यांचे आणि जैवविविधतेने नटलेल्या
जंगलाचे जतन करण्यासाठी हे ट्रस्ट सतत कार्यरत आहे!
No comments:
Post a Comment