घाटवाट, आहुपे- बैलघाट मार्गे खोपीवली!
आहुपे घाट - खोपीवली मार्गे कोकणात उतरतो. आहुपे हे आंबेगाव तालुका- पुणे जिल्ह्यातील गाव! खोपीवली हे मुरबाड तालुक्यातील- ठाणे जिल्ह्यातील एक गाव! बऱ्याच रेंज ट्रेक, घाट वाटांची खासियत कदाचित हीच की ते जिल्ह्याची सीमा ओलांडतात!
आहुपे घाट - खोपीवली मार्गे कोकणात उतरतो. आहुपे हे आंबेगाव तालुका- पुणे जिल्ह्यातील गाव! खोपीवली हे मुरबाड तालुक्यातील- ठाणे जिल्ह्यातील एक गाव! बऱ्याच रेंज ट्रेक, घाट वाटांची खासियत कदाचित हीच की ते जिल्ह्याची सीमा ओलांडतात!
विशाल काकडे, स्वप्नील खोत, उदय मोहिते सर, सागर मोहिते आणि
मी...फ्रेन्डशिप डे (मैत्री दिवस) चं औचीत्य साधून सकाळी ६.१५ च्या
पुणे-त्र्यंबकेश्वर एस.टी ने मंचरसाठी शिवाजीनगर एस.टी स्टॅन्ड वरून निघालो.
साधारण ८ च्या दरम्यान मंचर आलं. चौकशी अंती समजलं की ९.३० ला आहुपेची गाडी आहे.
“मयूर हॉटेल-मिसळ आणि जिलेबी स्पेशल”...आमचा मित्र राजकुमार ने सुचविलेलं.
मिसळ-पाव, जिलेबी, चहा वर ताव मारला .फरसाण –भेळ बांधून घेतली आणि ९.३० च्या आहुपे
एस.टी. मधे बसलो. थोड्या वेळातचं सर्वांना बसायला जागा मिळाली.
डिंभे धरण आलं आणि ह्या ट्रेकच रुपचं बदललं. निसर्गाने
वास्तव्यासाठी जणू हाच मार्ग निवडला होता. डिंभे धरणाचा विस्तीर्ण जलाशय, धरणाच्या
कडेने जाणारा एस.टी. चा मार्ग, पावसाच्या विश्रांतीमुळे दिसणारं स्वच्छ, निरभ्र
निळशार आकाश, घनदाट झाडी, मधूनचं दर्शन देणारी विविध रंगी फुले, भाताचा सुगंध आणि आदिवासी
धाटणीची घरे....एस.टी. च्या खिडकीतून बाहेर बघून बघून मान आखडून आली.
आहुपे यायला १२ दुपारचे सव्वा बारा वाजले! एका घरी चहा
घेतला. स्माईली चे पिवळेधमक चेंडू लहान मुलांना मिळाल्यावर त्यांच्या संगतीतील निरागस
हास्याने आमचा “मैत्री दिवस” साजरा झाला!
गावातील सुप्रसिद्ध “कडा” बघितला. कडा हा एक व्ह्यू पॉइन्ट
आहे जिथून कोकणचे विलोभनीय दर्शन घडते!
खासकरून गोरखगड आणि मच्छिंद्रगडामुळे आहुपे गाव प्रसिद्ध
आहे! इथल्या लहान मुलांपासून म्हाताऱ्या स्त्रियांपर्यंत सर्वांना “ट्रेकिंग” ला लोकं
आल्यावर त्यांच्या गरजा काय असतात ह्याची माहिती आहे. गावात काय काय बघण्यासारखं
आहे ह्याची नामावली ते सांगतात. आपलं गाव नितांत सुंदर गाव आहे, निसर्ग सौदर्याने
बहरलेलं आहे ह्याची त्यांना छानशी जाणीव आहे. गावात खानावळ, राहण्याची व्यवस्था
सर्वकाही आहे. पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या किनाऱ्यावर असलेले हे गाव ३८५५ फुट
उंचीवर असून, मंचर गावापासून साधारण ७५-८० किमी. अंतरावर आहे. असो.
एक वाजता आहुपे मधून निघालो. दोन दिवसाची पावसाची उघडीप
असली तरीही हलक्याश्या सरी बरसतचं होत्या. ह्युमिडीटी चांगलीच जाणवत होती!
खोपीवली पर्यंतचा हा उतार दोन तासात पार होतो असं
गावकऱ्यांनी सांगितलं. हा तीक्ष्ण उतार आहे, तो ही जवळजवळ ८० डिग्री मधला. उतार मार्ग ही दगडांची पायवाट आहे. सुदैवाने
दगडावर फारसं शेवाळ साठलेलं नव्हतं आणि दगडी कपारीत फारसा पाणीसाठा देखील नव्हता.
हा उतार लोभसवाणा भासत होता. आजूबाजूला गर्द झाडी, डोंगर कपारी, दरी, छोटे छोटे धबधबे,
उडणारी फुलपाखरे आणि छोटी पांढरी अगणित रानफुले! पांढरी आणि गुलाबी रंगाची ही
असंख्य फुले ह्याच पट्टयात बघायला मिळाली.
नजरेच्या टप्प्यात गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे जुळे गड मोहक
दिसत होते. ते पाहताना गावातल्या लोकांबरोबरच्या गप्पा आठवल्या. ते म्हणाले होते, “गोरखगड
चढायला अवघड आहे. गडाला पायऱ्या आहेत ज्या हाताच्या आधाराने (बेडकासारखे) चढाव्या
लागतात. उतरायला ह्या पायऱ्या अधिक कठीण आहेत कारण त्या हाताच्या आधारानेच पण
पाठमोऱ्या उतराव्या लागतात. पावसाळ्यात हा ट्रेक धोकादायक आहे”.
संध्याकाळचे चार वाजत आले होते तरीही खोपीवली गावाचा
थांगपत्ता लागत नव्हता. अर्थात ह्या उताराला आम्ही खूप वेळ दिला. ह्या उतराईच्या
घाटाला “बैलघाट” म्हणतात. अर्थात कोकणात उतरायला व्यापारी मार्ग असलेली ही ऐतिहासिक “गुरांची वाट”
!
आहुपे गावातील आदिवासी लोकं देखील कोकणात उतरायला ह्याच
मार्गाचा अवलंब करायचे असं म्हणतात.
आहुपे गाव आणि घाट रस्त्याची खासियत ही की ह्याला भीमाशंकर,
गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, दमदम्या डोंगर, दुर्ग ढाकोबा सारख्या विलोभनीय
गडांच सौंदर्य लाभलेलं आहे!
खोपीवली गावाच्या अलीकडे एक नदी लागली. मुलांनी आणि पार्ले-जी बिस्किटा्ंनी
पाण्यात डूबण्याचा आनंद घेतला.
पाण्यात डूबण्याचा आनंद घेतला.
अनवाणी पायाने नदी ओलांडताना नदीतले गारगोटे तळपायाला इतके
टोचले की काहीवेळ तळपाय हुळहुळे झाले.
खोपीवली गावात पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे पाच वाजून गेले होते.
एका घरी चहा-पोहे, खाकरा-चटणी आणि माहिमचा हलवा खाल्ला आणि पुढच्या प्रवासाला
सुरुवात केली.
काही तासात विभाग बदलला, भूप्रदेश बदलला, पावसाचे सरासरी
प्रमाण बदलले, स्त्रियांचा पेहराव बदललेला, चेहऱ्याची ठेवण बदललेली, बोलण्याचा हेल
बदललेला, भाताचा नामप्रकार बदललेला.... रेंज ट्रेकचं हे वैशिष्ट्य मला विशेष
भावलं!
परतताना अचानक दिसलेल्या मावळतीच्या पिवळसर-नारंगी सूर्यबिंबाने
आम्ही सगळे हरखून गेलो!
पाठीमागे गोरखगड-मच्छिंद्रगड, सिद्धगड आणि बैलघाट नजर
खिळवून ठेवत होता, आसमंतात चंद्रबिंबाने विसावून, गडांना आमची नजर लागू
नये म्हणून जणू “तीट” चं लावली!
आमचा पाय तिथून हलत नव्हता, राहून राहून नजर मागे वळतं होती.
आम्ही पुढे जात होतो तरी मन मागेच गुंतल होतं!
आम्ही पुढे जात होतो तरी मन मागेच गुंतल होतं!
गावकऱ्याने सुचवल्यानुसार म्हसे गावापर्यंत टेंपो केला.
तिथून ९.३० च्या एस.टी ने आळे फाट्याला आलो तेव्हा रात्रीचे १२ वाजले होते.
पुण्यात पोहोचायला रात्रीचे दोन वाजले.
फोटो आभार: ट्रेक टीम
No comments:
Post a Comment