गणपतींचे पुणे: कसबा, मांदार, गुंडाचा आणि गुपचूप गणपती, २,9 सप्टेंबर २०१९

खरं तर सुरुवात झाली ती शनिवारपासून, ३० ऑगस्ट पासून! Godrej Interio and SharpClick यांनी Eco Friendly Ganesh Idol Making Workshop  आयोजित केल होत. मी आणि आमच्या नृप ने त्यात भाग घेतला. एक स्वर्गानुभूतीच म्हणा ना! चार तास कसे सरले समजून आलंच नाही. गणेशाची मूर्ती बनवणे खरोखरच जिकीरीचे काम! प्रत्येक अवयव अगदी हुबेहूब आला तरच त्यात "प्राण" येतो! आम्हा दोघांना जमेल तसा प्रयत्न केला. आयुष्यातील पहिला निर्मिती अनुभव! अप्रूप तर आहेच. सोबत Certificate सुद्धा!



ह्याला जोड मिळाली ती फिरस्ती महाराष्ट्राची, Ancient Trails and Puneganeshfestival.com तर्फे आयोजित पुणे गणपती हेरीटेज वॉक ची! २ सप्टेंबर ते १० सप्टेंबर दहा दिवस गणेश माहिती दर्शन! ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले पुण्यातील काही गणपती!

गणपतीची गर्दी, ढोल-ताशांचे आवाज, गुलाल इ. गोष्टींना दूर ठेवणारी मी. जाऊ की नको ह्या विचारात होते. गणेश चतुर्थीची सुट्टी असल्याने विचार केला आज जाते. आजच्या अनुभवावरून उद्याचा निर्णय घेऊ.

संध्याकाळी ६.३० वाजता शनिवारवाडा दिल्ली दरवाज्याजवळ भेटलो.



तिथे आजच्या  हेरीटेज वॉकची माहिती मिळाली. गर्दीतून वाट काढत वॉक सुरु झाला.

वातावरण एकदम चैत्यन्याने पुलकित झालेलं. सगळीकडे उत्साह संचार!  त्यात तरुणाई जरा जास्तच जोमात!

ढोल-ताशांचे आवाज,गुलालाची उधळण, विद्युत रोषणाई, पत्र्या-फुलांचे पथारीवाले, गणेश मूर्तींचे स्टॉल, स्पीकर वरील गाण्यांचे आवाज, आरतीचा आवाज.....असो.

हेरीटेज वॉकची सुरुवात झाली तो अर्थात कसबा गणपती पासून! पुण्याचे ग्रामदैवत! प्रथम पूजेचा आणि प्रथम मिरवणुकीचा दर्जा असलेला मानाचा पहिला गणपती. घरातील शुभ कार्याची सुरुवात ह्या गणपतीचा आशीर्वाद घेऊनच केली जाते. मग ती लग्नपत्रिका असो की  उपनयनसंस्कार पत्रिका असो. आधी वंदन या गणरायाला!

पुण्याच्या कसबा पेठेत भर वस्तीत असलेले मंदिर. पूर्वी पुण्याची वेस याचं भागात असायची. मंदिराचा सभामंडप लाकडी.



अंतराळात यादवकालीन खांब. मंदिराच्या बाहेर असलेल्या स्तंभावशेषावरून मंदिर बाराव्या शतकात उभारले असावे.




कर्नाटकातील ईंडी येथून ब्राम्हणांची आठ कुटुंबे पुण्यात आली. ठाकर त्यातील एक कुटुंब या कुटुंबाने ह्या गणेशाची स्थापना केली. ठकार कुटुंब मंदिराचे विश्वस्त म्हणून देखरेख करत आहेत.

गणेश मूर्ती तांदळा स्वरूपातील. अर्थात फक्त एक मुखवटा! गाभाऱ्यातील आजचा तांदळा अलौकिक, भान हरपून टाकेल असा. चांदीचा मुकुट आणि पितांबराने सजलेला. तांदळा मूर्तीच्या डोळ्यात हिरे तर नाभीत माणिक आहे.



मंदिराच्या आवारात हनुमान प्रतिमा आणि दीपमाळ आहे.





गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंदिराच्या समोर गणेशोत्सवामुळे केली असली तरी तांदळा स्वरूपातील गणेशाची महती निर्विवादच!

हेरीटेज वॉक मधला दुसरा गणपती होता, त्रिगुणेश्वर मांदार गणपती! कसबा गणपती मंदिराच्या अगदी समोरच्या ढेरे वाड्यात प्रस्थापित हा गणपती!



मांदार किंवा मंदार म्हणजे पांढऱ्या फुलाचा रुई वृक्ष!

कीर्तनकार इस्लामपुरकर कसबा गणपती मंदिरात कीर्तन करत असताना त्यांना दृष्टांत झाला की "समोरच्या मांदार वृक्षात मी आहे"! ते वाड्यात गेल्यावर वाड्यात असलेला मांदार वृक्ष दुभंगून तीन गणेश मूर्ती दृष्टीस आला. म्हणून हा त्रिगुणेश्वर मांदार!

दृष्टांतात मिळालेल्या तीन गणेश मूर्तींची एक मूर्ती साकारली. २ फुट उंचीची ही चतुर्भुज गणेश मूर्ती. मूर्तीचे दोन हात गुडघ्यावर तर दोन हात खांद्यावर ! मांडीवर उपरणे आणि सोंड लंबाकार!





एक पौराणिक कथा आहे. भृशुंडी ऋषी मोठे गणेशभक्त. कठोर तपश्चर्येचे फलित स्वरूप त्यांच्या दोन भुवयांमधून एक सोंड उगवली. सोंडेला पाहून मांदार आणि शमिका पती-पत्नी हसले. ते सहन होऊन ऋषींनी शाप दिला की भूलोकी वृक्ष व्हाल. शमीचे वडील आणि मांदारचे गुरु यांनी शापमुक्ती साठी गणेशाची आराधना केली. गणेश प्रसन्न झाले. ऋषींच्या शापातून ते दोघांना मुक्त करू शकत नसले तरी त्यांनी उ:शाप दिला. मांदार वृक्षाखाली माझा वास असेल आणि शमी अर्पणाने मी प्रसन्न होईल.

आज वाडा सुस्थितीत नाही. मांदार वृक्ष देखील नाही. परंतु मांदार त्रिगुणेश्वर गणपतीचा सुखद अधिवास तेथे आहे. गणेशचतुर्थीला नैवेद्याचे ताट कसबा गणेशाकडून मांदार गणेशाला दरवर्षी जाते!

मांदार गणपती विषयी खालील लिंक वर अधिक माहिती जाणून घ्या...

https://bit.ly/2kr08N8


हेरीटेज वॉक मधला तिसरा  गणपती, गुंडाचा गणपती!



नागोजी गुंड, पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणीस यांचे एक सहकारी. त्यांच्या घराजवळील गणपती हा गणपती म्हणून त्याचे नाव "गुंडाचा गणपती"! दुसरे बाजीराव पेशवे यांच्या १८१०-११ मधील रोजनिशीत त्याचा उल्लेख आहे. पेशवे काळात ह्या गणपतीला विशेष महत्व होते. पेशवेकालीन कागदपत्रात ह्या गणपतीचा उल्लेख ही आढळतो.

उजव्या सोंडे ची मूर्ती असून हे जागृत देवस्थान आहे. मूर्ती शिलाहार काळानंतरची पण शिवकालपूर्वीची असावी असा अंदाज आहे.



सन १९७५ साली मूर्तीवरील कवच निघून आले. भारत इतिहास संशोधक मंडळ आणि डेक्कन पुरातत्व विभाग यांनी केलेल्या पाहणीनुसार मूर्ती १४ व्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मूर्तीवरील थर काढून १९७६ साली नवीन मूर्तीची स्थापना केली. मूर्तीचा साचा त्यानंतर केळकर संग्रहालयाला भेट देण्यात आला. मंदिरात आता दिसते ती नवीन मूर्ती. जुनी मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्या मागे लाकडी कपाटात ठेवली आहे. 




मंदिर आवारात हनुमान आणि समोर म्हसोबा देवस्थान आहे.





मंदिराचा कळस एका खास शैलीत बांधला आहे.



पेशवेकाळात कसबा गणपतीनंतर गुंडाच्या गणपतीला विशेष महत्व होते!

अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा,

http://www.maharashtrachishodhyatra.com/2018/04/blog-post_27.html

गुंडाच्या गणपतीनजीक माझ्या ओळखीचे एक बालरोगतज्ञ राहत होते. त्यांच्या आठवणी या निमित्ताने ताज्या झाल्या.

हेरीटेज वॉकला जाऊ की नको या विचारात पडूनही शेवटी  तीन गणपती पाहून आले.



आलेली  मरगळ वॉक वरून परतताना नाहीशी झाली होती आणि उद्याच्या हेरीटेज वॉकचा विचार मनात रुंजी घालत होता....


गुपचूप गणपती अर्थात वरद गणपती! शनिवार पेठेत नेने घाट जवळ असलेले एक सुरेख मंदिर. मंदिराची स्थापना  मचंद्र विष्णू गुपचूप यांनी केली तर मूर्तीची स्थापना केली मोरेश्वर आणि राजीवशास्त्री दीक्षित यांनी. माघ शु. १३ शके १८१३ अर्थात  १२ फेब्रुवारी १८९३ हीच ती स्थापनेची तारीख!

दीक्षित कुटुंबीय मंदिराची देखरेख करतात.



उत्तराभिमुख अर्धपद्मासनातील काळी पाषाण मूर्ती, शेदूर चर्चित आहे.




वरील दोन्ही हातात आयुध, खालील एक हात अभयमुद्रेत तर दुसरा हातात मोदक असून सोंड मोद्काजवळ!

लाकडी सुरेख सभामंडपात जुन्या कालशैर्लीतील हंड्या आणि झुंबरे आहेत. ह्यामुळे मंदिराला प्राचीन आणि कलात्मक रूप आले आहे. सभामंडपात व्यासपीठ आहे.







सभामंडपातील लाकडी खांबावर सुप्रसिद्ध चित्रकार राजा रविवर्मा यांनी काढलेली चित्रे आहेत.


प्रदक्षिणामार्गावर पूर्वी शमी चे झाड होते.


फोटो वॉक टीम: फिरस्ती महाराष्ट्राची:




पुण्यातील अशा विविध गणपती, मारुती तसेच अनेक प्रसिद्ध ठिकाणच्या नावामागचा मनोरंजक इतिहास तुम्ही खालील पुस्तकात नक्की वाचू शकता.


धन्यवाद!

गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
भेटू उर्वरित गणपतीचा इतिहास घेऊन पुढील गणेशोत्सवात!





No comments: