Indian Grey Hornbill धनेश: धनाचा ईश्वर

शिंपी पक्षी, राखी चिमणी, कोकिळा, घार, लालबुड्या बुलबुल, शिपाई बुलबुल...बापरे...काही नावे नुसतीच ऐकून होते. काही नावे तर उच्चारता देखील येत नव्हती. अशी विद्वत्ता असताना चक्क हे सारे पक्षी काही फुटांवर प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता यावेत. ते हि काही शारीरिक परिश्रम न घेता. आहे ना अचंबित करणारी पण सुखद वार्ता!

हा सुखद अनुभव दिला कोव्हीड-१९ अर्थात कोरोना ह्या जगभरात पसरलेल्या आजाराने! आजार हा क्लेशदायकच! पण त्याने काही आरोग्यसंपन्न आणि जीवनशैलीला नवीन आयाम देणाऱ्या सवयी आत्मसात करण्यास भाग पाडल्या. त्याच कोरोना मुळे हा पक्षीवृंद माझ्या घराच्या खिडकीबाहेर डोलू लागला.

आमच्या खिडकीबाहेर मुख्यत: दोन झाडे आहेत, पिंपळ आणि पांढरी सावर. पिंपळावर गुळवेळीचा सुरेख वेल बहरला आहे. त्याची लालचुटुक फळे पानांच्या हिरव्या रंगावर जणूकाही लाल बुट्टेच! कोरोना काळातील लॉकडाऊन मध्ये पुण्यात सर्वत्र माणसांसाठी संचारबंदी असताना पक्षांचा मुक्त संचार मी मनसोक्त अनुभवला.

पक्षांचे निरीक्षण करण्यात तासन तास कसे सरायचे समजून यायचं नाही. रोज सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ५.३० ते ७ हा पक्षांच्या मुक्त वावराचा पिक पिरीयड!

१८ मार्च पासून हा बासरीस्वर सुरु झाला. हो, बासरीस्वरच! श्रीकृष्णाच्या मधुर बासरीने सारे गोकुळ मंत्रमुग्ध होत असे असे वाचलेलं. त्याचा जीता-जागता अनुभव ह्या पक्षांच्या सुरेल कंठस्वरांनी दिला. पहाटे चार वाजल्यापासून कंठस्वरांची जुगलबंदी जी सुरु होत असे तो शेवटी रात्री मी निद्रिस्त व्हायची!

मे महिना उजाडला. आता तेच तेच पक्षी पहिले कि मनोमन आर्जव होत असे "अरे आता नवीन पक्षी येऊ दे रे"!

२१ मे ! आजवर ज्या सख्या झाल्या त्या माझ्या सख्या पक्षांनीच शेवटी माझे आर्जव ऐकले. 

दुपारचा पावणे तीनचा सुमार. ऑफिस टीम सोबत स्काईप कॉल साठीचा मेसेज नेटवर्क नसल्याने जात नव्हता. खिडकीपाशी आले. मेसेज जाण्याच्या प्रतीक्षेत असताना, पिंपळाच्या झाडावर "कुई वुई" असा काहीसा आवाज आला. आतापर्यंत हा आवाज कधीच ऐकण्यात आला नव्हता. डोळे भिरभिरले, कान टवकारले. आवाजाचा मागोवा घेत घेतच खिडकीपाशी ठेवलेला सोनी सायबर शॉट कॅमेरा हातात घेतला. कॅमेरा ऑन करतकरतच पक्षाच्या आवाजाचा मागोवा सुरु ठेवला. वसंत ऋतू सुरु झाल्याने पिंपळ हिरव्या गर्द पानांनी डवरलेला. त्या गर्द पानांच्या पाशात पक्षी दिसणार तरी कसा. आवाज कुठून येतोय हेच उमगेना. पाच-सात मिनिट असेच गेले. अचानक पक्षी उडाला. माझ्या नजरेच्या टप्प्यात आला. अगदी माझ्या समोर! 

पक्षावर नजर स्थिरावली आनंदाने मी मोहरले. चक्क एक नवीन पक्षी ! माझ्या वृंदावनात आकंठ बुडालेला. कॅमेरा त्याच्यावर फोकस केला. क्लिक..क्लिक..क्लिक...

आतापर्यंच्या अनुभवातून शिकलेले, पक्षी कॅमेऱ्याची चाहूल घेतो. लगेच उडन-छु! फोटो पक्षावर केंद्रित करताना मनात तोंडाने म्हणत राहिले, " थांब जरासा..थांब जरासा"!

अखेर पक्षी कॅमेऱ्यात आला. तो उडेल तसा कॅमेरा फिरवत ठेवला. क्लिक करत गेले....

पक्षाला लोकेट करण कठीण जात होत. कारण पानांच्या रंगात त्याचा किंचित करडा/राखाडी/मातकट रंग उठून येत नव्हता. डोळ्यांचा चांगलाच व्यायाम झाला. त्याच्या पाठी कॅमेरा लावणे ..बापरे..पाळत ठेवणं म्हणजे काय हे ह्यानेच शिकवलं.

पिंपळावर बसतोय कि, पांढऱ्या सावरीवर, किती वेळ स्थिरावतोय, चोच-पंख, मान, डोळे इ. सर्व कसे डोलत आहेत, पक्षाचा आकार, रंग...बापरे...न्याहाळायचं तरी काय काय...

आकस्मिक घबाड हाती आल्यावर विस्मयतेतून मिळणारा आनंद मी अनुभवत होते.

कॅमेऱ्यात त्याला घेताना त्याच नाव कोणाला माहित होतं...त्यावेळी खरंतर नाव, गाव, फळ, फुलं..सर्व सुचायला हवं..पण कसलं काय..त्याच्या लकबी न्याहाळताना मी स्वत:ला विसरले ...

असो. स्वत:चा अर्धा तास छानपैकी माझ्या नावावर करत तो भुर्रकन उडाला. मंतरलेले शरीर आणि मन पूर्वपदावर आले. जाणीव सजग झाल्या. कंबर ताठरलेली, डोळे ताणावलेले, हात आखडलेले, मान मोडलेली...

शिणावलेले अवयव ताणरहित व्हायला अर्धा तास लागला. तेव्हा कुठं आठवलं "अरे पण पक्षी कोणता? नाव काय?"

कुठेतरी, केव्हातरी पक्षाचा फोटो पाहिलेला. पूसटसं नाव आठवल...Hornbill ! Whatsapp ग्रुप वर नावाची खात्री झाली , Indian Grey Hornbill (Ocyceros Birostirs) राखी/करडा धनेश!

गुगल सर्च मारला..धनेश, धनचिडी, राखी शिंगचोचा!  एकामागोमाग एक नावांची सुरेख लगड!

राखाडी काया, डोके काळसर, चोच किंचित पांढरी-पिवळसर, तपकिरी डोळे, अणकुचीदार चोचीवर एक शिंग....

माझ्या वाचनात लोकसत्ता मधील अमृता राणे यांच्या धनेश पक्षावरील कार्याचा लेख वाचण्यात आला. धनेशला "जंगलाचा शेतकरी " म्हणतात. बिया पसरवण्याचे मोलाचे काम हा पक्षी करतो. त्यामुळे जैवविविधता टिकून राहते.

श्री. राजू कसंबे सर यांच्या "मायाळू धनेशाचे गुपित" या पुस्तकाचा परिचय वाचण्यात आला. धनेशाला "पक्षांमधील गेंडा" म्हणतात असा त्यात उल्लेख आहे.  

धनेश पक्षांचा आकार, परीघ, लांबी, नर-मादी, उंडी उबवण्याचा काळ, तो काय खातो, कुठे सापडतो..इ.इ. ह्याबद्दल सर्व माहिती गुगलवर आहेच.पक्षी तज्ञांनी अभयसात्मक खूप निरीक्षणे नोंदवलेली आहेत. ह्या ब्लॉग चा उद्देश ती माहिती पुन्हा इथे देण हा नसून त्याला न्याहाळताना मी काय काय अनुभवल, मला काय भावलं हे तुम्हाला सांगण हा आहे. तर मग आपल्या उद्देशाकडे येऊ..

माझ्या वृंदावनात तो आला तो वाट चुकून! वाटसरूचं म्हणूयात ना...झाडाच्या फांदीवर बसताना मानेची, शरीराची जी हालचाल करत होता त्यातील तालबद्धता  पाहणं हा खरा आनंदी क्षण!

खूप काळ स्तब्ध होता. इथे येण्याचा त्याचा उद्देश  For a change असेल कदाचित! कारण इथे काही नाविन्यपूर्ण त्याला दिसले अशी अधीरता त्यात जाणवली नाही. थोडा गारवा त्याने अनुभवला असेल इतकेच काय ते...

नाही पांढऱ्या सावरीचा कापूस त्याला आकृष्ट करू शकला कि नाही गुळवेलीची लालचुटुक फळे भुरळ घालू शकली!


क्षणभर विसाव्याला आलेला वाटसरू...माझे वृंदावन मोहित करून आणि माझी धनाची अर्थात ज्ञानाची कवाडे खुली करत भुर्र उडाला....

माझे वृंदावनावर जणू लगेच संचारबंदीचे सावट आले....एकदम निस्तब्ध शांतता....

धणेशाचा कंठस्वर ऐकण्यास कान आतुर आहेत, डोळे भिरभिरत आहेत....

माझे वृंदावन त्याचा वावर पुन्हा अनुभवण्यासाठी कायमच राहील धनेशाच्या प्रतीक्षेत .........

 


No comments: