भोरगिरी टू भीमाशंकर जंगल ट्रेक, १७ जुलै २०१६


सकाळी ७ च्या दरम्यान शिवाजीनगरवरून खाजगी वाहनाने ट्रेकसाठी आम्ही निघालो. भोरगिरीला पोहोचलो तेव्हा जवळजवळ ११ वाजले होते. 

भोरगिरी हे पुणे जिल्हयातील खेड तालुक्यातील एक छोटस गाव तर भीमाशंकर हे आंबेगाव तालुक्यातील एक गाव! बारा ज्योतीर्लींगापैकी एक हेमाडपंथी शिवमंदिर ह्या गावातच आहे. हा ट्रेक साधारणत: ४-५ तासाचा आहे. 

भोरगिरी ते भीमाशंकर ट्रेकची चार मुख्य आकर्षणे आहेत, पहिले गुप्त भीमाशंकर हे ठिकाण, 


दुसरे खास करून याच जंगलात दिसणारी इंडियन जायंट स्क्विरल अर्थात शेकरू अर्थात रानटी खार, तिसरे घनदाट अभयारण्य आणि चौथे बारा ज्योतीर्लींगापैकी एक हेमाडपंथी शिवमंदिर!...निसर्गदेवता आणि भक्तीदेवता यांची अनोखी समरूपता! यामुळेच हा ट्रेक सर्वांगसुंदर ट्रेक आहे! 

पठार येईपर्यतचा टप्पा हा बहुतांश सखल, सपाट होता. पाऊस पडत होता. ढग डोंगरावर उतरले होते. दाट धुक्याच बख्तर सगळीकडे बघायला मिळत होतं. सभोवती हिरवीगार वनराई, ओसंडून, खळाळत वाहणारे नदी-नाले आणि त्यामधून जाणारी पावसाने ओली झालेली मातीची पायवाट!

ढग धुके आणि डोंगरांच मिलन होण्याचा हा काळ! त्या मिलनाचे साक्षीदार ही फळा-फुलांनी बहरलेली वनराई आणि खळाळणारे नदी-नाले! स्वत:ला अदृश्य करून सूर्य देखील ह्या निसर्गरम्य मिलनाला विलोभनीय, उठावदार, रेखीव आणि सौदर्यशील बनवत होता!
पाऊस समाधानकारक असल्याने भात शेती होताना दिसत होती. काही स्त्रिया भात शेती करताना दिसत होत्या. शेत नांगरणी सुरु होती. 

रोपं उगवलेली हिरवट-पोपटी भात-खेचर क्षणभर थांबण्यासाठी साद घालत होती! मधूनच करायला येणारी गायी-गुरे, शेळ्या-बक-या,भीमाशंकर भागातील आदिवासी लोकांची ओळख करून देत होती!

एक-दोन टप्पे असे होते जे किचिंत चढाईचे होते आणि पावसाने निसरडे झाल्याने कसोटीचे होते. सर्वजण पठारावर आल्यावर काही क्षण विश्रांती घेऊन ट्रेक सुरु झाला. 


आता भीमाशंकर अर्थात अभयारण्याचा टप्पा सुरु झाला होता. गर्द हिरव्यागार जंगलातून जाताना धबधबा जवळ आला की येणारा पाण्याचा खळाळता आवाज! उत्साह द्विगुणीत होतो तो धबधब्याखाली भिजण्यासाठी!

मनसोक्त वेळ आम्ही धबधब्याखाली घालवला.
गुप्त भीमाशंकरचे दर्शन आणि आमच्यातील काही जणांना तर शेकरुही दिसले. आपल्या ट्रेक साथीदारांसोबत जंगलातून मार्गक्रमण करण्यासारखा दुसरा आनंद नाही!

जास्त चढाई नसणारा, न थकवणारा, जंगल विहाराचा आनंद देणारा, आणि पावसाळ्यात धबधब्यामुळे मनजल्लोष ओसंडून वाहू देणारा असा हा ट्रेक आहे. 

हा ट्रेक मी दुस-यांदा करत होते, २०१४ च्या जुलै मध्ये पहिल्या वेळी केलेल्या ट्रेकच्या दोन आठवणी आहेत. पहिली शेकरू दिसण्याची आणि दुसरा माझा नी-स्प्रेन झाल्याची! नी-स्प्रेन झालेली जागा देखील मला आठवली. मी बसून देखील माझा पाय खाली टेकला नव्हता. गेल्या ट्रेकला उलट्या दिशेने येत होतो आणि ही जागा इतकी ऊंच होती की पाय ठेवण्यासाठी मी पाय खेचला आणि गुडघ्यातून एक जोराची कळ आली. ती कळ जाईपर्यंत थांबण्याशिवाय पर्यायच नव्हता!


काही न पटलेल्या गोष्टी जरूर नमूद कराव्याशा वाटतात. शेकडोंच्या संख्येने तरुणवर्ग इथे आला होता. जंगलातून जाताना ओरडणे, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढणे, मंदिराच्या आवाजात पिपाण्या वाजवणे, नाचणे हे बघितलं की विचारभिंगरी सुरु होते....

ह्या ट्रेक दरम्यान मनाला स्पर्शून गेलेल्या तीन गोष्टींचा उल्लेख करणे अतिशय महत्वाचे आहे. पहिली ही की हर्षदा सोबत हा माझा दुसरा ट्रेक होता. यावेळी दोघींमध्ये थोडा जास्त संवाद झाला. ती एकटी येते, एकदम कुल असते आणि ट्रेकचा आनंद घेते! तिला बघितलं की काही गोष्टींच महत्व उमगतं, त्या गोष्टी आहेत, स्वत:मध्ये रममाण होणं, स्वत:ला वेळ देणं आणि स्वत:च्या इच्छेनुसार काही गोष्टी करणं!

दुसरी गोष्ट मिनूची आहे. तीच आणि माझं नातही छान फुलतयं. नोकरी सोडून एकटीच फिरायला चाललीय. नोकरीतून रिलीव्ह होण्याचा आणि मनसोक्त, मनमुराद भटकंतीचा आनंद तिच्या चेह-यावरून, तिच्या बोलण्यातून दिसून येत होता. हर्षदा, मी आणि प्रतीक्षाची एकच कमेंट होती, “वुई आर फिलिंग जेलस”! 


तिस-या माधुरी मॅडम! संसार एके संसार झाल्यानंतर, वयाच्या ५४ व्या वर्षी सोबत नसली तरीही घराबाहेर पाऊल टाकण्याचं धाडस करणाऱ्या! “ ट्रेक तुझ्या वयाच्या लोकांच काम नाही” अशी घरच्यांची प्रतिक्रिया ऐकल्यावरही स्वत:च्या क्षमतांना एक संधी देण्यासाठी पुढे आलेल्या! माधुरी मॅडमने ट्रेक पूर्ण केला! मला म्हणे, “ग्रुप छान आहे सविता, परकं वाटलं नाही, सगळी तरुण मुलं-मुली आहेत, आपल्या वयाच्या आपण दोघीचं, पण वयातलं अंतर जाणवलं नाही, किती वैयक्तिक काळजी घेतात ही मुलं-मुली. मला किती जपून आणलं.”. ह्या तिघींसारखी काही व्यक्तिमत्व समोर आली की भारावल्यासारखं होतं. अशीच काही व्यक्तिमत्व जीवनात आणण्याचा ट्रेक हा एक मार्ग आहे! 

एस. जी. ट्रेकर्सचं कौतुक ह्यासाठी कि त्यांनी ५४ वयाच्या आणि आधी कधीही ट्रेक न केलेल्या सहभागिला सामावून घेतलं आणि त्यांचा ट्रेक पूर्ण होण्यासाठी स्वत:च १००% तर दिलंच पण तो ट्रेक आनंददायी आणि जीवनभरसाठी संस्मरणीय होण्यासाठीचा दृष्टीकोन ठेवला!

(फोटो आभार: ट्रेक सहभागी)   

Post a Comment