मा. कळसुबाई नाईट ट्रेक, १९-२० डिसेंबर २०१५


कळूसबाई शिखर हा ट्रेक करण्याची असीम इच्छा होती. शाळेत असताना हया शिखराबद्दल वाचलं होतं की महाराष्ट्राच्या सहयाद्री रांगेतील सर्वोच्च शिखर! ५४०० फुट आणि १६४६ मीटर! मनात थोडी भीती होतीच कारण सर्वोच्च शिखर समीट करणं आणि ते ही रात्रीचं ! ट्रेक बद्दल आणि मधे मधे असणार्‍या लोखंडी शिडयांबद्दल खूप ऐकलं होतं आणि फेसबुकवर फोटो बघितले होते. त्या शिडयापाहूनच घाबरायला व्हायचं. जवळ जवळ ५०-६० लोखंडी आडवे गज असलेल्या त्या शिडया आणि त्या ही एकदम स्टी़, ताठ, ऊंच आणि सरळसोट. पण झालं असं होतं की आतापर्यंत ट्रेकच व्यसन लागलं होतं. रविवारचा ट्रेक करुन आलं की दूसर्‍या दिवसापर्यंत थकवा राहयचा. मंगळवारी थकवा गूल आणि आपोआपच पुढचा ट्रेक कोणता आहे हयाचं फेसबुक सर्च सुरु व्हायचं. ट्रेक ची माहिती विशालकडून घ्यायची. तो अगदी सविस्तर माहिती दयायचा आणि मोटीव्हेट करायचा!

१८ डिसेंबरला शिवाजीनगर लोकमंगल इथे संध्याकाळी वाजता भेटायच ठरलं. साधारण वाजता निघालो असेल. जून्नर, आळे फाटा मार्गे गाडी जाणार होती. लीडर्स पैकी विशाल आणि आलेख ट्रेकला होते. गाडीत गाण्यांची मैफल रंगली. यावेळी आलेखला गाणी म्हणताना मी पाहत होते. गंमत वाटत होती. विशाल ने जवळ बोलवुन घेतले. आलेख अगदी रंगात येऊन, हावभाव आणि हातवारे करुन गाणी गात होता. विशालच्या भाषेत मुला-मुलींनी नुसता कल्ला केला होता. आलेखची ती भावमुद्रा मी कधीही विसरणार नाही. मी जवळ जवळ निम्म्यापेक्षा जास्त प्रवासात ऊभी राहून गाणी ऐकत होते. शेवटी विशाल म्हणालामॅडम आता थोडं बसा, विश्रांती घ्या. त्याच्या हे लक्षात आलं होतं की मी बराच वेळ उभी आहे आणि परत त्यानंतर रात्रीचा ट्रेक देखील करायचा आहे.!

साधारण २-२.३० च्या दरम्यान आम्ही बारी हया बेस गावात पोहोचलो. तिथं पोहे आणि चहा घेतला. ट्रेक सुरु होणार तेवढयात विशाल माझ्याकडे आला आणि म्हणाला, मॅडम, पुर्ण ट्रेकभर तुमच्या बरोबर गुरुदास राहिल. मी आणि आलेख आहोतचं काही लागलं तर लगेच सांगा.गुरुदास म्हणे,मॅडम, मी आहे. चलायचं आपण. मी होकारार्थी मान हलवली. पण डोक्यात विचार येऊन गेला की गुरुदास तर एक ट्रेक सहभागी आहे. पण नंतर वाटलं विशाल ने कदाचित असा विचार केला असेल की तो आणि आलेख दोघचं लीडर्स ट्रेक ला होते. रात्रीचा ट्रेक होता आणि विशालला माझ्यासाठी कोणी सोबतीला असावं असं वाटलं असेल म्हणून त्याने गुरुदास ला माझ्या सोबत राहयला सांगितलं असाव. असो. रात्री ३-३.१५ च्या दरम्यान ट्रेक सुरु झाला. साधारणत २०-२५ लोकांचा ग्रुप होता.

आता ट्रेकला सुरुवात झाली. रात्रीचा ट्रेक असल्याने टॉर्च सोबत होती. माझ्या गतीने चालत गुरुदास मला साथ देत होता. विशाल मधे मधे विश्रांती साठी थांबत होता आणि मधे मधे विचारत देखील होता, मॅडम ओके ना? रात्रीचा ट्रेक असल्याने टॉर्चच्या प्रकाशात खाली जमीनीकडे बघत ट्रेक करावा लागत होता. काही ठिकाणे अत्यंत स्टी होती. तो स्टीनेस पार केला की क्षणभर मला थांबावच लागत होतं. काही ठिकाणी अरुंद रस्ता, तर काही ठिकाणी रॉक पॅचेस होते. अवघड नव्हते पण रात्र असल्याने काळजी अधिकच घ्यावी लागत होती.

मी स्वतंत्रपणे ट्रेक करु शकते पण काही अवघड ठिकाणी कोणाच्या तरी हाताचा आधार लागतो. शरीराची उंची कमी असल्याने काही ठिकाणी स्वतंत्रपणे लांब पाय टाकणे अवघड होतं. कंबरला हिसका बसेल अशी भीती मनात असते. उडी मारता येत नाही कारण कंबर, पाय, गुडघ्याला इजा व्हायला नको. कोणाचा हाताचा आधार मिळाला की ती लांब ऊडी मारणे किंवा पाय लांब करणे सुलभ होते. माझी सोबत करणार्‍याला माझ्या गतीने चालण्याचा संयम राखणे हे मोठं जिकीरीच आणि तापदायक होऊन बसत असेल. कौतुकच आहे ना माझी सोबत करणार्‍याचं!

कळसूबाई ट्रेकच्या लोखंडी शिडया चढण-उतरणं महाकठिण कसब आहे. सरासरी ५०-६० आडवे गज असणार्‍या, सरळसोट आणि ताठ उभ्या शिडया आहेत. काही एकदम भक्कम तर काही थोडया लूज, हलणार्‍या. काही आडव्या गजांमधे समान अंतर नाही, बहुतेक मधला गज तूटल्यामूळे असेल. प्रत्येक गज चढताना-उतरताना पायरीचा अंदाज घेत पाऊल टाकावं लागत होतं त्याबरोबरच बाजूचे उभे गज भक्कम आहेत की हलत आहेत हयाचा अंदाज देखील घ्यावा लागत होता. रात्र असल्याने बॅटरीच्या प्रकाशात शिडया चढण एक कसबचं होतं. सुरक्षेच्या दृंष्टीने शिडी चढणार्‍या दोन लोकांमधे १-२ पायरीच अंतर ठेवाव लागत होतं. गटागटाने शिडया चढाव्या आणि उतराव्या लागत होत्या. झपाझप शिडया चढल्या-उतरल्या असं होतं नव्हतं. शिडीच्या पायरीवर एक पाय ठेवायचा मग त्याच पायरीवर दूसरा पाय ठेवायचा. मग एक पाय उचलून दूसर्‍या पायरीवर ठेवायचा आणि त्याच पायरीवर मग दूसरा पाय ठेवायचा. अशी शिडया चढण्याची पद्धत वापरावी लागत होती. शिवाय पायरीवर दोन्ही पाय ठेवायचे ते पायरीच्या मधोमधचं. एकदम केंद्रस्थानी. ना एकदम उजवीकडे, ना एकदम डावीकडे. पाय किंवा बूट थोडा घसरला किंवा बाजूच्या उभ्या गजांची घेतलेली हाताची पकड निसटली तर संपलच. तोल जाऊन पडण्याची भीती किंवा खरचटणं, कापण, इजा होणं, हात-पाय मुरगळण्याची भीती. एकाच्याही बाबतीत असं काही झालं तर पुढचा घाबरणार ही भीती ती वेगळीच. शिवाय प्रकार असा होता की मधे काही दगडी पायर्‍या होत्या किंवा मातीची चढण आणि परत शिडया सुरु. त्यात काही ठिकाणी आडवी-तिडवी चढणं आणि ती ही कमालीची स्टी़फ! तरुण मुला-मुलींना कदाचित हे प्रकार माझ्याइतके कठीण वाटतं नसतील. हा ट्रेक हयादृष्टीने कठीण नाही आणि कठीण आहे तो त्याची ऊंची आणि स्टीनेस मुळे. अन्यथा हया ट्रेक मधे कमालीचे कठीण असे रॉक पॅचेस नाहीत, दोरखंडाचा किंवा ट्रेकिंगच्यां कूठल्या साहित्याचा वापर करावा लागत नाही. एवढंच की अतिउंचीचा आणि लांबलचक ट्रेक आहे!

असो. गुरुदास, आलेख आणि विशालच्या सोबतीने ट्रेक पार करत होते. आता पहाटची चाहूल लागायला सुरुवात झाली होती. तांबड फुटायला लागलं होतं. पण माझ्यातला स्टॅमिना संपत येऊ लागला होता. आलेख म्हणे, सुर्योदय बघायचायं शिखरावरुन आपल्याला”. माझी पण इच्छा होतीच. 

शेवटचा पल्ला गाठायचा तेव्हा पुर्णवेळ आलेख माझ्या सोबत होता. त्यामुळे गुरुदास थोडा फ्री झाला. आता शेवटची शिडी लांबून दिसत होती. पण मला अक्षरश: चालवत नव्हतं. पायला गोळे यायला लागले होते. पुढचं पाऊल टाकवत नव्हतं. आणि सुर्योदय तर चुकवायचा नव्हता. माझ्याबरोबर आलेखचाही सुर्योदय चुकू नये अशी इच्छा होती. सुर्योदय पाहण्याची आशा असली तरिही ते अंतर पटापट चालून ते अंतर पार करण्याची ताकद राहिली नव्हती. कोणत्याही क्षणी मी खाली बसले असते आणि कदाचित इतकं जवळ येऊनही शिखर सर होऊ शकले नसते. आलेखच्या ते लक्षात आलं. त्याने माझा हात हातात घेतला, सॅक घेतली आणि चालायला सुरुवात केली.त्याच्या हाताचा आधार मिळाल्याने चालण्याची गती थोडी वाढली आणि ढळणारा तोल सांभाळला गेला. आता चांगलचं उजाडलं होतं. टॉर्च विझली होती. आकाशात तांबडा-लालसर रंग पसरु लागला होता. आता शेवटची शिडी पार करायची होती. ती शिडी पार केली की शिखरावर पोहोचणार! माझा स्टॅमिना गेलाय, ताकद संपलीय, तोल जातोय आणि शिडया तर चढायच्या आहेत हे आलेख आणि विशालच्या लक्षात आलं. त्यांनी काय केलं की मला मधे घेतलं. माझ्या मागे आलेख आणि पुढे विशाल असं उभं राहून अत्यंत हळू हळू, अक्षरश: डोळयात तेल घालून लक्ष दयाव तसं माझ्याकडे संपुर्ण लक्ष देतं ही शेवटची शिडी पार केली. मला हे आठवलं की हया लीडर्सचं कौतुक वाटतं, प्रेम वाटत, अभिमान वाटतो. प्रसंग पाहून त्या क्षणाला तुम्हाला काय स्ट्रॅटीजी वापरायची, काय निर्णय घ्यायचा आणि सहभागीचा ट्रेक पुर्ण होण्यासाठी किती पराकोटीचा प्रयत्न करायचा हे कसब त्यावेळी मला विशाल आणि आलेख मधे दिसून आलं!.

शिडीची शेवटची पायरी आणि त्यानंतर शिखरावर पाऊल.........महाराष्ट्राच्या एव्हरेस्टवरचं माझं पहिलं पाऊल! .काय तो आत्मानंद! विशालला म्हटल, राजा, इथे माझा एक फोटो काढ. हा क्षण मला कायमचा स्मरणात राहयला हवा आहे. मी परत कळसूबाई ट्रेक करेन असं मला वाटतं नाही.. विशालला माझी भावना समजली आणि माझी इच्छा पूर्ण करत मी, आलेख आणि तो अशी एक सेल्फी काढली. मी शिखरावर पाऊल ठेवलं आणि विशाल आणि आलेख दोघांनीही शेकहँड केलं. दोघांच्याही चेहर्‍यावर मी ट्रेक समीट केल्याचं कौतुक दिसतं होतं! तो क्षण माझ्याही जीवनात असीम समाधानाचा होता!

माऊंट कळसूबाई शिखर, महाराष्ट्रचं एव्हरेस्ट!. ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात आलेख जगातल्या माऊंट एव्हरेस्ट शिखराबद्दल सांगत होता. २९०२९ फुट आणि ८८४८ मीटर उंच, किती खर्च येतो, काय तयारी करावी लागते, कागदपत्रे इ. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट शिखर आपण समीट केले ही भावनाचं स्वत:ला शिखरावर नेणारी होती!

आलेख हा असा एक लीडर आहे ज्याचं वाचन जबरदस्त आहे. त्याच्या बोलण्यात त्याची अभ्यासू वृत्ती दिसून येते. माथेरान ट्रेकला त्याच्यातला आणि माझ्यातला बॉन्ड खू स्ट्रॉग झाला. तो ट्रेकला असला की माझ्या सहाय्याला तत्पर असतो. तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण त्याच्या केवळ माऊंट एव्हरेस्ट वरच्या बोलण्याने मी एव्हरेस्ट दर्शनाचा विचार केला आणि केवळ त्याची शिकवण आठवुन केटूएस ट्रेक करण्याच पाऊल उचललं! असो.

शिखरावर कळसूबाई देवीचं मंदिर आहे. ट्रेकला यायचं त्या दिवशी मी देवीचं ओटीचं सामान सोबत घेतलं होतं. ब्लाऊज पीस, तांदुळ आणि दक्षिणा. नारळाचं ओझं होणार असल्याने तो टाळला. वर गेल्यावर पहिलं काम केलं ते माझ्या आईचं स्मरण करुन देवीची ओटी भरली. मंदिर आतून छोटसंचं होतं. जेमतेम दोन माणसं  बसतील एवढीच जागा. त्यात एक पूजारी आणि दूसरी मी. देवीची ओटी भरली, दक्षिणा दिली. शिखर सर करण्याची तर तीव्र इच्छा होती आणि त्याला भक्तीची साथ देखील लाभली. हे मिळालेले समाधान काही औरच होते.

शिखरावरुन निसर्ग सौदर्य अलातून दिसतं होतं. सकाळची वेळ, शुद्ध हवा, गारव्याने बोचणारी हवा, सुर्याचा प्रकाश आजूबाजूच्या पर्वतांवर पसरत होता, प्रवरा धरणाचं पाणी लांबवर दिसत होतं. 

हया पार्श्‍वभूमीवर शेंदरी रंगाचं कळसूबाई देवीचं मंदिर, शिवरायांची प्रतिमा असणारा डकणारा भगवा झेंडा, खांबाला बांधलेल्या अगणित घंटा. त्यात कलेकलेने वाढणारा आणि प्रकाशीत होणारा सुर्योदय आणि त्याचं मनोभावे घेतलेलं दर्शन. आत्मा तृप्त झाला. वाव..तिथून हलावं, निघावं असं वाटतचं नव्हतं. असावा तो क्त निसर्गरम्य शांत परिसर आणि आपण! विशालला म्हटलही,आता उतरायचयं? इथेच थांबूयात ना. नो ऑफी, नो ताण, नो शहराची प्रदूषित हवा, नो वाहनांचा कर्कश आवाज.

सोबत आणलेला खाऊ सर्वांनी शिखरावर एकत्र बसुन खाल्ला. फोटो काढले. प्रत्येकाने त्याला हवा तसा ट्रेक समीट केल्याचा आनंद घेतला. विश्रांती घेतली.
 


आलेख चे त्याच्या स्टाईलमधील फोटो पाहण्यातही एक मजा होती. दोन्ही हात पसरुन निसर्गाकडे पाहत असतानाची पोज! त्याची ती फेमस पोज आहे. निसर्ग जेवढा बाहुपाशात सामावुन घेता येईल तेवढा तो घ्यायचा!

डावीकडून'-आलेख', रवी' आणि' गुरुदास
भारताचा तिरंगा झेंडा देखील सोबत नेला होता. तो हातात धरुनही बरेच फोटो काढले. खूप अभिमानाची गोष्ट आहे की सहयाद्री रांगेतील सर्वोच्च शिखर कळसूबाई हे महाराष्ट्रात आहे!


मी कॅमेरा नेला होता पण स्वत:ला सांभाळून ट्रेक करत 
फोटो काढणं शक्य नाही हे लक्षात आल्यावर कॅमेरा बॅगेत ठेऊन दिला. आलेख ने काही फोटो शिखरावर गेल्यावर काढले. रवीने माझा एक फोटो काढला. कपाळावर कुंकू असलेला! तो फोटो अद्वितीय आहे! फोटो पाहताना जाणवलं की थकव्याची, त्राण पुर्णपणे संपल्याची, रात्री झोपलेलो नसल्याची एकही निशाणी त्या फोटोत नाही. चेहरा एकदम प्रसन्न आणि फ्रेश वाटतोय. ट्रेक समीट केल्याचा आणि देवीच्या दर्शनाने सुखावल्याचा आनंद त्या फोटोतुन स्पष्ट दिसतोय. कळसूबाई शिखर ट्रेक आणि फोटो हे जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा तेव्हा क्त तो आणि तोच फोटो आठवेल! आणि त्या बरोबर आठवेल तो रविंद्र इनामदार!

सकाळी ६.३० ला मी शिखरावर पोहोचले होते. दोन तास थांबून आम्ही ८.३०-८.४५ ला शिखर उतरायला सुरुवात केली. आता मी, गुरुदास आणि प्रमिला एकत्र बरोबर शिखर उतरत होतो. अधून मधुन गप्पा सुरु होत्या. गुरुदास अतिकठिण आणि ज्याच्या उत्तरासाठी अभ्यासाची गरज आहे असे प्रश्‍न विचारत होता. साधारण तास शिखर उतरायला लागले. ट्रेक चढणं जितकी अवघड तितिकचं तो उतरणंही. तोल सांभाळत, न घसरण्याची काळजी घेत उतरणं कसरतचं असते. शरीराची गती कमी होते, पावलं जवळ जवळ टाकावी लागतात, शरीर गतीत आलं तर झोकांडी जाण्याची भीती असते म्हणून क्षणभर थांबाव लागतं. हयावेळी तर शिडया उतरताना हात थरथर कापत होते. हदयात धडधड होत होती. स्पंदने वाढत होती. हे सगळं सांभाळून आणि शरीराचा तोल सांभाळत, मनाची निर्धार घट्ट करतं आणि चित्त एकाग्र करत ट्रेक करणं हे एक कौशल्य आहे, कला आहे, सराव आहे, अनुभव आहे, अभ्यास आहे!

उतरताना पुष्कळ व्यक्ती भेटल्या ज्या देवीच्या दर्शनाला वर जात होत्या. काही तर अनवाणी पायाने जात. होत्या. पुष्कळशा बायकांच्या हातात ओटीचं सामान होतं.

किती तरी वेळ उतरत होतो तरी खालपर्यंत पोहोचत नव्हतो. आता पोहोचू आता पोहोचू करत धीर सूटायला लागला होता. शेवटी एकदाचे खाली पोहोचलो.

एका घरात जेवणाची व्यवस्था केली होती. सगळे जेवायला जमिनीवर बसले. मी मात्र कॉटवर बसूनच जेवण केलं. जमीनीवर बसले असते तर उठणं महाकठिण झालं असतं. इतकी प्रचंड थकले होते की जेवण येईपर्यंत झोप देखील लागून गेली आणि काही मिनीटांच्या त्या डुलकीने थोडी ताजीतवानी झाले.

थोडा आराम करुन परतीच्या प्रवासाला गाडीत येऊन बसलो. मी आणि गुरुदास गप्पा मारत होतो. तेवढयात विशाल जवळ आला. शेकहँड करण्यासाठी माझा हात त्याच्या दोन्ही हातात घेतला आणि म्हणाला, वेल डन मी गुरुदास कडे निर्देश केला. गुरुदास हया मुलाने संपुर्ण ट्रेक भर माझी सोबत केली. एकदाही तो मला सोडून गेला नाही. अतिशय जबाबदारीने, आपूलकीने, सिनसिअरली त्याने त्याची जबाबदारी पार पाडली. मला मात्र अतिशय गिल्टी वाटतं होतं. सारखं वाटतं होतं की हा मुलगा ट्रेक एन्जॉय करण्यासाठी आलेला असेल पण ट्रेक एन्जॉय करणं सोडाचं बिचार्‍यावर मला सोबत करण्याची वेळ आली, माझ्या गतीने चालण्याची वेळ आली, एक जबाबदारी विनाकरण त्याच्या गळयात येऊन पडली. तो गिल्ट मला आजही आहे. खरंतरं  विशाल आणि त्याच्यातला तो संवाद आणि दोंघांनी संगनमताने स्विकारलेली कार्यपद्धती. पण त्याने त्यादिवशी माझ्यासाठी केलेला ट्रेक आजन्म माझ्या स्मरणात राहिलं आणि त्याच्यामूळे मी ट्रेक समीट करु शकले यासाठी सतत ॠृणी राहिल! गुरुदास, तुमचे मनापासुन धन्यवाद!

हया ट्रेकमुळे नाईट ट्रेक मला जास्त सुखद वाटू लागले. नाईट ट्रेक मधे होतं काय की तुम्हाला कुठं पोहोचायचयं त्याचा अंधारामुळे काही अंदाजच येत नाही. लक्ष असतं ते क्त चालण्याकडे, जमीनीकडे. दिवसा कसं होतं की लांबूनच दिसत असतं की इथे इथे जायचयं. मग ते अंतर, ऊंची, चढाई हे पाहुनचं गर्भगळीत व्हायला होत. रात्रीच्या ट्रेकला हे होतं नाही. त्यामुळे नाईट ट्रेक हे मला दिवसाच्या ट्रेक पेक्षा सुलभ आणि सोपे वाटतात. आलेख म्हणतो तो म्हणूनच खरं वाटतं,ट्रेकींग हा माईंड गेम आहे.”!
विशालने हया ट्रेकमधे माझी वैयक्तिक दखल घेतली. मी आजही त्या विचाराने अत्यंत भावनिक होते. बर्‍याच ट्रेक मधे असं होतं की मी आऊटलायर असते. आऊटलायर अशा अर्थाने की इतर सहभागींच्या वयाच्या तुलनेत माझं वय त्यांच्या वयाच्या जवळ जवळ दूप्पट असतं. मला वाटतं ही एक गोष्ट आहे ज्याची विशाल आणि टीम ने प्रत्येक ट्रेक मधे दखल घेतलेली आहे. माझ्या वयामुळे माझ्यातला क्षमतांना गौण न मानता एक लीडर म्हूणन त्यांनी त्यावर उपाययोजना करुन मात दिलेली आहे. त्याच्या हया माझ्यासाठीच्या कार्यपद्धतीमधे भरपूर सहभागींनी पण त्याला साथ दिली आहे! म्हणून मला नेहमीच त्यांचा अभिमान वाटत आलेला आहे!

विशालने एक लीडर म्हणून ज्या अगणित गोष्टी माझ्यासाठी केल्या आहेत त्यातली एक ही की ट्रेक पुर्ण झाल्यानंतर माझा हात हातात घेऊन वेल डन म्हणणं. प्रत्येक ट्रेकला तो हे करत आलेला आहे. बरेचदा असं होतं अथवा म्हटलं जातं की अशा प्रसंगात स्पर्श सर्वकाही सांगून जातो. पण आमच्या बाबतीत स्पर्शापेक्षाही विशालचे डोळे, डोळयातली चमकं सर्व काही सांगून जाते. त्या डोळयात कौतुक असतं, आत्मविश्‍वास असतो, अभिमान असतो, प्रोत्साहन असतं, जिद्द असते, समाधान असतं! एका ट्रेक लीडरसाठी हीच मर्मबंधातली ठेव असावी की सर्व सहभागींनी सुरक्षीत रित्या ट्रेक समीट केला! त्यात माझ्यासारखी, लीडर्सना कदाचित वयामुळे आव्हानात्मक वाटणारी सहभागी ट्रेक समीट करत असेल तर ती मर्मबंधातली ठेव अधिकच अनमोल होत असेल!

कळसूबाई शिखर, महाराष्ट्राच एव्हरेस्ट तर समीट झालं. खरचं मनापासून इच्छा आहे की जगाच्या एव्हरेस्ट शिखर असणार्‍या धरतीवर पाऊल पडावं. त्यासाठी काय काय तयारी करावी लागेल याचा विचार झाला आहे. एव्हरेस्ट एक्सपीडीशनच्या कथा वाचणं सुरु आहे. ट्रेकिंगचे ब्लॉग्ज वाचणं सुरु आहे. विशाल ने मोटीव्हेशन पुस्तक वाचायला दिलं आहे. शिव, आलेख आणि राहुल यांनी जी माहिती आणि ट्रेकिंगचे तंत्रज्ञान सांगितले आहे त्याची पाठांतरे सुरु आहेत.

कॅमेरा, कंपनी, त्याचे स्पेसीफीकेशन, फोटो काढण्याचे तंत्र इ. गोष्टीत खूप मुलांकडून मार्गदर्शन सुरु आहे.

माझ्यातल्या कोणत्या गोष्टींवर ज्या ट्रेक दरम्यान थोडया डाव्या पडतात (उदा. दम लागणे) मला जास्त लक्ष दयावं लागेल त्या गोष्टींची उजळणी मधून मधून सुरु आहे. प्राणायाम, योगासनांचा नक्कीच उपयोग होईल असं वाटतयं.


कळसूबाई देवीचा आशिर्वाद असेल तर एस. जी. ट्रेकर्स सोबत हिमालयीन ट्रेक आणि एव्हरेस्ट चे विलोभनीय दर्शन करण्याची इच्छाही पुर्ण होईल!
Post a Comment