शिवनेरी ट्रेक (शिवजयंती स्पेशल), १९ फेब्रुवारी २०१६

एक्स्ट्रीम ट्रेकर्स बरोबरच हा माझा पहिलाच ट्रेक होता. २५ डिसेंबर २०१५ रोजी, भिगवण-भुलेश्वर ला पक्षी निरीक्षणसाठी त्यांच्यासोबत गेलेले असल्याने तशी प्रतीक खर्डेकरशी माझी ओळख झालेली होती.

जेव्हा शिवनेरी ट्रेक चा पोस्ट मी बघितला तेव्हा ट्रेकला जाण्याचा निर्णय मी ताबडतोब घेऊन टाकला. ट्रेकचे दोन पर्याय होते. एक पाय-यांनी आणि दूसरा साखळ दांडीच्या वाटेने!

शिवनेरी, शिवरायांचे जन्मस्थान! ३५०० फुट उंचीचा, जुन्नर तालुक्यातील हा किल्ला!

मी ४-५ वी इयत्तेत असल्यापासून “शिवराय आणि शिवनेरी” विषयी शाळेतील शिक्षकांकडून ऐकत आलेली आहे. पुढे शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकातून त्यांच्याबद्दल वाचायलाही मिळत गेले. मोठे होऊ लागले तसे मग “श्रीमानयोगी”, “छावा” सारख्या कादंब-याही वाचनातून गेल्या. मतितार्थ काय तर शिवनेरीचं दर्शन घ्यायची इच्छा ही बालपणापासूनची! ती पूर्ण होत होती ती वयाच्या ४७ व्या वर्षी!

शिवनेरी ट्रेक हा त्रिवेणी योग साधून आला होता, शिवजयंती, ट्रेक आणि इच्छापूर्ती! खूप संतोष वाटतं होता की उराशी बाळगलेलं आणि डोळ्यात साठवलेलं स्वप्न आज पूर्ण होणार!

आम्ही आठ सहभागी होतो. प्रतीकला पायाला एका ट्रेक दरम्यान मोठी दुखापत झाली होती त्यामुळे तो जवळजवळ २ महिने ट्रेक करू शकला नव्हता. प्रतीक म्हणाला, “ट्रेकला पुन्हा सुरुवात करण्यासाठी शिवजयंतीसारखा दुसरा दिवस नाही. आपण नऊ जण आहोत आणि ट्रेक करणार आहोत”. त्याच्या आवाजात एक जोश होता! आग, तिच्याच ज्वालांनी होरपळू लागल्यावर तिला पण पाण्याची शीतलता हवीहवीशी वाटवी.....होरपळणारी आग जणू पाण्याचीच वाट पाहत होती! तसं वाटलं मला प्रतीकचं बोलणं ऐकून!  

आमच्याबरोबर रिचर्ड लोबो सर होते. एस.जी ट्रेकर्स बरोबर ते वासोटा जंगल ट्रेकला गेले होते आणि एस.जी च्या ग्रुपवर माझे पोस्ट त्यांनी बघितले होते.

गाडीत गप्पा रंगल्या. प्रतीक बडबड्या आहे. मनापासून बोलतो आणि मनातलं बोलतो. त्याच्या बोलण्यात एक सच्चेपणा जाणवतो! त्यामुळे नारायणगाव कधी आलं कळालच नाही. तिथे एक सर आम्हाला जॉईन झाले. ते अहमदनगर भागात राहत्तात आणि प्रतीकच्या ट्रेक्सला असतात. प्रतीक कडून इन्स्पायर होऊन त्यांनी त्या भागात आपल्या सहका-यांच्या मनात ट्रेकिंग रुजवायला सुरुवात केली. सर रुजलेले ट्रेकर वाटतं होते. गळ्यात कॅमेरा अडकवलेला, हातात ट्रेकिंग स्टिक, डोक्याला टोपी....ते आणि लोबो सरांशी ट्रेकिंगच्या गप्पा मी एन्जॉय केल्या!

आम्ही सर्वजण साखळ दांडीच्या मार्गाने ट्रेक करणार होतो. जिथून ट्रेकला सुरुवात होणार होती तो शिवनेरीचा गडपायथा आला. गाडीत आणि नाश्त्याच्या दरम्यान ओळख झाल्याने सरळ ट्रेकिंगलाच सुरुवात केली. गडपायथ्यावरूनचं शिवनेरी गडाचं दर्शन होत होतं. कडेलोट टोक आणि लेण्या ठळकपणे दिसत होत्या. अगदी जिथून ट्रेकला सुरुवात होते तिथे माझ्या कंबरेपेक्षा उंचीची सिमेंटची भिंत होती. वाटलं झालं, इथूनच परीक्षेचे क्षण सुरु! नी-स्प्रेन झाल्यामुळे अशा गोष्टींसाठी मी जरा धास्तावतचं होते! एक पाय ठेवायला भिंतीला खाचं पण नाही! भिंतीवर हात ठेऊन पाय खेचायची भीती वाटतं होती..परत गुडघा दुखावला गेला तर?...पण प्रतीकच्या मदतीने भिंत पार झाली!

हा पुढचा रस्ता आता अरुंद, स्टिफ होता..एका वेळी एकच जण जाऊ शकेल असा. आधारासाठी दुतर्फा झाडे होती. पानगळ सुरु झाल्याने वाळलेल्या पानांवर पाय पडला की आवाज येत होता. उन्हाळयाची चाहूल....उकाडा भासत होता, हलकासा घाम येत होता...इलेक्ट्राल मिश्रित पाणी पिण्याचं काम सुरु होतं. ह्या ट्रेकच्या ह्या रस्त्यावर काही  रॉक पॅचेस देखील होते पण पार करायला तितकेसे कठीण नव्हते.

प्रतीक हा मुलगा एक भारी आहे. नुकताच मोठ्या दुखण्यातून रिकव्हर झाला होता. पायाने लंगडत होता. पण त्याही परिस्थितीत त्याचा उत्साह आणि चालण्याची गती अचंबित करणारी होती!

हा चढ पार करून आम्ही लेण्यांजवळ पोहोचलो. दगडामध्ये कोरलेल्या लेण्या बघितल्या. स्तूप, पाण्याचे हौद....कातळ पाषाणातील ह्या लेण्या अतिशय मोहक आहेत. 

आता पर्यंत ह्या वाटेवर आम्हीच होतो पण आता येणा-यांची गर्दी होऊ लागली. ह्या लेण्यापाहून पुढे निघाल्यावर एक अरुंद मार्ग होता. एका बाजूला खोल दरी आणि दुस-या बाजूला लेण्यांची भिंत! थोडसं घाबरायला झालं! खूप खबरदारी घेऊन तो पॅचं पार करावा लागला.

आता गड जवळ येऊ लागला. शिवजयंती उत्सवाचे पडसाद कानावर येऊ लागले. इथे पोलिसांची गस्त होती. गडावरचा कार्यक्रम झाल्याशिवाय गडावर लोकांना सोडत नव्हते. भरपूर गर्दी झाली होती. त्यावेळेत आम्ही आमच्याजवळचा खाऊ खाऊन घेतला.

गडाकडे जाणा-या ह्या वाटेवर अतिशय कठीण असा रॉक पॅच होता.भयानक खतरनाक! दगडात पाय-या कोरलेल्या, अतिशय अरुंद, एका वेळी कसाबसा एकच पाय बसेल एवढीच त्यांची लांबी असलेल्या २५-३० पाय-या! एका बाजूला दगडी भिंत आणि दुस-या बाजूला खोल दरी! आधाराला काही जागाच नाही. एकावेळी एकच जण जाऊ शकेल आणि दुस-याला मदतीला यायला वावच नाही. जीव मुठीत धरून चढण काय असतं हे तेव्हा उमगलं!

हा रॉक पॅच पार करून आम्ही गडावर पोहोचलो. शिवजयंती उत्सव! गडाला एक वेगळचं सौदर्य प्राप्त झालं होतं! गडावरच्या वास्तू फुलांनी सजल्या होत्या. 

शिवकुंज किंवा शिवस्मारक तेथील जिजाऊ आणि बालशिवाजीचा पंचधातुतील पुतळा आकर्षून घेत होता. तो पाहून जिजाऊ “एक गुरु” या नात्याने असणा-या शिवाजी महाराजांच्या इतिहासातील गोष्टी आठवत होत्या!


शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. शिवाजी महाराजांचा पुतळा आणि पाळणा फुलांनी इतके सुशोभित केले की डोळासुखचं! त्या जागेचे पावित्र्य पाहून तुम्ही नतमस्तक झाला नाही तर नवलचं! 

कडेलोट-टकमक टोका वरून जुन्नर गावचा नजरा डोळ्यात मावत नव्हता. शिवनेरी आणि आजूबाजूच्या गडांची माहिती प्रतीक ने द्यायला सुरुवात केली. आलेले लोक ही त्याचा प्रभावी आवाज ऐकून माहिती ऐकण्यासाठी थबकले. जवळजवळ २५-३० लोक गोळा झाले! त्यावेळी प्रतीकचे रुप मनात साठवण्यासारखे होते. त्याच्या आवाजात त्याचा इतिहासाचा अभ्यास, रुची, वाचनावर केलेला विचार दिसून येत होता. शिवराय आणि त्यावेळचा इतिहासाबद्दल प्रतीक जवळजवळ २०-२५ मिनिट बोलत होता. त्यावेळी दळणवळण कसे होते, कडेलोट कुठल्या परिस्थितीत केला जायचा इ. बद्दल त्याने लाजवाब माहिती दिली. तो बोलत होता आणि त्याचं बोलणं पूर्ण होईपर्यंत तिथे स्तब्धता होती..शांतता होती! सर्वजण मन लावून, एकाग्र होऊन, समरूप होऊन त्याचं बोलणं ऐकत होते. त्याचं बोलणं संपल्यावर टाळ्यांचा इतका कडकडाट झाला की असं वाटलं शिवजयंती आता ख-या अर्थाने साजरी झाली! शिवरायांना मानाचा मुजराचं होता तो!

अंबरखाना (धान्यकोठार), कमानी मस्जिद, गंगा-जमुना टँक, बदामी तलाव बघितल आणि परतीच्या प्रवासाला निघालो. आता आम्ही पाय-यांच्या मार्गाने जाणार होतो. वाटेत पहिल्यांदा लागले ते शिवाई देवीचे मंदिर! जागृत देवस्थान! उभ्या कड्याच्या गर्भात वसलेले देवीमंदिर! श्रीमानयोगी मध्ये उल्लेख आहे, जिजाबाई म्हणतात, “शिवाईला नवस बोलले होते...मुलाचं नाव "शिवाजी" ठेऊयात”....

शिवाई दरवाजा, मेणा दरवाजा, कुलूप दरवाजा, हत्ती दरवाजा, पीर दरवाजा, गणेश दरवाजा, महादरवाजा असे एकूण सात दरवाजे आहेत. अति भव्य, बुलंद आणि पाषाणात कोरलेले. हे दरवाजे पाहून त्याकाळी गर्भवती जिजाऊंचा शाही मेणा किती आस्ते आस्ते गडावर आणावा लागला असेल ह्याची कल्पना येते!  

गडाला किती पाय-या आहेत कुणास ठाऊक पण त्या अतिशय आकर्षक आहेत. आजूबाजूची बाग फुलांनी सजली होती. मी पाय-या उतरत होते खरी पण सारखं सारखं मागे वळून पाहण्याचा मोह आवरत नव्हता. काय कराव म्हणजे हे सगळ मनात साठवता येईल आणि आपल्या सोबत घेऊन जाता येईल असं वाटत होतं. " अभिमानाने ऊर भरून येतो" म्हणजे काय होतं हे अनुभवलं!

परतीच्या प्रवासात इच्छापूर्तीचा आनंद तर होताचं पण एका इतिहासात समरूप झालो ह्याच समाधान जास्त मोठं होतं!


धन्य तो शिवराय ! धन्य ती जिजाऊ! 
जय शिवराय!


Post a Comment