तुंग-तिकोना ट्रेक, १९ जून २०१६

सकाळी ६.३० च्या दरम्यान शिवाजीनगर वरुन ट्रेक साठी खाजगी गाडीने निघालो. पौड मार्गे तिकोनापेठ येथे साधारणत: ८-८.३० च्या दरम्यान पोहोचलो. पोहे आणि चहाचा नाश्ता केला.

मनप्रीत ने पुन्हा एकदा विचारलं, आपकी बेटी नहीं आई? तिला वाटतं प्रमिला सिंग माझी मुलगी आहे. अर्थात प्रमिला आणि माझी छान मैत्री झाली आहे. आमच्यातल नातं असं समजुतीच आणि केअरिंगचं आहे. त्यामूळे कदाचित मनप्रीत ला सांगाव वाटलं नाही की बाई गं ती माझी मुलगी नाही. तिला म्हटलं, यहा जो आते है मेरे बेटे है, बेटीयाँ है”!

तिकोना गड चढण्यापूर्वी ओळख परेड झाली. यावेळी साधारणत: ४० ट्रेकर्स सहभागी झाले होते. १४ जून २०१५ मधे हा ट्रेक करुन झाला होता आणि त्यावेळी तो कठीण वाटला नव्हता. त्यामूळे ठरवल्याप्रमाणे विशाल सोबत काहीही संवाद केला नाही. तरिही मनात धाकधूक होतीच पण त्याचा परिणाम ट्रेक पूर्ण करण्याच्या निश्‍चयावर होऊ दिला नाही. एक-दीड तासात गड चढू असे आधीच विशालने गडाची माहिती देताना सांगितले होते. पावसाळी वातावरण होते. पावसाचे काही थेंब पडलेही पण त्यानंतर मात्र पाऊस पडला नाही. आकाश ढगाळलेले, हवेत थोडासा गारवा, मधूनच उन्हाची येणारी तिरिप, ढग ओढून घेतलेले डोंगर आणि शीतलता अशा वातावरणात ट्रेक सुरु झाला. यावेळी आम्ही जाणारी वाट वेगळी होती. १४ जून २०१५ रोजी घेतलेला ट्रेक चा मार्ग थोडा लांबलचक वाटला आणि आत्ताचा हा मार्ग छोटा आणि जवळचा वाटला, अति चढाईचा नव्हता आणि तुलनेने सोपा होता. त्यामूळे मला आनंदच होत होता. घाम गळत होता पण हवामानामूळे असेल कदाचित, इतक्या प्रमाणात दम लागला नाही. पाणी पिण्याची वारंवारता पण कमी होती. तरिही टँग मिश्रित पाणी तयार होतेच. काही ट्रेक च्या अनुभवाने आणि ट्रेक लीडरच्या सांगण्यानूसार पाण्याचा घोट घेत घेत चढाई करायची म्हणजे पायाला क्रॅम्प येत नाही. रेनकोट सोबत नेला होता पण पावसाचा अंदाज घेऊन तो गाडीतच ठेवला. त्यामूळे पाठीवरचे ओझेपण झेपणारे होते. त्यामूळे अंदाजानूसार चढाई वेळेत पूर्ण झाली.

तिकोना चा अर्थ आहे तीन कोन असलेला, त्रिकोणाकृती! गडाच्या मध्यावर तळजाई देवीच मंदिर आणि गुहा आहे, तसेच राक्षसाला किंवा दानवाला मारण्याच्या अर्विभावातील हनुमानाची शेंदरी मुद्रा आहे. यानंतर सुरु होतो तो शिवाजी ट्रेल आणि बाले किल्ल्याची चढाई एकावेळी एकच व्यक्ति चढू शकेल अशा दगडी पायर्‍यांचा पॅच आहे. हया पायर्‍या चढून गेलं की गडावर त्र्यंबकेश्‍वर महादेवाचे मंदिर आहे. गडावरुन पवना धरणाचा निसर्गरम्य परिसर दिसतो.

माझा कॅमेरा नेहाली, सायली आणि अभिषेक कडे दिला होता. काही ट्रेक मधे किंवा हल्ली मी ङ्गोटो काढण्याच्या मागे लागतच नाही. एक सावधानता म्हणून. लक्ष क्त सुरक्षित आणि सुखरुप चढण्या-उतरण्याकडे देते. आधीच्या काही ट्रेकमधे असं लक्षात आलं की फोटो काढणं आणि चढणं-उतरणं मला तितक्याशा शिताफीने करता येत नाही. त्यांमूळे फोटोवरच लक्ष कमी केलं.

गड चढताना-उतरताना विशाल, राहूल, शिव, नेहाली, सायली, अभिंषेक या सर्वांचच माझ्याकडे लक्ष होतं. हया ट्रेक सोबत असले की मी निर्धास्त असते. एकाग्रतेने मी ट्रेक करत असते  आणि  मला खात्री असते की माझ्या आजूबाजूला कोणाचातरी मदतीचा हात नक्की आहे. मदतीसाठी हाक दयावी लागली असं आत्तापर्यंत एकदाही झालेलं नाही !

ट्रेक दरम्यान मी थोडसचं खाते. अगदीच उपाशी पोटी चढाई करायची नाही म्हणून. पाणी जास्त पिते. ते ही इक्लट्रॉल, टँग मिश्रित किंवा सरळ लिंबू सरबत! सोबत १-२रचंद ठेवते. बस्स. काही वेळा पूरणपोळी, आंब्याची पोळी, साठोरी असं घेऊन जाते. मनूके मला चालतात पण बदाम खाल्ले तर ठसका लागतो त्यामुळे ते कट.

साधारणत: १२ च्या दरम्यान गड उतरुन खाली आलो. जेवण केलं. साधारण दुपारी च्या दरम्यान तुंगसाठी निघालो. दूपारी च्या दरम्यान तुंग गड चढायला सुरुवात केली. शिव ने आधीच कल्पना दिली होती की, गड छोटा आहे पण काही ठिकाणे थोडी धोक्याची आहेत. फोटो काढणे टाळा”. 

चढाईला सुरुवात केली. शिव ने सल्ला दिला की माझी ट्रेकींग स्टीक चढताना वापरणे टाळावे. काहीवेळा हातांच्या आधाराने चढणे-उतरणे जास्त सोयीचे होते. त्याचा सल्ला मानत अधून-मधून स्टीक न वापरण्याचा प्रयोग करत होते. मागच्या वर्षी १४ फेब्रुवारी २०१५ रोजी वासोटा हा एस. जी बरोबरचा नववा जंगल ट्रेक केला होता. स्टीक न वापरता केलेला ट्रे़क़ आणि चक्क जमला मला. चढताना-उतरताना एकाग्र राहणे आणि शरीराचे तोल सांभाळणे हया दोन मुख्य गोष्टी मी तेव्हा केल्या होत्या. उतरताना शरीराला गती आली तर क्षणभर थांबणे उत्तम. पण हा ट्रेक जमला म्हणून स्टीक वापरायलाच नको असा आतला आवाज नव्हता. विचार करायला लावणारी गोष्ट आहे ना? भीमाशंकर जंगल ट्रेक ला गूडघा स्प्रेन झाला होता. डॉक्टर म्हणे, नो हायकिंग, नो जंपींग़”. पण राहवतयं कूठे? मग मार्ग काढला, नी-कॅप आणि स्टीक वापरायची! शिवने देखील नी-कॅप वापरण्याचा सल्ला दिला होता. शिवची कमाल बघा तो ट्रेक ला असेल तेव्हा तेव्हा मला आवर्जून विचारतो, मॅडम, नी-कॅप वापरताय ना..असे वैयक्तिक दखल घेणारे लीडर्स असणार्‍या एस. जी. ट्रेकर्स चा मी एक भाग आहे हयाचा खरंच अभिमान वाटतो!

शिव बद्दल अजून एक उल्लेखनीय गोष्ट. ऑगस्ट २०१५ रोजी केलेला कातळधर ट्रेक हा माझा एस.जी. ट्रेकर्स बरोबरचा पहिला ट्रेक होता. एखादया ट्रेकिंग ग्रुप बरोबर पहिल्यांदा जाण्याचा अनुभव, कातळधर ट्रेकच्या वर्णनात तुम्ही वाचालचं. तर मी कातळधर ट्रेक मधील शिव बद्दलची एक उल्लेखनीय गोंष्ट तुम्हाला सांगत होते. ऑगस्ट महिना आणि पाऊस. पावसात ट्रेक करण जिकीरीचं असतं. माझ्यासाठी तर परीक्षाच असते. निसरडया जागेत शरीराचा तोल सांभाळण महाभयंकर काम होऊन बसतं. कातळधरला पहिल्यांदा धबधबा दिसला आणि आता शेवटचा टप्पा पार करायचा होता. तो पॅच मला कठीणच वाटत होता. मातीचा चढ पावसाने चांगलाच डेंजरस वाटत होता.

म्हटल, मी इथेच थांबते. मला खात्री वाटत होती की तो पॅच मी चढून जाऊ शकणार नाही. शिव ने माझे शब्द ऐकले. लगेच म्हणे, मॅडम, तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. हा पॅच क्त पूर्ण करायचाय. चला मी आहे”. त्याने हाताचा आधार देऊन तो पॅच पूर्ण करुन दिला. आजही मला त्याचे ते वाक्य आठवतं आणि घेतलेला पूढाकार मनाला स्पर्शून जातो. 

तुंग अर्थात कठीणगड़ तुंगवाडीपासुन हा ट्रेक सुरु होतो. पायथ्याला हनूमानाचे मंदिर आहे. काही भाग दगडांच्या खाचांनी तयार झालेला आहे. तर काही जागा खुप अरुंद आहेत. एका बाजूला डोंगर आणि दूसर्‍या बाजूला दरी. हया १-२ जागा सोडल्या तर तुंग गड चढायला-उतरायला तसा सोपा वाटला. गडावरच्या रस्त्यावर काळयाभोर मातीत कर्दळीची झाडे लावली होती त्यामूळे गडाच्या सौदर्यात भर पडंत होती. काळयाभोर साडीवर हिरवीगार नक्षीच जणु! गड खालून खुपच नयनमनोहर दिसत होता. तुंग गड मला जास्त आवडला. त्याच सौदर्य काही वेगळचं आहे. खालून बघितलं तर गड तीक्ष्ण, धारदार शंकूच्या आकारासारखा दिसतो. त्याचे ते तीक्ष्ण, धारदार कडे मला पाहून मला मात्र तो गड खडा आणि प्राण्याच्या डौलदार शिंगासारखा वाटला!

इथेदेखील चढताना ङ्गारशी दमछाक झाली नाही. त्यामुळे छान वाटतं होते. गडावरुन निसर्ग सौदर्य अङ्गलातून दिसत होते. डोळे भरुन पहावे, डोळयात साठवावे आणि शांततेत ते काय सांगताहेत ते ऐकावे. बस्स अजून काय हवे? गडावर तुंगाई मातेचे मंदिर आहे. तिच्या दर्शनाला गडाखालील कंपनीत काम करणार्‍या काही नाशिक गावच्या स्त्रिया रस्त्यात भेटल्या. कंपनीत असल्याने सगळयांनी हिरवी साडी नेसली होती त्यामुळे एकामागून एक उतरताना त्या देवीरुप दिसत होत्या. काहीं तर अनवाणी गड उतरत होत्या. भक्तीच्या माध्यमातून जी शक्ती मिळते ती एक अनुभूतीच!

आतापर्यंत सर केलेल्या बहुतेक गडावर महादेवाच, देवीच, हनुमानाच , गणेशाच मंदिर आहेच. का असावीत ही मंदिर/प्रतिमा? गडाचं पावित्र्य राखण्यासाठी, देव-देवतांना साधना-तपश्‍चर्या करण्यासाठी एकांत-शांत जागा, इतिहासाची स्ङ्गूर्तीस्थाने, शक्तिस्थाने, मनाची ताकद वाढवणारी बलस्थाने, घरापासून दूर असलेल्या मावळयांना आर्शिवादासाठी  प्रतिकात्मक माता-पिता....

दूसर्‍या दिवशीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कयानी बेकरीतुन चॉकलेट वॉलनट केक  सर्वांसाठी घेतला होता. माझी इच्छा होती की गडावर तो खाल्ला जावा. गडावर केक कापला. शुभेच्छांचा वर्षाव झाला आणि वाढदिवस अशा रितीने एस. जी. ट्रेकर्स सोबत गडावर साजरा झाला. पुर्णपणे ऐतिहासिक!

साधारण ४.३० च्या दरम्यान गड उतरायला सुरुवात केली. काही ठिकाणी थोडं काळजीपूर्वक उतरायला लागत होती पण अगदीच अवघड वाटलं नाही. शिव सोबत होताच आणि काही महत्वाच्या टीप्सपण देत होता. त्याने दिलेल्या तांत्रीक टीप्स अतिशय अभ्यासू, अनुभवी आणि प्रभावी असतात.

शिव असला की ट्रेकचा फीडबॅक तो घेतोच. मला नेहमी प्रश्‍न पडतो मी काय सांगू? हया ट्रेकर्सने माझ्यासाठी जे केलयं ते शब्दात गूंङ्गण केवळ अशक्य आहे. हया ट्रेक डायरीच्या माध्यमातून त्यांच्या सोबतचे अनुभव तुमच्याही मनाला स्पर्शून जातील!
तुंग आणि तिकोना एक दिवसाचा ट्रेक ही नवी अ‍ॅडीशन होती आणि ती आयडीया मला आवडली. वेळेच व्यवस्थापन जबरदस्त झालं. सहभागींना विश्रांती आणि हवा तसा आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळाली.

परतीच्या प्रवासात पवना धरण आणि पाण्याचा आनंदही घेतला. यावेळी हवेत चांगलाच गारवा जाणवत होता.

जाताना-येताना गाण्यांची मैल गाडीत रंगलीच होती. गाणी म्हणण्यापेक्षा मुला-मुलींना गाणी गाताना ऐकण मला जास्त आनंद देत. खासकरुन विशाल, राहूल आणि आलेख! मुला-मुलींचा जोश, आवेश, उत्साह, गाणी म्हणण्याची स्टाईल, हावभाव इ. खूप मज्जा येते. यावेळी तर भगवानने म्हणलेल्या गाण्यांचाही आस्वाद घेतला आणि प्रजेशचं हिंदी गाण ऐकण्यासाठी कान हयावेळी देखील आसूसलेलेच राहिले!

ट्रेक दरम्यान तर सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर डान्स पण झाला! अनेकवेळा हं!

खूप सार्‍या नवीन सहभागींची ओळख झाली....सुयोग, गौरव, संदीप, मीनू, सुमेधा, युंगधरा......गौरव आणि सुयोग सोबत गप्पा खूप समाधान देणार्‍या होत्या. नेहाली, सायली आणि प्रतिक बरोबर देखील छान गप्पा झाल्या.

खुपजण असेही होते जे माझ्या आजुबाजुला अधून मधून मदतीसाठी सोबत देत होते. त्यांची नावे आत्ता मला आठवतं नाहीत पण चेहरे मात्र लक्षात आहेत. 

हया मुला-मुलींच्या सोबत असल्यावर मनाला जबरदस्त उभारी येते पण वयाच्या हया वळणावर शरीर तेवढ लवचिक राहिलेलं नाही आणि गुडघे आणि कंबर शाबूत राहतील हयाच भानही ठेवाव लागतं!

हया ट्रेकला फारशी दमछाक झाली नाही. मधे खंड पडल्यामूळे विसापूर ट्रेक ला थोडी दमणूक झाली. पण हया ट्रेक मूळे शरीर ट्रेक साठी तयार झालयं असं वाटलं.

थोडक्यात काय, जूलै २०१६ च्या अंधारबन जंगल ट्रेकला तयार!

No comments: