कात्रज टू सिंहगड (k2s day trek) डे ट्रेक, ९ जुलै २०१६


२१ नोव्हेंबर २०१५ रोजी केटूएस नाईट ट्रेक मी केला होता. रात्रीच्या अंधारामुळे मी किती टेकड्या चढतेय, किती चढाईच्या, पुणे किती सुंदर दिसतेय इ. चा काहीच अंदाज आला नव्हता. तेव्हा इच्छा मात्र निर्माण झाली होती की हा दिवसाचा ट्रेक करायचा आणि तो योग ९ जुलै ला आला.

स्वारगेटला आशिष जोशी भेटले. ते व्हॅली ऑफ फ्लावर्स ला जाणार असल्याने सराव म्हणून ते ह्या ट्रेकला आले होते. मी पण व्हॅली ऑफ फ्लावर्सला जाणार असल्याने आम्ही त्या ट्रेकबद्दल गप्पा मारल्या.

विशाल आज नेहमीपेक्षा जास्त ठाम वाटत होता. सात तासात ट्रेक करायचा आहे असं ठामपणे खासकरून माझ्याकडे बघत सांगितलं. मी समजू शकत होते की २९ जुलै २०१६ ला होणाऱ्या केटूएस स्पर्धेसाठी त्याने हा ट्रेक ठेवला आहे, पण म्हणून माझ्याकडून पण सात तासात ट्रेक पूर्ण करण्याची अपेक्षा? माझ्या डोक्यात विचार हे की सात तासाच विशालच लक्ष्य मी पूर्ण करू शकणार का?

सर्वजण जमल्यावर कात्रज ओल्ड टनेल पासून ट्रेक सुरु झाला. यशोदीप त्याने नुकत्याच केलेल्या रूपकुंड ट्रेकबद्दल सांगत होता. वाघजाई मंदिरापर्यत जाईपर्यंत मला कमलीचा दम लागला होता. बोलताना श्वास फुलला होता. त्यात भर म्हणून पायांना अॅन्कलच्या ठिकाणी अचानक जडपणा आला. तो भाग इतका ताठर झाला की पुढच पाऊलं टाकवेना. मी तर स्वप्नं रंगवल की विशालला सांगून मी माघारी जाणार.

वाघजाई मंदिराजवळ थांबल्यावर विशालला म्हटल, “विशाल जमेल का? पाय खूप ताठरलेत”. विशाल म्हणे, “खूप वेळ थांबून चालायला सुरुवात केली म्हणून असेल.स्प्रे मारायचा का?”. थोड्या वेळातच ताठरपणा आपोआप नाहीसा झाला. विशालने ओळख परेड घेतली. आम्ही ११ जण होतो आणि क्षितीज नावाचा एक सात वर्षाचा मुलगा. त्याने एव्हरेस्ट चढण्याची इच्छा बोलून दाखवली. मी त्याला शेकहँड करत माझी पण ती इच्छा असल्याचं सांगितलं. विशालने पुन्हा एकदा सागितलं की सात तासात ट्रेक पूर्ण करायचा आहे. खरं तर त्याच्या ह्या लक्ष्यच मला दडपण यायला हवं होत पण तसं न होता मी त्याच्या ठामपणावर विचार करत होते. इतका ठामपणा मी आजपर्यंत कधी बघितला नव्हता. त्याच्या त्या ठामपणापुढे माझी काही बोलण्याची बिशाद्च नव्हती. विशालच्या बोलण्यात ओव्हर कॉन्फीडन्स नव्हता की नव्हती माझ्याकडून अवाजवी अपेक्षा!

विशालने ओळख परेड मध्ये म्हणाला की, “मॅडमच कौतुक करण्यासारखं आहे. त्या खूप भारी ट्रेक करतात. फुल डीटरमिनेशनने ट्रेक करतात. त्यांना ट्रेक करताना पाहून मुलींसाठी आम्ही हिरकणी अॅडव्हेचर क्लब सुरु केला. नुकताच त्यांचा लोहगड ट्रेक झाला.”. हिरकणी अॅडव्हेचर क्लब सुरु करण्यामागे मी आहे हे मला आत्ताचं कळत होतं. मला जबरदस्त दडपण आलं पण विशालच कौतुकही वाटलं. खास मुलींसाठी क्लब मी तरी ऐकल नव्हता. किती हा पुढारलेला विचार! थँक यु एस. जी ट्रेकर्स खास मुलींसाठी हा क्लब सुरु केल्याबददल!

विशालने स्टॉपवॉचं सुरु केलं होत. वाघजाईचा आशीर्वाद घेतला आणि मी ट्रेक सुरु केला. पाऊसं सुरूच होता. आजूबाजूचा परिसर, डोंगर हिरवेगार दिसत होते. पहिल्या दोन टेकड्या चढण्यात आणि उतरण्यात जीव अर्धमेला झाला. ह्या टेकड्या अत्यंत चढाईच्या, विस्तीर्ण आणि ताठ आहेत. ह्या दोन टेकड्या पार करण्यातचं तुम्हाला कल्पना येते की पुढच्या १०-११ टेकड्या तुम्ही पार करू शकणार की नाही. थोडं दम खातचं ह्या टेकड्या मी पार केल्या. दोन टेकड्या पार झाल्या आणि सर्वांनी “यो” म्हणत आनंदाचा जल्लोष केला. काही सहभागी नवीन होते पण अनोळखीपणा जाणवलाच नाही. खूप खेळीमेळीत, गप्पा मारत, चेष्टा-मस्करी करत पुढचा ट्रेक सुरु केला. थोड अंतर पार केलं की विशाल थांबत होता. सर्वजण आल्यावर परत ट्रेक सुरु होत होता. मला दम लागतो म्हणून मी आणि स्मिता पुढे जात होतो आणि विशाल चक्क जाऊ देत होता. पण “पायवाट सोडू नका आणि नजरेत रहा” अशी सूचना आवर्जून देत होता. दाट धुकं जेव्हा येत होत तेव्हा मात्र सर्वांनी एकत्र पुढे जाण्याचा अट्टाहास करत होता. पावसाबरोबर सोसाट्याचा वारा सुटत होता. मी आणि स्मिता हेलकावे घेत होतो. आम्ही ठरवल की एकमेकिंचा हात धरून ट्रेक करायचा. जिथे सखल, सपाट भाग होता, चढाई नव्हती तो भाग मी आणि स्मिता झपाझप चालून, प्रसंगी पळून पार करत होतो.

मी नाईट ट्रेक केला होता आणि काही आठवण्याचा प्रयत्न करत होते. दोन पॅचेस मला आठवले. जिथे खोल दरीत उतरल्यासारख मला वाटलं होत. यावेळी टेकड्या संपल्यानंतरच जंगल टणटणीच्या फुलांनी बहरलं होत. त्याचे काटे टोचू नयेत म्हणून काळजी घ्यावी लागत होती.

पहिल्या दोन टेकड्या पार करताना जीव अर्धमेला झाला होता. पण नंतरच्या टेकड्याची खासकरून’ शेवटच्या २-३ टेकड्याची चढाई अति तीव्र वाटली नाही. ह्या टेकड्या पार करताना फार दम लागला नाही, फार त्रास झाला नाही. दिवसाचा ट्रेक असल्याने पुढची टेकडी स्पष्ट दिसत होती आणि तिची चढाई बघून तितकसं मानसिक दडपण पण आलं नाही. यावेळी सखल, सपाट भाग थोडा जास्त वाटला. इथे गुरे चरायला येत असल्याने पायवाटा झाल्या आहेत. मी विचार करत होते मला असं का वाटतय की जणू टेकड्याचं कमी झाल्या आहेत. टेकड्या तर कमी होऊ शकत नाहीत... मग? मला ट्रेक अंगवळणी पडलाय, ट्रेक करण्याच तंत्र सुधारलय, मानसिक तयारी चांगली झालीय.......

संपूर्ण ट्रेक दरम्यान निसर्गाचा अलौकिक रूप बघायला मिळत होतं. आजूबाजूचे डोंगर हिरव्यागार वनश्रीने नटले होते. कधी पाऊस तर कधी उघडीप, डोंगरावर कधी छाया तर कधी निळाशार प्रकाश...ट्रेक मधील सपाट भागावर पांढ-या-पिवळ्या रंगाची फुले फुलली होती. हिरव्यागार रंगावर पांढ-या-पिवळ्या फुलांचा गालिचाच जणू! एक वेगळ्या प्रकारचं फुलं बघायला मिळालं. जमिनीवर हिरवगार पान आणि पानातून कोंब येऊन उंच दांडीला फुल फुललं होत. ट्रेकच्या वाटेवर जळू, पैसा, गोगलगाय, मृगाचा किडा, खेकडे भरपूर बघायला मिळाले. हिरव्यागार धरतीवर गायी चरताना पाहून तर स्वित्झर्लड मधील गवताळ कुरणाचीच आठवण येत होती!

या ट्रेक मध्ये प्रशांत शिंदे नावाच्या मुलाची ओळख झाली. “मॅडम पाणी घ्या.”म्हणत पाण्याची बाटली/सिपर तो पुढे करायचा. अवघड ठिकाणी हाताचा आधार द्यायला तत्पर. खाऊ म्हणून त्याने डब्यात काकडी, सफरचंद, टोमॅटो आणि बीटाच्या फोडी आणल्या होत्या. मी इतके ट्रेक्स केले पण पहिला असा मुलगा बघितला ज्याने असा हेल्थी खाऊ आणला होता. हा आलेख एक मुलगा होता ज्याने माथेरान ट्रेक मध्ये एक मोठा डबा भरून मोड आलेले हरभरे (हाय प्रोटीन) आणले होते. अन्यथा बहुतेक मुले-मुली लेजची पाकिटे, बिस्किटे, कुरकुरे, चिवडा ई. असा खाऊ आणतात. प्रशांतचा खाऊ पाहून मी चक्रावलेच. कौतुकचं वाटलं मला. पाण्याला पूरक असा त्याचा खाऊ! मनात आलं आतापर्यत ट्रेक दरम्यान बघितलेल्या मुला-मुलींमध्ये हा एकचं असा मुलगा आहे ज्याला ट्रेक दरम्यान काय खायचं ह्याच ज्ञान आहे!

ट्रेक दरम्यान स्मिता आणि माझी चांगलीच दोस्ती झाली. संपूर्ण ट्रेकभर सोबत करून तिने माझी काळजीच नाही घेतली तर तिच्या वयाला मला समरूप करून घेण्यात ती यशस्वी झाली! हॅपी गो लकी वाटली ती! तिच्या वर्णनावरून मी कांद्याची भजी आणि साखर मिश्रित दह्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. नाहीतर मी विचार केला होता की आधीच पावसात भिजलेय, ओलेचिंब कपडे अंगावर आहेत., गार वा-यामुळे थंडी वाजतेय तर मी दही खाणार नाही. पण ह्या मुलीमुळे दह्याची तीन मटकी मी खल्लास केली! तिच्या कम्पनीचा मी इतका आनंद घेतला की चेहऱ्यावर स्मित हास्य येणारच!

एक लीडर कसा असावा हे विशालच्या रूपाने मी ह्या ट्रेकमध्ये बघितल. सुरुवातीपासून तो त्याच्या विचारावर ठाम होता, सात तासात ट्रेक पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेऊन जरी तो आला होता तरी वेळेचं त्याने केलेलं व्यवस्थापन जबरदस्त होत! ट्रेक दरम्यान कुठेही त्याने घाई केली नाही, आमची चालायची गती तो स्वीकारत होता, उशीर झालाय असं वाटून चलबिचल होत नव्हता, ठरवलेल्या वेळेत ट्रेक पूर्ण होईलचं असे नाही ही लवचिकताही त्याच्या वागण्यात दिसत होती, आरामासाठी थांबला तर घड्याळात बघायचा आणि अपेक्षेनुसार वेळ झाल्यावर ट्रेक सूरु करायचा!

सांगायला अभिमान वाटतो की आमचा ट्रेक सात तासात पूर्ण झाला! कौतुक ह्याच की माझ्या चालण्याचा गतीचा अंदाज घेऊन विशालने मांडलेल गणित एकदम अचूक निघाल! सिंहगडावर विशालने जेव्हा सात तासात ट्रेक पूर्ण केल्याच सांगितल तेव्हा सर्वांनी आनंदाचा जल्लोष केला!

विशालच्या लीडरशीपला तोड नव्हती. वाटलं हा मुलगा आणि त्याची टीम एस.जी. ट्रेकर्सला एक दिवस असीम उंचीवर घेऊन जाणार आणि तो दिवस फार दूर नाही!!
थ्री क्लॅप्स-थ्री टाईम्स देऊन सर्वांनी क्षितीज आणि माझ अभिनंदन केलं. क्षितीज ७ वर्षाचा आणि मी ४८! आणि सात तासात ट्रेक! आहे ना भन्नाट गोष्ट!

मी तर जणू सातव्या आसमानावर होते. एक क्षण होता मी माघार घेणार होते आणि एक क्षण होता मी सिंहगडावर होते! केटूएस दिवसा करण्याची प्रबळ इच्छा हे कारण मानलं तरी ट्रेक दरम्यान मिळालेलं सर्वांच सहाय्य, प्रोत्साहन हे ट्रेक पूर्ण करण्यामागे महत्वाचे होते!

मला वाटत प्रत्येकाने नाईट आणि डे ट्रेक करून बघावा आणि कोणता ट्रेक जास्त भावतो ते ठरवावं. फुफुसाची क्षमता दोन्ही ट्रेकमध्ये अजमावता येते. मला तर डे ट्रेक जास्त भावला! नाईट ट्रेकच्या तुलनेत इथे निसर्गाचा आनंद जास्त घेता आला. वेगवेगळ्या वनस्पती, फुले, डोंगर, द-या, नाले, कीटक, गुरे.....सर्व काही..२-३ पाऊस पडून गेल्यावर, पावसाळा संपल्यानंतर किंवा हिवाळा हे ऋतू डे ट्रेक साठी सर्वोत्तम!

नाईट आणि डे ट्रेक मुळे मला माझी एक नवीन ओळख झाली. स्वत:तील क्षमतांची जाणीव झाली होती. शारीरिक आणि मानसिक रित्या आपण फीट आहोत ही भावना समृद्ध करणारी होती. स्वत:चा अभिमान वाटत होता!

“स्वत:ला स्वत:च्याच प्रेमात पडणारा, स्वत:च्या नजरेतून 
स्वत:ची प्रतिमा उंचावणारा” असा हा केटूएस ट्रेक आहे! सेल्फ एस्टीम जर वाढवायचं असेल तर एकदातरी केटूएस ट्रेक जरूर करावा!

रात्री ८ वाजता घरी पोहोचले. गरमागरम पाण्याने स्नान केले आणि गरमागरम दुध पिले. ट्रेकचा थकवा घालवण्यासाठी आणि दुस-या दिवशी ताजेतवाने होण्यासाठी मला दोनच गोष्टी लागतात, साखर घालून गरमागरम दुध पिणे आणि छानशी ६-७ तासांची शांत झोप! बस्स....दुस-या दिवशी एकदम फ्रेश...नो थकवा...नथिंग......

सात तासात केटूएस आणि तो ही दिवसाचा...भर पावसात....वाव....एक अविस्मरणीय अनुभव!

दुस-या दिवशी विशालने पाठवलेल्या मेसेज शिवाय हा अनुभव पूर्ण होऊच शकत नाही. शिव ने तर खास वैयक्तिक मेसेज पाठवला. स्मिता आणि माझ्यातील संवाद तर अफलातुनच!

२९-३० जुलै २०१६ रोजी होणाऱ्या केटूएस स्पर्धेत जरूर भाग घ्या. भाग घेतलेल्यांना माझ्या शुभेच्छा!
Post a Comment